logo
logo

शिवाच्या १० रूपांचे वर्णन

योग कथांमध्ये वर्णन केलेल्या शिवाचा दहा वेगवेगळ्या रूपांबद्द्दल सदगुरू आपल्याला सांगत आहेत आणि स्पष्ट करत आहेत कि ही दहा रूपे प्रत्येकी कोणत्या गोष्टीचे प्रतिनिधित्व करतात. जसं कि गतिमान नटराज, भीतीदायक काळभैरव, लहान मुलासारखे भोलेनाथ आणि बरेच काही !

सद्गुरु: मानवी मन कल्पना करू शकेल आणि शकणार नाही अशा प्रत्येक संभाव्य गुणांना व्यापणारी शिवाची असंख्य रूपे आहेत. काही वन्य आणि भयंकर आहेत. काही गूढ आहेत. इतर प्रेमळ आणि मोहक आहेत. भोळ्या भोलेनाथापासून पासून भयावह काळभैरवापर्यत, सुंदर सोमसुंदरापासून ते भयंकर अघोरापर्यंत – शिव सर्व शक्यता व्यापतो, आणि तरी या सर्वांपासून अलिप्त राहतो. या सर्वांमध्ये पुढील पाच मूलभूत रूपे आहेत.

शिवाची पाच मूलभूत रूपे

योग योग योगेश्वराय

भूत भूत भूतेश्वराय

काल काल कालेश्वराय

शिव शिव सर्वेश्वराय

शंभो शंभो महादेवाय

योगेश्वर रूप

योगमार्गावर चालण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या जीवनाच्या अशा टप्प्यावर आला आहात जिथे तुम्हाला भौतिकतेची असण्याची मर्यादा जाणवली आहे आणि तुम्हाला भौतिकतेच्या पलीकडे जाण्याची आवश्यकता वाटत आहे. तुम्हाला या विशाल विश्वाचही बंधन वाटू लागलं आहे. तुम्हाला हेजाणवतंय की जर तुम्ही एका छोट्या सीमेमध्ये बांधले जाऊ शकता तर तुम्ही एका विशाल सीमेने देखील बांधले जाऊ शकता. तुम्हाला हा अनुभव घेण्यासाठी काही ब्रह्मांड पार करण्याची गरज नाही. इथे बसून, जर तुम्हाला हे कळतंय की ही लहान सीमा तुम्हाला बांधून ठेऊ शकते तर विश्व पार केल्यावर देखील काही काळानंतर ती प्रचंड सीमा पण तुम्हाला बंधनासारखी वाटेल. तुम्ही किती दूर अंतर प्रवास करू शकता एवढाच एक प्रश्न आहे. एकदा का तुमची अंतर कापण्याची क्षमता वाढली कि सर्व प्रकारच्या सीमा या बंधनच वाटतील. एकदा का हे तुम्हाला समजलं आणि अनुभवातुन जाणवलं, एकदा का तुम्हाला लक्षात आले कि ही ओढ भौतिक विश्वावर प्रभुत्वामुळे पूर्ण होउ शकत नाही कि मग समजा तुम्ही योगमार्गावर आहात. योग म्हणजे भौतिक रचनेच्या मर्यादा मोडणे, परंतु ही सीमा मोडण्यासाठी आणि तो पैलू जाणण्यासाठी ज्याचे स्वरूप भौतिक नाही. तुम्हाला सीमित आणि असीमित यांचे मिलन घडवायचे आहे. अस्तित्वाच्या असीमित स्वरूपात तुम्हाला सीमा विरघळवून टाकायच्या आहेत.

