logo
logo

शिवाचा नील कंठ

शिव - आदियोगी यांना अनेक नावांनी ओळखले जाते, त्यापैकी एक आहे नीलकंठ. सद्गुरू शिवाच्या नील कंठाचे प्रतीक समजावून सांगतात.

प्रश्न: शिवाच्या नील कंठाचे काय प्रतीक आहे?

सद्गुरू: योगिक परंपरेत एक कथा आहे. देव आणि दानव यांच्यात सतत युद्ध सुरु होते. पुन्हा पुन्हा युद्ध होऊन अनेकजण मारले जात होते, तेव्हा त्यांनी समुद्रात लपवलेले अमृत बाहेर काढून त्याचे आपसात वाटप करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून दोघेही अमर होतील आणि आनंदाने लढू शकतील. मृत्यू होत असल्यामुळेच युद्ध भयानक ठरते. मृत्यूचा प्रश्न सुटला तर युद्ध खूप छान गोष्ट आहे.

त्यांनी भागीदारी करून समुद्र मंथन करण्याचे ठरवले. कथेनुसार त्यांनी मेरू पर्वत घेतला आणि एका मोठ्या सापाचा दोर म्हणून वापर करून मंथन केले. जेव्हा त्यांनी मंथन सुरू केले, तेव्हा सुरुवातीला अमृताऐवजी समुद्राच्या तळातून एक प्राणघातक विष बाहेर आले. याला हलाहल म्हणत. हे प्राणघातक विष मोठ्या प्रमाणात वर आले. सर्व देव घाबरले. जर एवढे विष बाहेर आले, तर ते संपूर्ण जग नष्ट करेल. आणि यावर कोणीही काहीही करू शकत नव्हते.

नेहमीप्रमाणे, जेव्हा याबद्दल कोणीही काहीच करायला तयार नव्हते, तेव्हा त्यांना वाटले की, शिव योग्य व्यक्ती असतील. त्यांनी शिवाला बोलावले आणि बाहेर येणारे प्रचंड विष दाखवले. "हे पसरले तर जीवन नष्ट होईल. तुम्ही काहीतरी करा." नेहमीप्रमाणे, स्वतःच्या कल्याणाची पर्वा न करता, त्यांनी विष पिऊन टाकले. त्यांची पत्नी पार्वती हे पाहून धावली आणि तिने त्यांचा गळा धरला, त्यामुळे विष गळ्यातच थांबले आणि त्यांचा गळा निळा झाला.

पूर्वग्रहाचे विष आणि शिवाच्या नील कंठाचे प्रतीक


ही खूप महत्त्वाची कथा आहे. हे प्रत्येक माणसाच्या बाबतीत हे खरे आहे. जर तुम्ही प्रत्येक माणसाच्या आत खोलवर गेलात, तर तिथे फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे सतत वाढणारे जीवन. जर ते त्या सोबत एकरूप झाले, तर त्यांचे मन आणि भावनाही तशा प्रकारे कार्य करतील. पण जर तुम्ही त्यांना वरवर स्पर्श केला, तर ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा अमेरिकन आहे, हा भारतीय आहे अशा अनेक गोष्टी असतील. हाच पूर्वग्रह विष आहे. जेव्हा त्यांनी वरवर मंथन केले, तेव्हा जगाचे विष बाहेर आले. कोणीही विषाला स्पर्श करू इच्छित नसल्याने सर्वजण विषापासून पळून गेले. शिवाने जगाचे विष प्यायले आणि ते त्यांच्या गळ्यातच थांबले. जर ते आत गेले असते तर त्यांना विष बाधा झाली असती. पण ते गळ्यात थांबले, म्हणजे ते पाहिजे तेव्हा थुंकून टाकू शकतात. जर ते तुमच्या गळ्यात असेल तर तुम्ही ते थुंकू शकता. जर ते तुमच्या शरीरात गेले तर तुम्ही ते बाहेर काढू शकत नाही.

सध्या, तुमचे राष्ट्रीयत्व, लिंग, कुटुंब, अनुवांशिक ओळखी, जातीय ओळखी, धर्म हे तुमच्या गळ्यात थांबलेले नाहीत. ते तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीत भिनले आहेत. त्याचे मंथन केले पाहिजे, जेणेकरून ते सर्व वर येईल आणि तुम्ही ते थुंकून टाकू शकाल आणि फक्त जीवनाचा एक भाग म्हणून इथे राहू शकाल.

शिवाच्या नील कंठाचे हेच प्रतीक आहे. त्यांनी जगाचे विष त्यांच्या गळ्यात साठवले, जेव्हा ते काढून टाकायचे असेल, तेव्हा थुंकून टाकण्यासाठी ते तयार असते. जर ते त्यांच्या शरीरात गेले असते, तर ते काढून टाकण्याचा मार्ग नसता. एका अर्थाने, संपूर्ण आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे मंथन करणे, जेणेकरून तुमचे सर्व पूर्वग्रह वर येतील आणि एक दिवस आम्ही तुम्हाला ते थुंकून टाकायला लावू शकू. जर ते खोलवर गेले असेल तर कसे काढायचे? जर मी तुमचा एखादा पूर्वग्रह काढून टाकण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्या अनुभवात असे वाटेल की, तुमचे जीवन काढून घेतले जात आहे. जर मी तुमचे लिंग, मुले, पालक किंवा राष्ट्राशी असलेली ओळख काढून टाकण्याचा प्रयत्न केला, तर असे वाटेल की तुमचे जीवन काढून घेतले जात आहे. नाही, फक्त पूर्वग्रहाचे विष काढून टाकले जात आहे. म्हणून पूर्वग्रहाचे विष थुंकून टाकण्याची वेळ आली आहे.

    Share

Related Tags

Get latest blogs on Shiva