प्रश्न: नमस्कार, सद्गुरू तुमच्या ‘अनुपस्थिती’ ह्या कवितेत तुम्ही म्हणता की, “चाखून बघ काय आहे माझ्या नसण्यात” याचा अर्थ  काय?

सदगुरू: सृष्टीचे हे स्वरूपच असे आहे की इथे जे काही आहे किंवा प्रगट स्वरूपात अस्तित्वात जे काही आहे, ते खूप थोडं आहे. केवळ दृष्टीला ते दिसतं म्हणून ते प्रभावी वाटतं. परंतु तुमच्याजवळ जे नाहीये त्याचाच तुमच्या जीवनावर भारी पगडा असतो आणि तेच तुमचे जीवन नियंत्रित करत असते. तुम्ही त्याला इच्छा,आकांक्षा,ओढ किंवा शोध म्हणत असाल, पण तुमच्याकडे जे नाहीये तेच  तुमच्यावर अधिकार गाजवते आणि तुमच्या आयुष्याची दिशा ठरवते.

उपस्थिती आणि अनुपस्थिती याचा अर्थ कोणी इथे हजर किंवा गैरहजर असा समजू नका. मी जो कुणी आहे ते केवळ माझ्या अनुपस्थितीमुळे, माझ्या उपस्थिती किंवा हजेरीमुळे नाही. माझ्यासोबतचे लोक जे माझ्याबरोबर इथे दीर्घकाळापासून आहेत ते नेहमी माझ्याबद्दल एकतर गोंधळलेले असतात किंवा त्यांना वाटतं मी भ्रष्ट होत चाललो आहे, कारण मी अगदी योजनाबद्धरित्या ठरवून माझ्या आयुष्यात सतत बदल करत असतो जे आजच्या गरजेनुसार नव्हे तर भविष्यातील गरजेनुसार निगडीत आहे. आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी पूर्ण झालेली गोष्ट आहे. मी माझं व्यक्तिमत्व, माझं बोलणं, माझा पेहराव, माझी प्रत्येक गोष्ट मी उद्याच्या गरजेप्रमाणे घडवत असतो.

काही लोक जे गुरूमध्ये आपले स्थैर्य शोधत आहेत ते गोंधळून जात आहेत. एकेकाळी ज्यांनी चांगली व्यक्ती या दृष्टीने गुरूंची निवड केली, ते
नंतर विचार करतात की हे गुरु आता भ्रष्ट होत चालले आहेत; कारण दहा वर्षांपूर्वी ते जसे होते तसे ते आत्ता नाहीत. ते आत्ता तसे नाहीत हे खरं आहे कारण ते काही कोणी निर्जीव पाषाण नाहीत - ते एक जिवंत संभावना आहेत.

तुमचं मूल किंवा एखादं नारळाचं झाड दहा वर्षांपूर्वी ते जसं होतं तसंच राहिलेलं तुम्हाला चालेल की ते पूर्णतः बदललेले तुम्हाला हवेत? नक्कीच बदललेले हवेत. पण तुमचा गुरु मात्र तुम्हाला तो दहावर्षापूर्वी जसा होता तसाच तुम्हाला हवाय, कारण तुमच्या सुरक्षिततेची हमी म्हणून एका मजबूत पाषाणप्रमाणे तुम्ही त्याच्याकडे पाहत आहात. तुम्हाला पाषाण हवा असेल तर तसा एक पाषाण मी तुमच्या गळ्यात बांधतो. आणि मग तुम्ही जिथे जाल तिथे तो पाषाण तुमच्यासोबत असेल जेणेकरून नेहमी तुम्ही स्थिर असाल.

मुख्यत्वे, मी एका रिकाम्या पोकळी सारखा आहे, आणि तीच सगळ्यात मोलाची चीज आहे.

स्थायिक होण्याचा प्रयत्न करू नका. जेंव्हा आम्ही इथे आश्रमात प्रथम आलो आणि एका छोट्या इमारतीचे उदघाटन केले तेंव्हा तामिळनाडूच्या छोट्या गावांमधून आलेल्या काही स्त्रिया म्हणाल्या की मला इथे राहणे म्हणजे मला माहेरी आल्यासारखंच वाटतंय. त्या माहेर असं म्हणाल्या कारण सासर म्हणजे त्यांच्यासाठी नेहमी केवळ न संपणारी कामं आणि मुले जन्माला घालणे एवढंच असतं. हेच त्यांचे आयुष्य असायचं. माहेर म्हणजे त्यांच्यासाठी या दोन्ही पासून सुटका.

