प्रश्नकर्ता: सद्गुरुजी, मला या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्सव ईशामध्ये येवढ्या मोठया जनसमुदायासोबत साजरा करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. पण माझ्या मनात कायम असा प्रश्न निर्माण होतो की आपण, विशेषतः भारतीय लोक देवापाठोपाठ आपले पालक आणि गुरु यांना अत्यंत पूजनीय मानतो, पण तरीसुद्धा आपण आपल्या गुरूंविषयी जेवढा आदर दाखवतो, तेवढ्याच उत्साहात आपण गुरुपौर्णिमेचा उत्सव मात्र साजरा करत नाही. याचे कारण काय?

सद्‌गुरु: या देशात गुरुपौर्णिमा आणि त्यासारख्या आध्यात्मिक महत्व असणार्‍या इतर अनेक गोष्टी काळाच्या पडद्याआड जाण्याचे कारण म्हणजे आपल्यावर अनेक वर्षे परकीयांनी राज्य केले आहे. आणि आपल्याला स्वातंत्र्य देताना त्या राज्यकर्त्यांनी आपल्यासाठी ज्या चौकटी आखून दिल्या, तेंव्हा आपल्यासाठी काय योग्य आहे आणि आपल्याला काय हवे आहे हे आपण लक्षात घेणे आवश्यक होते, पण आपण तसे केले नाही आणि त्यांनी घालून दिलेल्या नियमांच्या चौकटीच आपण आपले व्यवहार करत राहिलो. उदाहरणार्थ, या देशात प्राचीन काळापासून शेताची नांगरट करणारा शेतकरी आजसुद्धा सोमवारी सकाळी शेतात नांगर फिरवत नाही. हो की नाही? तामिळनाडु मध्ये आजदेखील ही प्रथा सुरू आहे. उत्तरेकडे ही प्रथा मोडीत काढलेली दिसते कारण हल्ली नांगरणीसाठी जनावरे न वापरता ट्रॅक्टरचाच वापर केला जातो.  तो खरेदी करण्यासाठी तुम्ही बँकेतून कर्ज काढलेले असते, त्यावर द्यायचे व्याज दररोज सुरूच असते, त्यामुळे तुम्हाला आठवड्यातील सातही दिवस ट्रॅक्टर शेतात कामासाठी घेऊन जावाच लागतो. ब्रिटिश जेंव्हा या देशात आले, तेंव्हा त्यांनी या सर्व पद्धती बदलून काढल्या कारण त्यांना हे माहिती होते की या देशाची ताकद त्यांच्या संस्कृतीत आहे. त्यामुळे त्यांना ही संस्कृती अतिशय पद्धतशीररित्या मोडून काढायची होती, आणि ती मोडण्यासाठी त्यांनी अतिशय हुशारीने मार्ग शोधून काढले. त्यांनी तुमची साप्ताहिक सुट्टी रविवारी करून टाकली. रविवारी तुम्ही काय करता, तुम्ही फक्त दिवसभर भरपोट खाता आणि टीव्ही पहात बसता, तुमच्याकडे त्यादिवशी करण्यासारखी इतर कोणतीही गोष्ट नसते. तसे करण्यामागे त्यांचा काहीतरी हेतु होता. बहुसंख्य जनतेला रविवारी सुट्टी घेऊन काहीही फायदा होत नाही. रविवारी करण्यासारखे काहीही नसते. त्या दिवशी काहीही घडत नाही. सोमवारी मात्र अनेक गोष्टी घडत असतात, पण तुम्हाला मात्र त्या दिवशी कामाला जावे लागते. पूर्वी अनेक वर्षे या देशात प्रत्येक पौर्णिमा हा मासिक सुट्टीचा दिवस असे.  पौर्णिमेच्या आधीचा एक दिवस, पौर्णिमेचा दिवस आणि त्यानंतरचा एक दिवस अशी तीन दिवसांची सुट्टी असे. अमावास्येचा दिवस आणि त्याआधीचा एक दिवस अशी दोन दिवसांची सुट्टी असे. अमावास्या आणि पौर्णिमा हे दोन दिवस आपल्यावर शारीरिकरित्या, मानसिकरित्या खूप मोठे परिणाम घडवून आणतात. अगदी आपला जन्म सुद्धा आपल्या आईचे शरीर चंद्राच्या चक्राशी सुसंगत होते म्हणूनच झालेला आहे, अन्यथा आपण आज इथे अस्तित्वातच नसतो. तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी घडत असतात, अगदी समुद्राला सुद्धा या दोन दिवशी मोठे उधाण येते आणि मोठमोठ्या लाटा उसळतात. आपले शरीर म्हणजे 70% पाणीच आहे, तर मग तुम्हाला असे वाटते का की आपल्या शरीरात या दोन दिवशी काहीच वेगळे घडत नसेल? म्हणूनच आपण या दोन दिवसांना आध्यात्मिक महत्वाचे दिवस मानले आहे. हे दोन दिवस तुम्ही कामावर जाणे अपेक्षित नाही, तर त्या दिवशी तुम्ही स्वतःवर लक्ष केन्द्रित करणे अपेक्षित आहे. त्यानुसार गुरुपौर्णिमा देखील या देशात खूप मोठ्या प्रमाणावर साजरी केली जात होती, पण आता मात्र तसे होत नाही कारण लोकांना कामावर जायचे असते. म्हणून माझी आपल्याला अशी विनंती आहे, आपण केंद्रीय मंत्री आहात, आणि एक केंद्रीय मंत्री म्हणून आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुट्टी द्यावी. प्रत्येक पौर्णिमेला सुट्टी देणे शक्य होणार नाही याची मला कल्पना आहे, परंतु किमान गुरुपौर्णिमेच्या दिवशी तरी केंद्र सरकारतर्फे सार्वजनिक सुट्टी देण्याचा प्रयत्न आपण करावा अशी माझी विनंती आहे. आणि तसे जर घडले, तर मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगतो की गुरुपौर्णिमेचा उत्सव संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल कारण त्या उत्सवाचा आत्मा अजून शिल्लक आहे पण तो व्यक्त करण्यासाठी जागा किंवा वेळ शिलक नाही. आपण जर ही एक गोष्ट करू शकलात, तर आपण या देशासाठी गुरुपौर्णिमेचा उत्सव हे पर्यटकांचे एक मोठे आकर्षण बनवू शकतो. भारताला आध्यात्मिक केंद्र बनविण्याविषयी मी आपल्याशी अगोदरच बोललो त्यानुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जगभरातील अनेक आध्यात्मिक प्रयटकांना येथे येण्यासाठी आकर्षित करू शकतो, त्यामुळे आपल्या कामाचा एक भाग म्हणून असे करणे सुद्धा अतिशय चांगले ठरेल.