मी? आणि संन्यास??

on-the-path-of-the-divine-maa-chandrahasa-maa-offering-flowers-to-sadhguru

माँ चंद्रहासा : “मला संन्यास घ्यायचा आहे.” मी उभे राहून अक्ख्या व्होलनेस प्रोग्रॅमच्या क्लाससमोर एके दिवशी जाहीर करून टाकलं! कदाचित मला जाणणाऱ्या सर्वांसाठी तो मोठा धक्काच होता. मलाही आश्चर्यच वाटलं कि मी असं बोलून गेले, कारण मला माझ्या भोवतीच्या सर्व गोष्टींशी, आणि सर्वजणांशी एक ऋणानुबंध तयार करायची सवयच होती. होलनेस प्रोग्रॅम मध्ये माझा हा गुण सर्वांसमोर आलाच होता.

एकदा सदगुरु प्रोग्रॅम हॉल मध्ये एक साप घेऊन आले आणि म्हणाले, “कोण या सापाची काळजी घ्यायला तयार आहे? तो अगदी मरायला टेकला आहे. तुमच्यापैकी कुणी जर काही दिवस त्याला खाऊ घालण्याची जबाबदारी घेतली तर तो कदाचित अजून जगू शकेल.”

त्यांना तो साप ईशा योगा सेंटर मधल्या कॅक्टस गार्डनमध्ये, एका झाडाखालच्या बिळात सापडला होता. तो चांगला ६ फूट लांब होता. आमच्यापैकी बहुतांश जण तर त्याच्या जवळही जायला तयार नव्हते, त्याची काळजी वगैरे घेणं तर लांबचीच गोष्ट!

हॉलमध्ये शांतता पसरली, आणि अचानक- “मी घेईन त्याची काळजी”- मी बोलून गेले. माझा विचार असा होता - जर सदगुरुंनी कुणाला काही करायला सांगितलं, आणि इतर कुणीही ते करायला तयार नसेल, तर मला ते करायचं असे, मग ते काम कसलंही असो! सदगुरूंनी तो नाग माझ्या हातात देऊन टाकला. मी त्याआधी कधी सापाला हातही लावला नव्हता, आणि हि इथे मी उभी होते, माझ्या हाताभोवती गुंडाळलेला ६ फूट लांब नाग हातात घेऊन! “जर त्यानं तुझ्याहातून खाणं बंद केलं तर त्याला जंगलात सोडून ये” सदगुरुंनी सांगितलं.

तो बिचारा अगदीच गरीबडा आणि झोपाळू नागोबा होता. मी त्याला कापडाच्या पिशवीत घालून कलासमध्ये एका जागी टांगून ठेवलं. व्होलनेस प्रोग्रॅमच्या काही विद्यार्थ्यांनी घाबरून मला धमक्याही दिल्या- “जर त्या सापाला बाहेर नाही नेलं तर तुलाही बाहेर हाकलून देऊ” म्हणून! सदगुरुंची तर त्यांच्या प्रतिक्रिया बघून खूपच करमणूक झाली, त्यांनी तर त्यांना उलट आणखीनच घाबरवलं “तो रात्रीच्या वेळी हळूच येऊन तुमच्या अंथरुणात झोपणारेय!” वगैरे.

संन्यासापर्यंत, मला वाटतं हा संपूर्ण प्रवास हा एक प्रत्यक्ष अनुभवच होता- जीवनाबरोबर सखोल असं एकत्वाचं, अद्वैताचं एक नातं निर्माण होण्याच्या प्रक्रियेचा!

एके दिवशी संध्याकाळी मी धनिकांडी (एक खेडं) च्या मुलांच्या एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठीचं संगीत टेपरेकॉर्डरवर ऐकत होते. मला सदगुरु आणि इतर काहीजण एकत्र कुठेतरी जाताना दिसले, आणि त्यांच्यातील एकाच्या हातात एक साप होता. “हा साप का बरं घेऊन चाललाय? नक्की काहीतरी भानगड आहे” माझ्या अंतःप्रेरणेन सांगितलं. मी टेपरेकॉर्डर वगैरे तिथेच सोडला आणि काय झालंय ते बघायला धावले. हा तोच साप होता ज्याची मी काळजी घेत होते... पण तो आता मेलेला होता. सदगुरुंना ज्या जागी तो पूर्वी सापडला होता, त्याच जागी तो मेलेला आढळला.

“प्लिज तो माझ्या हातात द्या” मी विनंती केली, पण ते मला द्यायला तयार होईनात. मी खूप पाठपुरावा केल्यावरच मग त्यांनी तो मला हातात घेऊ दिला. मी त्याला हाती घेऊन ओकसाबोक्षी रडले. तो माझ्या हातात, जेव्हा जिवंत होता तेव्हापेक्षा फारच विचित्र, वेगळा वाटत होता. तो जिथे सापडला त्याच्या जवळपासच आम्ही त्याला दफन केलं. मलातर असं वाटलं कि मी माझ्या स्वतःच्या पोटच्या पोराचंच आज दफन केलं आहे, कितीतरी वेळ मी तिथेच बसून होते.

