सद्गुरू: काही दिवसांपूर्वी कुणीतरी मला विचारले की मी शिवाचा - आदियोगींचा चाहता आहे का? चाहता-वर्ग तेव्हा सुरू होतो, जेव्हा लोकांच्या भावना एखाद्याच्या बाबतीत गुंतून जातात. मी निश्चितच त्यांचा चाहता नाही. मग काय आहे? खरी गोष्ट वेगळी आहे, पण मी तुम्हाला ते समजावून सांगतो.
शेवटी, कोणत्याही पिढीत, एखाद्या व्यक्तीचे मूल्य त्याने त्या पिढीला किंवा येणाऱ्या पिढ्यांना दिलेल्या योगदानावरून ठरते. या जगात अनेक चांगली माणसे होऊन गेली ज्यांनी इतरांच्या जीवनात अनेक प्रकारे योगदान दिले. कुणी प्रेमाची लाट आणली, कुणी ध्यानाची लाट आणली, कुणी आर्थिक समृद्धीची लाट आणली - त्या काळाच्या गरजेनुसार.
उदाहरणार्थ, महात्मा गांधी - त्यांच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून - त्यांना कमी लेखण्यासाठी नाही - स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या पद्धती, त्यांचा मार्ग आणि त्यांची कार्यपद्धती यामुळे ते एका विशिष्ट पातळीवर पोहोचले. ते योग्य व्यक्ती होते आणि त्या काळासाठी त्यांनी अद्भुत कामे केली - पण ते नेहमीच प्रासंगिक नसतील. किंवा मार्टिन ल्युथर किंग, त्या काळात, भेदभाव असल्यामुळे, ते खूप महत्त्वाचे होते, पण समाजात अशा समस्या नसत्या तर ते फक्त एक सामान्य व्यक्ती असते.
इतिहासात मागे गेलात तर अनेक महान पुरुष होऊन गेले, पण ते बहुतांशी त्या काळातील घडामोडी, त्या काळाची गरज किंवा त्या काळातील एखादी कमतरता यामुळे ते महत्त्वाचे ठरले. गौतम बुद्धांकडे पाहिले तर, समाज कर्मकांडामध्ये इतका गुरफटला होता की, जेव्हा ते कर्मकांडाशिवाय आध्यात्मिक मार्ग घेऊन आले, तेव्हा ते लगेच लोकप्रिय झाले. जर हा समाज कर्मकांडाशिवाय असता तर ते काही नवीन नसते आणि ते इतके महत्त्वाचे ठरले नसते.
अनेक प्रकारे, कृष्ण खूप महत्त्वाचा होता. पण तरीही, त्या समाजात संघर्ष नसता, पांडव आणि कौरव यांच्यात लढाई नसती, तर त्याचा प्रभाव फक्त स्थानिक असता. तो इतका मोठा झाला नसता. किंवा राम, त्याची पत्नी पळवली गेली नसती तर तो फक्त एक राजा म्हणून राहिला असता, कदाचित एक चांगला राजा म्हणून स्मरणात राहिला असता, किंवा काही काळानंतर लोक त्याला विसरून गेले असते. संपूर्ण युद्ध आणि लंकादहन झाले नसते तर त्याचे जीवन फारसे महत्त्वाचे ठरले नसते.
आदियोगी किंवा शिवाचे महत्त्व हेच आहे - असा कोणताही प्रसंग घडला नाही. कोणतेही युद्ध नव्हते, कोणताही संघर्ष नव्हता. त्यांनी त्या दररोजच्या गरजा पूर्ण केल्या नाहीत. त्यांनी मानवी चेतना विकसित करण्यासाठी अशी साधने आणि पद्धती दिल्या ज्या सर्व काळांसाठी प्रासंगिक आहेत. जेव्हा लोकांना अन्न, प्रेम किंवा शांतीची कमतरता असते आणि तुम्ही त्यांना जे हवे ते देता, तेव्हा तुम्ही त्या काळात महत्वपूर्ण बनू शकता. पण जेव्हा अशी कोणतीही कमतरता नसते, तेव्हा अखेरीस मानवासाठी स्वतःला कसे उन्नत करायचे हेच प्रासंगिक ठरते.
आपण फक्त त्यांनाच महादेव हा पदवी का दिली, कारण त्यामागील बुद्धिमत्ता, दृष्टी आणि ज्ञान अतुलनीय आहे. तुमचा जन्म कुठेही झालेला असो, तुमचा धर्म, जात किंवा पंथ कोणताही असो, तुम्ही पुरुष असा किंवा स्त्री - या पद्धतींचा वापर कायमच करता येईल. जरी लोक त्यांना विसरले तरी लोकांना याच पद्धती वापराव्या लागतील, कारण त्यांनी मानवी यंत्रणेबाबत जाणून घेण्याजोगे काहीच शिल्लक ठेवले नाही. त्यांनी कोणतीही शिकवण दिली नाही. त्यांनी त्या काळासाठी कोणतेही उपाय दिले नाहीत. जेव्हा लोक अशा प्रकारच्या समस्यांसह त्यांच्याकडे आले, तेव्हा त्यांनी फक्त डोळे बंद केले आणि पूर्ण अनास्था दाखवली.
