व्यसनं दूर करायला योग फायदेशीर आहे का?
सद्गुरू येथे व्यसनाधीन होण्याचे मूळ कारण उलगडून सांगतायत. योगमार्ग इतक्या प्रचंड आनंदाचा अनुभव करून देऊ शकतो की व्यसन आपोआपच गळून पडेल.
प्रश्नकर्ता: सद्गुरू, मी व्यसनाधीन व्यक्तींसाठी काम करतो आणि अमेरिकेत असा समज आहे की व्यसनाधीनता हा एक आजार आहे आणि एखाद्या माणसाला एकदा व्यसन लागलं की तो नेहमीच व्यसनी राहतो. मला हे पटलेलं नाही. व्यसनामुळे शारीरिक परावलंबित्व येत असेल किंवा काही आजारही होत असतील पण हा काही कायमस्वरूपी लागलेला रोग आहे का?
सद्गुरू: कशाचं व्यसन आहे त्यावर ते अवलंबून असेल. कित्येक प्रकारची व्यसनं असतात - खाण्याचं व्यसन, अमली पदार्थांचं, मद्याचं, सेक्सचं, दु:खाचं, कुटाळक्या करण्याचं - बेशुद्ध वर्तनाचे कितीतरी प्रकार आहेत. आणि ही बेशुद्धी वेगवेगळ्या गोष्टींविषयी असू शकते. कुटाळक्या करण्याऱ्यांचं उदाहरण घेऊ- तुम्हाला वाटतं का की त्यांच्यावर इलाज होऊ शकेल? तुम्ही फार तर त्यांना विषय बदलायला लावू शकता. जर त्यांच्या कुटाळक्यांनी दुसऱ्यांना अपाय होत असेल तर त्यांना दुसऱ्यांना उपकारक अशा कुटाळक्या करायला शिकवू शकता. तर व्यसन हा आजार आहे का? कुठलीही बेशुद्वीची अवस्था जी तुमच्याकडून तुमचा निश्चिंतपणा, सहजता हिरावून घेते, त्या अर्थाने तो आजारच होय. तो कायमचा लागतो का? नाही. तुम्ही कायम जिवंत रहाल काय? मग व्यसन कायम लागून रहायचा प्रश्नच कुठे येतो?
वैयक्तिक पातळीवरील कल्लोळ
जे लोक असं म्हणतात की व्यसन हा आजार आहे आणि त्यानुसार त्यावर उपचार करतात, ते स्वत:च व्यसनाधीन आहेत - त्यांना एखादी गोष्ट एखाद्या पद्धतीनेच करायचे व्यसन असते. प्रत्येकजण या ना त्या प्रकारे या कल्लोळात सापडला आहे. सर्वांना लागू होईल असा इलाज काही प्रमाणातच करता येतो. बाकी प्रत्येक व्यक्तीकडे स्वतंत्रपणे पाहिले पाहिजे आणि त्या त्या व्यक्तीला आवश्यक तो उपचार केला पाहिजे. आपल्यात तेवढी काळजी आणि कळकळ आहे का की गरज पडल्यास त्या त्या व्यक्तीला स्वतंत्रपणे हाताळू शकू? आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना हा अधिकार कुणी दिला की दरवेळेस त्यांनी काहीतरी बेजबाबदार वागून अडचणीत यावं आणि इतरांनी त्यांच्यावर उपचार करावे अशी अपेक्षा करावी? हेही लक्षात घेतलं पाहिजे. या देशात (अमेरिकेत) बऱ्याच लोकांना असं वाटतं की वाटेल तसं, बेजबाबदारपणे वागून गोत्यात यायचा त्यांना अधिकारच आहे आणि सरकारने कसंही करून त्यांची सेवा केली पाहिजे. जर प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या कल्याणाची जबाबदारी घेतली नाही तर पृथ्वीवरील किंवा स्वर्गातील कुठलीच शक्ती त्यांना वाचवू शकत नाही. त्यांना जर असं वाटलं नाही की असं करणं इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा चांगलं आहे तर ते तसं काही करणार नाहीत. त्यांना वाटतं असं वागणं खूप छान आहे.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वत:च्या जीवनाविषयी जबाबदारीची भावना त्यांच्यात निर्माण केली पाहिजे आणि त्यांना अधिक चांगले पर्याय दाखवले पाहिजेत. नाहीतर ते मद्य आणि अमली पदार्थांचा पिच्छा सोडणार नाहीत. सध्या त्यांनी त्यांच्या आयुष्यात हीच सगळ्यात मोठी गोष्ट अनुभवली आहे. रविवारच्या शाळेत वगैरे त्यांना बोलावून ते या गोष्टी सोडणार नाहीयेत. अजून चांगले पर्याय त्यांना दाखवले पाहिजेत. आपण जर त्यांना असा मार्ग दाखवला की ज्याने त्यांनी आतापर्यंत जे काही अनुभवलं आहे त्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठा अनुभव त्यांना येईल, तर या फालतू गोष्टी ते ताबडतोब सोडून देतील.