तर अशी होते मी!

एक वर्ष आधी सुद्धा, माझ्या भावस्पंदन प्रोग्रॅमच्या वेळी, मी सदगुरूंसमोर बोलायला उभी राहिले होते. त्या वेळी ते माझ्या लग्न करण्याच्या इच्छेबाबत आणि खूप मोठं घर घेण्याबद्दल होतं. मी अगदी मला नवरा कसा पाहिजे, आणि घराचा माझा प्लॅन अगदी इंचाइंचाने सांगितला होता. त्यामुळे एकाच वर्षात मी पूर्ण यू-टर्न घेऊन तपस्यामार्गावर स्वतःला झोकून देण्याचा निश्चय करणं हे फारच अनपेक्षित होतं. पण खरी गोष्ट अशी होती कि माझ्या आत एक ज्वाला, एक आग पेटलेलीच होती...

“मरण्याआधी मला त्यांच्या हातून एकदा भगवी वस्त्रं (संन्याशांची वस्त्रं) मिळवायची आहेत” सतत ह्या विचाराचा भुंगा माझ्या डोक्याला लागलेला असे. आणि त्यात भर म्हणून कित्येक व्होलनेस प्रोग्रॅम चे विद्यार्थी आणि अगदी स्वतः सदगुरूंही मला ब्रह्मचार्याच्या विचारापासून परावृत्त करायचा सतत प्रयत्न करत होते, ही तर आणखी चिडचिड करायला लावणारी गोष्ट होती. पण माझा निश्चय दृढ होता, आणि अखेरीस सदगुरुंना हार मानवी लागली. मला ईशाच्या १९९५ च्या पहिल्या ब्रह्मचारी बॅच मध्ये ब्रह्मचर्याची दीक्षा देण्यात आली, आणि २००३ च्या पहिल्याच बॅच मध्ये संन्यासदीक्षाही देण्यात आली. संन्यासदीक्षेनंतर जेव्हा मला भगवी वस्त्रे सद्गुरुंच्या हातून मिळाली, मी अक्षरशः नखशिखान्त थरथरत होते. “खरंच हा असामान्य सन्मान मिळण्याची माझी लायकी तरी आहे का?” असा विचार माझ्या मनात राहून राहून येत होता.

व्होलनेस पासून संन्यासापर्यंत, मला वाटतं हा संपूर्ण प्रवास हा एक प्रत्यक्ष अनुभवच होता-जीवनाबरोबर सखोल असं एकत्वाचं, अद्वैताचं एक नातं निर्माण होण्याच्या प्रक्रियेचा!

“होलनेस” चा उंच झोका ....

ज्या अचाट प्रक्रियांमधून आम्ही जात होतो त्यांमुळे मी कधी गडबडा लोळत असे, कधी हातपाय झाडत असे, आणि कधीकधीतर चक्क त्या झोपडीला आतून आधार म्हणून उभी केलेली जी मेढ होती, तिच्यावर चढत असे.

“व्होलनेस” च्या काळात मी एका वेगळ्याच धुंदीत असे. कित्येक दिवस मी सेशनच्या वेळात सदगुरुंच्या पायाशीच बसून राही, आणि कधीकधीतर त्यांचे पाय सोडतच नसे. आणि जेव्हा मी त्यांच्या पायाशी नसे, तेव्हा ज्या अचाट प्रक्रियांमधून आम्ही जात होते त्यांमुळे मी कधी गडबडा लोळत असे, कधी हातपाय झाडत असे, आणि कधीकधीतर चक्क त्या कुटीला आतून आधार म्हणून उभी केलेली जी मेढ होती, तिच्यावर चढत असे. एकदा तर, प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सदगुरु कुटीतून निघून गेले, आणि माझी मात्र त्या मेढीवरून उतरता उतरता पुरेवाट झाली, कारण तोपर्यंत मी मेढीवरच शुद्धीवर आलेली होते.

