प्रश्न : समाजासाठी माझे कर्तव्य काय आहे हे मी कसे शोधू? मी 'बिझिनेस स्कूल'मध्ये गेलो, मला बहुराष्ट्रीय कंपनीकडून नोकरीची संधी आली आणि मी म्हणालो, "नाही, हे नाही, मला जे करायचे आहे ते आणखी बरेच काहीतरी आहे आणि ते काय आहे  हे शोधण्यासाठी मी इथे आलो आहे.

सद्गुरू : जेव्हा मी एका उच्च व्यावसायिक विद्यालयात गेलो तेव्हा मला धक्का बसला जेव्हा ते लोकांना शिकवत होते, “तुम्ही ज्या गोष्टी मोजू शकत नाहीत, त्यांना काही किंमत नाही.” नाही, ज्या गोष्टी तुम्ही मोजू शकत नाहीत, त्याच फक्त मौल्यवान आहेत. तुम्ही जे मोजू शकता त्याला आपल्या आयुष्यात अत्यल्प महात्व आहे. तुम्ही जे मोजू शकता ते मुळात तुम्हाला जे मिळू शकतं ते असतं. तुम्ही जे मिळवू शकता त्यातून तुम्ही उपजीविका चालवू शकता. पण त्यातून तुम्ही तुमचं जीवन घडवू शकत नाही. आपलं आयुष्य फक्त उपजीविकेसाठी व्यतीत करायचं आहे की  त्यातून जीवन घडवायचं आहे? प्रत्येक माणसाकडे हा पर्याय आहे.

आज दुर्दैवाने, बहुतेक लोकं उपजीविकेसाठी अख्ख आयुष्य खर्ची करतात कारण त्यांचं राहणीमानच इतकं अनैसर्गिक आणि महागडं आहे. ते एखादे घर खरेदी करतात, तीस वर्षे ते घराकडे तारण होतात - घर गहाण ठेवलं जात नाही, आपण घरासाठी तारण ठेवले जातो. ते एखादी मोटारगाडी खरेदी करतात, त्यासाठी दहा वर्षे तारण होतात. त्यांचे शैक्षणिक कर्ज फेडण्याससुद्धा पंधरा वर्षे लागतात. आजच वर्तमानपत्रातमध्ये काहीतरी बातमी आली आहे; ते सांगत आहेत की भविष्यात, आतापासून या ग्रहावर जन्मलेला प्रत्येक तिसरा मनुष्य १०० वर्षांपर्यंत जगू शकेल. आणि तो साधारणपणे ३२ वर्षांचा झाल्यावर शिक्षण पूर्ण करेल. तो ५० वर्षांचा होईपर्यंत शिक्षणाचे कर्ज फेडेल. ४५ वर्षांचा झाल्यावर त्याचे लग्न होईल. आणि ७० किंवा ७२ व्या वर्षी ते निवृत्त होतील. त्यानंतर पुढच्यासाठी ३० वर्षे अर्थातच त्यांचा आरोग्य विमा आहे. मग तो एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे चकरा मारत राहील.

...आणि अधिकाधिक सजग होणे, जागरूक होणे हा अगदी एकमेव मार्ग आहे जीवन अनुभवण्याचा

जर तुम्हाला यामधून जीवन घडवायचे असेल तर आपण समाजासाठी काय करू शकतो या दृष्टीने विचार करू नका. आपण स्वत: साठी खरोखर काहीतरी अद्भुत केले तर नैसर्गिकरित्या आपल्याला ते प्रत्येकासह वाटावेसे वाटेल, ते होणे अपरिहार्य आहे. खरोखर अत्भुत काहीतरी आपल्या वाट्याला आलं, तर आपल्याला ते इतरांबरोबर वाटावेसे वाटत नाही? फक्त ज्या गोष्टी आपण मोजू शकतो त्या आपल्याला इतरांबरोबर वाटण्याची इच्छा नसते. जीवनातले ते पैलू जे आपण मोजू शकत नाही, त्या अश्या गोष्टी असतात ज्या कधीही कमी होत नाही. आपण ज्या गोष्टी मोजू आणि मिळवू शकतो त्या गोष्टी नेहमीच संपून जातील याची भीती असते. जर आपण दहा लाख रुपये गोळा केले आणि ठेवले तर फक्त दहा लाखच आहेत अशी भीती असते, आणि जर आपण ते बाहेर आणले तर ते संपून जाईल. जर तुमच्या आत आनंद असेल, परमानंद असेल, जीवनाविषयी जाण असेल , आत्मज्ञान असेल, तर ते कधी संपून जाणार नाही हे तुम्हाला ठाऊक असते. म्हणून ते बंद करुन ठेवण्याची गरज नाही. आणि मग तेव्हाच  तुम्ही कुठेतरी पोहोचू शकता आणि जे करणे गरजेचे आहे ते करू शकता.