शिवाचे भूतेश्वर रूप

भौतिक सृष्टी, आपण जे काही पाहतो, ऐकतो, ज्याचा वास घेतो, चव घेतो आणि ज्याला स्पर्श करतो – तुमचे शरीर, ग्रह, ब्रह्माण्ड, अगदी संपूर्ण विश्व – सर्व काही फक्त पाच पदार्थांचा एक खेळ आहे. केवळ पाच घटकांसह काय हि आश्चर्यकारक रचना ज्याला आपण विश्व म्हणतो. आपण एका हाताच्या बोटांवर मोजू शकता अशा फक्त पाच घटकांसह, किती गोष्टी तयार केल्या जातात! निर्मिती यापेक्षा जास्त करुणात्मक असूच शकत नाही. जर पन्नास लाख घटक असतील तर तुम्ही हरवूनच जाल.

पंचभूत या नावाने ओळखल्या जाणार्‍या या पाच घटकांवर प्रभुत्व मिळविणे म्हणजेच सर्व काही मिळवण्यासारखे आहे – तुमचे आरोग्य, तुमचे कल्याण, जगातील तुमची शक्ती आणि तुम्हाला हवे असलेले निर्माण करण्याची क्षमता या सर्व गोष्टी. कळत नकळत, जाणीवपूर्वक किंवा अजाणपणे काही व्यक्ती या भिन्न घटकांवर काही प्रमाणात नियंत्रण किंवा प्रभुत्व मिळवतात. त्यांच्याकडे किती नियंत्रण किंवा प्रभुत्व आहे हे त्यांच्या शरीराचे स्वरूप, त्यांच्या मनाचे स्वरूप, ते काय करतात त्याचे स्वरूप, ते किती यशस्वीरित्या करतात आणि किती दूरदृष्टीने पाहू शकतात हे निर्धारित करते. भूतेश्वरायाचा अर्थ असा आहे की ज्याने पंचभूतांवर प्रभुत्व मिळवले आहे तो किमान या भौतिक जगात त्याचे जीवन निश्चित करू शकतो.

कालेश्वर रूप

काल म्हणजे (काळ) वेळ. जरी तुम्ही पंचभूतांवर प्रभुत्व मिळवले असले, जरी अमर्याद अशा विश्वाशी एकरूप झाला असाल, किंवा तुम्हाला विरघळणं जरी माहित असेल तरी जोपर्यंत तुम्ही इथे अस्तित्वात आहात तोपर्यंत काळ हा पुढे जातंच असतो. काळावर प्रभुत्व मिळवणे हा एक पूर्णपणे वेगळा आयाम आहे. काल म्हणजे फक्त काळचं अर्थ नाही तर त्याचा अर्थ अंधार देखील आहे. काळ काळोख आहे. काळ हा प्रकाश असू शकत नाही कारण प्रकाश काळामधून प्रवास करतो. प्रकाश काळाचा गुलाम आहे. प्रकाशाला एक सुरुवात आणि अंत आहे. काळाचे स्वरूप वेगळं आहे. हिंदूंच्या जीवनशैलीमध्ये त्यांना काळाचे सहा भिन्न प्रकार सांगितले गेले आहेत. आपल्याला एक गोष्ट जाणून घ्यावी लागेल – जसे आपण येथे बसता, आपला वेळ संपत जाईल. मृत्यूबद्दल तमिळ अभिव्यक्ती खूप चांगली आहे – “कालमयितंगा,” म्हणजे “त्याचा काळ संपला.”

इंग्रजीमध्ये, आपण यापूर्वीही अशा प्रकारचे शब्द वापरत होतो – “he expired!” एखाद्या औषधाप्रमाणे किंवा कशासही, एखादा माणूस देखील एक्सपायरी डेटसह येतो. आपल्याला वाटेल की आपण बर्‍याच ठिकाणी जात आहात. नाही, जिथे आपल्या शरीराचा प्रश्न आहे, ते क्षणभरसुद्धा विचलित न होता सरळ चितेकडे चाललं आहे. तुम्ही या प्रक्रियेचा वेग थोडा कमी करू शकता परंतु यामुळे दिशा बदलणार नाही. जसे जसे तुमचं वय होत जातं, पृथ्वी तुम्हाला परत आत ओढून घ्यायचा प्रयत्न करीत असल्याचे तुम्हाला जाणवेल. जीवन आपले चक्र पूर्ण करतेच.