कधीकधी सदगुरु त्यांच्या अधिभौतिक अस्तित्वाने मला अवाक करून सोडत. “मी २४ तास तुमच्यासोबत आहे” त्यांनी व्होलनेस च्या दुसऱ्या महिन्यात एके दिवशी आम्हाला सांगितलं. “ते घरी परततीलच ना? कसे काय ते २४ तास आमच्याबरोबर असू शकतील?” माझ्या मनात प्रश्न उभा राहिला. त्याच दिवशी रात्री, मला झोप लागतच होती, कि मला विभूतीच्या तीव्र, सुंदर सुगंधाने जाग आली. मी अर्धवट झोपेतच, “कुठून येत असेल बरं हा सुगंध” असा विचार करत पुन्हा झोपी गेले. पुन्हा त्याच सुगंधाने मला जाग आली. असं २-३ वेळा झालं. “केवढा वास पसरला आहे! कुणी बरं एवढी विभूती लावली आहे?” मी विचार केला. अखेरीस मी उठून बॅटरी हातात घेतली आणि तिचा प्रकाश सगळ्या झोपलेल्या लोकांच्या तोंडावर टाकत विभूतीच्या वासाचा शोध घेतला. पण मला काहीच सुगावा लागला नाही. कोड्यात पडलेली मी तशीच परत झोपी गेले.

दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या सेशन मध्ये पहिल्याप्रथम मी सदगुरूंना विभूतीच्या वासाबद्दल विचारलं. “मला कशाला विचारतेस? जा आणि तुझ्या बॅटरीलाच विचार!” सदगुरु म्हटले, आणि मी अवाकच झाले.

अनुत्सुक योगशिक्षक

माझ्यासाठी ईशा योगा शिकवणं ही एक फारच रहस्यमयी, गूढ प्रक्रिया आहे, कारण ती माझ्या हातून आपोआपच घडत जाते.

माझ्यासाठी ईशा योगा शिकवणं ही एक खूपच रहस्यमयी, गूढ प्रक्रिया आहे, कारण ती माझ्या हातून आपोआपच घडत जाणारी क्रिया आहे. व्होलनेस च्या दुसऱ्या महिन्यात सदगुरुंनी माझं नाव “शिक्षक प्रशिक्षणा” साठी देऊन टाकलं. जरी मला प्रशिक्षणात खूप मजा आली, आणि मी त्यात अगदी उत्साहानं भाग घेतला असला, तरीही जे काही होत होतं त्या साऱ्याचं मला सखोल आकलन होतंच असं नाही. जरी इतर लोक ईशा योगा क्लास च्या विविध पैलूंवर अगदी दिवस दिवस सखोल चर्चा करत असत, तरी माझ्यासाठी मात्र तो क्लास म्हणजे नुसता डान्सच होता. खरा सांगायचं तर, कधीकधी तर मला काहीच सुधरत नसे. तरी, शेवटी, कशीतरी एकदाची मी इशा योगा क्लास घेण्यायोग्य ठरले आणि मला शिक्षकपदाची शाल मिळाली. मी माझा पहिला क्लास “टाटाबाद हॉल” मध्ये १९९६ साली दिला.

सदगुरूंनी क्लास आपल्या ताब्यात घेतला

एकदा असं झालं, मी एका नवीन सहशिक्षिकेबरोबर क्लास घेत होते. आम्ही एका व्हॉलंटियरच्या घरी राहत होतो, त्याचं घर कलासच्याच बिल्डिंगमध्ये, पण वरच्या मजल्यावर होतं. एके दिवशी, त्या नव्या शिक्षिकेनं स्वतंत्रपणे क्लास हाताळायला शिकावं असं मला वाटलं, म्हणून मी सेशनच्या दरम्यान क्लास मध्ये गेलेच नाही, त्याऐवजी वरच्या मजल्यावर गच्चीतच थांबून राहिले. बाहेर रस्त्यावर काहीतरी गाणी वाजत होती. त्यातल्या एका मस्त गाण्यावर मी ठेका धरून गुणगुणायलाही लागले.

मी सटपटलेच! हा तोच दिवस होता ज्या दिवशी त्या फालतू गाण्यावर माझ्या पावलांनी ठेका धरला होता, जेव्हा त्या बाईंना माझ्या जागी सदगुरु बसलेले दिसले होते. “हा क्षण अपरिहार्य आहे”; मी पुटपुटले. “म्हणजे तुम्ही त्या-त्या क्षणात जगायला हवं, माँ” सदगुरुनी म्हटले.

