जेव्हा कृष्णाला विचारलं गेलं, "सत्याचं स्वरूप काय आहे?", त्यांनी म्हटलं , "जे विषासारखं वाटतं वास्तविक ते अमृत असतं आणि जे अमृतासारखं लागतं ते विष असतं".

आयुष्यात भरपूर उन्हाळे-पावसाळे अनुभवावे लागतात याची जाणीव व्हायला. फारच कमी लोकांना जास्त परिश्रम न करता हे उमजतं. बहुतेक लोकांना खूप खस्ता खाल्ल्यावर याची जाणीव होते. बहुतेक जणांना जेव्हा हे कळतं तोवर खूप उशीर झालेला असतो, त्यामुळे कळूनही काही करता येत नाही.

असं घडलंय का तुमच्यासोबत? तुम्ही सोळा वर्षांचे असताना जी गोष्ट तुम्हाला अगदी जबरदस्त वाटायची तीच गोष्ट तिसाव्या वर्षी तेवढी भारी वाटत नाही. आणि तिशीत जर हे तुम्ही घडू दिलं नाही, तर ती साठीत घडेल. ही आयुष्याची नाहक नासाडी आहे, भयंकर अपव्यय आहे हा! जीवनाच्या अनुभवातून तुम्ही जितकं वेगानं जाल, तितकं उत्तम.

एक म्हण आहे, 'अनुभव हा असा कंगवा आहे जो माणसाला तेव्हा सापडतो जेव्हा त्याचे सगळे केस गळून गेलेले असतात.' आणखी एक प्रादेशिक म्हण आहे, 'सगळे दात पडल्यावर माणसाला शेंगदाणे सापडतात.' तर मृत्यू जवळ येत असताना ज्ञानाची वृष्टी होण्यात काय अर्थ आहे, ती आत्ता झाली पाहिजे. जेव्हा तुम्ही तरुण आणि निरोगी, सशक्त आहात. आणि वृष्टी नव्हे तर ज्ञानाचा महापूर आला पाहिजे. तसं व्हायचं असेल तर तुम्ही तुमचे आकलन सुस्पष्ट करण्यावाचून पर्याय नाही.

तुमचं आकलन सुस्पष्ट करण्यासाठी तुम्ही पुरेसे प्रयत्न केले नाहीत तर ज्ञान होणं अवघड आहे. आकलन स्पष्ट नसेल तर गोष्टी प्रत्यक्षात जशा नाहीयेत तशा भासू लागतील. गोष्टी जशा नाहीयेत तशा दिसू लागल्या की तुम्ही अजाण आणि निरर्थक जीवन जगालपण कदाचित आणखी दहा जण तुमच्या गटात सामील असतील आणि तुम्ही दहाही जण त्याच त्याच मूर्खपणाच्या गोष्टी करत असाल अन् तुम्हाला वाटत असेल की हेच योग्य आहे. पण एके दिवशी तुम्हाला कळेल खरोखर योग्य काय आहे ते. माझी एवढीच इच्छा आहे की तो तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस नसावा.

रात्री २:३० वाजता शंकरन् पिल्ले बायकोला उठव म्हणाला, 'घरात काहीतरी विचित्र घडतंय. रोज रात्री घडतंय. मी विचार केला उगाच तुला त्रास नको द्यायला पण आता जास्तच होत चाललंय आणि आत्ताच मी पुरता घाबरून गेलो. तिनं विचारलं, 'अच्छा. काय घडतंय?' तो म्हणाला, 'रात्री लघवीला मी जेव्हा बाथरूमध्ये जातो तेव्हा दार उघडलं की आपोआपच लाईट लागतो‌.' ती त्याचा चेहरा ओरबाडून किंचाळली, "अरे गाढवा! म्हणजे आजवर फ्रीजमध्ये तू लघवी करत होतास काय?'

तर कृपा करून हे उमजून घ्या. शक्य तितक्या लवकर!

सप्रेम व सानुग्रह

Love & Grace