logo
logo

शिव कोण आहेत? मानव, मिथक की दैवी?

शिव कोण आहेत? मानव, मिथक की दैवी?

शिव कोण आहेत? भारतीय आध्यात्मिक परंपरेतील सर्वात या महत्वाच्या व्यक्तीरेखेभोवती अनेक कथा आणि कल्पना रचल्या गेल्या आहेत. तो देव आहे का? का हिंदू परंपरेच्या एकत्रित कल्पनेतून निर्माण केलेले एक मिथक? का शिव या शब्दाचा अजून काही गहन अर्थ आहे, जो केवळ त्याच्या शोधात असलेल्यांनाच उमजतो?

सद्गुरु: आपण जेंव्हा “शिव” असे म्हणतो, तेंव्हा आपण दोन मूलभूत पैलूंना उद्देशून तसे म्हणतो. “शिव” या शब्दाचा शब्दशः अर्थ, “ते जे अस्तीत्वात नाही” असा आहे. आज आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की ब्रम्हांडातील प्रत्येक गोष्ट शून्यातूनच निर्माण होते आणि ती शून्यातच पुन्हा विलीन होते. विश्वाच्या अस्तित्वाचा आधार आणि मूलभूत गुण म्हणजे एक अफाट, अथांग शून्यता किंवा अनंत आकाशिक पोकळी आहे. ग्यालक्सी किंवा आकाशगंगा ह्या केवळ एक छोटीश्या घडामोडी आहेत. एक लहानसा शिडकावा. उर्वरित सर्व एक विशाल रिकामी जागा किंवा पोकळी आहे ज्याला शिव असे संबोधले जाते. या विशालकाय गर्भातूनच सार्‍या विश्वाची उत्पत्ती झालेली आहे, आणि त्यातच पुन्हा सारे काही ओढून घेतले जाते. सारे काही शिवापासून येते आणि शिवातच पुन्हा विलीन होते.

म्हणून शिवाचे वर्णन अस्तीत्व शून्य असा केलेला आहे, सापेक्ष अस्तीत्व असलेला नव्हे. शिवाचे वर्णन प्रकाश म्हणून नव्हे, तर अंधःकार असे केले जाते. मानवाने केवळ प्रकाशाचेच गुणगान गायिले आहे कारण त्याच्यावर असलेला त्याच्या दृष्टीचा जबरदस्त प्रभाव. अन्यथा कायमस्वरूपी असणारी केवळ एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे अंधार. प्रकाश ही मर्यादित स्वरुपात घडणारी घटना आहे, कारण प्रकाशाचा कोणताही स्त्रोत – एखादा लाईट बल्ब असो किंवा सूर्य – कालांतराने त्यांची प्रकाश देण्याची क्षमता कालांतराने संपुष्टात येईल. प्रकाश काही शाश्वत नाही. ती नेहेमीच एक सीमित शक्यता आहे कारण ती घडते आणि संपते. अंधःकार ही शक्यता प्रकाशापेक्षा कितीतरी पटीने प्रचंड आणि विशाल आहे. काहीही जळण्याची आवश्यकता भासत नाही, तो कायमस्वरूपी शाश्वत आहे. अंधःकार सर्वत्र आहे. ही एकमेव गोष्ट आहे जी विश्वव्यापी आहे.

पण मी जर “दैवी अंधःकार” असे म्हणालो, तर लोक म्हणतील मी भूतांचा उपासक आहे की काय. खरे म्हणजे, काही पाश्चिमात्य देशात शिव हा राक्षस आहे असा प्रचार केला जात आहे. परंतु आपण त्याकडे जर एक संकल्पना म्हणून पहिले, तर सृष्टी रचनेची संपूर्ण प्रक्रिया आणि ती कशी घडली याची यापेक्षा अधिक चांगली संकल्पना या ग्रहावर नाही. याविषयी मी जगभरातील वैज्ञानिकांबरोबर “शिव” या शब्दाचा उल्लेख न करता शास्त्रीय परिभाषेत बोलतो, आणि ते आश्चर्यचकित होतात, “अरे, असे आहे का? त्यांना हे माहिती होते? कधी?” हजारो वर्षांपासून आपल्याला हे माहित आहे. भारतातील बहुतांश सामान्य शेतकऱ्याला सुद्धा अजाणतेपणे याविषयी माहिती आहे. याविषयीचे शास्त्र माहिती नसताना सुद्धा त्याबद्दल बोलतात.