काळ हा जीवनाचा एक खास आयाम आहे – इतर तीन आयामांमध्ये तो बसत नाही. आणि विश्वातील सर्व गोष्टींपैकी ही सर्वात मायावी गोष्ट आहे. तुम्ही त्याला पकडून ठेऊ शकत नाही कारण तो नाहीच. तो तुम्हाला माहित असलेल्या अस्तित्वामध्ये नाही. काळ हा सृष्टीचा सर्वात शक्तिशाली आयम आहे, जो संपूर्ण विश्वाला बांधून ठेवतो . यामुळे, आधुनिक भौतिकशास्त्र गुरुत्वाकर्षण कसे कार्य करते याबद्दल अजूनही गोंधळात आहे. गुरुत्वाकर्षण नाही; हा कालच आहे जी प्रत्येक गोष्ट बांधून ठेवतोय.

शिव – सर्वेश्वर – शंभो

शिव म्हणजे “जे नाही ते; जे विरून गेलं आहे ते.” जे नाही तेच प्रत्येक गोष्टीचा आधार आहे आणि तोच हा असीम सर्वेश्वर. शंभो ही फक्त एक किल्ली आहे, एक रस्ता आहे. जर तुम्ही अशा प्रकारे शंभो उच्चारू शकत असाल ज्याने शरीर तुटून जाईल तर तो तुमच्यासाठी एक मार्ग होऊ शकतो. तुम्हाला या सर्व बाबींमध्ये प्रभुत्व मिळवायचे असेल आणि तिथे पोचायचे असेल तर बराच काळ लागेल. जर तुम्हाला फक्त मार्ग हवा असेल तर तुम्ही या बाबींमध्ये प्रभुत्व न मिळवता नव्हे तर गुपचूप तिथे पोचू शकता.

मी जेव्हा लहान होतो तेव्हा मैसूर प्राणीसंग्रहालयात माझे मित्र होते. रविवारी सकाळी माझ्याकडे असलेल्या दोन रुपयांचे मासे विकत घ्यायला मच्छिबाजारात जायचो – अगदी आत – जिथे ते अर्धे कुजलेले मासे विकतात तिथे. तिथे दोन रुपयांत मला कधीकधी दोन ते तीन किलो मासे मिळायचे. मी त्यांना प्लास्टिकच्या पिशवीत बांधून घायचो आणि ते मैसूर प्राणीसंग्रहालयात घेऊन जायचो. माझ्याकडे आणखी पैसे नसायचे. जर तुम्ही मुख्य दारातून आत जात असाल तर त्यावेळी तिकिट एक रुपयाला होतं. तिथेच जमिनीपासून सुमारे दोन फूट उंच असा अडथळा देखील होता. तुम्ही त्याखालून रांगत जायला तयार असाल तर प्रवेश विनामूल्य. ही काही माझ्यासाठी समस्या नव्हती – मी रांगत जायचो. त्यामुळे मी तिथे दिवसभर त्या कुजलेल्या माशांना माझ्या सर्व मित्रांना (प्राण्यांना) खाऊ घालायचो.

जर तुम्हाला सरळ चालत जायचे असेल तर, हा एक कठीण मार्ग आहे आणि भरपूर काम करावं लागेल. तुम्ही रांगायला तयार असाल तर इतर सोपे मार्ग आहेत. जे रांगणाऱ्यापैकी आहेत त्यांना कशावरही प्रभुत्व मिळवण्याची चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही आयुष्य असेपर्यंत जगा. जेव्हा मराल, तेव्हा तुम्ही सर्वात सर्वोच्च अवस्थेला पोहोचाल.

