सद्गुरु: संपूर्ण जगाची वाटचाल ही एका विशेष प्रकारच्या विकृत मानसिक अवस्थेकाडे होत आहे, जी यापूर्वी कधीच नव्हती.. आधुनिक मानवाने त्याच्या शरीराचा मोठ्या प्रमाणावर वापर करणे थांबवले आहे येवढेच त्याचे कारण आहे. पूर्वी, आपण जेंव्हा शारीरिक हालचालींमध्ये स्वतःला पुर्णपणे गुंतवून घेत होतो, तेंव्हा तुमची बरीच ऊर्जा खर्च होत होती. तुमच्या मज्जासंस्थेमधील ऊर्जा खर्च केली जात होती. मला अशी अनेक माणसे माहिती आहेत, विशेषतः तरुण माणसे, ज्यांना मानसिक समस्या आहेत. त्यांनी दररोज पोहणे किंवा इतर कोणतातरी खेळ दररोज खेळायला सुरुवात केली आणि त्यानंतर सर्वकाही ठीक झाले. कारण पुरेश्या हालचाली केल्यामुळे, त्यांची ऊर्जा खर्च झाली.

माणूस आज यापूर्वी कधीही नव्हता येवढा निष्क्रिय बनला आहे. यापूर्वी शारीरिकदृष्ट्या येवढे निष्क्रिय बनणे त्याला परवडणारे नव्हते, फक्त जगण्यासाठी त्याला अनेक गोष्टी स्वतः कराव्या लागत असत. आता तो पूर्वीपेक्षा अधिक विकृत बनत चालला आहे. एक सर्वसामान्य घटना म्हणून, मनोरुग्ण पूर्वीसुद्धा होते, पण येवढ्या मोठ्या संख्येने नाही. आज समाजात ही एक सामान्य गोष्ट झाली आहे, की प्रत्येकाला काही प्रमाणात मानसिक विकार जडलेले आढळून येतात. तुमच्यात असलेली ऊर्जा खर्च केली जात नाही येवढेच यामागचे कारण आहे. ती अडकून पडली आहे. तुम्ही तुमचा वेडेपणा ओलांडून पुढे गेला नाहीत आणि त्याचवेळी तुम्ही कार्यरत सुद्धा नाही. त्यासाठी कोणती उपचारप्रणाली सुद्धा नाही. तुम्ही जर बाहेर पडून दिवसभर लाकडं तोडलीत –तुम्ही दर दिवशी शंभर ओंडके तोडले – तर तुमच्यातील बरीच ऊर्जा खर्च होईल, आणि आयुष्य शांतीपूर्ण होईल. पण आज तसे घडताना दिसत नाही. पूर्वी तुमच्या शरीराचा वापर ज्या प्रमाणात होत होता, तसा तो आज होताना दिसत नाही, त्यामुळे मग तुम्हाला आता ,पूर्वी कधीही होत नव्हते येवढ्या प्रमाणात सर्व प्रकारचे आजार होताना आढळून येतात.

तुमच्या शरीरात हे हळूहळू साठायला लागते. मग तुमच्या शारीरिक आणि भावनिक उर्जेला बाहेर पडायला काहीतरी वाट शोधायला लागते. आणि यामुळेच बार, क्लब, आणि डिस्कोथेक उदयाला आले आहेत. काहीही करून, कुठेतरी लोकांना त्यांचा मानसिक तणाव बाहेर काढायचा असतो. हे डिस्को म्हणजे वेड्यांचा बाजार वाटतो, तुम्ही तिथे धडपणे श्वाससुद्धा घेऊ शकत नाही. ती जागा धूर आणि घामाने भरून गेलेली असते, पण आतमधली लोकं मात्र बेभान झालेली असतात. तुम्हाला नाचतादेखील येत नाही, प्रत्येकजण एकमेकांना धडकत असतो, पण त्याने काही फरक पडत नाही, तरीही ते नाचतातच. नाहीतर तुम्ही वेडे व्हाल. म्हणून शनिवारी, तुम्ही आठवडाभर असलेले ताण तणाव दूर करायला तिथे जाता. मग पुन्हा एकदा ते जमा होऊ लागतात आणि पुन्हा एकदा शनिवार रात्रीची धुंदी येते.

