logo
logo

शिव आणि गंगा - दंतकथा आणि त्याचा अर्थ

सद्गुरू शिवाच्या जटांमधून वाहणाऱ्या गंगेची दंतकथा आणि या कथेचा काय अर्थ आहे ते संवादात्मक पद्धतीने सांगतात.

शिव आणि गंगा - दंतकथा आणि त्याचा अर्थ

सद्गुरू: तुम्हाला माहित असेल की, गंगा शिवाच्या जटांमधून वाहते असे मानले जाते. हिमालयात एक म्हण आहे की प्रत्येक शिखर हा स्वतः शिव आहे. हिमालयाची शिखरे बर्फाच्छादित आहेत, आणि या बर्फाच्छादित पर्वतांमधून वाहणारे अनेक लहान पाण्याचे प्रवाह हळूहळू एकत्र येऊन ओढे आणि नंतर नद्या बनतात. म्हणूनच त्यांनी सांगितले की पर्वत शिवासारखा आहे, आणि खाली वाहणारे हे प्रवाह म्हणजे जटा आहेत आणि त्यातूनच गंगा नदी बनली, जी आकाशातून आली - जे खरं आहे कारण बर्फ आकाशातून पडतो.

हीच प्रतीकात्मकता गंगेची दंतकथा निर्माण करते, आणि ते सर्वात शुद्ध पाणी मानले जाते कारण ते आकाशातून येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विशिष्ट भूभागातून वाहत असल्याने त्याला एक विशिष्ट गुणधर्म प्राप्त झाला आहे. मी वय वर्ष एकोणीस असल्यापासून दरवर्षी हिमालयात एकटाच ट्रेकिंगला जात असे, आणि मी नेहमी गारठलेला आणि भुकेला असे कारण मी फारसे साहित्य न घेताच येत असे. माझ्याकडे फक्त डेनिम पँट आणि जाड टी-शर्ट होता. मला अनेकदा असा अनुभव आला की गंगेच्या फक्त काही ओंजळी पाणी पिल्यामुळे मी चाळीस-अठ्ठेचाळीस तास थकव्याशिवाय चालू शकलो. आणि मी अनेक लोकांकडून थेट ऐकले आहे की, गंगेचे पाणी पिऊन त्यांचे आजार बरे झाले. तुम्हाला माहित आहे की, भारतात कुणाला मरायचे असले तरी त्यांना थोडे गंगाजल हवे असते.

गंगेचे पाणी खूप खास असू शकते, तुमचा काही विश्वास आहे म्हणून नाही, तर पाण्याचा गुणधर्म तसा असल्यामुळे. या पाण्यावर हिमालय काहीतरी करतो.

नदी एक जिवंत अस्तित्व आहे

दंतकथेनुसार, गंगा ही एक स्वर्गीय नदी आहे जी या पृथ्वीवर उतरली, आणि तिच्या वेगामुळे जगाचे नुकसान झाले असते म्हणून शिवाने तिला आपल्या डोक्यावर घेतले आणि त्याच्या केसांमधून हळूवारपणे हिमालयाच्या उतारावरून वाहू दिली. लोकांसाठी याचा काय अर्थ आहे, तो म्हणजे तिची पवित्रता, त्याची ही संवादात्मक अभिव्यक्ती आहे. नदीची शुद्धता ही भारतीयांसाठी शुद्धतेचे प्रतीक बनली आहे. जर तुम्ही नद्यांशी संबंधित असाल, तर तुम्हाला माहित असेल की, प्रत्येक नदीला स्वतःचे जीवन असते. हे जगभरात खरे आहे, मग ती इजिप्तमधील नाईल असो, युरोपमधील डॅन्यूब असो, रशिया आणि मध्य आशियाई देशांमधून वाहणारी व्होल्गा असो, अमेरिकेतील मिसिसिपी असो किंवा दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन असो. त्यांना केवळ पाण्याचे स्रोत मानले जात नाही. आपल्याला माहित आहे की, बहुतेक संस्कृती सर्वज्ञात कारणांसाठी नदीकाठी विकसित होतात, परंतु ज्या लोकांचा नदीशी जवळचा संबंध आहे, त्यांच्यासाठी ती एक जिवंत अस्तित्व बनते. तिला स्वतःचे व्यक्तिमत्व असते; तिला स्वतःची मनःस्थिती, भावना आणि विलक्षणता असते.

