सद्गुरू - एकदा एक डॉक्टर होते. त्यांना एका रुग्णाचं निदान करण्यात अडचण आली. मग सल्ला घ्यायला ते गेले ज्येष्ठ तज्ञाकडे. ते ज्येष्ठ तज्ञ म्हणाले, ‘ओह! नर्व्हस आणि उलट्या, हो ना? हं.’ ‘हो ना!’ तरुण डॉक्टरने उत्तर दिलं, ‘पण मला तर नर्व्हस आणि उलट्यामागचं काही वैद्यकीय कारण दिसत नाही.’ यावर ज्येष्ठ डॉक्टरने सुचवलं, ‘हे बघ, त्याला गोल्फ खेळायला सांग. तो खेळत असेल तर त्याला थांबवायला सांग आणि खेळत नसेल तर सुरु करायला सांग. तो अगदी ठणठणीत होईल.’ तब्येतीचं असंच असतं.

काही लोक खूप काम करतात पण त्यांची प्रकृती पण निरोगी नसते. काही लोक खूप कमी काम करतात, त्यांचीही प्रकृती निरोगी नसते. तुम्ही जर २०० वर्षांपूर्वीच्या काळात जगत असतात, तर आजच्या किमान २० पट अधिक अंगमेहनतीचं काम तुम्ही केलं असतं. सगळीकडे चालत गेला असता, प्रत्येक काम हाताने केलं असतं. इतकं काम तुम्ही केलं असतं तर मी तुम्हाला म्हटलं असतं की, घ्या थोडी विश्रांती, थांबा आता थोडं. परंतु, आज पाहिलं, तर बहुतांशी लोक आपल्या शरीराचा पुरेसा वापर करत नाहीत. शंभर वर्षांपूर्वी एखादी ६० वर्षाची व्यक्ती जे काम सहज करत असे, ते काम आजचा २० वर्षांचा तरुण मुळीच करू शकणार नाही. म्हणजेच, आपण सगळे अशक्त होत चाललेली मानव प्रजा आहोत. ह्या शरीराचा वापर करत राहाल तरच हे शरीर धडधाकट राहील. जितकं जास्त शरीर वापराल, तितकं जास्त सुदृढ ते होत जाईल.

चालणारे राजे!

काही वर्षांपूर्वी, काही लोकांना सोबत घेऊन मी निघालो पश्चिम घाटात ट्रेकिंगसाठी. हस्सन-मंगलोर टापूतला हा भाग आहे. मी तिथे भरपूर ट्रेकिंग केलं आहे, त्या जागेची सौंदर्य मोहिनी

काय आहे हे मी जाणून होतो. मोठ्या प्रमाणावर जंगली प्राणी, घनदाट जंगल असा हा जादुई परिसर आहे. त्या आधी बंगलोरला जाणारं नौसेनेचं एक हेलिकॉप्टर जंगल्यातल्या त्या भागात कुठेतरी कोसळलं होतं. शोध पथकांनी एरियल सर्च द्वारे चिक्कार प्रयत्न केले होते, परंतु ते हेलिकॉप्टर काही त्यांना सापडलं नव्हतं. त्यानंतर साधारण २०० जवानांची तुकडी सोबत घेऊन त्यांनी जंगल विंचरून काढायला सुरुवात केली. तरीसुद्धा काही आठवडे लोटल्यावर देखील त्यांना त्या हेलिकॉप्टरचा पत्ता लागला नाही. ते जंगल होतंच तसं घनदाट.

त्या भागातून पायी चालत जाणारे आम्ही साधारण ३५-४० जण होतो. खायला काही करणं ही कसरत होती कारण त्या दिवशी पाऊस सतत नुसता झोडपून काढत होता. दिवसभर आम्ही निव्वळ चालत होतो. त्या सैन्याच्या कॅम्पमध्ये आम्ही शिरलो आणि त्यांनी केलेल्या स्वैपाकाच्या सुवासामुळे न बोलावता जाऊन बसलो. शरीराला इतकं प्रचंड थकवल्यावरच अन्नाची खरी किंमत कळते. आम्ही सरळ चालत आत गेलो. त्यांचे कमांडिंग ऑफिसर अगदी उदार होते. त्यांनी मोठ्या आनंदाने आमचं स्वागत केलं, त्यांच्यात सामील व्हायला सांगितलं.

