logo
logo

‘शिव’ हा विनाशक का आहे ?

लोक देवाकडे धाव घेतात, ते संपन्नता आणि संरक्षण लाभावे यासाठी. पण यौगिक संस्कृतीमध्ये ‘शिव’ हा ‘विनाशक’ म्हणून पुजला जातो. वर-वर पाहता विचित्र वाटणाऱ्या या दृष्टिकोनामागचे कारण जाणून घ्या.

प्रश्नकर्ता : योगाचा उद्देश मुक्ती हाच आहे, असं मला वाटलं होतं. पण मग शिव, ‘आदियोगी’, हा ‘विनाशक’ म्हणून का ओळखला जातो ? तो कशाचा नाश करतो ?

सदगुरु : समजा, तुम्हाला कोणी तरी सांगितलं, की परग्रहावरून कोणी वेगळ्या प्रकारचा जीव येणार आहे. तर तुम्ही काय कल्पना करता ? “त्याला कदाचित आठ हात असतील, तो हत्तीसारखा दिसत असेल, की कुत्र्यासारखा ?” तुमची सगळी विचार प्रक्रिया तुम्ही आत्तापर्यंत जे काही अनुभवलं आहे, त्यावर आधारित असते. म्हणून आपण ‘मुक्ती’ समजून घेण्याचा प्रयत्न करायला नको, कारण जे आपण अनुभवलं नाही, ते आपल्याला कळू शकत नाही.

शिवाच्या विनाशक स्वरूपाचे महत्त्व

आधी आपण जाणून घेऊया, ‘बंधन’ काय आहे. जर बंधन काय आहे हे तुम्हाला समजलं आणि ते तोडण्याचा प्रयत्न तुम्ही यशस्वीपणे केला, तर त्याला म्हणतात ‘मुक्ती ’. एका प्रकारे आध्यात्मिक प्रक्रिया ही ‘नकारात्मक’ असते. म्हणून तर आपण शिवाला ‘विनाशक’ म्हणून पूजतो, कारण हा तुमच्या स्वतःला नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. आत्ता सध्या, ज्या कशाला तुम्ही ‘मी’ समजता – एक व्यक्ती म्हणून जो काही मर्यादित भाग तुम्ही अधोरेखित केला आहे, जर तो तुम्ही नष्ट केला, तर हीच आहे मुक्ती.

तुमचं सगळं व्यक्तिमत्त्व, तुम्ही स्वतःबद्दल जो विचार करता आणि तुम्ही स्वतःला जे समजता, ते केवळ तुमच्या शरीर आणि मानासोबत असलेल्या घट्ट ओळखीतून तयार झाले आहे. ही ओळख इतकी घट्ट झाली आहे कारण तुम्ही जीवनाचा अनुभव फक्त पंचेंद्रियांद्वारे घेत असता. जर पंचेंद्रिय निद्रिस्त झाले, तर तुमच्या अनुभवात, जग आणि तुम्ही, दोन्हीचे अस्तित्त्व उरणार नाही.

आत्ता सध्या, जो मर्यादित अनुभव हे पंचेंद्रिय तुम्हाला देतात, या एकमेव मार्गाने तुम्ही तुमच्या आजूबाजूचे विश्व आणि तुमच्या आत जे आहे, ते अनुभवू शकता. म्हणून तुमचं पाहिलं काम म्हणजे शरीराशी आणि मनाशी जडलेली ओळख तोडणं. आणि नेमके हेच काम योगसाधना करते. योगसाधनेची पहिली पायरी, म्हणजे पंचेंद्रियांच्या जाणीवेपलीकडे जाणं. एकदा का तुम्ही जीवन पंचेद्रीयांच्या जाणीवेपलीकडे अनुभवू लागला, की मग स्वाभाविकपणे तुमची शरीर आणि मनाशी जडलेली ओळख हळूहळू कमी होऊन नाहीशी होईल.

शिव – तुमची ओळख नष्ट करणारा विनाशक

शिव, योगाच्या पहिल्या गुरूचे वर्णन नेहमी ‘विनाशक’ म्हणून केले जाते, कारण जोपर्यंत तुम्ही ही ओळख नष्ट करत नाही, जोपर्यंत तुम्ही सध्या तुमच्यासाठी सगळ्यात मौल्यवान जे काही आहे, ते नष्ट करत नाही, तोपर्यंत त्या पलीकडे जे काही आहे ते घडणार नाही; हाच सगळ्यात मोठा अडथळा आहे. हाच तो बुडबुडा आहे, ज्यातून बाहेर येण्याची तुमची इच्छा नाही. तुम्हाला भीती वाटते की तो फुटेल. त्याच वेळी, तुमच्या आत असे काहीतरी आहे ज्याला अमर्याद व्हायचे आहे.

ज्याला तुम्ही आध्यात्म म्हणता ते म्हणजे तो बुडबुडा अमर्याद करण्याबद्दल आहे. खरंतर ‘अमर्याद बुडबुडा’ असं काही नसतं. केवळ बुडबुड्याला टाचणी लावून तो फोडायचा आहे. तुम्हाला हा बुडबुडा एवढा मोठा फुगवायचा नाहीये, की ज्यात सारं विश्व सामावेल. जर तुम्ही त्याला टाचणी लावून फोडले, तर तुम्ही असीमित बनता. सगळ्या सीमा नाहीशा होतील.

लोकांना वाटतं की शरीर आणि मनासोबत गुंतलेले नसणे म्हणजे फाटके कपडे घालणे, अंघोळ न करणे आणि त्या दुर्गंधीने आजूबाजूच्या सर्वांसाठी समस्या निर्माण करणे. नाही. न गुंतणे ही एक गोष्ट आहे; आणि त्याची काळजी न घेणे ही अगदी वेगळी गोष्ट आहे. तुम्ही त्यासोबत गुंतलेले नाही, पण तरी देखील जे करण्याची गरज आहे ते सगळं काही तुम्ही त्यासोबत करत आहात. जर तुम्ही असे असाल, तर तुम्ही शरीर आणि मनाच्या प्रक्रियांपासून मुक्त व्हाल. जर तुम्ही या दोन्ही गोष्टींच्या पलीकडे गेला, तर तुम्ही असीमित आहात. जर तुम्ही तुमचे असीमित अस्तित्त्व अनुभवले, तर तुम्हाला मुक्ती मिळाली असेच म्हणावे लागेल, नाही का?

संपादक टीप: आदियोगी शिव बद्दल आणखी रोचक कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

    Share

Related Tags

आदियोगी

Get latest blogs on Shiva

Related Content

आदियोगी – योगाचे उगमस्थान