सद्गुरुंसोबतचे काही अविस्मरणीय क्षण!

 

सद्गुरुनां मी दिल्लीत ६ कुशक रोड येथे भेटले आणि त्यांना प्रत्यक्ष ऐकलं आणि त्यांनी लिहिलेल्या इनर इंजिनिअरिंग या मराठी भाषांतरित पुस्तकाचे मनन केलं. मामा अविनाश बर्वेनी केलेल्या सहज व सुंदर भाषांतरांने ते खुप मराठी भाषिकांपर्यंत पोहचले आहे. Thanks to YouTube, मी रोज त्यांचा एक संकल्प ऐकत असे, आणि हे करताना नकळत त्यांच्या विज्ञाननिष्ट श्रद्धेशी जोडले गेले. प्रकाशचा कोयंबतूर प्रवास ठरला आणि मी पण जाणं पक्क केलं, कोरी पाटी घेऊन गेले. मुद्दामच वेबसाईट पाहिली नाही. भव्यतेचं दर्शन डोळ्यात साठवणे व गुगल प्रतिमा पाहणं यांत साठवाचा आठव निवडला.

विमानतळावर विविध प्रोटोकॉल्स येतात त्यातला एक ईशा फौडेंशनचे स्वयंसेवक विश्वनाथ व तेजल. तेजलने मराठीत संवाद सुरु केला आणि माझे कुतुहल तीने उलगडलं. ती मुंबईतली, MBA करून Executive Officer म्हणुन कामकरत होती आणि आता ईशाची पुर्णवेळ स्वयंसेवक आहे. मराठीतुन तीचे बोलणे साहजिकच होते.

गाड्या, प्रोटोकॉल्स सगळ्यासोबत निघालो. तीने पहिला स्टॉप सांगितला आदियोगी शिवचे महाकाय शिल्प. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी त्याचं उद्घाटन केल. गावं मागे पडत होती, समोर एका वळणावर वेस्टर्न घाट दिसायला लागला. घनगर्द झाडीवर काळा कातळ वेल्लिंगीरीच्या सप्तरांगाची भव्यता डोळ्यात मावत नव्हती.

मग अजुन एक वळण आणि समोरचं दृश्य स्तिमित करणारं.

गाडी थांबली.

पावलं तालु लागली त्या अदियोगीच्या दिशेने. भन्नाट वारा, भव्य शिल्प, काळाकुळकुळित आदियोगी, गळ्यातले रुद्राक्ष, डोक्यावरची चंद्रकोर, कानातील आभुषण, त्यानी धारण केलेला वासुकी नाग, हे नजरेत साठवत असतानाच माँ कनका, म्हणजे ईशाचे ब्रम्हचर्य स्विकारलेली डेन्टीस्ट मुलगी, आपलं सारं आयुष्य ईशासाठी समर्पित केलेली, त्या म्हणाल्या,

हे शिल्प ७०० टन स्टिलचे आहे, ह्याची रचना, जागा, आकार, सबकुछ सदगुरुंचं. त्या ठिकाणी निरंतर चालणारा मंत्रघोष: योग योग योगेश्वराय! भुत भुत भुतेश्वराय! काल काल कालेश्वराय! शिव शिव सर्वेश्वराय! शंभो शंभो महादेवाय!

हा एका रिदममधे, त्याचं ऊच्चारण सुद्धा सदगुरुंचं. आदियोगीच्या समोर एक प्राणप्रतिष्ठित शिवलिंग स्थापलेलं आहे ज्याला योगेश्वर लिंग असं संबोधलं जातं.

अदियोगींच दर्शन घेतलं, ते तेज मनात व मंत्रोच्चार कानात घेऊन निघालो. नजर जाईल तिथं पर्यन्त हलणारी ऊंच ऊंच नारळाची झाडे एका बाजुला, दुसरीकडून जाणारा रस्ता हिरव्या कुरणांचा, गाडीतून जाताना वेगवेगळ्या आलयांची नावे, मग स्वागत कक्ष, हजारो पर्यटक भारतभरातुन आलेले. विविध भाषा, वेषभुषा, शहरी ग्रामीण, तरुण वृद्ध; एरव्ही अरेरावी करणारी माणसे, ईथली शिस्त सहजपणे पाळत होते. चढेआवाज, रांग मोडण्याच हक्क, हे काहीही नव्हतं. हा फरक वास्तुचा आणि त्या वास्तुपुरुषाचा.