वासनेकडून प्रेमाकडे जाणे

तुम्ही जेंव्हा प्रेम करता, तेंव्हा तुम्ही स्थिर बनता, आणखी कशाची गरज भासत नाही. तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य इथे बसून राहू शकता. वासना असेल तर तुम्ही कुठेच बसून राहू शकत नाही. एकतर तुम्ही एखाद्या वेड्या कृत्यात सहभागी होता, किंवा तुम्हाला हमखासपणे वेड लागते.

हा वेडेपणा सोडून देऊन पुढे जाण्याचा आणखी एक मार्ग आहे – तो पुर्णपणे मागे सोडून जाणे आणि पुढे निघून जाणे जिथे यापुढे तुम्ही त्याचा एक भाग बनून रहात नाही. ध्यानधारणा आपल्याला हेच शिकवते. आता, तुम्ही जर नाचलात, तर तुम्ही केवळ नाचाच्या आनंदासाठी नाचाल, मनातून काहीतरी बाहेर टाकण्यासाठी नाही. तुम्ही एखादी गोष्ट विसरून जाण्यासाठी नाचत असाल, कदाचित तो एक उपचार असू शकेल. तो एक चांगला उपचार आहे, पण त्यामध्ये एक प्रकारची कुरूपता आहे. ते वासनामय आहे. तुम्ही प्रेमाने नाचू शकत नाही. तुम्ही केवळ वासनेमुळेच नाचू शकता.

तुम्हाला प्रेम आणि वासना यातला फरक माहिती आहे का? वासना ही एक तीव्र गरज आहे. प्रेम ही गरज नाही. तुम्ही जेंव्हा प्रेम करता, तेंव्हा तुम्ही स्थिर बनता, आणखी कशाची गरज भासत नाही.तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य इथे बसून राहू शकता. वासना असेल तर तुम्ही कुठेच बसून राहू शकत नाही. एकतर तुम्ही एखाद्या वेड्या कृत्यात सहभागी होता, किंवा तुम्हाला हमखासपणे वेड लागते. जेंव्हा एखादा मानसिक आजार असतो, तुमच्यात एक विशिष्ट प्रकारचे वेडेपण असते, तेंव्हा तुम्ही फक्त वासनेतच असू शकता. तुमची वासना लैंगिक संबंधासाठी, अन्नासाठी किंवा इतर आणखी कुठल्याही विशिष्ट कामासाठी किंवा कुठल्या छंदासाठी असू शकते; ती कशाची वासना आहे याने काही फरक पडत नाही, पण तुम्हाला एखाद्या गोष्टीची वासना निर्माण होते. त्या वासनेशिवाय तुम्ही जीवंत राहू शकत नाही. तुमचे काम हेसुद्धा तुमच्या वासना बाहेर फेकून देण्याचे एक प्रभावी साधन आहे. आणि हा जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वमान्य मार्ग आहे. आज लोकं फक्त काम आणि कामच करत राहतात. ते काहीतरी विलक्षण निर्माण करतात म्हणून नव्हे, तर त्यांना फक्त कामच करायचे असते म्हणून. नाहीतर आणखी काय करायचे हे त्यांना माहितीच नसते.

तुम्ही या वेडेपणाचे जाणीवपूर्वक रक्षण करणे आवश्यक आहे. आपल्यामधे हे आहे असे कोणाला कधीही माहिती नसते आणि तुम्हाला स्वतःलाच ते विसरायला आवडेल. तुम्ही ते विसरून जाण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करता. जगातील सर्व प्रकारचे मनोरंजन तुमच्यातील वेडेपणा लपवण्यासाठीच आहे. तुम्ही जर अतिशय परिपूर्ण असता, तर तुम्हाला मनोरंजनाची गरजच भासली नसती. तुमचा वेडेपणा झाकून ठेवण्यासाठी तुम्हाला मनोरंजनाची आवश्यकता आहे. आम्ही जर तुमची मनोरंजनाची साधने काढून घेतली, तर तुम्हाला वेड लागेल. माणसाला त्याचे वेडेपण लपवून ठेवण्यासाठी मनोरंजनाची गरज असते. तो जर परिपूर्ण असता, तर त्याला मनोरंजनाची गरजच भासली नसती. तो निव्वळ बसून बांबू उगवताना पहात बसू शकला असता. त्याला मनोरंजनाची गरजच भासली नसती.