logo
logo

महाशिवरात्री का साजरी केली जाते आणि द महाशिवरात्रीचे महत्त्व

महाशिवरात्री म्हणजे “शिवाची महान रात्र” हा भारतीय आध्यात्मिक कॅलेंडरमधील एक महत्वाचा सोहळा आहे. ही रात्र एवढी महत्वाची का आहे आणि आपण तिचा वापर कसा करून घेऊ शकतो हे सद्गुरु आपल्याला समजावून सांगत आहेत.

सद्गुरु: भारतीय संस्कृतीत एके काळी वर्षभरात 365 सण साजरे केले जात असत. दुसर्‍या शब्दात सांगायचे म्हणजे, त्यांना वर्षातील प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी काही ना काहीतरी कारण हवे असायचे. हे 365 सण विविध कारणांसाठी आणि जीवनातील विविध उद्देश डोळ्यासमोर ठेऊन साजरे केले जात होते. विविध ऐतिहासिक घटना, विजय किंवा जीवनातील विशिष्ट परिस्थिती, उदा, पेरणी, लावणी, आणि कापणी यासाठी ते साजरे केले जात होते. प्रत्येक परिस्थितीसाठी एक उत्सव होता. परंतु महाशिवरात्रीचे महत्व वेगळेच आहे.

प्रत्येक चंद्र महिन्यातील 14 वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणार्‍या बारा शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी-मार्च मध्ये येणार्‍या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्व आहे. या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो. याचा वापर करून घेण्यासाठी, या संस्कृतीमध्ये आपण रात्रभर सुरू असणारा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. नैसर्गिक ऊर्जेच्या या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी, रात्रभर सुरू असणार्‍या या उत्सवातील प्राथमिक आवश्यकता म्हणजे आपण आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून संपूर्ण रात्र न झोपता, जागे राहणे.

अध्यात्माच्या मार्गावर असणार्‍या व्यक्तींसाठी महाशिवरात्र अतिशय महत्वाची आहे. कौटुंबिक व्यक्ती, तसेच जगातील महत्वाकांक्षी लोकांसाठीसुद्धा ही अतिशय महत्वाची आहे. कुटुंबात रममाण होणार्‍या व्यक्ती हा दिवस शंकराच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करतात. जी लोकं अतिशय महत्वाकांक्षी आहेत ते हा दिवस शिवाने त्याच्या सर्व शत्रुंवर मात केली म्हणून साजरा करतात.

परंतु योगी व्यक्तींसाठी, हा दिवस म्हणजे शिव कैलास पर्वताशी एकरूप झाले तो दिवस आहे. ते पर्वतासारखेच बनले – अतिशय स्थिर. योग परंपरेत, शिव देव म्हणून पूजले जात नाही तर त्यांना आदिगुरु, म्हणजे ज्यांच्यापासून योग विज्ञान उगम पावले ते प्रथम गुरु असे मानले जाते. हजारो वर्षे ध्यान केल्यानंतर एके दिवशी ते अत्यंत स्थिर बनले. तो महाशिवरात्रीचा दिवस आहे. त्यांच्यामधील सर्व हालचाल बंद झाली व ते संपूर्णतः स्थिर झाले त्यामुळे योगी महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र या दृष्टीने पाहतात.

समजुती बाजूला ठेवून दिल्या तरीसुद्धा, योग परंपरेत हा दिवस आणि रात्र महत्वाची मानली जातो याचे कारण हा दिवस अध्यात्माची ओढ असणार्‍या व्यक्तींना प्रचंड संधी उपलब्ध करून देतो. आधुनिक विज्ञान अनेक टप्प्यांमधून पुढे गेलेले आहे आणि आज या निष्कर्षापर्यन्त पोहोचलेले आहे की ज्याला तुम्ही जीवन असे म्हणता, तुमच्या अस्तित्वाबद्दल माहिती असणारी प्रत्येक गोष्ट, तुम्हाला विश्व आणि आकाशगंगा म्हणून माहिती असणारी गोष्ट, या सर्व गोष्टी एकच आहेत आणि त्या लक्षावधी मार्गांनी प्रकाशित होतात हे आज सिद्ध झालेले आहे.

