सद्गुरूंच्या ओघवत्या शैलीत आपण आदियोगी, प्रथम योगी, ज्यांनी मानवतेला योगाची ओळख करून दिली त्यांच्याविषयी माहिती करून घेतो आहोत.
सद्गुरु: योग विज्ञानात, शिव हा देव म्हणून ओळखला जात नाही, तर तो आदियोगी किंवा प्रथम योगी – योगाचा जनक म्हणून ओळखला जातो. मानवाच्या मनात हे बीज त्यानेच पहिल्यांदा रोवले. योग शास्त्रानुसार, पंधरा हजार वर्षांपूर्वी शिवांना संपूर्ण आत्मज्ञान झाले आणि त्यांनी त्या परमानंदी अवस्थेत हिमालयावर नृत्य केले. त्या परमानंदाच्या अवस्थेने जेंव्हा त्यांना थोडी गती दिली, तेंव्हा ते अधिकच बेभान आणि धुंद होऊन नाचू लागले. जेंव्हा ते हालचालींच्या पलीकडे पोहोचले, तेंव्हा ते संपूर्णतः निश्चल, स्थीर झाले.
लोकांनी पाहिले की ते असा काही अनुभव घेत होते की जो यापूर्वी कोणीच अनुभवला नव्हता, असा अनुभव ज्यावर त्यांचा विश्वासच बसेना. लोकांचा त्यामधील रस वाढत गेला आणि लोक त्याविषयी जाणून घ्यायला त्यांच्याकडे गेले. ते आले, त्यांनी वाट पाहिली आणि ते निघून गेले कारण तो इतरांच्या उपस्थितीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होता. एकतर तो नृत्यात मग्न असे किंवा अगदी निश्चल, स्थीर असे. त्यांच्या आजूबाजूला काय घडते आहे याबद्दल त्याला अजिबात काळजी नव्हती. काही काळाने सर्वजण परत फिरले…
फक्त ते सातजण वगळता….
त्या सातजणांना मात्र कोणत्याही परिस्थितीत शिवाकडील ज्ञान प्राप्त करायचे होते, परंतु शिवाने त्यांचाकडे दुर्लक्ष केले. त्यांनी त्याच्याकडे याचना केली, “कृपा करून आम्हाला आपल्याकडील ज्ञान द्या.” शिवाने त्यांची विनंती नाकारली आणि ते म्हणाले, “अरे मूर्खांनो, आपण आत्ता जसे आहात त्या परिस्थितीत पुढील लाखो वर्षातसुद्धा तुम्हाला काहीही समजणार नाही. यासाठी प्रचंड प्रमाणात तयारी करण्याची आवश्यकता आहे. ही काही करमणूक नाही.
म्हणून मग त्यांनी तयारी करायला सुरुवात केली. दिवसांमागून दिवस निघून गेले, महिन्यांमागून महीने निघून गेले, वर्षामागून वर्षे निघून गेली, त्यांची तयारी सुरूच होती. शिवाने मात्र त्यांचाकडे दुर्लक्षच करायचे ठरविले. पौर्णिमेच्या दिवशी, 84 वर्षांच्या साधनेनंतर, जेंव्हा सूर्याचे उत्तरेकडून दक्षिणेकडे भ्रमण सुरू झाले – ज्याला या परंपरेत दक्षिणायन असे म्हणतात – आदियोगींनी या सातजणांकडे पाहिले आणि त्यांना असे दिसले की ते ज्ञान ग्रहण करणारे तेजपुंज तारे बनले आहेत. ते ज्ञान ग्रहण करण्यास अगदी तयार होते. आता शिवाला त्यांचाकडे अधिक दुर्लक्ष करणे अशक्य झाले. त्यांनी त्याचे लक्ष वेधून घेतले होते.