एखाद्या सध्या गोष्टींवरही प्रभुत्व मिळविण्यामध्ये एक विशिष्ट सौंदर्य आहे, एक अवर्णनीय सौंदर्य आहे. उदाहरणार्थ, एक बॉलला लाथ मारणे हे लहान मूल देखील करू शकते. पण जेव्हा एखादा त्यावर प्रभुत्व मिळवतो, तेव्हा अचानक त्यामध्ये एक सौंदर्य असते ज्यामुळे अर्ध्या जगाला उभे राहून पहावे लागते. आपल्याला प्रभुत्व जाणून घ्यायचे असेल आणि त्याचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी मेहनत आहे. परंतु तुम्ही जर रांगायला तयार असाल तर फक्त शंभो.

योग परंपरेतील शिवाची विविध रूपे

शिवाचे भोलेनाथ रूप

शिवाकडे नेहमीच एक अत्यंत सामर्थ्यवान जीव म्हणून पाहिले जाते, आणि त्याच वेळी जो व्यवहारात तितकासा धूर्त नाही म्हणून देखील पहिले जाते. म्हणूनच, शिवाचे एक रूप भोलेनाथ म्हणून ओळखले जाते, कारण ते एखाद्या लहान बालकासारखे आहेत. भोलेनाथ म्हणजे निरागस किंवा अजाण सुद्धा. तुम्हाला लक्षात येईल की बर्‍याच हुशार लोकांना अतिशय सहजपणे फसवले जाऊ शकते कारण ते त्यांची बुद्धिमत्ता क्षुल्लक गोष्टींच्या अधीन ठेवत नाहीत. बुद्धिमत्ता जी चतुर आणि हुशार आहे ती जगातील एखाद्या बुद्धिमान व्यक्तीस सहजपणे फसवू शकते. याला पैशाच्या किंवा समाजाच्या दृष्टीने काहीतरी अर्थ असू शकतो परंतु याला जीवनाच्या अनुषंगाने काहीच अर्थ नाही.

जेव्हा आपण बुद्धिमत्ता म्हणतो तेव्हा आपण फक्त हुशार असणे पाहत नाही. आपण त्याकडे, एक असा आयाम ज्यामुळे जीवन घडून येते, त्याला पूर्ण शक्तीने वाहू देण्याच्या दृष्टीने पाहतो. शिवही असाच आहे. तो मूर्ख आहे असे नाही, परंतु त्या सर्व क्षुल्लक गोष्टींमध्ये बुद्धिमत्तेचा वापर करण्याची त्याची इच्छा नाही.

शिवाचं नटराज रूप

नटेश किंवा नटराज म्हणजे नृत्यकलेची देवता हे शिवाच एक अत्यंत महत्त्वपूर्ण रूप आहे. जेव्हा मी स्वित्झर्लंडमधील ‘C.E.R.N.’ संस्थेला भेट दिली, जी जगातली एक मोठी भौतिकशास्त्रीय प्रयोगशाळा आहे, जिथे अणूंची टक्कर करवून ते नष्ट करण्यावर प्रयोग केले जातात, तेव्हा मी पाहिले की प्रवेशद्वारासमोर एक नटराजाची मूर्ती स्थापित आहे, कारण त्यांनी ओळखलयं की सध्या ते जे काम करत आहेत त्याच्याशी साधर्म्य असलेलं मानवी संस्कृतीत यापेक्षा जवळच असं दुसरं काही नाही.

नटराज हे रुप सृष्टीची विपुलता आणि सृष्टीचे नृत्य दर्शवते, ती सृष्टी जिने स्वतःला चिरंतन शांततेपासून स्वतः निर्माण केले आहे. चिदंबरम मंदिरात असलेला नटराज खूप प्रतिकात्मक आहे कारण तुम्ही ज्याला चिदंबरम म्हणता, ते म्हणजे मुळात पूर्णतः निश्चल रूप आहे. ही निश्चलताच या मंदिराच्या रूपानी नटलेली आहे. शास्त्रीय कला ही माणसांमध्ये परिपूर्ण निश्चलता आणण्यासाठी आहे. निश्चलतेशिवाय शिवाय खरी कला येऊच शकत नाही.