नदी ही एक जिवंत प्रक्रिया आहे आणि हे भारतातील गंगेसाठीही खरे आहे. मला गोमुखापर्यंत गंगेच्या उगमस्थानापर्यंत जाण्याचे भाग्य लाभले आहे आणि तिच्या प्रमुख उपनद्यांपैकी जवळपास प्रत्येकीवर प्रवास करण्याचेही भाग्य लाभले आहे - जसे की मंदाकिनी, अलकनंदा आणि, अर्थातच, भागीरथी जी गंगेचा मुख्य भाग आहे. हिमालयात ती पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे, परंतु मैदानी भागात वाहताना ती भारतीय उपखंडाच्या उत्तरेकडील मैदानी भागाची जीवनरेषा आहे. एक मोठ्या कालखंडात, अनेक राजवंशांचे उदय आणि पतन गंगेच्या साक्षीने झाले आहेत. ती देशाच्या त्या भागातील लोकांसाठी शक्ती आणि समृद्धीचा सातत्यपूर्ण स्रोत राहिली आहे.

आता असा काळ आला आहे, जिथे आपण तिला एक संसाधन म्हणून पाहत आहोत आणि आपण तिला हिमालयात धरणांनी अडवले आहे, ज्यामुळे गंगेला जिवंत माता किंवा देवी मानणाऱ्या अनेक लोकांना दुःख झाले आहे. आणि पुढे मैदानी भागात ती खूप प्रदूषित झाली आहे. काही जागरूक लोकांकडून गंगेला पुन्हा तिच्या मूळ स्वरूपात आणण्यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत. मी तीस वर्षांपासून हिमालयात प्रवास करत आहे आणि मला दिसते की बर्फाच्या प्रमाणात खूप बदल झाला आहे. अनेक बर्फाच्छादित शिखरे आता बर्फाच्छादित राहिली नाहीत, आणि केवळ उघडे, टोकदार, खडबडीत कडे बनली आहेत. गोमुखाच्या मुखाशीच आपल्याला स्पष्टपणे दिसते की हिमनदी वेगाने मागे सरकत आहे, जो गंगा नदीसाठी गंभीर धोका आहे. त्याला गोमुख म्हणतात कारण ते गाईच्या तोंडासारखे दिसते. मला आठवते जेव्हा मी पहिल्यांदा तिथे गेलो - ऑगस्ट १९८१ मध्ये - हे फक्त १५ ते २० फुटांचे मुख होते ज्यातून पाणी बाहेर येत होते, आणि ते खरोखरच गाईच्या तोंडासारखे दिसत होते. आज ती २०० फूट रुंद गुहा आहे जिथे तुम्ही पाहिजे तर अर्धा मैल आत चालू शकता.

हवामान बदलाचा गंगेच्या जीवनावर होत असलेला परिणाम अफाट आहे, आणि कधीही जर त्यामुळे नदीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला, तर हे भारताच्या उत्तर भागासाठी मोठी आपत्ती ठरू शकते जिथे ती नेहमीच लोकांची जीवनरेषा ठरली आहे.

गंगा वाचवण्याचे महत्त्व

प्रत्येक संस्कृती, प्रत्येक लोकसंखेला, प्रत्येक सभ्यतेला त्यांच्या जीवनात वेगळ्या पातळीची पवित्रता आणण्यासाठी काही प्रतीके हवी असतात. गंगा हे कायमच करत आली आहे आणि कुंभमेळ्यांदरम्यान तिच्या काठावर सर्वात मोठा मानवी जमाव एकत्र येतो जिथे ८ ते १० कोटींहून अधिक लोक एकत्र येतात. पृथ्वीवर अन्य कुठेही मानव असे एकत्र येत नाहीत. गंगा आणि तिची पवित्रता नेहमीच या प्रेरणेचा मुख्य कणा राहिली आहे. ही प्रतीकात्मकता खूप आवश्यक आहे. ही नदी वाचवणे आणि तिला शुद्ध ठेवणे हे केवळ आपल्या अस्तित्वासाठी आणि गरजांसाठीच नाही, तर मानवी चेतनेला टिकवून ठेवण्यासाठी आहे.

    Share

Related Tags

Get latest blogs on Shiva