आदियोगी – योगाचा स्राेत
15,000 वर्षांपूर्वी, आजच्या सर्व धर्मांच्या आरंभा आधी, आदियोगी, म्हणजे पहिला योगी, हिमालयात अवतरला.
तो अत्यानंदाने नृत्य करणे नाहीतर अत्यंत गहन निश्चलतेत स्थिर बसणे ह्या दोनच अवस्थांमधे असायचा, आणि त्याच्या गालांवरून ओघळणारे आनंदाश्रूच तो जिवंत असल्याचा संकेत असे. हे नक्की होतं की तो जे काही अनुभवत होता त्याचा कुणालाच थांगपत्ता लागू शकत नव्हता. लोक त्याच्या भोवती उत्सुकतेने जमले पण तो त्यांच्या उपस्थितीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होता आणि म्हणून अखेरीस ते निघून गेले. याला अपवाद फक्त सात तीव्र साधकांचा होता. त्यांनी याचना केली, ”कृपया आम्हालाही ते जाणून घ्यायचे आहे जे तुम्हाला समजले आहे”. त्यांची चिकाटी पाहून आदियोगींनी त्यांना काही प्राथमिक तयारीची साधना सांगितली. त्यांनी संपूर्ण एकाग्रतेने 84 वर्षे ती साधना केली, आणि ह्या काळात आदियोगीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आणि, उन्हाळ्यातील त्या सर्वात मोठा दिवस असणाऱ्या दिवशी, दक्षिणायनाच्या सुरुवातीस, आदियोगीना ते ज्ञान ग्रहणासाठी सुयोग्य अशा चमकणाऱ्या पात्राप्रमाणे दिसले. नंतर पुढील २८ दिवस त्या सात जणांचे जवळून निरीक्षण केल्यावर, पुढच्या पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच आज ज्याला गुरुपौर्णिमा म्हणून ओळखतात, त्याने स्वतःला ‘पहिल्या गुरू’ च्या रुपात परिवर्तीत केले, ज्याला आपण आदिगुरु म्हणतो. कांती सरोवराच्या काठावर आदियोगीने सविस्तर आणि पद्धतशीरपणे योगशास्त्राचे तंत्रज्ञान आपल्या पहिल्या सात शिष्यांना देण्यास सुरुवात केली, जे आज सप्तर्षी म्हणून गौरवले जातात.
मानव आपल्या मर्यादा लंघून त्याच्या परम संभावनेपर्यंत पोहोचू शकेल यासाठी आदियोगीने ११२ मार्ग घालून दिले आहेत. आदियोगीचे वरदान म्हणजे व्यक्तिगत स्व-परिवर्तनाची साधने आहेत, आणि वैयक्तिक स्व-परिवर्तन हाच विश्व-परिवर्तनाचा एकमेव मार्ग आहे. त्यांचा मुलभूत संदेश आहे “आपल्या आतच आहे दुःख मुक्ती आणि आनंद प्राप्तीचा मार्ग” ज्यायोगे मानव स्वस्थ, सुखी आणि मुक्त होईल. आता वेळ आली आहे आपण मानव कल्याण व्यक्तीनिष्ठ तंत्रज्ञानाच्या पद्धतीने घडवण्याची.