मानवी अस्तित्व समजून घेण्याबाबतीत, प्रत्येक प्रकारच्या मानवासाठी मार्ग शोधण्याबाबतीत, हे शाश्वत योगदान आहे; हे त्या काळाचे किंवा त्या काळासाठीचे योगदान नाही. निर्मिती म्हणजे, जिथे काहीच नव्हते, तिथे ते काहीतरी बनले. त्यांनी या निर्मितीला अनिर्मित अवस्थेत आणण्याचा मार्ग शोधला.
म्हणूनच आपण त्यांना “शि-व” हे नाव दिले - याचा अर्थ “ते, जे नाहीये”. जेव्हा “ते, जे नाहीये” काहीतरी बनले किंवा “ते, जे नाहीये”, आपण त्या आयामाला ब्रह्म म्हटले आहे. शिवांना असे म्हणले गेले, कारण त्यांनी एक पद्धत, एक मार्ग दिला - फक्त एकच नाही तर शक्य तो प्रत्येक मार्ग दिला की, कशी अंतिम मुक्ती मिळवायची, याचा अर्थ “काहीतरी” पासून “काहीही नाही” कडे जाणे.
शिव हे नाव नाही, ते एक वर्णन आहे. जसे कुणाला डॉक्टर, वकील किंवा अभियंता म्हणतात, तसे आपण त्यांना शिव म्हणतो, जीवनाचे विघटन करणारा. याचा थोडा चुकीचा अर्थ जीवनाचा नाश करणारा असा लावला गेला. पण एका अर्थाने ते बरोबर आहे. तुम्ही जेव्हा "नाश करणारा" हा शब्द वापरता, फक्त तेव्हाच लोक त्याला नकारात्मक समजतात. कुणी "मुक्तिदाता" असा शब्द वापरला असता तर ते सकारात्मक समजले गेले असते. हळूहळू "विघटन करणारा" हा "नाश करणारा" झाला आणि लोक त्यांना नकारात्मक समजू लागले. त्यांना काहीही म्हणा, त्यांना त्याची पर्वा नाही - हेच बुद्धिमत्तेचे स्वरूप आहे.
जर तुमची बुद्धिमत्ता एका विशिष्ट उंचीवर पोहोचली तर तुम्हाला कोणत्याही नैतिकतेची गरज नाही. जेव्हा बुद्धिमत्तेची कमतरता असते, फक्त तेव्हाच तुम्हाला लोकांना हे सांगावे लागते की काय करू नये. जर कुणाची बुद्धिमत्ता वाढली असेल, तर त्यांना काय करावे आणि काय करू नये हे सांगण्याची गरज नाही. त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबद्दल एक शब्दही उच्चारला नाही. योग पद्धतीतील यम आणि नियम हे पतंजलींचे आहेत, आदियोगींचे नाहीत. पतंजली बरेच नंतर होऊन गेले.
पतंजली आपल्यासाठी प्रासंगिक आहेत, कारण योग इतक्या शाखांमध्ये विभागला होता की, तो हास्यास्पद झाला होता. जसे २५-३० वर्षांपूर्वी, जर तुम्हाला वैद्यकीय तपासणी करायची असेल, तर फक्त एक डॉक्टर पुरेसा होता. आज तुम्हाला १२ ते १५ डॉक्टर लागतात - एक तुमच्या हाडांसाठी, एक मांसासाठी, एक रक्तासाठी, एक हृदयासाठी, एक डोळ्यांसाठी - हे आणखी वाढेल.
समजा आणखी शंभर वर्षांनी, आपण इतक्या तज्ञतेकडे जाऊ की, जर तुम्हाला वैद्यकीय तपासणी हवी असेल तर तुम्हाला १५० डॉक्टर लागतील. मग तुम्हाला जावेसे वाटणार नाही, कारण १५० भेटी घेणे, त्या पूर्ण करणे आणि १५० मते एकत्रित करणे यात काही अर्थ राहणार नाही. मग कुणीतरी हे सर्व एकत्र करून त्यातून एक कुटुंब वैद्य बनवण्याबद्दल बोलेल. हेच पतंजलींनी केले.
असे म्हणतात की, त्या काळी जवळपास १८०० योगाच्या शाखा होत्या. जर तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया करायची असेल तर तुम्हाला १८०० शाळांमध्ये जावे लागले असते आणि १८०० वेगवेगळ्या प्रकारचे योग करावे लागले असते. हे अव्यवहार्य आणि हास्यास्पद झाले होते. म्हणून पतंजली आले आणि त्यांनी हे सर्व २०० सूत्रांमध्ये मांडले, ज्यात सराव करण्यासाठी योगाचे फक्त आठ अंग होते. अदियोगी किंवा शिव यांच्याबाबत असे नाही, कारण जीवनातील कोणत्याही परिस्थितीत, ते नेहमीच प्रासंगिक असतात. म्हणूनच ते महादेव आहेत.