प्रत्येक योगीमध्ये हे वैज्ञानिक सत्य म्हणजे अनुभवात्मक सत्यता आहे. योगी या शब्दाचा अर्थ ज्याला या एकरूपतेचा साक्षात्कार झालेला आहे अशी व्यक्ती. जेंव्हा मी “योग” असे म्हणतो, तेंव्हा मी कोणत्याही विशिष्ट पद्धतीविषयी बोलत नाही. अथांगतेची माहिती करून घेण्यासाठी उत्सुक असणे, अस्तित्वातील एकत्व जाणून घेण्याची उत्सुकता म्हणजे योग. याचा अनुभव घेण्याची संधी महाशिवरात्रीची रात्र तुम्हाला उपलब्ध करून देते.

परमार्थाची आकांक्षा बाळगणाऱ्या सर्वांसाठी महाशिवरात्री खूप महत्त्वाची आहे. ही रात्र तुमच्यासाठी एक उत्साहाने भरलेले आणि अध्यात्मिक जागृतीची होवो.
-सद्गुरू

महाशिवरात्र म्हणजे काय आणि ती का साजरी केली जाते?

महाशिवरात्री, "शिवाची महान रात्र" अध्यात्मिक कॅलेंडरमधील सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे.

प्रत्येक चंद्रमासातील चौदावा दिवस किंवा अमावास्येच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभरात येणाऱ्या सर्व बारा शिवरात्रींपैकी, फेब्रुवारी-मार्चमध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीचे सर्वात विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. या रात्री, पृथ्वीचा उत्तर गोलार्धाची स्थिती अशा प्रकारे असते की मानवामध्ये नैसर्गिकरित्या उर्जेचे एक उधाण निर्माण होते. हा असा दिवस असतो जेव्हा निसर्ग एखाद्याला त्याच्या आध्यात्मिक शिखराकडे ढकलत असतो. याचाच उपयोग करून घेण्यासाठी या परंपरेत आपण एक विशिष्ट सण स्थापित केला आहे जो रात्रभर चालतो.या नैसर्गिक ऊर्जेची वाढ होऊ देण्यासाठी, रात्रभर चालणाऱ्या या उत्सवाचा एक मूलभूत उद्देश म्हणजे तुम्ही रात्रभर तुमच्या पाठीचा कणा सरळ ठेवून जागे राहणे.

महाशिवरात्रीचे महत्व

जे लोक आध्यात्मिक मार्गावर आहेत त्यांच्यासाठी महाशिवरात्री खूप महत्त्वाची आहे. जे लोक कौटुंबिक परिस्थितीत आहेत त्यांच्यासाठी आणि जगातील महत्वाकांक्षी लोकांसाठी देखील ती खूप महत्वाची आहे. जे लोक कौटुंबिक परिस्थितीत आहेत ते महाशिवरात्रीला शिवाच्या विवाहाचा उत्सव म्हणून पाहतात. महत्वाकांक्षी लोक ह्या दिवसाला शिवाने आपल्या सर्व शत्रूंवर विजय मिळविल्याचा दिवस म्हणून पाहतात.

पण, संन्यासी लोकांसाठी, हा तो दिवस आहे जेव्हा शिव कैलास पर्वतासोबत एकरूप झाला. तो पर्वतासारखा पूर्णपणे अचल झाला. यौगिक परंपरेत, शिवाला देव म्हणून पूजले जात नाही, तर त्याला आदिगुरू मानले जाते, ज्याच्यापासून योगशास्त्राची उत्पत्ती झाली. अनेक सहस्र वर्षे ध्यानावस्थेत राहल्यानंतर एक दिवशी तो पूर्णपणे निश्चल झाला. तो दिवस म्हणजे महाशिवरात्री. त्याच्या सर्व हालचाली थांबल्या आणि तो पूर्णपणे अचल झाला, म्हणून संन्यासी लोक महाशिवरात्रीला निश्चलतेची रात्र मानतात.

महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व

पौराणिक कथांव्यतिरिक्त योग परंपरेमध्ये या दिवसाला आणि या रात्रीला इतके महत्त्व दिले जाते, याचे कारण ही रात्र साधकाला उच्च अध्यात्मिक शक्यता उपलब्ध करून देते. आधुनिक विज्ञान अनेक टप्प्यांतून गेले आहे आणि आज अशा टप्प्यावर पोहोचले आहे की जिथे ते तुम्हाला हे सिद्ध करून दाखवायला  तयार आहे की तुम्हाला जीवन म्हणून माहित असलेली प्रत्येक गोष्ट, तुम्हाला भौतिक पदार्थ आणि अस्तित्व म्हणून माहित असलेली प्रत्येक गोष्ट, तुम्हाला ब्रह्मांड आणि आकाशगंगा म्हणून माहित असलेली प्रत्येक गोष्ट, फक्त एकच ऊर्जा आहे जी लाखो वेगवेगळ्या मार्गांनी प्रकट होते.

हे वैज्ञानिक वास्तव प्रत्येक योग्यामध्ये एक जिवंत अनुभव आहे. "योगी" या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याने अस्तित्वाचे ऐक्य जाणले आहे. जेव्हा मी "योग" म्हणतो, तेव्हा मी कोणत्याही एका विशिष्ट पद्धतीबद्दल किंवा प्रणालीबद्दल बोलत नाही. अमर्याद जाणून घेण्याची सर्व तळमळ, अस्तित्वातील ऐक्य जाणून घेण्याची सर्व तळमळ म्हणजे योग. महाशिवरात्रीची रात्र मनुष्य हे अनुभवण्याची संधी देते.

शिवरात्री - महिन्यातली सर्वात काळोखी रात्र

शिवरात्री हा महिन्यातला सर्वात काळोखा दिवस आहे. दर महिन्याला शिवरात्री साजरी करणे, आणि खासकरून महाशिवरात्री साजरी करणे, जवळपास अंधकाराचा उत्सव साजरा केल्यासारखे वाटते. कोणतेही तार्किक मन अंधाराचा विरोध करेल आणि नैसर्गिकरित्या प्रकाशाची निवड करेल. पण “शिव” या शब्दाचा अर्थ “जे नाही ते” असा होतो. "जे आहे," ते अस्तित्व आणि निर्मिती आहे. "जे नाही”, ते शिव आहे. “जे नाही” म्हणजे, जर तुम्ही डोळे उघडून आजूबाजूला पाहिले, जर तुमची दृष्टी छोट्या मोठ्या गोष्टींकडे असेल, तर तुम्हाला बरीच सृष्टी दिसेल. जर तुमची दृष्टी खरोखरच मोठ्या गोष्टी शोधत असेल, तर तुम्हाला दिसेल की अस्तित्वातील सर्वात मोठी उपस्थिती एक विशाल पोकळी आहे.

काही ठिपके ज्यांना आपण आकाशगंगा म्हणतो ते साधारणपणे लक्षात येतात, पण त्यांना धरून ठेवणारी विशाल पोकळी कुणाच्या लक्षात येत नाही. ही विशालता, ही अमर्याद पोकळी, यालाच शिव म्हणतात. आज आधुनिक विज्ञान देखील सिद्ध करते की सर्व काही शून्यातून येते आणि शून्यात परत जाते. याच अर्थाने शिवाला, जो विशाल पोकळी किंवा शून्यता आहे, त्याला महादेव म्हणून संबोधले जाते.

या ग्रहावरील प्रत्येक धर्म, प्रत्येक संस्कृती नेहमीच परमात्म्याच्या सर्वव्यापी स्वरूपाबद्दल बोलत आली आहे. जर आपण त्याकडे पाहिले, तर एकच गोष्ट जी खरोखर सर्वव्यापी असू शकते, सर्वत्र असू शकते, ती म्हणजे काळोख, पोकळी किंवा शून्यता.

साधारणपणे, जेव्हा लोक कल्याणाच्या शोधात असतात, तेव्हा आपण परमात्म्याला प्रकाश म्हणून संबोधतो. जेव्हा लोक कल्याणाच्या शोधात नसतात, जेव्हा ते त्यांच्या जीवनाच्या पलीकडे जाऊन अस्तित्वात विलीन होण्याच्या शक्यतेकडे पाहत असतात, जेव्हा त्यांच्या उपासनेचा आणि साधनेचा उद्देश विलीन होणे असतो, तेव्हा आपण नेहमी परमात्म्याला काळोख म्हणून पाहतो.