सद्गुरुंच्या एका दर्शनासाठी; त्यांनी निर्माण केलेल्या त्या वातावरणात राहण्यासाठी. स्वागतकक्ष सोडुन पुढे गेलो की कानात घुमला झिंन्नाट नाद; ढोल, डमरु आणि पुर्ण ग्राऊंडभर पसरलेले सळसळते तारुण्य. गोपाल कालाच्या मटक्या चोर गोपीं भन्नाट नाचत होते. हा नाच ऊत्साहाचा, चैतन्याचा, कुठेही बिभत्सपणा नाही. मुलं मुली एकत्र होते पण त्यात एक सन्मान होता. योग्य अंतर होतं. आम्ही हा अस्सल सणाचा आनंद उधाण पाहत होतो.

माँ कनका सांगत होत्या, आपल्या संस्कृतींत हे सणाचे संदर्भ समाज जोडण्यासाठी होतो. सद्गुरु इथे हे जाणीवपुर्क करतात. आजचा हा समारंभ ह्या ठिकाणी राहणाऱ्यांचा, इथे आश्रमात ३००० स्वयंसेवक आहेत. आमच्या सारखे ब्रम्हचारी, आजीवन व्रती, पुर्णवेळ, अल्पकाळ, हटयोगी, साधक शिक्षक, कोणी कोर्स करायला आलेले मग तिथेच रमलेले. प्रकाशच्या तिथे जवळ जाण्यामुळे मुक्तपणा आक्रसला असतां मग आम्ही अंतरावरुन ते दृश्य पाहिले, ती लय घेऊन थोडे अंतर गेले. नालंदा, ह्या वास्तू परिसरात आमची निवास व्यवस्था केली गेली होती. पुन्हा माँ कनकानी अधोरेखीत केलं, गाडी थांबली. समोर पुर्णबहरलेले बोगन वेल दारांवर झुकुन स्वागत करत होते.

दगडाचे सुबक छोटेखानी पात्र ताज्या फुलांनी सजलेलं होते. आत गेल्यावर विस्तीर्ण चौक, डाव्या बाजुला स्वागतकक्ष, त्या आधीच चपला काढून ठेवण्याच्या जागा व स्टॅन्ड.

इथे अनेक साधक अनवाणीच चालतात. विश्वनाथनी त्याचे कारण सांगितले की पृथ्वी तत्वाला स्पर्श करणे म्हणजे शरीरातील चक्र सक्रीय करणे. सारा परिसर नेहमी स्वच्छ असतोच आणि ह्या मातीचा सुगंध अनुभवा बिना चपल्लांनी. पण हे सक्तीचे नाही. माँ कनका पायजामा, सैल कुर्ता, ओढणी, केस पूर्ण भादरलेले आणि पायात फ्लोटर्स, अशी हसत मुखी, मुक्त प्रसन्न होती. आता ऊजव्या बाजुला कोर्टयार्ड, चपला काढुन वर प्रशस्त ओसरी, त्यात पुन्हा मोकळे प्रांगण. मधोमध ऊत्तम आसन व्यवस्था, वर जाणाऱ्या जीन्याला सुतळीची विण होती रेलिंग म्हणुन.

आत आल्यावर परत ओसरी, चौक, दोन बाजुला दोन कक्ष, मधे प्रशस्त भोजन कक्ष, बाजुला दिवाणे खास. इथे देखणेपणाची शर्यतच होती, एकाहून एक सुरेख वस्तु, त्याची परफेक्ट जागा; दगड, पाणी, लाकूड, लोखंड, नानाविध धातुंचामिलाफ, अफलातुनच. नालंदा कक्ष ऊघडला. नेटकी रचना, सोफा, पलंग, कपाट, टेबल. पण एकही गोष्ट एकदा पाहिन व सोडेन अशी नव्हती. आता चहाला पर्याय नाही. पाहुन डोळे निवले होते. चहानंतर कधी निघुया या प्रश्नांनी पुढचं कुतुहुल जाग झालं आणि अजुन अर्धा कप चहा वल्ली माँ नी दिला.