प्रथम योगी

वेगळ्या पातळीवर, आपण जेंव्हा “शिव” असे म्हणतो, तेंव्हा आपण एका विशिष्ठ योग्याचा उल्लेख करत असतो, आदियोगी, किंवा प्रथम योगी, तसेच आदि गुरु, प्रथम गुरु, जो आपण योग विज्ञानाचा मुलभूत आधार म्हणून ओळखतो त्याचे जनक. डोकं खाली पाय वर किंवा आपला श्वास रोखून धरणे म्हणजे योग नाही. जीवन निर्मितीचे मुलभूत स्वरूप काय आहे आणि त्याला त्याच्या सर्वोच्च संभावनेत कसे बहरता येईल हे जाणून घेण्याचे योग हे एक विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे.

हिमालयातील केदारनाथच्या काही मैल पुढे असलेला हिम सरोवर, म्हणजे कांती सरोवराच्या काठावर हे आंतरिक विज्ञान पहिल्यांदा पद्धतशीरपणे आदियोगींनी त्यांच्या पहिल्या सात शिष्यांना प्रतिपादन करायला प्रारंभ केला, आणि ते सातजण आज सप्तर्षि म्हणून प्रसिद्ध आहेत. आजचे प्रचलित सर्व धर्म निर्माण होण्याआधीची ही घटना आहे. लोकांनी मानवतेला तडा जाणारे आणि ती जखम कधीही भरून न निघणारे अनेक मार्ग शोधण्याआधीच, मानवी चैतन्य वृद्धिंगत करण्यासाठी आवश्यक आलेली शक्तीशाली साधने निर्माण करून त्यांचा प्रसार केला गेला होता.

दोघं एक समान

म्हणून “शिव” म्हणजे “जे अस्तित्वरहित आहे ते,” आणि आदियोगी, अनेक दृष्टीने, ते एकसमान आहेत. एक अस्तीत्वसहित योगी, आणि दुसरे जे अस्तीत्वरहित ते, ज्याला आपण अनंत पोकळी म्हणतो, जे सृष्टी-निर्मितीचा आधार आहे, दोन्ही एकच आहेत, कारण एखाद्याला आपण योगी म्हणतो कारण त्याने संपूर्ण अस्तित्व आपलेच एक अविभाज्य अंग असल्याचे अनुभवलेले आहे. जर संपूर्ण ब्रम्हांड एखादा क्षणभरसुद्धा आपल्यात सामावून घ्यायचे असेल, तर त्या एका क्षणासाठी सुद्धा तुम्हाला ते शून्यत्व किंवा अनंत पोकळी व्हावेच लागेल. केवळ ते शून्यत्व किंवा अनंत पोकळीच विश्वातील प्रत्येक गोष्ट एकत्र धरून ठेऊ शकते. एक सीमित वस्तू असीमित वस्तुंना आपल्यात सामावू शकणार नाही. एखादे भांडे आपल्यात समुद्राला धरून ठेऊ शकत नाही. पृथ्वी समुद्राला आपल्यात धरून ठेऊ शकते, पण ती सूर्यमालेतील सर्व ग्रह आणि सूर्याला धरून ठेऊ शकत नाही. सूर्यमाला सूर्य आणि इतर ग्रहांना धरून ठेऊ शकते, परंतु ती उर्वरित आकाशगंगेला धरून ठेऊ शकत नाही. आपण जर असे टप्प्याटप्प्याने पाहात गेलात, तर शेवटी आपल्याला असे दिसेल, की केवळ शून्यत्वच सर्व गोष्टींना धरून ठेऊ शकते. “योग” या शब्दाचा अर्थ “मिलन” किंवा एक होणे असा आहे. योगी म्हणजे अशी व्यक्ती, जिने ह्या एकत्वाचा किंवा हे मिलन अनुभवलेले आहे. म्हणजेच, किमान एक क्षणभर तरी ते संपूर्ण शून्य किंवा ती अनंत पोकळी झालेले होते.

