सद्गुरू आणि शेखर कपूर हे नंदी, म्हणजे शिवाचे वाहन, त्याच्या महत्वाबद्दल आणि प्रतीकाबद्दल चर्चा करतात.
शेखर कपूर : मला माहिती आहे नंदी हे शिवाचे वाहन आहे, तो शिवाची बाहेर येऊन काही बोलण्याची वाट पाहतोय का? मला जरा नंदी बद्दल अजून सांगा.
सद्गुरू : तो बाहेर येण्याची आणि काहीतरी सांगण्याची वाट बघत नाही. तो प्रतीक्षेत आहे. नंदी हा आंतरिक प्रतीक्षेचे प्रतिक आहे. कारण, प्रतीक्षा हा भारतीय संस्कृतीत महान गुण समजला जातो. जो जाणतो की कसे केवळ बसून प्रतीक्षा करणे तो स्वाभाविकपणे ध्यानस्थ होतो. शिवा उद्या बाहेर येण्याची तो अपेक्षा करत नाही. तो अनंत काळ त्याची वाट पाहिल. हा गुण ग्रहणशीलतेचे सार आहे.
नंदी हा शिवाचा सर्वात जवळचा सहकारी आहे, कारण तो ग्रहणशीलतेचा सार आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी तुमच्या मध्ये नंदीची योग्यता पाहिजे – साधेपणाने बसणे. तुम्ही स्वर्गात जाण्याचा प्रयत्न करीत नाही आहात, किंवा काही घेण्याचा प्रयत्न करीत नाही आहात – तुम्ही आतमध्ये जाता आणि बसता. म्हणून तो फक्त बसून तुम्हाला सांगतोय की, “जेव्हा तुम्ही आंत जाल, तेव्हा तुमच्या लहरी गोष्टी करू नका. फक्त आत जा आणि माझ्यासारखे बसा.”
शेखर कपूर : आणि प्रतीक्षा करणे व अपेक्षा ठेवणे या दोन भिन्न गोष्टी आहेत असे मी मानतो, बरोबर?
सद्गुरू : तो अपेक्षेच्या किंवा शक्यतेमध्ये प्रतीक्षा करत नाहीये. तो फक्त प्रतीक्षा करतोय. हेच ध्यान होय – फक्त बसणे. हाच तुमच्यासाठी त्याचा संदेश आहे. फक्त आत जा आणि बसा. जागृत, झोपाळलेले नाही.
शेखर कपूर : तर बसलेला नंदी हा ध्यानस्थ आहे असे आपण म्हणू शकतो का?
सद्गुरू : लोकं नेहमीच ध्यान म्हणजे एक प्रकारची कृती आहे अशा चुकीच्या समजुतीत असतात. नाही, ध्यान हा एक गुण आहे. हाच मुलभूत फरक आहे. प्रार्थना म्हणजे तुम्ही देवाशी बोलण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही त्याला तुमच्या आणा-भाका, तुमच्या अपेक्षा किंवा असंच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत असता. ध्यान म्हणजे तुम्ही फक्त अस्तित्वाचं आणि सृष्टीचे परम स्वरूप ऐकण्यासाठी राजी असता. तुम्हाला बोलण्यासाठी काहीच नसतं, तुम्ही फक्त ऐका. हाच नंदीचा गुण आहे, तो बसलेला आहे, पण पूर्णतः सावध. हे अतिशय महत्वाचे आहे, तो सावध आहे. सुस्त किंवा निष्क्रिय बसलेला नाहीये. अत्यंत सक्रीय, पूर्णतः जागरूक आणि जीवनाने भरलेला, पण कोणतीच अपेक्षा किंवा मागणी नसताना. हेच ध्यान आहे. केवळ प्रतीक्षा…कोणत्याही विशिष्ट गोष्टीसाठी नसलेली.
जर तुम्ही तुमची स्वतःच्या क्षुल्लक गोष्टी न करता, केवळ प्रतीक्षेत बसलात, तर ब्रम्हांडच आपलं कर्त्यव्य करेल. मूलतः ध्यान म्हणजे व्यक्ती आपल्याच कल्पना विश्वातील गोष्टी करत नाहीये. ती केवळ तिथे उपस्थित आहे. एकदा तुम्ही तिथे आलात, की तुम्ही अस्तित्वाच्या मोठ्या विशाल आयामाप्रती जागरूक व्हाल, जे नेहमी कृतीशील, सक्रीय आहे. तुम्हाला जाणवेल की तुम्ही त्याचाच एक अविभाज्य घटक आहात. आत्ता सुद्धा आहात. पण “मी त्याचा एक भाग आहे” हे जेव्हा जाणवेल, तीच ध्यानधारणा होय. नंदी हे त्याचे प्रतिक आहे. तो प्रत्येकाला आठवण करून देतो की “तुम्ही माझ्यासारखे बसा.”
शेखर कपूर : ध्यानलिंग येथील नंदी कशाचा आहे? मला तो धातू वाटतोय. ते पोलाद आहे का?
सद्गुरू : बहुदा हा अशा अद्वितीय प्रकारे बनवलेला एकमेव नंदी आहे. सहा ते नऊ इंचाचे धातूचे तुकडे एकत्र करून पृष्ठभाग बनवलाय. आणि आतमध्ये तीळ, हळद, विभूती (पवित्र राख) काही विशिष्ठ तेले, काही वाळू, आणि मातीचे काही प्रकार भरलेले आहेत. या साठी जवळपास २० टन सामुग्री लागली आहे. नंतर ते सीलबंद केले. हे सर्व मिश्रण एका विशिष्ठ प्रकारे बनवले गेले आहे. यामुळे या नंदीतून उर्जेचे एक विशिष्ठ वलय उत्सर्गीत होते.