माझ्या डोळ्यांत पहा. मी नेहमी नशेत धुंद असतो, उभ्या आयुष्यात मी कधी मादक पदार्थांना हात लावलेला नाही. प्रत्येकाला अशा तऱ्हेने नशेत धुंद राहता येणे शक्य आहे. त्याला ना पैसा लागत ना तब्येतीवर काही परिणाम होत. तुमची इच्छा असेल तर तुम्ही प्रचंड जागरूक होऊ शकता, इतके जागरूक की काही दिवस तुम्ही झोपणार नाही. तर, जोवर तुम्ही त्यांना काही अधिक चांगलं शिकवत नाही तोवर त्यांना जे मिळालंय ते ते सोडणार नाहीत. त्याने शरीराला अपाय होत असेलही पण त्याना वाटतं की इतरांपेक्षा त्यांना फार मोठा अनुभव येतोय - इतर लोक काय दिवसभर राब राब राबतात, घरी येतात, खातात, झोपतात नि परत कामावर जातात. त्यांना वाटतं की ही सगळी फालतूगिरी आहे आणि ते करतायत ती गोष्ट जास्त चांगली आहे. जेव्हा ते हतबल होतात, खचून जातात, तेव्हा कदाचित तुम्ही त्यांना कमी लेखता पण जेव्हा ते नशेत बेधुंद असतात तेव्हा ते इतरांना कमी लेखत असतात. त्यांना असं वाटलंच नाही की ही गोष्ट आजूबाजूच्या अनेक गोष्टींपेक्षा चांगली आहे, तर ते ती करणारच नाही. त्यांच्या दृष्टीने चांगली आहे ती गोष्ट. फक्त जेव्हा शरीरात काही बिघाड होतो, तेव्हा ते तुमच्याकडे येतात.
जर एखाद्याने अशा पदार्थाचा शोध लावला जो शरीराला जास्त अपाय करणार नाही आणि सतत तुम्हाला धुंदीच्या अवस्थेत ठेवेल, तर अख्ख्या जगातील लोक त्यापाठी धावतील. एका अर्थाने मानवी समाज अनेक लोकांसाठी जीवनाचा अनुभव समृद्ध करण्यात अपयशी ठरलाय. म्हणून तो मिळवण्यासाठी लोक वेगवेगळे विक्षिप्त मार्ग शोधून काढतायत. आपण असं काही त्यांना दिलं पाहिजे जे मादक पदार्थांपेक्षा जास्त प्रभावीअसेल आणि जे सर्वांना कल्याणाप्रत घेऊन जाईल.
तुमच्या मेंदूतले गांजेचे उद्यान!