मी त्यांना याची जाणीव करून दिली की हे काही तुमचे माहेर नाही. आश्रम म्हणजे कुठली पळवाट किंवा सुट्टीचे ठिकाण नाही - हे एक संघर्ष करून स्वतःची उन्नती करून घेण्याचे ठिकाण आहे.  हे काही भावनिक आश्रयाचे किंवा तुमच्या नवीन पत्त्याचं हे ठिकाण नाही. खुशीने बेघर कसे राहावे हे इथे शिकायचे आहे. इथे आपल्या डोक्यावर  छप्पर आहे कारण आपल्याला त्याची गरज आहे. जर उद्या आपल्याला ही जागा सोडून जावे लागले तर विना तक्रार आपण येथून निघून जाऊ.

आश्रम आता फक्त एक निवारा नाही तर ती एक मोहीम आहे,  लाखों लोकांसाठी ती एक शक्यता आहे. म्हणून आपण त्याची काळजी वाहतो, पण हे काही कोणासाठी घर नाही. घर म्हणजे तुम्ही स्वतःसाठी एक प्रकारची ओळख, सोयी-सुविधा शोधत आहात आणि स्थायिक होऊ पाहत आहात. मला स्थायिक होणारे लोक आवडत नाहीत. जेव्हा तुम्हाला दफन किंवा दहन करतील तेव्हा तुम्ही स्थायिक व्हाल. तोपर्यंत तुम्ही सतत कृतीशील, प्रगतीशील असलेच पाहिजे. आणि हाच जीवनाचा उद्देश्य आहे - शेवटच्या घटकेपर्यंत सतत सक्रीय, कृतीशील असणे.

मी तुमच्यासाठी मौल्यवान आहे ते केवळ माझ्या नसण्यामुळे (अनुपस्थितीमुळे), कारण मी एका पोकळी सारखा आहे, सूर्यासारखा प्रज्ज्वलित आहे म्हणून नाही. गरज पडेल तेंव्हा मी तसा प्रज्ज्वलित सुद्धा होऊ शकतो पण मुख्यत्वे मी एका रिकाम्या पोकळी सारखा आहे, आणि तीच सगळ्यात मोलाची चीज आहे. या हॉलमध्ये भिंती आहेत, वर छप्पर आहे, खाली टाईल्स  बसवल्या आहेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यामधील ही पोकळी, ही मोकळी जागा. म्हणूनच तुम्ही इथे बसू शकताय. तर जे या हॉलबद्दल सत्य आहे तेच या ब्रम्हांडाबद्दलही खरं आहे, तेच माझ्याबाबतीतही खरं आहे आणि तेच तुमच्याबाबतीतही खरं व्हावं अशी माझी इच्छा आहे .

लोक असं म्हणताना तुम्ही असं ऐकलं असेल की अमुक एक माणूस आपल्याच गुणगाणात मग्न आहे. जेव्हा तुम्ही तुमच्याच गुणगाणात मग्न नसता तेव्हा तुम्ही अनुपस्थित असता, आणि असण्याचा हा एक अदभूत मार्ग आहे. आनंद लुटायला शिका तुमच्या नसण्याचा!

अनुपस्थिती

माझ्या उपस्थितीची जर तुझ्यावर पडली असेल मोहिनी
तर मित्रा, चाखून बघ माझी अनुपस्थिती!

माझ्या असण्याने जर कळला असेल तुला काही अर्थ
तर माझ्या नसण्याने आकळेल तुला परमार्थ

माझ्या असण्याने गेला असशील जर तू भारावून
तर घालशील लोटांगण माझ्या नसण्याने

ओथंबला असशील जर तू माझ्या कृपेत माझ्या असण्याने
तर पल्याड घेऊन जाईल तुला कृपा-अवकृपेच्या माझे नसणे

असणं माझं असेल जर धुंध सोमरस
तर नसणं माझं आहे दिव्य अमृतरस!

Love & Grace