थोड्या वेळाने काही व्हॉलंटियर धावत मला बोलवायला वर आले, क्लासमधली परस्थिती हाताबाहेर चालली होती. क्लासमधील एका बाईंचं शरीर क्लास मध्ये तयार झालेल्या विशिष्ठ ऊर्जांमुळे उत्तेजित होऊन नियंत्रणाबाहेर जाऊन तडफड करू लागलं होतं. त्यामुळे मला आत जावं लागलं. क्लासमध्ये पुन्हा शिस्त, शांतता प्रस्थापित झाल्यावर, नव्या शिक्षिकेनं पुढचा भाग शिकवायची मला काकुळतीने विनंती केली. दुसरा पर्यायच दिसत नसल्यामुळं मी गेले आणि शिक्षिकेच्या खुर्चीवर जाऊन बसले. ते रस्त्यावरचं ऐकलेलं गीत अजून माझ्या डोक्यात गुंजत होतं, आणि मी नकळत ते गुणगुणतही होते. जेव्हा विद्यार्थी आपापले अनुभव एक एक करून सांगत होते, माझ्या लक्षात आलं कि माझ्या पावलांनीं हळूच त्या गाण्याचा ठेका धरला होता. क्लास संपल्यावर त्या बाईंनी सांगितलं कि ‘त्यांना माझ्या जागी खुर्चीत स्वतः सदगुरु बसलेले दिसले, आणि मी जेव्हा सेशनच्या शेवटी मंत्रपठण करायला बसले, तेव्हा ते उठून निघून गेले’. असे अनुभव येत असतात लोकांना, म्हणून मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही.

आठवड्याभराने मी आश्रमात परत आले. जशी मी ट्रायंग्युलरल ब्लॉक मध्ये शिरले, माझी प्रत्यक्ष सदगुरूंशीच गाठ पडली! बाकी गोष्टी बोलता बोलताच त्यांनी एक विशिष्ठ तारीख सांगितली आणि प्रश्नाची तोफ डागली “या तारखेला सकाळच्या सेशनमध्ये तुम्ही कुठला क्लास शिकवत होतात?” मी सटपटलेच! हा तोच दिवस होता ज्या दिवशी त्या फालतू गाण्यावर माझ्या पावलांनी ठेका धरला होता, जेव्हा त्या बाईंना माझ्या जागी सदगुरु बसलेले दिसले होते. “हा क्षण अपरिहार्य आहे” मी पुटपुटले. “म्हणजे तुम्ही त्या-त्या क्षणात जगायला हवं, माँ” सदगुरु म्हटले.

माझ्या गुरुचं स्वप्न खेडोपाडी पोहोचवणं

भारतातल्या खेड्यांची अवस्था वाईट आहे... डोळे खोल गेलेले कुपोषित स्त्री-पुरुष- आपल्या कुवतीबाहेरची शरीरकष्टाची कामं ओढून काढत असलेले. कचरा-घाणीने भरलेले रस्ते, बाहेर उघड्यावर शौचाला बसणारे लोक, आणि हाडाडलेली, उधसलेली लहानलहान पोरं-पोरी.. भोवतीच्या अत्यंत गलिच्छ परिसरात तशीच खेळत असलेली. त्या अतृप्त, दुःखीकष्टी जीवनाचं रहाटगाडगं त्यांच्या इतकं सवयीचं झालेलं होतं, कि त्यांना नुसतं क्लासला यायला लावणं हेच मोठंआव्हान होतं.

१९९७ मध्ये, सांगायला अजूनही आनंद वाटतो, कि सदगुरूंनी मला तुरुंगातील स्त्रियांसाठी क्लास घ्यायला पाठवलं. पहिला दिवस म्हणजे अक्षरशः अग्निपरीक्षेचाच होता! पण बाकी दिवस मात्र एक महत्वाची जबाबदारी पार पडल्याच्या समाधानाने ओतप्रोत भरलेले होते.एकदा मी कोइम्बतूरमधल्या एका शारीरिक आणि मानसिक विकलांगांसाठीच्या अनाथाश्रमात २१ दिवसांचा क्लास घेतला. ते माझ्या आयुष्यातले सर्वात हळवे आणि हृदयस्पर्शी क्षण होते. २००३ मध्ये सदगुरूंनी मला तामिळनाडूच्या खेडोपाडी जाऊन “ऍक्शन फॉर रुरल रिज्युविनेशन (ARR)” चे कलासेस घ्यायचा आदेश दिला, ते म्हणाले “जा आणि त्या खेड्यांचा कायापालट करा. तिथले लोक आनंदी, स्वस्थ, आणि त्यांचा गाव हिरवागार होईल असं पहा. आणि त्यामुळे, प्रत्येक खेड्यात शिरताच मी सदगुरूंचं हे स्वप्न सत्यात उतरल्याची कल्पना करत असे.. तसं ते स्वप्न सत्यात उतरवणं हे काम सोपं नक्कीच नव्हतं. मी पाहिलं, कि भारतातल्या खेड्यांची अवस्था वाईट आहे... डोळे खोल गेलेले कुपोषित स्त्री-पुरुष- आपल्या कुवतीबाहेरची शरीरकष्टाची कामं ओढून काढत असलेले. कचरा-घाणीने भरलेले रस्ते, बाहेर उघड्यावर शौचाला बसणारे लोक, आणि हाडाडलेली, उधसलेली लहानलहान पोरं-पोरी.. भोवतीच्या अत्यंत गलिच्छ परिसरात तशीच खेळत असलेली. त्या अतृप्त, दुःखीकष्टी जीवनाचं रहाटगाडगं त्यांच्या इतकं सवयीचं झालेलं होतं, कि त्यांना नुसतं क्लासला यायला लावणं हेच मोठं आव्हान होतं.