त्या तुकडीतल्या एका सैनिकाने आम्हाला आमच्या चालण्याचं कारण विचारलं. आम्ही म्हटलं की, आम्हाला चालायचं होतं म्हणून आम्ही चालत होतो. त्याचा तर विश्वासच बसेना. ‘उगाच?’ त्याने विचारलं. ‘गेले कित्येक आठवडे आम्ही इथे अडकून पडलो आहोत. कधी एकदा ही कटकट संपते त्याची वाट पाहत आहोत. त्या हेलिकॉप्टरच्या शोधापायी रोज किमान २० ते ३० किलोमीटर चालावं लागतंय आम्हाला आणि तुम्ही केवळ ‘वाटतंय’ म्हणून गमतीसाठी चालताय? कमाल आहे. त्याचा तर विश्वासच बसत नव्हता. ‘असं गमतीसाठी कोणी चालू शकतं का? आणि पायाला एव्हढे फोड झाले आहेत, अजून कितीतरी अडचणी आहेत.’ त्याला हे लक्षात येत नव्हतं की, जुलमापायी जो व्यायाम त्याला करावा लागत होता त्याच व्यायामाने त्याची तब्येत इतकी धडधाकट राहिली होती.

जीवनाला पूर्णपणे कार्यरत होऊ द्या

आरोग्याबाबतची सर्वात सोपी बाब म्हणजे शरीराचा वापर. शरीराचा पुरेसा वापर केलात की, निरोगी करण्याच्या दृष्टीने शरीरच सर्व काही करतं, त्याच्याकडे असतच ते सारं. मी तर म्हणेन की, आपण शरीराचा जितका वापर करणं आवश्यक आहे, तितका तो केला तर, ह्या ग्रहावरचं ८०% दुखणं तर पळूनच जाईल. उरलेल्या २०% दुखण्यापैकी १०% दुखण्याला लोक खात असलेलं वेगवेगळ्या प्रकारचं अन्न कारणीभूत आहे. त्यात जर बदल केलात तर हे १०% दुखणं

कुठल्या कुठे नाहीसं होईल. म्हणजे मग केवळ १०% दुखणं उरेल. त्यामागे अनेक कारणं आहेत. एकतर तुमची कर्मं, दुसरं म्हणजे वातावरण आणि त्याहून वेगळी कारणं असू शकतात जी ह्या प्रणालीत घडून गेली आहेत. त्यांचा मागोवा घेता येतो. आजारी असलेल्या लोकांपैकी ९०% लोकांचा आजार शरीराचा सुयोग्य वापर करण्याने आणि योग्य अन्न सेवनाने बरा होणारा आहे. उरलेल्या १०% ना योग्य प्रकारे हाताळता येईल. परंतु, तूर्तास आजारी पडण्याचं प्रमाण प्रचंड आहे आणि त्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे आपण योग्य प्रकारे खात नाही, किंवा योग्य प्रकारे खाल्लं तरी शरीर योग्य प्रकारे वापरत नाही.

जणू काही ‘आरोग्य’ ही आपली कल्पना असून आपणच आरोग्य निर्माण केलं आहे अशा थाटात लोक वावरतात. आरोग्य काही असं तुम्ही शोधून नाही काढू शकत. ती काही तुमची कल्पना होऊ शकत नाही. जीवन-प्रक्रिया जेंव्हा व्यवस्थित सुरु असतात तेंव्हा तुम्ही आरोग्यपूर्ण असता. तुम्ही जीवनाला जेंव्हा पूर्णत्वाने कार्य करू देता, तेंव्हा ते निरोगी असतं.

म्हणजे, तुम्हाला वापर करायचा आहे तो तुमच्या शरीराचा, डोक्याचा आणि ऊर्जांचा. ह्या तीन गोष्टी जर योग्य व्यायामाने समतोल ठेवता आल्या तर तुम्ही निरोगी व्हाल. माझ्याबाबतीत झालं आहे असं एकदा. खूप पूर्वी; भव स्पंदनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या कार्यक्रमात; जिथे मी कार्यक्रम घेत होतो, ती अगदी छोटीशी जागा होती. तिथली व्यवस्था अशी होती की, कार्यक्रमादरम्यान मला खूप वेळा पायऱ्यांची चढउतार करावी लागायची. एक दिवस, कार्यक्रम घेतांना मी सहज मोजलं, मला स्वैपाकघर सुद्धा सांभाळावं लागायचं, तर मी मोजलं की, वर

खाली करण्यात मी त्या पायऱ्या १२५ वेळा चढलो उतरलो होतो. तरीही कार्यक्रमाच्या शेवटी मला जराही दमल्यासारखं झालं नव्हतं. अचानक खूप काम केल्याने तुम्ही थकून जाल, परंतु जर तुम्ही, शारीरिक, मानसिक आणि ऊर्जेच्या रुपात कृती करत राहिलात-तर तुमच्या जीवनात आरोग्य येईल. तुमचं शरीर उत्तमरित्या कार्य करत आहे, तुमचं मन उत्तमप्रकारे कार्य करत आहे आणि तुमची ऊर्जा त्या दोघांनाही आधार देत आहे- काहीही वावगं होणार नाही ह्याची खात्री करत आहे- ह्याला आरोग्य म्हणतात. जीवन परिपूर्णतेने व्यतीत होत असतं, ह्याला म्हणतात आरोग्य.