सद्गुरू: शिव हा थोडा भटकणारा पती होता. तो सतत अनेक वर्षे भटकंती करत असे. त्या काळात मोबाईल आणि ईमेल नव्हते, त्यामुळे जेव्हा तो जात असे तेव्हा पार्वतीचा त्यांच्याशी काहीच संपर्क होत नसे. आणि ती खूप एकाकी झाली. शिवाच्या स्वरूपामुळे - त्याला यक्षस्वरूप किंवा मानवी कुळ नसलेले मानले जात असे - पार्वतीला त्याच्यापासून मूल होऊ शकत नव्हते.
म्हणून, तिच्या एकाकीपणातून आणि मातृत्वाच्या इच्छेतून, तिने एक बाळ बनवण्याचा आणि त्याला जीवन देण्याचा निर्णय घेतला. तिने स्वतःच्या अंगावरचे चंदन आणि तिथली माती एकत्र करून बाळाचे रूप दिले आणि त्याला जीवन दिले. हे खूप काल्पनिक वाटू शकते, पण आज विज्ञान अशाच पद्धतीने बोलत आहे. जर कोणी तुमची एपिथेलियल म्हणजे त्वचा पेशी घेतली, तर एक दिवस आपण त्यातून तुमच्यासारखे काहीतरी बनवू शकतो. पार्वतीने त्याला जीवन दिले, आणि एक छोटा मुलगा जन्माला आला.
काही वर्षांनंतर, जेव्हा हा मुलगा सुमारे दहा वर्षांचा होता, शिव त्याच्या गणांसह परतला. पार्वती स्नान करत होती, आणि तिने ह्या छोट्या मुलाला सांगितले, "कोणीही इकडे येऊ नये याची खात्री कर." मुलाने कधीच शिवाला पाहिले नव्हते, म्हणून जेव्हा तो आला तेव्हा त्या मुलाने त्याला अडवले. शिव अशा मनःस्थितीत होता - थांबायला तयार नव्हता - म्हणून त्याने तलवार काढली, मुलाचे डोके उडवले आणि पार्वतीकडे आला.
जेव्हा पार्वतीने त्याच्या हातातली रक्ताळलेली तलवार पाहिली, तेव्हा तिला काय झाले ते कळले. तिने मुलाला विनाशीर पडलेले पाहिले आणि ती संतापली. शिवाने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, "काही हरकत नाही. तो खरंच तुझा मुलगा नाहीये. शेवटी, तूच त्याला बनवलेस आणि मी त्याला संपवले. मग समस्या काय आहे?" पण ती ऐकायला तयार नव्हती.
हा वाद मिटवण्यासाठी, शिवाने एका गणाचे शीर घेतले आणि ते मुलावर ठेवले. गणेश चतुर्थी हा त्या शीर प्रत्यारोपणाचा दिवस आहे. त्याने गणांच्या प्रमुखाचे शीर घेऊन या मुलावर ठेवल्यामुळे त्याने सांगितले, "आजपासून तू गणपती आहेस. तू गणांचा प्रमुख आहेस." कालांतराने, कॅलेंडर कलाकारांना हा प्राणी काय होता हे समजले नाही, आणि त्यांनी हत्तीचे तोंड काढले. पौराणिक कथांमध्ये गणांच्या हाडांशिवाय असलेल्या अवयवांबद्दल सांगितले आहे. या संस्कृतीत, हाडांशिवाय असलेला अवयव म्हणजे हत्तीची सोंड, म्हणून कलाकारांनी हत्तीचे डोके बनवले. मानसरोवराच्या किनाऱ्यावर तुम्हाला हत्ती सापडणार नाही कारण तेथील भूप्रदेश त्यांच्यासाठी योग्य नाही. हत्तीसाठी पुरेशी झाडी नाही. शिव काही हत्ती कापत फिरला नसता. म्हणून, त्याची अनेक रूप आहेत - गणेश, गणपती, विनायक - पण गजपती नाही.
गण हे शिवाचे साथीदार होते. ते कुठून आले हे आपल्याला माहित नाही, पण सामान्यतः पौराणिक कथांमध्ये त्यांचे वर्णन या ग्रहावरचे नसलेले प्राणी असे करतात. त्या जीवनाची रचना आपल्याला माहित असलेल्या जीवनापेक्षा खूप वेगळी आहे.