मानवी मेंदूवर अलीकडेच झालेल्या संशोधनात काही अविश्वसनीय गोष्टी आढळल्या आहेत. एक इस्राएली शास्त्रज्ञ कित्येक वर्षं मानवी मेंदूशी संबंधित काही बाबींवर संशोधन करत होता. त्यात आढळून आलं की माणसाच्या मेंदूत गांजेविषयी संवेदनशील असणारे लक्षावधी चेतातंतू आहेत. नंतर न्यूरॉलॉजिस्टना (मज्जासंस्थेचे तज्ज्ञ) असं आढळून आलं की बारकाईने शरीराचं आणि मेंदूच्या रसायनसंस्थेचं निरीक्षण केलं, तर कळून येईल की एका दिवसात वेगवेगळ्या वेळी शरीर स्वत:चाच गांजा निर्माण करतं आणि मेंदूतल्या संवेदी चेतातंतूंना संतुष्ट करतं. समजा एखादी व्यक्ती परमानंदाच्या किंवा आनंदाच्या अवस्थेत आहे तर तिच्या शरीरात ही रसायनं तयार होतात ज्यांची मेंदू सतत वाट पाहत असतो. तर तुमचा मेंदूही तुम्ही आनंदी होण्याची वाट पाहत आहे-लक्षावधी गांजा-संवेदी चेतातंतू तुम्ही आनंदी होण्याची वाट पाहत बसलेत- तुम्ही बिड्या फुकाव्यात, मद्यपान करावे किंवा ड्रग्स घ्यावे म्हणून नाही!
केवळ ही मानवी प्रणाली अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्याची तयारी असेल तर शांत राहणे, चोवीस तास, सतत अत्युच्च कोटीच्या आनंदात मग्न राहणे प्रत्येक माणसाला शक्य आहे. तर त्यांना या रसायनाचा शोध लागला जे संवेदी तंतूंकडे जाते. पण त्याला काही नाव नव्हते. त्या शास्त्रज्ञाला कोणतेही नाव त्या रसायनाला द्यायचे स्वातंत्र्य होते. त्याला थातुरमातुर काही नाव द्यायचे नव्हते तर समर्पक नाव हवे होते.
भारतातले आध्यात्मिक ग्रंथ त्याने अभ्यासून पाहिले तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं की फक्त भारतातलेच आध्यात्मिक ग्रंथ आनंद, परमानंदाविषयी बोलतात. जगातले इतर कुठलेच धर्म आनंदाविषयी बोलत नाहीत. ते पाप, भीती, अपराध, शिक्षा वगैरे गोष्टींविषयी बोलतात. पण आनंदाचा उल्लेख इतरत्र कुठेही नाही. तर त्याने या गांजा संवेदी चेतातंतूंकडे जाणाऱ्या रसायनाचे नाव "आनंदामाईड" असे ठेवले. तर तुम्हाला इतकंच करायचं आहे की थोडंबहुत आनंदामाईड निर्माण करायचंय कारण आतमध्ये गांजेची अख्खी बाग आहे! तुम्ही जर नीट लागवड केली आणि तिची काळजी घेतली तर तुम्ही चोवीस तास नशेत धुंद होऊ शकता, तुमच्या बौद्धिक क्षमता अबाधित ठेवून!
केवळ ही मानवी प्रणाली अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्याची तयारी असेल तर शांत राहणे, चोवीस तास, सतत अत्युच्च कोटीच्या आनंदात मग्न राहणे प्रत्येक माणसाला शक्य आहे. योग विज्ञान तुम्हाला अशा प्रकारचा आनंद देते. योगींचा सुखोपभोगाला मुळीच विरोध नसतो. फक्त ते लहानसहान सुखांत समाधान मानणारे नसतात. ते अतिशय हावरट असतात. त्यांना ठाऊक असतं की पेलाभर मद्य रिचवून सुखद झिणझिण्या येतात खऱ्या पण दुसऱ्या दिवशी डोकेदुखी आणि इतर गोष्टी पण सोबत येतात. त्या सगळ्या गोष्टी त्यांना मान्य नसतात. याउलट चोवीस तास नशेत धुंद पण शंभर टक्के स्थिर आणि जागरूक, कारण नशेची मजा घ्यायला तुम्ही शुद्धीवर तर पाहिजे ना! तर नशेत पूर्ण चूर पण पूर्ण शुद्धीत. निसर्गाने तुम्हाला ही शक्यता बहाल केली आहे.