सद्गुरु: भारत हे एकमेव ठिकाण आहे जिथे आपल्या देवांना नृत्य करता आलेच पाहिजे. जर ते नृत्य करू शकत नसतील तर ते देव होऊच शकत नाहीत! असे म्हणण्याचे कारण की या सृष्टीच्या विराट पसाऱ्याला सर्वांत समर्पक उपमा द्यायची झाली तर ते एक नृत्यासारखे आहे. आज, आधुनिक भौतिकशास्त्रज्ञ सुद्धा याच शब्दात बोलत आहेत – ते म्हणतात की संबध सृष्टी नृत्य करत आहे असे दिसते. जर तुम्ही एखाद्या नृत्याचे निरीक्षण केले, तर वरवर पाहाता त्यात कोणतीही सुसंगती दिसणार नाही. पण जर तुम्ही पुरेशा बारकाईने पाहिले तर तुम्हाला संपूर्ण प्रक्रियेत एक प्रगल्भ रचना दिसून येईल.
उदाहरणार्थ, भारतीय शास्त्रीय नृत्यामध्ये, नृत्यांगना फक्त वाटेल तसे हात आणि पाय हलवत असल्याचे दिसते. वरवर पाहताना असे वाटते की यात काहीच नाही. पण जर तुम्ही बारकाईने पाहिले तर जे काही घडत आहे त्यामध्ये एक सखोल सुसंगती आढळून येईल. जर ती सुसंगती नसेल तर तुम्ही नृत्याचा आनंद घेऊ शकणार नाही. आपले हात आणि पाय वेगवेगळ्या प्रकारे हलवणे यासारखी वरवर पाहाता तर्कहीन वाटणारी गोष्ट सुद्धा, जे दर्शवायचे आहे त्याच्याशी पूर्ण सुसंगती ठेवून करायला, अनेक वर्षांचे प्रशिक्षण आणि सराव लागतो. जर नृत्यामध्ये भौमितिक सौंदर्य असेल तर ते दर्शकांना विशिष्ट प्रकारे प्रभावित करते, जरी त्यांना कथा माहित नसेल किंवा नृत्य काय आहे हे समजत नसेल तरीही. संगीताचेही, काहीशा वेगळ्या प्रकारे, असेच आहे.
भौतिकशास्त्रज्ञ देखील या निकषापर्यंत येत आहेत. ही सृष्टी पूर्णपणे अनियमित आणि अपघाती असल्याचे जरी दिसत असले तरी जवळून निरीक्षण केल्याने, सर्वकाही काही एक प्रकारे सुसंगत असल्याचे दिसते. प्रत्येक गोष्टीमध्ये एक प्रकारची सुसंगती आहे, जी ते अद्याप पूर्णपणे समजू शकलेले नाहीत. योगावस्था शक्य असण्याचे एकमेव कारण म्हणजे वैयक्तिक जीवन आणि सृष्टीचे प्रकटीकरण यांच्यात सुसंगती आहे. जर सुसंगती नसेल तर आपण एक होऊच शकणार नाही. जर सुसंगती नसेल तर एक होण्याची शक्यताच नाही.
गेल्या काही वर्षांपासून विज्ञानामध्ये जो सिद्धांत मांडला जात आहे त्यातील एक सिद्धांत म्हणजे रचना सिद्धांत. त्यांचे म्हणणे असे आहे की तुम्ही अणू, मानव, हत्ती किंवा ब्रह्मांड घ्या – मूलभूत रचना समान आहे. केवळ गुंतागुंतीच्या प्रमाणात क्लिष्टता वाढते.
योगशास्त्रानुसार हे एक असल्याचे पूर्वीपासून सांगितले जातेच आहे. सूक्ष्म विश्व आणि महान विश्व यांची रचना मूलतः समान आहे. त्यातूनच योगसाधनेला सुरुवात झाली. आम्ही म्हटले की अंडं, पिंडं आणि ब्रह्मांडं – म्हणजे जीवन बनवणारे घटक, वैयक्तिक व्यक्ती आणि ब्रह्मांड – एकाच गोष्टीची तीन रूपे आहेत. ते सर्व एकाच समकालितेमध्ये आहेत. आणि कारण मूळ डिझाइन एकच आहे, त्यामुळे तुम्ही एकाला दुसऱ्यामध्ये घालू शकता. जसे तुम्ही गाजर खाता आणि ते मनुष्य बनवू शकता कारण ते समान डिझाइन आहे.