आज, एक-पेशीय प्राण्यापासून, जीवनाच्या अधिक जटिल रूपांपर्यंत, आणि तसेच मानवी रुपापर्यंत झालेली उत्क्रांती ही लक्षणीय आहे याबद्दल आधुनिक जीवशास्त्रात खूप स्पष्टता आहे. पण जीवनाचे मूलभूत स्वरूप तेच आहे - ते बदलले नाही. ते फक्त अधिक जटिल होत आहे. तथापि, गण अशा जीवनरचनेचे नव्हते. ते पृथ्वीवर बनले नव्हते. आणि त्यांचे अवयव हाडांशिवाय होते.
जर तुम्ही तुमचे शरीर विविध मार्गांनी वापरण्याचा प्रयत्न केला, जर तुम्ही आसने करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला वाटेल की तुमची हाडे नसती तर बरे झाले असते. मी माझे वय ११ वर्षे असताना योग सुरू केला, तर जेव्हा मी २५ वर्षांचा असताना हठयोग शिकवला, तेव्हा लोक माझ्याकडे पाहून म्हणाले, "अरे, तुला हाडेच नाहीत. तू हाडांशिवाय आहेस." हे प्रत्येक योग्याचे स्वप्न आहे: की एक दिवस त्याला हाडांशिवाय अवयव असतील जेणेकरून तो कोणतेही आसन करू शकेल!
हजारो वर्षांपासून गणेश चतुर्थी टिकून आहे, आणि गणपती भारतातून सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक निर्यात केलेल्या देवतांपैकी एक बनला आहे. तो खूप लवचिक आहे. तो अनेक रूपे आणि मुद्रा धारण करतो. तो शिक्षणाचा देवही आहे. तो एक तेजस्वी विद्वान असल्याचे मानले जाते. विद्वत्तेची क्षमता दर्शवण्यासाठी गणपतीला नेहमी एक पुस्तक आणि लेखणीसोबत दाखवले जाते. त्याची विद्वत्ता आणि बुद्धिमत्ता सामान्य मानवी क्षमतेपेक्षा जास्त होती.
आणि त्याला अन्न आवडत असे. सामान्यतः, जर कोणाला विद्वान दिसायचे असेल, तर त्याला बारीक दिसावे लागते. पण हा एक छान, सुपोषित विद्वान आहे. या दिवशी, लोक सामान्यतः मानतात की तुम्ही फक्त चांगले खावे. लोकांनी फक्त मोठे पोट पाहिले, पण नवीन डोक्यातील त्याहून मोठा मेंदू चुकवला. ती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचे पोट नंतर वाढले. कदाचित एवढ्या मोठ्या डोक्यासह, त्याला चालावेसे वाटले नसेल! पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची बुद्धिमत्ता वाढली. म्हणून हा फक्त खाण्याचा दिवस नाही. हा तुमचा मेंदू वाढवण्याचा दिवस आहे, पोट नाही.
सर्व योगिक साधना एका प्रकारे याबद्दल आहेत, की तुमची बुद्धिमत्ता जिथे आहे तिथेच अडकून राहण्याची गरज नाही. हजारो उदाहरणे आहेत जिथे लोकांनी, साधी आध्यात्मिक साधना सुरू करून, त्यांची बुद्धिमत्ता अनेक वेगवेगळ्या मार्गांनी वाढवली आहे. तुम्हाला सोंड वाढणार नाही, काळजी करू नका, पण तुम्ही तुमची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकता.
मानवतेने नेहमीच ‘चांगली माणसे’ तयार करण्याच्या दिशेने काम करण्याची गंभीर चूक केली आहे. आपल्याला चांगली माणसे नको आहेत; आपल्याला समंजस माणसे हवी आहेत. जर तुमच्यात समज असेल, तर तुम्ही योग्य ते कराल. लोक मूर्खपणाच्या गोष्टी करतात कारण त्यांच्यात समज नसते.
बुद्धिमत्ता म्हणजे चलाखी नाही. बुद्धिमत्ता म्हणजे हुशार असणे नाही. जर तुम्ही खरोखर बुद्धिमान असाल, तर तुम्ही अस्तित्वाशी १००% सुसंगत असाल, कारण बुद्धिमान होण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. बुद्धिमत्तेचे लक्षण म्हणजे तुम्ही तुमच्या आसपासच्या सर्व गोष्टींशी पूर्णपणे सुसंगत असता, तुम्ही आतून आणि बाहेरून कमीत कमी विचलित होऊन जीवन जगत असता.
गणेश चतुर्थी हा किमान तुमच्या बुद्धिमत्तेच्या वाढीचा प्रयत्न सुरू करण्याचा दिवस आहे. जर तुम्ही सकाळी हाडांशिवाय अवयव बनवण्यासाठी आसन केले, तर ते घडू शकते!