कांती सरोवर येथे सद्गुरु
त्याने त्यांच्यावर पुढील काही दिवस बारकाईने नजर ठेवली आणि जेंव्हा पुढची पौर्णिमा उगवली, तेंव्हा त्याने गुरु होण्याचे ठरविले. आदियोगींनी स्वतःचे परिवर्तन आदिगुरूंमध्ये केले; त्या दिवशी पहिल्या गुरूचा जन्म झाला, ज्याला आज गुरु पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. कांती सरोवराच्या तीरावर, केदारनाथच्या काही किलोमीटर्स वरच्या बाजूला असणारे हे तळे, त्यांची कृपा मानव जातीवर करण्यासाठी ते दक्षिणेकडे वळले, आणि योग विज्ञानाचे ज्ञान या सातजणांना प्रदान करण्याचे कार्य सुरू झाले. योग विज्ञान म्हणजे काही योग वर्ग नाही जेथे जाऊन आपण आपले शरीर कसे वळवायचे ते शिकतो – जे प्रत्येक नवजात अर्भकाला माहिती असते – किंवा आपला श्वास कसा रोखून ठेवायचा – जे जन्म न घेतलेल्या प्रत्येक अर्भकला माहिती असते. हे एक मानवी प्रणालीचे संपूर्ण आकलन करून घेण्याचे विज्ञान आहे.
कित्येक वर्षांनंतर, जेंव्हा हे ज्ञान प्रदान करण्याचे कार्यपूर्ण झाले, तेंव्हा त्यामधून सात परीपूर्ण ज्ञानीपुरुषांचा जन्म झाला – सात विख्यात ऋषि ज्यांना आज सप्तर्षि म्हणून ओळखले जाते, ज्यांची भारतीय संस्कृतीत आज आदराने पुजा केली जाते. या सातजणांपैकी प्रत्येकाला शिवाने योगाचे वेगवेगळे पैलू शिकवले, आणि हे पैलू योगाचे सात मूलभूत रूप बनले. अगदी आज सुद्धा योगाची ही सात वेगवेगळी रुपे अस्तीत्वात आहेत.
सात ऋषींना योग विज्ञानाची दीक्षा
ज्यामुळे मनुष्यप्राणी त्याच्या सध्याच्या मर्यादा आणि अनिवार्यतेच्या पलीकडे विकसित होऊ शकतो असे हे ज्ञान प्रसारित करण्यासाठी सप्तर्षिना सात वेगवेगळ्या दिशांना जगाच्या वेगवेगळ्या भागात पाठविण्यात आले. मानव स्वतःच सृष्टीकर्त्याच्या रुपात कसा राहू शकेल हे ज्ञान आणि तंत्रज्ञान प्राप्त करून ते शिवाचे अनेक हात बनले. काळाने अनेक गोष्टींचा विनाश केलेला आहे, परंतु या भूमीवरील संस्कृतींकडे बारकाईने पाहिले, तर त्या सातजणांच्या कार्याचे छोटे नमुने अजूनही जीवंत असल्याचे दिसते. त्यांनी विविध रंग आणि स्वरूपे घेतलेली आहेत आणि असंख्य विविध स्वरूपे धारण केलेली आहेत, परंतु त्याचे धागे अजूनही दिसून येतात.
आदियोगींनी ही शक्यता निर्माण केली, की मनुष्यप्राण्याने आपल्या प्रजातीच्या निर्धारित मर्यादांमध्ये समाधान मानण्याची आवश्यकता नाही. भौतिकतेत सामाविष्ट राहण्याचा मार्ग आहे परंतु त्यालाच चिकटून राहू नका. शरीरात राहून बसण्याचा मार्ग आहे, परंतु शरीरच बनून राहू नका. आपल्या मनाचा वापर सर्वोच्च क्षमतेने करण्याचा मार्ग आहे पण मनाच्या यातना आपल्याला कधीही स्पर्श करणार नाहीत. सध्या आपण जीवनाच्या ज्या काही स्वरुपात आहात, आपण त्याच्या पलीकडे जाऊ शकता. ते म्हणाले, “तुम्ही जर स्वतःवर आवश्यक ते कार्य केलेत, तर तुम्ही स्वतःच्या सध्याच्या मर्यादां पलीकडे विकसीत होऊ शकता.” आदियोगींचे हेच महत्व आहे.