सद्गुरू: परिपूर्णता ही काही कुठल्या कृतीतून मिळवता येत नाही. जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला लक्षात येईल की आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर तुम्हाला असे वाटले होते की, “अमुक असे झाले, तर माझे जीवन सफल होईल.” जेव्हा तुम्ही लहान होतात तेव्हा तर तुम्ही असा विचार केला असेल की, “जर मला हे खेळणे मिळाले तर माझे जीवन अगदी सफल होईल.” ते खेळणे मिळाल्यानंतर काही आठवड्यातच तुम्हाला त्याची पर्वा राहिली नाही. आणि जीवन काही सफल झाले नाही. शिकत असताना तुम्हाला वाटले असेल की परीक्षेत पास झालो तर माझे आयुष्य सफल होईल. ते झाले पण आयुष्य सफल काही झाले नाही. मग तुम्ही विचार केला असेल की, शिक्षण पूर्ण झाले की माझे आयुष्य सफल होईल. शिक्षणही झाले. मग विचार आला की, स्वतःच्या पायावर उभे राहू शकला नाहीत तर शिक्षणाचा काय उपयोग? तेही झाले. तीन एक महिन्यात तुम्ही विचार केला असेल की, गाढवासारखे नुसतेच काम करून काय उपयोग? तुमच्या मनात घर केलेल्या मुलीशी/मुलाशी लग्न केल्यावर जीवन सफल होईल. तेही झाले, आणि मग तुम्हाला माहीतच आहे काय झाले!

जेव्हा एखादा मनुष्य अशा अवस्थेत पोचतो की त्याला स्वत:साठी कुठलीही कृती करण्याची गरज उरत नाही आणि तो केवळ बाह्य जगात जे गरजे आहे त्यासाठी आवश्यक ती कृती तो करतो, तेव्हा तो मनुष्य परिपूर्ण झालेला असतो.

ज्या काही कृती केल्या असतील, पण जीवनात सार्थकता लाभलेली नाही. सार्थकता ही काही कोणत्या कृतीने लाभणार नाही. जेव्हा तुम्ही आतून परिपूर्ण व्हाल, तेव्हाच जीवन सफल होईल. जर तुमचे आंतरिक स्वरूप अबाधित असेल तर तुमचे जीवनही अबाधित असेल. आणि मग, तुम्ही डोळे बंद करून बसलात काय किंवा वेगवेगळ्या कार्यकृती केल्यात काय, कोणत्याही स्थितीत तुमचे जीवन परिपूर्ण असेल. जेव्हा एखादा मनुष्य अशा अवस्थेत पोचतो की त्याला स्वत:साठी कुठलीही कृती करण्याची गरज उरत नाही आणि तो केवळ बाह्य जगात जे गरजे आहे त्यासाठी आवश्यक ती कृती तो करतो, तेव्हा तो मनुष्य परिपूर्ण झालेला असतो.

तुम्ही एकामागून एक कृती का करत आहात याचा जरा विचार करा. ते परिपूर्णतेसाठीच. जे लोक गरजे बाहेर, अतोनात कृती करतात, त्यांना जर विचारले की ते सगळी धडपड का करत आहात, तर ते म्हणतील की, काय करू? अन्न, वस्त्र, निवारा, नवरा/बायको, मुलं – त्यांची काळजी कोण घेईल? पण खरं पाहता, जरी त्याच्या सर्व गरजा पूर्ण केल्या तरीही असा माणूस एक दिवस देखील शांत बसू शकत नाही. तो दोन-तीन तास देखील बसू शकत नाही. त्याने काही ना काही करायलाच हवं. याचे कारण तुम्हाला आंतरिक परिपूर्णता लाभलेली नाही आणि ती तुम्ही तुमच्या बाह्य कृतींमधून मिळवायचा प्रयत्न करत आहात. तुमच्या कार्यकृती उपजीविका किंवा सुखसोयी मिळवण्यासाठी होत नाहीयेत. त्या परिपूर्णतेच्या प्राप्तीसाठी होत आहेत. मग हे जाणीपूर्वक होत असो किंवा अजाणपणे, तुमच्या कृती तुम्ही अमर्यादतेचा शोधात आहात हे दर्शवतात.

जर तुम्हाला आंतरिक परिपूर्णता लाभली असेल, तर तुम्हाला बाह्य कृतीची काही गरज उरणार नाही. जर बाह्य जगात काही करणे गरजेचे असेल तर ती तुम्ही आनंदाने करता. जर त्याची गरज नसेल, तर तुम्ही डोळे मिटून गप्प बसू शकता. एखादी व्यक्ती, जेव्हा अश्या स्थितीला पोचते की तिला कृती करण्याची काही गरज राहिली नाही, तेव्हा आपण म्हणून शकतो की ती व्यक्ती अमर्याद झाली आहे. याचा अर्थ असा नाही की ही व्यक्ती काहीच कार्य करत नाही. जर बाह्य परिस्थितीची मागणी असेल, तर तो चोवीस तास देखील काम करू शकतो. पण त्याला आपल्या आंतरिक परिपूर्ततेसाठी कुठल्याही कृतीची गरज नाही. तो कुठल्या कृतीला बांधील नाही. कृती केली किंवा नाही त्याच्यात काहीही फरक पडत नाही.