आता मध्यांतर

भाग दोन

सद्गुरुंबरोबर संवाद व सांस्कृतिक कार्यक्रम

वल्ली माँ, ह्या पण आजीवन ब्रम्हचारीणी, वय अदांजे ५०, ती सद्गुरुंबरोबर जोडली गेली २२ वर्षांपासुन. काळा सावळा तेज पुंज वल्ली माँ.

नालंदाची अन्नपुर्णा. तीच्या हातचा चहा मला आवडला. म्हणजे चहा सोबत नाचणीची बिस्किटे. मस्त भाजलेला ब्रेड. आस्वाद घेताना अंमळ रेंगाळणार, तोपर्यन्त माँ कनका आल्या, अजुन काही हवं का हे विचारतां विचारताच, आपण आता चाललो ध्यानलिंग व लिंग भैरवीच्या दर्शनाला. तिथून सद्गुरुंची भेट व आमचा संस्कृतीक कार्यक्रम.

कपडे बदलुन जरा आवरुन निघालो; लिंग भैरवीची प्रतिमा डोळ्यांसमोर होती; आमच्या दिल्लीतील निवासस्थानी सदगुरुंनी दिलेली. भव्य कपाळ ऊंचवटा, ठसठशीत कुंकु, आरपार पाहणारे डोळे, लक्षावधी हातांच बळ असणारे तीचे बाहु. रोज तीची पुजा होते. नमस्कार करताना जाणवते तीचा करारीपणा व स्वयंपुर्णता पण ध्यानलिंग विषयीची ऊत्सुकता घेऊन निघाले, सगळा परिसर गजबजेला होता. पण ना गडबड ना गोंधळ; मौनाचा संकेत, सारे स्वेच्छेने पाळताना दिसले. आम्ही चपला काढल्या, पादत्राणे न घातल्याने सोप्पं होत. विस्तिर्ण चौकात प्रवेश चौकटी आधी एक रंगीबेरंगी बांधलेले, ओढण्यानी सजलेले झाड. त्या शेजारी ध्यानलिंग मंदिरात जाण्याआधी माहिती केंद्र. त्या ठिकाणी असणारे हसतमुख तत्पर स्वयंसेवक योग्य मार्गदर्शन करत होते.

आमच्या बरोबर विश्वनाथ, माँ कनका. आम्हाला आत १५ मीनीटांचा अवधी होता. दगडी चौकटितुन आत प्रवेश केला, छान घडीव पायरी, दोन्ही बाजुंना उभे असणारे देशी व विदेशी स्वयंसेवक, नमस्कार करुन दिशा दाखवत होते. बाहेरुन दिसणारा गोल घुमुट, त्यावरचा पितळी कळस लखलखत होता. मंद दिवे लागले होते, संध्याछाया हळुहळु लांबत होत्या, आत गेल्या गेल्या एका बाजुला ग्रे रंगाच्या दगडी लक्षवेधक जीवन वृक्ष, त्याची सावली. ओसरी सारखा व्हरांडा, शांत प्रसन्नतेचे वातावरण, साधकांची हालचाल. ध्यानलिंगाच्या गर्भगृहामधे शिरण्याआधी सर्वभित्तिचित्र पाहत आत जाणार, तेवढ्यात लक्ष गेले नव्हे खिळुन राहिले; पुर्ण शरणागती, पुर्ण शरणार्थी असणारी ती लिन झालेली, पालथी झोपलेली साधिका पाहिली, सुंदर दगडी शिल्प.

आतला लंबाकाकृती, अंडाकृती तो डोम, त्या मधोमध लिंग. त्या लिंगाभोवती तेवणारे तेलाचे दिवे, सुबक रांगोळी, फुलांची रचना, तो उजळलेला गाभारा व अंधाराची धुसरता. प्रदक्षिणा घालताना दिसल्या त्रिकोणी हवा वारी येण्यासाठीचे झरोके. त्याखाली त्रिकोणी कोनाडे. आत ध्यानस्थ बसलेले साधक. ही गर्भगृहाची संरचना. विज्ञानाधिष्टित यात ध्यान करताना जी ऊर्जा निर्माण होणार, त्याचा संयोग आतुन परिवर्तन होण्यास सहाय्यभुत ठरतात. हा डोम ७२.४ फुट व्यासाचा ३३ फुट ऊंचीचा. लोखंड, पोलाद काहीच न वापरता, फक्त मातीच्या विटा, मातीवाळु व त्याला जोडण्यासाठी बांधण्यासाठी हर्बल गोंद (adhesive) एवढंच. हा पुढे ५०० वर्ष तरी असाच ठाम ऊभा राहणार.