अर्धनारीश्वर रूप

साधारणत: शिवाचा परम पुरुष म्हणून उल्लेख केला जातो, परंतु अर्धनारीश्वर स्वरुपात, त्यातील अर्ध्या भाग पूर्ण विकसित स्त्री दाखवलेली आहे. असे म्हणले आहे की जर आतील पुरुषत्व आणि स्त्रीत्व यांचं मिलन झाल तर तुम्ही चिरंतन परमानंदात राहाल. जर तुम्ही ते बाहेर करण्याचा प्रयत्न केला तर ते कधीच जास्त वेळ टिकत नाही आणि त्याबरोबर येणाऱ्या सर्व त्रासांचा एक खेळ सुरु होतो. पुरुषत्व आणि स्त्रीत्व म्हणजे नर आणि मादी असे नाही. इथे आपण गुणांबद्दल बोलतोय. मूलत:, दोन व्यक्तींना एकमेकांशी भेटण्याची तीव्र इच्छा नसते तर जीवनाच्या दोन आयामांना एकमेकांशी भेटण्याची आस असते – बाहेर तसेच आतमध्येसुद्धा. जर तुम्ही ते आतमध्ये प्राप्त केले तर बाहेरचं शंभर टक्के तुमच्या निवडीनुसार होईल. अन्यथा, बाहेरचं एक भयानक सक्तीचे असेल.

हे दर्शविण्यासाठी हे एक प्रतीक आहे की जर तुम्ही तुमच्या सर्वोच्च स्वरूपात विकसित झाला तर तुम्ही अर्धा पुरुष आणि अर्धा स्त्री व्हाल – तृतीयपंथी नाही, एक संपूर्ण पुरुष आणि तेवढीच परिपूर्ण स्त्री. तेव्हा तुम्ही एक संपूर्ण विकसित मनुष्य व्हाल.

काळभैरव रूप

काळभैरव हे शिवाचे अतिभयंकर असे रूप आहे – जेव्हा ते काळालाच नष्ट करतात. सर्व भौतिक वास्तविकता हि काही कालावधीच्या अस्तित्त्वात असते जर मी तुमचा काळच नष्ट केला तर सर्वकाही संपेल.

शिवाने भैरवी यातना तयार करण्यासाठी योग्य प्रकारचा वेष घेतला आणि कालभैरव या नावाने प्रसिद्ध झाले. “यातना” म्हणजे परमदु: ख. जेव्हा मृत्यूचा क्षण येतो, तेव्हा अनेक जन्म प्रचंड तीव्रतेने एकत्र जगले जातात, तुम्हाला जे काही त्रास आणि दु:ख एवढ्या जन्मांमध्ये होणार असेल ते क्षणार्धात होतं. त्यानंतर, भूतकाळाचे काहीही तुमच्यामध्ये शिल्लक राहत नाही. तुमचे “सॉफ्टवेअर” पूर्ववत करणे वेदनादायक आहे. परंतु मृत्यूच्या क्षणी हे घडते, म्हणून यावेळी तुमच्याकडे कोणतीही पळवाट नसते. तो शक्य तितक्या संक्षिप्त पद्धतीने हे करतो, कारण त्रास लवकर संपला पाहिजे. आपण त्यास अति-तीव्र केले तरच असे होईल. जर तो सौम्य असेल तर तो कायम चालू राहील.