on-the-path-of-the-divine-maa-chandrahasa-arr-activity

पहिल्या आठवड्यात गोबीचेट्टीपल्यमच्या व्हॉलंटियर्सच्या मदतीने मी ४५ गावातल्या जवळपास ५०० घरांना, त्या भागातल्या महत्वाच्या लोकांना क्लासला आमंत्रित करण्यासाठी भेटी दिल्या. ह्या वेगवेगळ्या गावांतल्या १२० महत्वाच्या लोकांनी अथणी इथे होणाऱ्या पहिल्यावहिल्या क्लाससाठी आपली नावे दिली. त्यांनी मग इतर लोकांना सहभागी करून घेण्यासाठी आम्हाला मदतही केली. महिन्याभरातच, मी दिवसाला तीन, कधीकधी तर चारचार क्लासेस घेऊ लागले होते. सहा महिन्यांत मी कुठल्याही सहशिक्षकांशिवाय, फक्त काही मूठभर व्हॉलंटियर्सच्या साहाय्याने तब्बल १०० क्लासेस घेतले.

माझी या सहा महिन्यातली रोजची दिनचर्या म्हणजे ३ क्लासेस, तेही वेगवेगळ्या गावांत घेणे, घरोघरी जाऊन वेगवेगळ्या गावांतल्या लोकांना क्लाससाठी बोलावणे, आणि उरलेल्या वेळात, कधीकधी तर मध्यरात्रीपर्यंत लोक त्यांच्या आयुष्यातल्या समस्या सांगत, त्या ऐकणे. “ते खूप काहीबाही सांगत बसतात, सदगुरु! मला त्यांच्या खाजगी समस्या ऐकत बसायचा वीट येतो.” मी एकदा सदगुरुंकडे तक्रार केली.

“खेड्यातली एकत्र कुटुंबपद्धती, सण-वार, चौकात भरणाऱ्या पंचायती वगैरे सर्व परंपरा, ज्या त्यांना एकमेकांबद्दलच्या भावना व्यक्त करायला मोकळीक देत, त्या परंपरा आता खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे आता तुझ्याकडे येऊन ते सारं मन मोकळं करताहेत हे त्यांच्या कल्याणासाठी खूप चांगलं आहे. करू दे त्यांना त्यांचं मन मोकळं. त्यांनी म्हटलं. मलाही दिसून आलं कि कित्येक गावकरी, केवळ गोष्टी माझ्यासमोर मोकळ्या मनाने व्यक्त केल्यामुळे नैराश्यातून बाहेर येत होते. त्यामुळे मग मी माझ्याकडून होऊ शकेल तितका वेळ त्यांच्यासाठी देण्याचं ठरवलं.

सदगुरुंनी आदेश दिल्याप्रमाणे मी दरवेळी वेगळ्या घरी जेवायला जात असे. “शक्यतो, कुणी जर तुला जेवायला घरी बोलावत असेल तर नाही म्हणू नकोस” त्यांनी मला एकदा सांगितलं होतं. ते लोक अत्यंत गरीब होते, पण त्यांना एका संन्यासिनीची सेवा करण्याची मनापासून इच्छा असे... परंतु त्यामुळे कित्येक वेळा मी अगदीच निकस जेवण जेवत असे. अनेक घरात मी त्यांना क्लासला बोलावण्यासाठी गेले असता ते लोक आतिथ्य म्हणून मला काही खाण्याचा आग्रह करीत, त्यांना मी “हो” म्हणेन अशी अपेक्षाच नसायची. पण मी हो म्हटल्यावर मात्र कळून येई कि त्यांच्याकडे फक्त कालचं शिळं अन्नच आहे, किंवा फक्त पातळ रस्सम-भात! मग त्यांना मला जेवणाचा आग्रह केल्याचं वाईट वाटे. पण मी मात्र त्यांच्याबरोबर आनंदाने जेवे, आणि मग त्यांची-माझी कायमची गट्टीच जमून जाई! खेड्यापाड्यांतील लोकांबरोबर राहण्याचा अनुभव कल्पनेपल्याड समृद्ध करणारा होता. ते अगदी साधेसुधे पण उत्तम आकलनशक्ती असलेले लोक असतात. हे खरं आहे कि मला नवनवीन क्लुप्त्या लढवून त्यांना क्लासमध्ये आणावं लागे, पण एकदा कलासमध्ये आले, कि ते पहिल्याच दिवशी त्यात पूर्ण समरसून जात. दुसऱ्या दिवसापासून त्यांचा सदगुरूंशी एक दृढ ऋणानुबंधच तयार होई, आणि क्लास संपायच्या दिवसापर्यंत तर त्यांच्यात आमूलाग्र बदल घडलेला असे. त्यांचं ते कष्टमय जीवन, आणि तरीही त्यांच्यात असलेली ती प्रेमभावना आणि त्यांच्यात होत जाणारा बदल, हा एक भारावून टाकणारा अनुभव असे. त्या तीन वर्षांत त्या खेडूत लोकांमध्ये राहण्याचा जो अनुभव होता, त्यानेच आत्ताच्या मला घडवलं असं मला वाटतं.