ही भव्यता अनुभवत प्रदक्षिणा झाली. त्या शिवलिंगाच्या सान्निध्यात बसले ते ध्यान होतं का मी स्वत:ला पाहत होते. मी जागृत होते व नव्हते हे ही मला जाणवत होते. एक मंद सुवास, एक प्रकाश रेषा, एक नाद, अनाहत, एक सामर्थ्य. एक शांत निवण, भरलेपण आणि रितं होण तेवढ्यात प्रकाशने ओझरता स्पर्श केला, डोळे ऊघडले, निघावं लागणार होत. तिथे थांब थोड इतकं म्हणतां ही येणार नव्हत, कारण इथे फक्त मौन असतं. फोन सुद्धा मौन मोडवर. भरलेले मन आणि जड पाऊले, त्या ज्ञाताला नमन!

बाहेर येताना फार काही पाहिलं नाही, कारण तशी भिरभिरणारी नजर जरा निवली होती. माँ कनका विचारत होत्या; How was the experience?

हे सारे साधक जमेल तितका वेळ, जमेल तेवढा वेळ, इथे येऊन ध्यान करतात. ती सांगत होती; सदगुरु म्हणतात गर्भगृह तुम्हाला रिते कसे ठेवेल?

आता लिंग भैरवी कडे निघालो. त्या देवळाच्या परिसरात चिक्कार गर्दी. सार्थक झाले असा भाव असणारे भाविक. तेवढ्यात आम्ही शॉर्टकटने निघालो. फरशीबंद रस्ता, अंधुक प्रकाश. देवळात जाण्याआधी बाहेर पुरुष व प्रकृती यांचा आकृतीबंध. पुन्हा तशीच साधिका ईथेही. आत उजवीकडून जाण्याची रित. स्री शक्तीचा सन्मान ठेवणारी देवी. तिथली पुजारीण पण उत्साहानं उर्जावंत, तीने आरतीचा दिवा त्या चैतन्यदेवीला दाखवला. त्या एका बाजुने लावलेल्या, लाल चुनरिया मुर्ती वर पसरत जाणारा तो प्रकाश पलिता. नतमस्तक होण हे स्वाभाविकच.

प्रसाद म्हणुन कुंकु, पानाच्या द्रोणात ताजी मोगरा फुल दिली, तो सुगंध अजुन दरवळतोय लिंग भैरवीच्या दर्शनाने आलेली समाधानाची साय घेऊन बाहेर पडलो.

आता पुढचा महत्वाचा कार्यक्रम होता सदगुरुंना भेटण्याचा. मनांत अपार ऊत्सुकता त्यांना त्यानी निर्माण केलेल्या ह्या प्रांगणात पाहणे, भेटणे हा एक वेगळाच अनुभव होता, त्यांची पुस्तकं वाचतांना, त्यांची तत्वचिंतनं ऐकताना, त्यांच मिश्किल हास्य पाहतांना, त्यांच शुभ्र दाढीला हात लावण, सहज पणे हालचाली करण हे सगळ पाहीलेलं. ६ कुशक रोडच्या घरातल्या भेटित या व्यतिरिक्त नोंदवल.

कुशाग्र बुद्धी, अचुक मांडणी, कावेरी कॉलिंगचं पॅशन, ऊत्तम शब्दनिवड, ही मांडणी एखाद्या ऊद्योजकाची की नेत्याची हा प्रश्न. समाजाचा, राष्ट्रहिताचा त्याला सरकारी बळ मिळवणे ह्याचं महत्व सद्गुरूंनी अधोरेखीत केलं. आज, आत्ता मी पाहत होते अध्यात्मिक साधनेची उंची हजारो युवकांना प्रेरित करणारे सदगुरू ज्यांच्या परिस स्पर्शाने हा झळाळुन ऊठलेला परिसर, त्यांच्या एका दर्शनासाठी तहानलेले भक्त, साधक आणि मी त्यांना भेटणार होते.

