logo
logo
The Story of Shiva’s Third Eye and Its Hidden Symbolism

शिवाचा तिसरा डोळा आणि त्यामागचा खरा अर्थ

सद्गुरू शिवाच्या तिसऱ्या डोळ्याची प्रतिकात्मता आणि तिसरा डोळा उघडल्यावर स्पष्टता आणि समज कशी वाढते हे सांगतात. शिवाने कसे त्याचा तिसरा डोळा वापरून कामदेवाला जाळले ह्याचे सद्गुरू वर्णन करतात.

जेव्हा शिव त्याचा तिसरा डोळा उघडतो

शिवाने तिसरा डोळा कसा उघडला याची एक कथा आहे. भारतात प्रेम आणि कामवासनेचा देव आहे कामदेव. कामवासना अशी गोष्ट आहे जिचा बहुतेक लोकांना उघडपणे सामना करायला आवडत नाही. तुम्हाला त्याभोवती सुंदर वलय हवे असते, म्हणून तुम्ही त्याला प्रेम म्हणता. कथेत असे आहे की कामदेव झाडामागे लपून शिवाच्या हृदयावर बाण मारतो. शिव थोडा विचलित होतो. म्हणून तो त्याचा तिसरा डोळा उघडतो ज्यामध्ये अग्नी जळत असतो, आणि तो कामदेवाला जाळून भस्म करतो. ही गोष्ट सर्वसाधारणपणे सगळ्यांना सांगितली जाते.

पण जरा स्वतःला विचारून पाहा, कामवासना तुमच्या आत उत्पन्न होते की झाडामागे? नक्कीच ती तुमच्यामध्ये उत्पन्न होते. वासना म्हणजे फक्त विरुध्द लिंगाबद्दल नसते. प्रत्येक इच्छा ही वासना आहे, मग ती लैंगिकता, सत्ता किंवा हुद्या या कशा बद्दलही असो. वासना म्हणजे तुमच्यातील अपूर्णतेची भावना आहे, एखाद्या गोष्टीबद्दलची वासना ज्यामुळे तुम्हाला असे वाटते की, “जर ती गोष्ट माझ्याकडे नसेल, तर मी परिपूर्ण नाही.”

शिवाचा तिसरा डोळा: योगाचा एक आयाम

यावर आधारित, शिव आणि कामदेव यांच्या गोष्टीला योगाचा एक आयाम आहे. शिव, योग साधना करत होता, म्हणजे तो फक्त परिपूर्ण होण्यासाठी नाही, तर अमर्याद होण्यासाठी प्रयत्न करत होता. शिवाने तिसरा डोळा उघडला आणि त्याला कामदेव, म्हणजेच स्वतःची वासना दिसली, जी उफाळून येत होती, आणि ती त्याने जाळून भस्म केली. हळूहळू राख त्यांच्या शरीरातून बाहेर पडली, आणि आतील सर्वकाही कायमसाठी नष्ट केले असे दाखवून दिले. तिसरा डोळा उघडून त्याने भौतिक पातळीच्या वरची पातळी गाठली आणि सर्व शारीरिक आसक्ती गळून पडल्या .

शिवाचा तिसरा डोळा म्हणजे काय?

तिसरा डोळा म्हणजे असा की, जो भौतिकतेच्या पलीकडले पाहू शकतो. जर तुम्ही तुमच्या हाताकडे पाहिले, तर तुम्ही तुम्ही पाहू शकता कारण तो प्रकाश अडवतो आणि परावर्तित करतो. तुम्ही हवा पाहू शकत नाही कारण ती प्रकाश अडवत नाही. पण हवेत थोडा धूर असेल तर तुम्ही तो पाहू शकाल कारण तुम्ही तेच पाहू शकता जे प्रकाशाला अडवते . ज्यातून प्रकाश आरपार जातो अश्या गोष्टी तुम्ही पाहू शकत नाही. या दोन डोळ्यांचा हाच स्वभाव आहे.

हे दोन डोळे, जे भौतिक आहे तेच पाहू शकतात. जेव्हा तुम्हाला असे काही पाहायचे असेल जे भौतिक स्वरूपाचे नाही, तर आतमध्ये पाहणे हाच एकमेव पर्याय आहे. आपण जेव्हा “तिसरा डोळा” म्हणतो, तेव्हा आपल्याला जे दोन डोळे पाहू शकत नाहीत ते पाहणे असे प्रतिकात्मकरीत्या म्हणायचे आहे.

हे दोन डोळे बाहेर पाहतात. तिसरा डोळा तुमच्या आत- तुमचा मूळ स्वभाव आणि तुमचे अस्तित्व पाहण्यासाठी आहे. हे काही जादा अवयव नाही किंवा कपाळावरची खूण नाही. आकलनशक्तीचा असा आयाम ज्यामुळे भौतिकतेच्या पलीकडचे जाणता येते तो म्हणजे तिसरा डोळा.

आयुष्याकडे तिसऱ्या डोळ्यातून बघणे.

आणखी एक पैलू म्हणजे डोळे हे कर्माने बाधीत असतात. कर्म म्हणजे जुन्या कृतींच्या उरलेल्या आठवणी. तुम्ही जे काही पाहता ते कर्माच्या आठवणीने प्रभावित असते. तुम्ही ते टाळू शकत नाही. तुम्ही एखाद्याकडे पाहता तेव्हा विचार कराल की, “तो ठीक आहे तो ठीक नाही, तो चांगला आहे, तो वाईट आहे. जे जसे आहे ते तसे तुम्ही पाहू शकत नाही कारण कर्माच्या आठवणी तुमची दृष्टी आणि पाहण्याची क्षमता प्रभावित करतात. ती फक्त तुमच्या कर्माप्रमाणे आणि तुमच्या आठवणीं प्रमाणे सगळं दाखवेल.

सर्व काही जसे आहे तसे पाहण्यासाठी सूक्ष्म दृष्टीचा डोळा- जो आठवणींनी दुषित नाही- तो उघडला पाहिजे. पारंपरिकरित्या, भारतामध्ये जाणणे म्हणजे पुस्तके वाचणे, प्रवचने ऐकणे किंवा माहिती गोळा करणे नव्हे. कितीही विचार आणि तत्वज्ञान तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणू शकत नाहीत. तुम्ही निर्माण केलेली तर्कशुद्ध स्पष्टता सहज मोडून पडता येऊ शकते. कठीण परिस्थिती त्याला पूर्णपणे गोंधळात पाडू शकते.

अचूक स्पष्टता तेव्हाच येईल जेव्हा आतली दृष्टी उघडेल. जगातील कोणतीही परिस्थिती किंवा व्यक्ती तुमच्यातील ती स्पष्टता बिघडवू शकत नाही. खरे ज्ञान मिळवण्यासाठी तुमचा तिसरा डोळा उघडला पाहिजे.

संपादक टीप: या लेखामध्ये, सद्गुरू, तिसरा डोळा उघडण्याच्या दोन पद्धतींबद्दल बोलतात.

    Share

Related Tags

आदियोगी

Get latest blogs on Shiva

Related Content

‘शिव’ हा विनाशक का आहे ?