त्यातलेच काही अनुभव इथे सांगते आहे-

तो तब्बल १० वर्षांनी परत कामावर गेला

दहा वर्षांपूर्वी एका माणसाच्या डोक्यावर नारळ कि नारळाची झावळी (नक्की आठवत नाही) पडली होती, आणि तो कायमचा जायबंदी झाला होता. तेव्हापासून आजतागायत, त्याची बायकोच काबाडकष्ट करून कुटुंबाचं पोट भरायचा प्रयत्न करत होती. एके दिवशी तो ईशा योगा क्लासला येऊ लागला. दुसऱ्याच दिवसानंतर त्यानं सांगितलं कि त्याला तब्येतीत फरक पडलेला जाणवू लागला होता, त्याला आता परत कामाला जावंसं वाटू लागलं होतं. मी त्याला सुरुवातीला जरा सबूरीचा सल्ला दिला, पण पाचव्या दिवसापर्यंत तो कामावर रुजूही झाला होता.

१० दिवसांची साधना राहिली

या अद्भुत माणसाकडे पाहून मी अक्षरशः अवाक झाले. वयाने जवळपास ८० वर्षांचे असलेले हे आजोबा, यांना खाली मांडी घालून बसतानाही त्रास होतो, पण त्यांना आपली १० दिवसांची साधना हुकल्याचं दुःख होत होतं.

एक म्हातारा-म्हातारी सहसा भेटून जात असत. ते सदगुरुंना खूप मानत, आणि नेमाने साधना करत. अलीकडेच एकदा जवळपास दहा वर्षांनी मला काही कामानिमित्त त्या खेड्याला भेट देण्याचा योग आला, आणि मी त्यांना भेटायला गेले. आजोबा लगबगीने माझ्या स्वागताला आले. आज्जी तोपर्यंत देवाघरी गेल्या होत्या. आम्ही बोलत बसलो. आजोबांनी आज्जीच्या शेवटच्या आजाराविषयी सांगितलं आणि ते रडू लागले. त्यांच्या मुलांनी नंतर मला सांगितलं कि आज्जी गेल्यावर ते फक्त दोनच व्यक्तींसमोर रडले: एक- त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, आणि मी. त्यांची माझ्याबद्दलची इतकी आत्मीयता, जवळीक बघून मी भारावले. मग ते सारखी माफी मागू लागले. मी विचारलं, कशाबद्दल तुम्ही माफी मागताहात? “मी माझी साधना नेहमी अगदी नित्यनेमाने केली, एकही दिवस न चुकवता. पण ते दहा दिवस, जेव्हा माझी बायको मृत्युशय्येवर होती, तेव्हा मी साधना करू शकलो नाही.” या अद्भुत माणसाकडे पाहून मी अक्षरशः अवाक झाले. वयाने जवळपास ८० वर्षांचे असलेले हे आजोबा, यांना खाली मांडी घालून बसतानाही त्रास होतो, पण त्यांना आपली १० दिवसांची साधना हुकल्याचं दुःख होत होतं. मी त्यांच्यापुढे हात जोडले.

क्लासच्या बाहेरचा क्लास

एकदा एक दारू पिऊन धुंद झालेला मनुष्य क्लासला आला, आणि अर्थातच मी त्याला पहिल्या दिवशी क्लासमध्ये यायला मनाई केली. तो हॉलच्या बाहेर बसला, संपूर्ण क्लासभर बाहेर बसून श्रवणभक्ती केली. शिकवलेल्या सर्व क्रियाही त्याने बाहेरच बसून आपल्याआपण केल्या. दुसऱ्या दिवशी मात्र तो दारू न पिता क्लासला आला, मला म्हणाला “तुम्ही मला नाकारू शकत नाही. कालचा संपूर्ण क्लास मी बाहेर बसून अटेंड केला आहे.”