त्यांच्या कक्षाबाहेर थांबलो होतो. दोन लाकडी घडीव बाक, समोरुन जाणारा रस्ता, तो चौक, मंद दिवे, आम्ही वाट पाहत होतो. माँ कनका व स्वामी तुष्या आमच्या सोबत होते. मी विचारत होते, तुम्हा सगळ्यांचं रुटिन काय? जबाबदारी काय? यांनी सुद्धा ईशाचं ब्रम्हचर्य स्विकारलेलं. गेली १० वर्षांपासून इथेच आहे. तो म्हणाला, आम्ही घरी जात नाही. घर सोडलं. आई, वडिल येतात भेटायला. बाकी सांसारिक गोतावळा मागे टाकल्याशिवाय, हे व्रत घेतां व निभावता येत नाही. आमची साधना सकाळी ५:३० ला सुरु होऊन ती सुमारे ९, ९.३० पर्यंत चालते व नंतर आम्ही ब्रंच घेतो.

आम्ही ब्रम्हचारी शक्यतो कंजीच घेतो, दोनदा. जे व्रती आहेत ते सकाळी ८ व रात्री ७ ह्या दोन वेळाच खातात. मनाचं सामर्थ्य वाढवताना भुक आटोक्यात येतेच. तुमच्या घरच्यांनी परवानगी दिली? हा माझा भाबडा प्रश्न. त्यांना आम्ही परत येऊ असं वाटल पण ब्रम्हचर्य घेतल्यावर ती दारे बंद केली आहेत हे कळलं.

आता त्यांना समाधान व कौतुक वाटत. पण वाईट ही वाटतच की ही चर्चा सुरु होती तोपर्यन्त सदगुरू आलेच असा सांगावा आला तेवढ्यात धडाडणारी जीप आली. बाजुने सदगुरू चालवत होते जीप, बाजुने पांढरी दाढी दिसली, आम्ही सरसावुन उठलो, दाराची चौकट पार करुन गेले, ते स्वागतास बाहेर आले. प्रकाशशी बोलणं सुरु झालं. मला विचारले, कसं वाटलं ध्यानलिंग? मला ना स्वतःच्या आत डोकावण्याची ताकद जाणवली. ते मंदसे हासले.

त्यांनी ह्या टप्प्यावरच्या अनेकांना पाहिलंय, ऐकलय. हा अनुभव सरावाचा होता. दारं ऊघडुन आत आल्यावर जाणवली रसिकता, वेगळेपणा, संरचेनाचा, वस्तुंचा कोनडे टेबल ह्या सगळ्या ठिकाणी नेमक्या वेचक व वेधक वस्तु. एक सोफा, बाजुला दोन खुर्च्या, ते मधोमध बसले. त्यांचे ते मुंडासे उर्फ फेटा त्यांची भली मोठी शाल तो निळ्या मोरपंखी रंगाची, त्यांचा सैल सदरा,घोतरासारखी विजार.

मला तर ते फॅशन आयकॉनच वाटतात.

मी व प्रकाश बसलो.

आमच्या बरोबर आलेल्यानी ऊशीची आसने घेतली व ते जमीनीवर बसले. मग संवाद कावेरी कॉलींगवर सुरु झाला. आंध्र व तेलंगाणा सरकारची भुमिका, अडचणी, केंद्राकडुन काय सहाय्य हवं याची चर्चा.

डेन्स फॉरेस्ट कसे करणार याचा ऊहापोह.

माझी नजर ते बसले होते त्या मागच्या काळ्या लाल कॅनव्हासवर. हे ओळखुन ते म्हणाले, हे शब्द सुचले पहिल्यांदा हेलिकॉपटर उडवले तेव्हा. त्यांच्यातला कलाकार मला दिसत होता.

सृजनाचे वरदान त्यांन आहेच.

तोपर्यन्त दारं किलकिलल्, एक तरुण जोडपं आत आलं. सद्गुरू म्हणाले, माझा जावई संदिप व राधे. बोलक्या डोळ्यांची शिडशिडित बांध्याची. नऊवार सारखे पाचवारी नेसलेली राधे, गजरा माळुन देखणी दिसत होती. तीचे दिसणे रेखीव पण थेट वडिलांसारखं.