आदियोगी

योग परंपरेत शिवची पूजा देव म्हणून केली जात नाही. तो आदियोगी म्हणजे प्रथम योगी, आणि आदि गुरु, जो योग शास्त्राचा स्रोत आहे. दक्षिणायनाची पहिला पौर्णिमा म्हणजे गुरु पूर्णिमा होय, याच दिवशी आदियोगीने या योगज्ञानाचा प्रसार त्याच्या पहिल्या सात शिष्यांमधे केला ज्यांना सप्तऋषी असे म्हणतात.

हे सर्व धर्माच्या उदयाच्या आधीच झालेलं आहे. लोकांनी मानवतेला खंडित करण्याचे फूट पाडण्याचे मार्ग तयार करण्यापूर्वी, मानवी चेतना वाढविण्यासाठी आवश्यक असलेली सर्वात शक्तिशाली साधने साकारली गेली आणि त्याचा प्रसार केला गेला. त्यांची आधुनिकता अविश्वसनीय आहे. त्यावेळी लोक इतके परिष्कृत होते की नाही हा प्रश्न असंबद्ध आहे कारण हे एका विशिष्ट सभ्यतेतून किंवा विचार प्रक्रियेमधून आलेले नाही. हे एका अंतर्गत अनुभूतीतून आले आहे. ते स्वत: आदियोगीपासून आले आहे. आजही आपण त्यात एखादी गोष्ट बदलू शकत नाही कारण जे काही सांगितले जाऊ शकते ते सर्व काही त्याने अतिशय सुंदर आणि बुद्धिमान पद्धतीने सांगितले आहे. तुम्ही आयुष्यात केवळ ते उलगडण्याचा प्रयत्न करू शकता.

शिवाचे त्र्यंबक स्वरूप

तिसर्‍या डोळ्यामुळे शिव नेहमीच त्र्यंबक म्हणून संबोधले जातात. तिसर्‍या डोळ्याचा अर्थ असा नाही कपाळावर एक खाच आहे. याचा सहज अर्थ असा आहे की त्याचे आकलन त्याच्या सर्वोच्च शक्यतेपर्यंत पोचले आहे. तिसरा डोळा द्रष्टेपणाचा डोळा आहे. दोन भौतिक डोळे फक्त ज्ञानेंद्रिय आहेत. ते मनाला सर्व प्रकारचा मूर्खपणा पुरवत आहेत कारण तुम्ही जे पहात आहात ते सत्य नाही. तुम्ही या व्यक्तीला किंवा ती व्यक्तीला पाहता आणि तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी विचार करता, परंतु तुम्ही त्यात शिव पाहण्यास सक्षम नाही. त्यासाठी, आणखी एक डोळा, खोल भेदक असा डोळा, उघडला पाहिजे.

विचार आणि तत्त्वज्ञान कोणत्याही प्रमाणात तुमच्या मनात स्पष्टता आणणार नाही. तुम्ही तयार करता ती तार्किक स्पष्टता कोणीही विकृत करू शकते; कठीण परिस्थिती तुम्हाला पूर्णपणे बुचकळ्यात टाकू शकते. दृष्टी केवळ तेव्हाच उघडते जेव्हा आपल्याकडे अंतर्दृष्टी असते. तेव्हाच परिपूर्ण स्पष्टता येते.

ज्याला आपण शिव म्हणून संबोधतो ते आकलनाचे प्रत्यक्ष सर्वोच्च स्वरूप होय. या संदर्भाने ईशा योग केंद्रामध्ये महाशिवरात्र साजरी केली जाते. प्रत्येकासाठी आकलन किमान एक टप्प्याने अजून वाढण्याची ही एक संधी आणि शक्यता आहे. शिव म्हणजे हेच आहे आणि योग म्हणजेसुद्धा हेच आहे. हा धर्म नाही; हे आंतरिक उत्क्रांतीचे विज्ञान आहे.

    Share

Related Tags

शिव तत्त्व

Get latest blogs on Shiva

Related Content

शीर्षक: महाशिवरात्री दिवशी तुम्हाला सजग ठेवण्यासाठी 4 कथा