ieco
ieco

शिवा आणि काली : तांत्रिक प्रतीक

article शिवाच्या गोष्टी
सद्गुरु शिवाच्या छातीवर पाय ठेवून उभ्या असलेल्या कालीच्या प्रतिमेचे महत्व स्पष्ट करतात. कालीने एकदा शिवाला कसे मारले आणि ते कशाचे प्रतीक आहे, याची कथा ते आपल्याला सांगतात.

प्रश्न: सद्गुरू, मी काली शिवाच्या मृतदेहाच्या छातीवर पाय देऊन उभी असलेली बरीच छायाचित्रे पाहिली आहेत. ह्या दृश्याचे काय महत्त्व आहे?

कालीने शिवाला कसे मारले

सद्गुरू: ही एक विशिष्ट कथा आहे, जी ऊर्जेचे स्त्री तत्त्व कसे काम करते हे दर्शविण्याचा प्रयत्न करीत आहे. एकदा असे झाले की, अनेक राक्षस जगावर वर्चस्व गाजवू लागले. अनेक वाईट शक्ती जगाचा ताबा घेऊ लागल्या. म्हणून कालीला राग आला. जेव्हा तिचा राग अनावर झाला, तेव्हा तिला थांबवणारे काहीच नव्हते. ती सगळ्यांची फक्त कत्तल करत सुटली.

तिचा संताप थांबत नव्हता. तो चालूच होते, कुठल्याही तर्कापलीकडे, त्या परिस्थीतीला आवश्यक कृतीच्या पलीकडे, सगळ्याच्याच पलीकडे. तिच्या रागाला एक जोर आला होता आणि तो कमी होत नव्हता, आणि तिने कत्तल चालू ठेवली म्हणून कोणालाही जाऊन तिला थांबवण्याची हिंमत झाली नाही. ते शिवाकडे गेले आणि म्हणाले, “ती सर्वत्र संहार करत आहे. ती तुमची पत्नी आहे. कृपया तिला आळा घालण्यासाठी काहीतरी करा. ”

शिव काली कडे गेला कारण तोच तिला चांगला ओळखत होता. तो आक्रमक न होता, युद्धाचा पवित्रा न घेता, तिच्याजवळ सहज गेला. पण कालीची ऊर्जा अशा स्तरावर गेली होती, की त्याने अगदी शिवाला सुद्धा खाली पाडले. जेव्हा ती त्याच्यावर उभी राहिली, तेव्हा तिला कळले की, तिने काय केले. तेव्हा ती शांत झाली आणि पुन्हा एकदा त्याचामध्ये जीव फुंकला.

देवी स्वतःचे मस्तक काढते

अशा अनेक तांत्रिक पद्धती आहेत, ज्या ह्या विशिष्ट घटनेवर आधारित आहेत. तुम्ही तांत्रिकांच्या प्रतिमा आणि छायाचित्रे पाहिले असतील, ज्यात त्यांनी स्वतःचे मस्तक काढले आहे आणि ते स्वतःच्या हातात धरून चालत आहेत किंवा तुम्ही स्वतः देवी स्वतःचे मस्तक काढून चालत आहे असे दर्शवणारी चित्रे पहिली असतील. अशा अनेक तांत्रिक पद्धती आहेत ज्यात लोक स्वतःचा शिरच्छेद करतात आणि मस्तक परत लावतात. काही विधी आहेत ज्याद्वारे हे केले जाते.

तंत्र : जीवन मोडणे आणि घडवणे

मला माहीत आहे की, आज खूप लोक विचार करतात की तंत्रविद्या म्हणजे अनिर्बंध वासनांचा अतिरेक. हे यामुळे आहे कारण आज बहुतेक तंत्राविद्येची पुस्तके अमेरिकन लेखकांनी लिहिली आहेत, आणि लोक तंत्राविद्येबद्दल पुस्तकामध्ये आणि मॅगझीनमध्ये वाचतात. तंत्रविद्या म्हणजे वासनेच्या आहारी जाणे नाही. तंत्रविद्येला खूप शिस्त लागते. तंत्रविद्या म्हणजे एक तंत्रज्ञान, एक पद्धत, एक क्षमता, जीवन मोडून पुन्हा घडवण्याची. तंत्रविद्या म्हणजे संपूर्ण यंत्रणेवर एवढे प्रभुत्व की तुम्ही जीवन पूर्णपणे मोडून त्याला परत घडवू शकता.

काली शिवाला मारण्याचे प्रतीक

तुमचे जीवनावर एवढे प्रभुत्व असू शकते की, जीवन आणि मरण हे अगदी पूर्णपणे तुमच्या हातात येते, जेणेकरून तुम्ही जीवन मोडू शकता आणि पुन्हा त्याला पूर्ववत करू शकता. तुम्ही परमेश्वराला सुद्धा मारू शकता आणि त्याला परत आणू शकता. हा एक पराक्रम नाही जो तुम्ही एखाद्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहात. हे यासाठी आहे की तुम्हाला जीवनावर तेवढे प्रभुत्व हवे आहे.

जो पर्यंत तुमचे जीवनावर काही प्रभुत्व नाही, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. प्रत्येकाचे जीवनावर काहीतरी प्रभुत्व असते. अन्यथा, तुम्ही काय करू शकाल? तुमच्या प्रभुत्वाची उंची ठरवते की तुम्ही किती करू शकता.

काली शिवावर उभी असणारी प्रतिमा मुळात जीवनाच्या प्रक्रियेवर संपूर्ण प्रभुत्व दर्शवते. याच अर्थ असा की, तुम्ही स्वतः देवाला सुद्धा मारू शकता आणि त्याला पुन्हा जीवन देऊ शकता. हे खूप धाडसी आहे, नाही का? तंत्रविद्येचे तंत्रज्ञान असेच आहे.