संदिप आज अष्टमीच्या कार्यक्रमात गाणार होता. गोरा, नाकेला गंध, रेखलेला, दोघंही खाली आसनांवरच बसले. मी म्हणाले, तुझी ओळख सदगुरुंच्या प्रवचानातुन झाली.

ती म्हणाली चेष्टा करतात ते.

बाप लेकींचा हा संवाद पाहताना पिता सदगुरु आहेत समजले.

तीच्या नृत्यांचं व संदिपच्या गाण्याचे कौतुक करताना.

मग त्यानंतर होम स्कुलची संकल्पना, महाशिवरात्रीचा ऊत्सव, अनेक सामाजिक कार्ये, विद्यार्थ्यांशी, विषेशता सगळ्यांचं. एक विचार, समान राष्ट्रवाद, नाविन्यता विकास, हे बोलणं सुरु असतानाच पुन्हा पुन्हा कावेरीचा फोटो.

घड्याळात पाहिले ८:२५

चला निघुया. हा वक्तशीरपणा आश्रमातील सगळ्याच व्यवस्थांना.

आम्ही हॉलमधे शिरलो. २५०० ते ३००० लोकांनी हॉल भरलेला होता

सगळ्यांना ओढ गुरुजींच्या दर्शनाची.

ते आले त्यांनी पाहिले त्यांनीआधिच जिंकलेलं होतं.

परत विषेश आसन व्यवस्था.

समोर तीनस्टेज होती. मधल्या स्टेजवर आदियोगी, त्यापुढे मंद तेलाचे दिवे, फुले.

तोपर्यन्त संदिपचा पहिला सा लागला.

कृष्णानी बेगने बारो (पंडित भीमसेन जोशींनी गायलेलं कानडी भक्तीगीत) ही पांरपारिक रचना सुरु झाली.

माझ्या शेजारी जमीनीलगतच्या आसनांवर अनेक विदेशी शिष्यगण होते.

त्यांनाही हे स्वर भिडत होते.

जगभर ताल व लय ही भिनत जाते हेच खर.

संदिपला साथीला पण विदेशी सहकलाकार होते.

तो सारा समुह त्या कनकदास, पुरदंराच्या रचनांनी मंत्रमुग्ध झालेला एकरूप पावलेला.

स्वत: सदगुरु पण त्या तालयात्रेचा आस्वाद घेत समेवर थांबत होते.

ह्या नंतर कृष्णाष्टमीचा संदेश चित्रफित सुरु झाली.

समोर बोलणारे व खुर्चीवर तेच ऐकणारे सदगुरु पाहणं हे वेगळच.

ते सांगत होते राधेचा धर्म.

कृष्णरुप

दुर्योधनाला भावलेले कृष्ण

राधेला भावलेले कृष्ण

मानवी भावभावनांचा सखा गोपी

मला आठवत होतं. कृष्णकिनारा अरुणा ढेरे यांच पुस्तक.

कुंती, द्रोपदी, राधा व यशोदेचा कृष्ण

प्रत्येकीच्या जगण्याचा किनारा कृष्णच

तस काहीस विवेचन सदगुरु करत होते.

त्या भावपुर्ण संदेशानंतर काही काळ त्या गोविंदाशी जोडले गेले.

ईशा संस्कृती शाळेतील मुलींचा त्यानंतर नृत्याचा अविष्कार सुरु झाला.

त्या तरुण मुली स्टेजवर आल्या त्या घुंगराचे आवाज

काळी निळी व केशरी सुती साडी केशरी ब्लाऊज

लांब वेणी, गजरा आणि नजर खिळवुन ठेवणारी ताल बद्ध डौलदार नर्तन.

त्या मुलींच्या मेहनतीचं कौतुक करावं तेवढ कमीच.

कनकदास व नंतर तल्लाना किती तल्लीनतेने त्यांनी केला.

ते आवर्तन संपले व गोविंदा तु गोपालाचा जयजयकार सदगुरू सांगत होते.

ते करता करता ते डोलणारे थिरकणारे भक्तसमुह त्या अनुपम रंगाने न्हावून गेले.

यांवर कळस म्हणजे जेव्हा सदगुरूच तालबद्ध नृत्य करु लागले

त्यांची ती ऊर्जा

ऊत्साह रममाण होण

सगळंच कायम स्मरणात राहिल.