सद्गुरू: शिव पुराणात असे म्हटले आहे की, आदियोगी शिव हे एक वैरागी होते आणि कवट्यांची माळ घालून स्मशानात फिरणारे उग्र वैरागी होते. ते एक अतिशय उग्र व्यक्ती होते आणि त्यांच्याजवळ जाण्याची कुणाची हिंमत होत नसे. मग सर्व देवांनी त्यांची स्थिती पाहिली आणि विचार केला, “जर ते असेच राहिले, तर हळूहळू त्यांची ऊर्जा आणि त्यांचे तरंग संपूर्ण जगावर प्रभाव टाकतील आणि मग प्रत्येकजण वैरागी होईल. आत्मज्ञान आणि मुक्तीच्या दृष्टीने हे चांगले आहे, पण आमचे काय? आमचा खेळ संपेल. लोक आम्हाला हव्या असलेल्या गोष्टींकडे लक्ष देणार नाहीत. आम्ही आमचे खेळ खेळू शकणार नाही, म्हणून आपल्याला काहीतरी करावे लागेल.”
बराच आग्रह आणि मनधरणी केल्यानंतर, कसेबसे त्यांचे सतीशी लग्न लावून दिले. या विवाहानंतर ते अर्धवट गृहस्थ झाले. काही क्षण ते अतिशय जबाबदार गृहस्थ होते; काही क्षण ते बेजबाबदार दारुडे होते; काही वेळा ते इतके रागावलेले असत की, सृष्टी जाळून टाकू शकत होते; काही वेळा ते सृष्टीसाठी इतके शीतल आणि आल्हाददायक बनत असत. ते सतत बदलत राहिले.
सतीला जगासाठी आवश्यक असलेल्या पद्धतीने त्यांचा पूर्णपणे सांभाळ करता आला नाही. नंतर अशा घटना घडल्या की, तिने देह त्याग केला आणि शिव पुन्हा एकदा अतिशय उग्र वैरागी झाले, पूर्वीपेक्षाही जास्त भयानक आणि दृढनिश्चयी. आता संपूर्ण जग वैरागी होण्याचा धोका अधिक वाढला आणि देव खूप काळजीत पडले.
त्यांना पुन्हा एकदा विवाहाच्या बंधनात अडकवायचे होते. म्हणून त्यांनी आदिशक्तीची आराधना केली आणि तिला पार्वतीचे रूप धारण करण्यास सांगितले. तिने पार्वती म्हणून जन्म घेतला आणि तिच्या आयुष्यात एकच ध्येय होते - काहीही करून शिवासोबत विवाह करणे. ती मोठी झाली आणि तिने अनेक मार्गांनी त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग देवांनी कामदेवाचा वापर करून शिवावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला, आणि एका अलगद क्षणी, ते पुन्हा गृहस्थाश्रमात आले. त्यानंतर त्यांनी स्वतःमध्ये प्रचंड सुसंवाद आणि संतुलन राखत वैरागी आणि गृहस्थ अशा दोन्ही भूमिका बजावायला सुरुवात केली.
शिवाने पार्वतीला आत्मज्ञानाचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. अनेक वेड्यावाकड्या आणि प्रेमळ मार्गांनी, त्यांनी तिला ‘स्वतःला कसे जाणावे’ हे शिकवले. पार्वतीने सर्वोच्च आनंद प्राप्त केला. पण मग, जसे नेहमीच कुणाच्याही बाबतीत घडते, एकदा तुम्ही शिखरावर पोहोचला आणि जेव्हा तुम्ही खाली पाहता, सुरुवातीला तुम्ही आनंदाने भारावून जाता; त्यानंतर करुणा तुम्हाला व्यापते आणि तुम्हाला ती इतरांना द्यावीशी वाटते. तुम्हाला वाटते की, कसेही करून प्रत्येकाला हे मिळावे.
महाशिवरात्रीचा दिवस हा शिव आणि पार्वतीच्या विवाहाचा दिवस होता. आदियोगी हे एक वैरागी होते, त्यांचे परम वैराग्य या दिवशी प्रेमात रूपांतरित झाले, कारण त्यांना गुंतण्याची भीती नव्हती; आणि हे प्रेम त्यांच्या ज्ञानाची आणि दृष्टीची खोली प्रसारित करण्याचे साधन बनले.
पार्वतीने जगाकडे पाहिले आणि शिवाला म्हणाली, "तुम्ही मला जे शिकवले ते खरोखर अद्भुत आहे, हे सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. पण मला दिसते की ज्या पद्धतीने तुम्ही मला हे ज्ञान दिले, त्या पद्धतीने तुम्ही संपूर्ण जगाला हे ज्ञान देऊ शकणार नाही. तुम्हाला जगाला देण्यासाठी दुसरी पद्धत विकसित करावी लागेल." आणि तेव्हाच शिवाने योगाची पद्धत रचायला सुरुवात केली. त्यांनी सात शिष्य निवडले, जे आज सप्तऋषी म्हणून ओळखले जातात. त्या क्षणापासून, आत्मज्ञान प्राप्त करण्याची एक पद्धत म्हणून, योग अतिशय पद्धतशीर आणि वैज्ञानिक बनला, जेणेकरून तो प्रत्येकाला शिकवता येईल.
अशा प्रकारे शिवाने दोन पद्धती विकसित केल्या - तंत्र आणि योग. त्यांनी पत्नीला - पार्वतीला तंत्र शिकवले. तंत्र हे अतिशय आत्मीय आहे, फक्त लोकांच्या अतिशय लहान गटांमध्येच केले जाऊ शकते, पण योग मोठ्या गटांना शिकवला जाऊ शकतो. तो आपल्या भोवतालच्या जगासाठी, विशेषतः आजच्या काळासाठी अधिक योग्य आहे. म्हणूनच आजही शिवांना योगचे पहिले गुरु किंवा आदिगुरु म्हणून मानले जाते.