त्याच्या त्या प्रतिबद्धतेनं मला जिंकून घेतलं, आणि मी त्याला क्लासमध्ये यायची परवानगी दिली. मला वाटतं कित्येक वर्षांनी प्रथमच, ते सलग सात दिवस तो दारू प्यायला नाही. दीक्षाविधीने तर तो खूप भारावून गेला, नंतर कित्येक तास तो रडत होता. नंतर त्याने नियमितपणे आपली साधना केली, आणि अखेरीस तो त्याच्या दारूच्या व्यसनातून पूर्णपणे बाहेर पडला. त्याने पुन्हा कामावर जायला सुरुवात केली, आणि त्याची बायको जी त्याला सोडून निघून गेली होती, ती त्याच्याबरोबर नांदायला परत आली.

गुरु-आज्ञेच्या पल्याड

सहा महिन्यांनी मला इतर शिक्षकही येऊन मिळाले. मग आम्ही कामाचा विस्तार इतर अनेक खेड्यापाड्यांत वाढवू शकलो. खेड्यातले व्हॉलंटियर्स आणि गावकरी लोक इतके प्रेमळ आणि विश्वासू होते कि २००६ मध्ये, जेव्हा ८ लाख वृक्ष लावल्याबद्दल आम्हाला गिनीज रेकॉर्ड मिळालं, त्यावेळी एकूण संख्येच्या जवळपास १०%, म्हणजे ९०,००० वृक्ष लागवड आम्ही एकट्या इरोड जिल्ह्यातच केलेली होती! ह्याचा परिणाम म्हणजे, सदगुरुंच्या आदेशाशिवायच, मी त्यांना त्यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून ५० लाख वृक्ष लावायचा संकल्प केला. मी ह्यासाठी गावोगावी गेले. अर्थात, ते यशस्वी झालं नाही. आणि त्या धावपळीत माझी तब्येत इतकी खालावली कि शेवटी सदगुरुंनी मला तब्येतीची काळजी घेण्यासाठी आश्रमात परत बोलावून घेतलं. मग मी आश्रमातूनच ARR चं काम पाहू लागले. लवकरच चेन्नई ग्रामोत्सवाची उद्घोषणा झाली. त्यासाठी आम्ही शेकडो खेळाडूंना बोलावलं होतं. हजारो गावकऱ्यांनाही त्यांच्या स्वतःच्या खर्चानं यायचं होतं. पण संपूर्ण व्यवस्थापनाची, खेळांची वगैरे जबाबदारी घ्यायला कुणीतरी चेन्नईमध्ये असणं गरजेचं होतं. खेड्यातल्या लोकांशी माझे जिव्हाळ्याचे बंध असल्यामुळे मी सदगुरूंना “मी जाऊ का” म्हणून विचारलं. “ग्रामोत्सव नीट होईल माँ. तुम्ही इथेच राहा.” त्यांनी म्हटले. पण मी अगदी आग्रहच धरला, तेव्हा ते म्हणाले “ठीकाय, जा. पण नंतर तब्येत बिघडली म्हणून माझ्याकडे तक्रार घेऊन येऊ नका” आणि ते निघून गेले.

ग्रामोत्सव नेत्रदीपक रीतीने साजरा झाला, ५,००,००० हून अधिक लोक आले होते! मला एवढ्या अवाढव्य कार्यक्रमाचं व्यवस्थापन करण्यात आणि खेड्यापाड्यातून आलेल्या लोकांची काळजी घेण्यात खूप मजा आली. पण माझ्या परतीच्या प्रवासात माझी तब्येत खूपच बिघडली, इतकी, कि मला तातडीनं हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागलं, आणि सर्जरीचा सल्ला देण्यात आला. पण सदगुरुंनी सर्जरी करायला नकार दिला. त्यांनी मला काही विशिष्ठ डाएट आणि साधना सुरु करून दिली. ४० दिवसांनी मी जेव्हा पुन्हा चेकअप साठी गेलेलं, मी बरी झालेली होते. पण मी एक महत्वाची गोष्ट कायमची शिकले.

२००६ मध्ये मी पूर्णवेळ आश्रमामध्येच काम करू लागले, आणि काही वर्षांनी अक्षया आणि स्थानिक लोककल्याणाच्या कामांची देखरेख करू लागले. शिवांग साधना जेव्हा प्रथमच स्त्रियांसाठी सुरु करण्यात आली, तेव्हा सदगुरुंना मुख्यत्वे खेड्यातील स्त्रियांना तिचा लाभ करून द्यायचा होता. त्यामुळे मी परत स्त्रियांना साधना सुरु करण्यासाठी आणि उद्यापनासाठी आश्रमात यायला उद्युक्त रण्यासाठी गावोगावी फिरले. त्या वर्षी, म्हणजे २०११ ला थायपूसम च्या दिवशी १४०० स्त्रिया आश्रमात आल्या. मला ते पाहून अक्षरशः आनंदाने नाचावंसं वाटत होतं!