शिवरात्रीचे महत्व

प्रकाश म्हणजे तुमच्या मनात घडणारी एक क्षणिक घटना आहे. प्रकाश हा शाश्वत नसतो, तो नेहमीच मर्यादित असतो कारण तो उदयाला येतो आणि संपतो. या ग्रहावर आपल्याला माहित असलेला प्रकाशाचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे सूर्य आहे. अगदी सूर्याचा प्रकाशसुद्धा, तुम्ही तुमच्या हाताने थांबवू शकता आणि काळी सावली पाडू  शकता. पण काळोख सर्वत्र पसरलेला आहे. जगातील अपरिपक्व मने नेहमीच अंधाराचे वर्णन सैतान म्हणून करतात. परंतु जेव्हा तुम्ही परमात्म्याचे सर्वव्यापी म्हणून वर्णन करता, तेव्हा तुम्ही स्पष्टपणे परमात्म्याचा उल्लेख काळोख म्हणून करत आहात, कारण फक्त काळोखच सर्वव्यापी आहे. तो सर्वत्र आहे. त्याला कशाच्याही आधाराची गरज नाही.

प्रकाश नेहमीच स्वतः जळत असलेल्या स्रोताकडून येतो. त्याला सुरुवात आणि शेवट आहे आणि तो नेहमीच मर्यादित स्रोताकडून येतो. अंधाराचा स्रोत नाही. तो स्वतःचा स्रोत आहे. तो सर्वव्यापी, सर्वत्र आहे. म्हणून जेव्हा आपण शिव म्हणतो, तेव्हा आपण अस्तित्वाच्या विशाल शून्यतेबद्दल बोलत आहोत. या विशाल शून्यतेच्या मांडीवरच सर्व सृष्टी निर्माण झाली आहे. आणि यालाच आपण शिव म्हणतो.

भारतीय संस्कृतीमध्ये, कुठल्याही प्राचीन प्रार्थना स्वतःचे संरक्षण करण्याबद्दल किंवा जीवन चांगले घडवण्याबद्दल नव्हत्या. सर्व प्राचीन प्रार्थना नेहमीच "हे प्रभू, मला नष्ट कर म्हणजे मी तुझ्यासारखा होऊ शकेन"  अशा होत्या. म्हणून शिवरात्री, जी महिन्यातली सर्वात काळोखी रात्र आहे, ती प्रत्येक मानवासाठी, त्याच्या मर्यादांच्या पलीकडे जाण्याची, सृष्टीच्या उगमाची अमर्यादता अनुभवण्याची संधी आहे, जी प्रत्येक मानवामध्ये बीजरूपात उपस्थित असते.

महाशिवरात्री - अध्यात्मिक जागृतीची  रात्र

महाशिवरात्री ही एक संधी आणि शक्यता आहे, ती विशाल शून्यता अनुभवण्याची जी प्रत्येक मानवाच्या आत आहे, जी सर्व सृष्टीचा स्रोत आहे. एकीकडे शिव संहारक म्हणून ओळखला जातो. दुसरीकडे, तो सर्वात कृपाळू म्हणून ओळखला जातो. तो सर्वात श्रेष्ठ दाता म्हणूनही ओळखला जातो. योग पुराणात शिवाच्या कृपाळू स्वभावाबद्दल अनेक कथा आहेत. त्याचा कृपाळूपणा व्यक्त करण्याची पद्धत अद्भुत आणि त्याचवेळी विचित्र आहे. त्यामुळे महाशिवरात्र ही कृपा ग्रहण करण्यासाठी एक खास रात्र आहे. ही शून्यतेची, जिला आपण शिव म्हणतो, तिची विशालतेची तुम्हाला एका क्षणासाठी तरी जाणीव व्हावी, हीच आमची इच्छा आणि आशीर्वाद आहे. ही रात्र तुमच्यासाठी फक्त जागरणाची रात्र नाही, तर जागृतीची रात्र होवो.