इथं आणि इथेच

फळ चाखून अज्ञानाचे

लेकरे प्रभूची वेडी;

मी कसा, कुठोनी आलो

ही तयांस पडली कोडी

 

ते आतुर जाणून घेण्या…

पुसती, तू कुठला, कोण?

त्यां सांगावी मी कुठली

मज ओळखण्याची खूण

 

हा वनराईत फुलोरा

ऋतु वसंत घेऊन आला;

त्या फुलाफुलांतून तुजला

दिसेन मीच फुलताना

 

दवबिंदूंची ही माला

गवतावर अलगद झुलते;

अस्तित्व तिथेही माझे

त्या मोत्यातुन चमचमते

 

निश्चल पर्वतरांगांची

नि:शब्द गिते मी गातो;

त्या निरव शांतते मधुनी

मी व्यक्त निरंतर होतो

 

देवदार उभा हा रानी

घनगंभीर त्याची माया;

पानांचा दरवळ त्याच्या

ती माझिच रे पडछाया

 

तळमळून तान्हा रडता

मायेला पाझर फुटतो;

होऊनी प्रेम, वात्सल्य

पान्ह्यातुन मी पाझरतो

 

दू:खाने कुण्या युगाच्या

कोल्हा भयाण कोकलतो;

काळोख्या उदास राती

त्या आकांती मी असतो

 

ना कुठूनही मी येतो

ना कुठेही मजला जाणे;

लोपल्या दिशा मजसाठी

ना उरले जाणे-येणे

 

अंतरी बहरले सारे

माझ्यातील मिपण गेले;

चल-अचल सर्व मी झालो

अवघेची निश्चल झाले!!

सप्रेम,आशीर्वाद