जगासोबत आपण आपल्या पसंती असे काहीतरी करू नये. जगासोबत आपण जे करायला हवे ते जगाच्या गरजेचे असावे, नाही का? जे आवश्यक आहे तेच केले पाहिजे, आपल्या आवडीनुसार नव्हे. नेहमीच याचा प्रचार केला जातो, विशेषत: पाश्चात्य समाजात. “आपल्याला जे आवडते ते करणे म्हणजे स्वातंत्र्य आहे.” आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे की आपल्या आवडी-निवडी हे एक प्रकारचे बंधन आहेत. जर तुम्हाला आवडते ते करता आले नाही, तर तुम्हाला त्रास होतो. तुम्हाला जे आवडत नाही ते करावे लागेल तर त्याचं दुःख होतं. हे एक बंधन आहे – हा एक सापळा आहे. तुम्ही तुमच्याआवडीनुसार तुमचे जीवन गुंतवत असाल तर तुम्ही एका खोल सापळ्यात अडकत आहात. आणि मग तुम्ही पाहाल की तुम्हाला जे आवडत नाही ते तुम्हाला सर्वकाळ त्रास देत राहील.

तुम्हाला काय आवडते याची चिंता करू नका. मुळात सगळ्यात आधी असं काही ठरवूनच ठेवू नका. फक्त जे आवश्यक आहे तेच करा. तुम्ही आवश्यक असलेल्या गोष्टी करीत असल्यास, सर्वकाही व्यवस्थित होते. सक्तीपूर्ण प्रवृत्तींचा प्रश्नच उद्भवत नाही. मग स्वाभावकपणे तुम्ही जागरूक व्हाल. तुम्ही नेहमी आवश्यक असलेल्या गोष्टीकडे पहात असल्यास तुम्ही खूप सजग व्हाल. आणि अधिकाधिक सजग होणे, जागरूक होणे हा अगदी एकमेव मार्ग आहे जीवन अनुभवण्याचा. जर तुम्ही कमीकमी जागरूक होत गेलात तर तुम्ही जीवनाचा अनुभव घेऊ शकत नाही. तुम्ही अधिकाधिक जागरूक झालात तरच तुम्ही जीवनाचा अनुभव घेऊ शकता. तुम्ही खरोखर जागरूक असलात, तर सर्वकाही विलक्षण होते. तुम्ही पूर्ण अजागारूक झालात तर हे मेल्यासारखेच आहे.

त्यामुळे कशा प्रकारचं आयुष्य हवंय हा निवडीचा प्रश्नच नाहीये; निवड ही जीवन आणि मृत्यू, यांपैकी आहे कारण 'जागरूकता' हाच एकमेव मार्ग आहे ज्यामुळे जीवन घडू शकते. अजगारूक असणे म्हणजे तुम्ही हप्त्यांमध्ये मृत्यूकडे वाटचाल करत आहात. आणि तुम्ही जे मोजू शकता त्यामध्ये तुम्ही जास्त गुंतवणूक केल्यास तुम्ही अधिकाधिक अजागारूक व्हाल. कर्नाटकात एक ऋषी होते, त्यांचे नाव अल्लामा-महा-प्रभु होते, एक अद्भुत ऋषी; त्यांनी हजारो कविता लिहिल्या. एका कवितेत ते शोक करत म्हणतात, जर माणूस बुडत असेल तर आपण त्याच्याशी बोलू शकतो. जर एखाद्या माणसाला साप चावला तर आपण त्याच्याशी बोलू शकतो. पण जो माणूस संपत्ती आणि पैशाच्या आहारी गेला आहे, त्यच्याशी आपण बोलू शकत नाही कारण तो प्रचंड अजागारूक झालेला असतो.

तुमच्याकडे काही पैसे असतील, तर बाकी गोष्टी थोड्या सोप्या आणि सुलभ बनतात. त्या पलीकडे याचा काही परिणाम होत नाही. जे तुम्ही तोलू-मापू शकत नाही, तेच नेमकं महत्वाचं आहे. म्हणून  ज्याचे तुम्ही मूल्यमापन करू शकत नाही त्यातच आपल्या जीवनाची गुंतवणूक करा. मग तुम्ही जे काही कराल, ते जगासाठी एक मोठे योगदान ठरेल.

सप्रेम आशीर्वाद