जेंव्हा आपण शिवाविषयी, “जे अस्तित्वरहित आहे असे” आणि शिवा एक योगी या अर्थाने बोलतो, तेंव्हा एका अर्थाने दोघं एक समान, सारखेच आहेत, पण तरीही ते दोन वेगळे पैलू आहेत. भारतात बोलीभाषिक संस्कृती असल्याने आपण एका गोष्टीपासून दुसर्‍या गोष्टीकडे आणि दुसर्‍या गोष्टीपासून पुन्हा पहिल्या गोष्टीकडे विनासायास वळू शकतो. एका क्षणी आपण शिवाला अद्वितीय असे म्हणतो, दुसर्‍याच क्षणी आपण शिवाचा उल्लेख योगप्रक्रियेचं तंत्रज्ञान बहाल करणारी व्यक्ती म्हणून करतो.

शिवा काय नाही!

दुर्दैवाने, आज बहुतांश लोकांना शिवाची ओळख फक्त भारतीय कॅलेंडरवरील चित्रातूनच केली गेलेली आहे. त्यांनी त्याला एक गोबर्‍या गालाचा, निळ्या रंगाचा माणूस बनविले आहे कारण कॅलेंडर तयार करणार्‍या कलाकार केवळ एकच चेहेर चित्रित करायची मुभा असते. आपण जर कृष्णाची मागणी केलीत, तर तो त्याच्या हातात बासरी दाखवेल. आपण जर रामाचे चित्र मागितलेत, तर तो त्याच्या हातात धनुष्य दाखवेल. आपण जर शिव म्हणालात तर तो त्याच्या डोक्यावर चंद्र काढेल, येवढेच!

प्रत्येक वेळेस मी ही कॅलेंडर पहात असताना, मी नेहेमीच ठरवतो की या चित्राकारांसमोर मी कधीही बसणार नाही. कॅमेरामधील छायाचित्र एकवेळ ठीक आहेत – तुम्ही जसे असता तसेच तुमचे छायाचित्र येते. तुम्ही जर भूतासारखे दिसत असाल, तर तुमचे छायाचित्रसुद्धा भूतासारखेच असेल. शिवासारखा एक योगी गोबर्‍या गालांचा कसा काय असू शकेल? तुम्ही त्याला जर हाडकुळा दाखवलात तर एक वेळ ठीक आहे, पण गोबर्‍या गालांचा शिवा – कसे शक्य आहे?

योग संस्कृतीत, शिवाकडे देव किंवा ईश्वर म्हणून पाहिले जात नाही. ती एक अशी व्यक्ती होती, जो या भूमीवर चालला, फिरला आणि हिमालयात त्याचं निवासस्थान होतं. योग परंपरेचा जनक म्हणून, मानवी चेतना वृद्धिंगत करण्यामधील त्याचे योगदान इतके अभूतपूर्व आहे की ते कधीच दुर्लक्षित करता येणार नाही. मानव तंत्रप्रणाली तिच्या परम संभावानेत रुपांतरीत करण्याहे एकूणएक मार्ग हजारो वर्षे आधी त्याने शोधले, पारखले आणि त्यांचे परीक्षण केले. त्या मार्गांची परिष्कृतता आणि जटिलता अविश्वसनीय आहे. त्याकाळचे लोक इतके प्रगत होते की नाही हा प्रश्न अप्रासंगिक आहे. कारण हे काही एक विशिष्ठ सभ्यता किंवा विचारसरणीतून निर्माण झालेले नाही. हे त्याच्या स्वतःच्या आत्म साक्षात्कारातून निर्माण झालेले आहे. त्याच्या सभोतली काय होतं किंवा काय घडत होतं याच्याशी त्याचा काहीच संबंध नव्हता. त्याच्या स्वानुभवातून आपल्यालाच ओतप्रोत केले. मानवाच्या प्रत्येक तंत्र प्रणालीत कोणत्या क्षणी काय करता येईल याविषयीचे अतिशय तपशीलवार, अर्थपूर्ण आणि मुद्देसूद विवेचन त्याने केलेले आहे. आपण त्यामधील एकही गोष्ट बदलू शकत नाही कारण त्यांनी ते सर्व काही इतक्या विलक्षण आणि अदभूत हुशारीने आणि सुंदर प्रकारे सांगून ठेवलेले आहे. आपण केवळ ते समजावून घेण्यासाठी आपले आयुष्य व्यतित करू शकतो.

    Share

Related Tags

शिव तत्त्व

Get latest blogs on Shiva

Related Content

महाशिवरात्रीची 5 तथ्ये