आजकाल मी ईशा फार्म ची काळजी घेते, जिथे आम्ही शून्य बजेट, आणि आंतरपिकाचं तंत्रज्ञान वापरून सेंद्रिय शेती करतो. मी हे तंत्रज्ञान “ग्रीनहॅन्डस वर्कशॉप” मध्ये शिकले होते. ती छोटीछोटी रोपं वाढताना पाहून आणि त्यातून येणारं उत्पादन अक्षयाला पाठवताना मला अवर्णनीय आनंद मिळतो! हे तंत्रज्ञान अप्रतिम आहे, मी फक्त गायी-गुरांचं शेण आणि गोमूत्र खत म्हणून वापरते. एका एकरातूनच आम्ही २.१ टन मुळा काढून पाठवलाय! ६५० किलो कोथिंबीर गेल्याच महिन्यात काढली, आणि लवकरच टोमॅटो आणि भेंडीही हाताशी येतेय. मला स्वतः शेतकरी असण्याचा एक सार्थ अभिमान अनुभवायला मिळतोय.

आंतरिक शक्तीच्या जडणघडणीचा प्रवास

पूर्वीच्या त्या गळेपडू, पोरकट मुलीच्या जागी, आताची मी- सर्व परीस्थितींपासून मनाने अलिप्त, तटस्थ; आणि तरीही २५ वर्षांपूर्वी असायचे तितकीच सर्व गोष्टींत पूर्णपणे समरस झालेली!

on-the-path-of-the-divine-maa-chandrahasa-meditating-under-tree

एकदा एका दुखापतीमुळे माझा उजवा हात असह्य दुखत होता. डॉक्टरांनी जर त्यावर आयोडीन वगैरे लावायचं म्हटलं असतं, तर मला नुसतं धरून ठेवायलाच चार लोक लागले असते, अशी अवस्था! माझी सहनशक्ती अगदीच कमी होती. त्यामुळे अर्थातच, जेंव्हा खूप दुखायला लागलं, तेंव्हा मी सदगुरुंकडेच धाव घेतली. त्यांनी त्याची उलट चेष्टाच केली, आणि वर ‘औषध घेऊ नको’ म्हणून सांगितलं, अगदी वेदनाशामकही नाही! तो आजार वाढून मला सर्वीकल स्पॉण्डिलायटिस झाला, आणि दुखणं अगदीच असह्य झालं. डॉक्टरांनाही नवल वाटायला लागलं कि हि बाई काहीच उपचार का करून घेत नाहीये! जेव्हा अगदीच सहन होईना, तेव्हा मी तिसऱ्यांदा सदगुरुंकडे गेले. सदगुरूंनी पुन्हा मला हसण्यावारी नेलं. पण यावेळी विजीअक्का माझ्या मदतीला धावल्या आणि सदगुरूंना आमचं ऐकावं लागलं. त्यांनी मला विशिष्ठ साधना करायला दिली, आणि दुखणं काही दिवसांतच बंद झालं. मला नवल वाटलं, ही साधना सदगुरुंनी मला सुरुवातीलाच का बरं नाही दिली? पण नंतर मलाजाणवलं, कि त्या दुखण्यानंतर माझ्या सहनशक्तीमध्ये खूप फरक पडला. अश्याच प्रकारे त्यांनी मला माझ्या कित्येक सीमा- मर्यादा, ज्या मला सतत खाली खेचत, त्या मोडायला भाग पाडलं. माझ्या ह्या परिवर्तनाची खरी कसोटी लागली जेव्हा मला माझ्या आईच्या मृत्यूची बातमी कळाली, तेव्हा! मला वेदना, दुःख जाणवलं, पण त्यापासून एक तटस्थ अंतरही जाणवलं, आणि शांतपणे मी माझ्या नेहमीच्या वेळापत्रकातल्या क्लासेसकडे वळले. त्यावेळी मला जाणवलं कि माझ्यात किती बदल घडून आला आहे. पूर्वीच्या माझ्यापेक्षा आताची मी खूप वेगळी आहे. पूर्वीच्या त्या गळेपडू, पोरकट मुलीच्या जागी, आताची मी- सर्व परस्थितींपासून मनाने अलिप्त, तटस्थ; आणि तरीही २५ वर्षांपूर्वी असायचे तितकीच सर्व गोष्टींत पूर्णपणे समरस झालेली! मी सदगुरुंचे आभार तरी मी कसे मानू? जेव्हा जेव्हा मी माझ्या मार्गापासून विचलित झाले, तेंव्हा तेंव्हा त्यांनी मला परत योग्य मार्गावर आणण्यासाठी आपला वेळ आणि आधार दिला. माझ्यासाठी सदगुरुच माझं सर्वस्व आहेत.

सदगुरुंच्या असीम कृपेची मी उतराई तरी कशी होऊ?