ब्रह्मांड कसे कार्य करत आहे यासाठी आपण देऊ शकता असे सर्वात जवळचे जवळचे उदाहरण म्हणजे ते एक नृत्यासारखे आहे, कारण हे सर्व अतार्किक पणे घडताना दिसते, परंतु त्यामागे परिपूर्ण संघटना आणि योजना आहे. हे असे आहे की बहुतेक लोकांची गोष्टी आयोजित असण्याची कल्पना खूप बौद्धिक आणि विभाजक आहे. उदाहरणार्थ, एक छान, मॅनिक्युअर बाग आणि जंगल घेऊ. बाग म्हणजे सर्वकाही व्यवस्थित पणे आयोजित केलेलं आहे. जंगल म्हणजे कोणतंच व्यवस्थापन नाही. परंतु जर तुम्ही तीन महिने बागेत हजर नसाल तर ती बाग संपून जाईल. पण तुम्ही लक्ष ना देतासुद्धा जंगल लाखो वर्षे जगू शकते. मग सांगा तुम्ही कोणती पद्धत अधिक चांगली मानाल?
चिदंबरम मंदिरात नटराज आहे, जे शिवाचं नृत्याच्या देवाचं रूप आहे. नटेश किंवा नटराज हे शिवाचे सर्वात लक्षणीय रूप आहे. जेव्हा मी स्वित्झर्लंडमध्ये CERN संस्थेला भेट दिली, जी पृथ्वीवरील भौतिक शात्राची अग्रणी प्रयोगशाळा आहे, जिथे अणूंची टक्कर करवण्यात येते, तेव्हा तिथे मी पाहिले की प्रवेशद्वारासमोर एक नटराज मूर्ती आहे, कारण त्यांनी देखील ओळखले की मानवी संस्कृती मधली विश्वरचनेशी साधर्म्य असणारी सर्वात जवळची गोष्ट म्हणजे नृत्यं.
सृष्टी ही स्वतः एक नृत्य आहे म्हणून आपण म्हणतो की परमेश्वर एक नर्तक आहे. जर तो नर्तक नसेल तर तो हे नृत्य कसे घडवू शकेल? जेव्हा आपण शिवाला नटराज म्हणतो, तेव्हा आपण वैयक्तिक नृत्याबद्दल बोलत नाही. तुमच्या लक्षात आले असेल की नटराजाच्या चित्रणात त्याच्या भोवती एक वर्तुळ आहे. वर्तुळ हे नेहमीच ब्रह्मांडाचे प्रतीक असते कारण जेव्हा कुठलीही हालचाल होते तेव्हा अस्तित्त्वात घडणारे सर्वात नैसर्गिक रूप हे एक वर्तुळ असते. कोणतीही गोष्ट जी स्वतः घडते ती वर्तुळ किंवा लंबवर्तुळाकार असते – जे की थोडेसे ताणलेले वर्तुळ असते – कारण वर्तुळ हा कमीतकमी प्रतिकाराचा आकार असतो. ग्रह, चंद्र, सूर्य, ही सर्व वर्तुळे आहेत.
म्हणूनच नटराजाभोवतीचे वर्तुळ ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. तो एक वैश्विक नर्तक आहे. अशाच प्रकारे त्याचे नेहमी वर्णन केले जाते. हे म्हणजे एक कुणी व्यक्ती ब्रह्मांडात नाचत आहे असे नाही. आपण म्हणतो की ब्रह्मांड स्वतः नृत्य करत आहे आणि हे नृत्य एका विशिष्ट बुद्धिमत्तेने मार्गदर्शित आहे. आपण व्यक्ती आहोत आणि आपण प्रत्येक गोष्टीला स्वतंत्र जीव समजतो, म्हणून आपण स्वतःच्या समजुतीसाठी त्याला ‘नटराज’ म्हणून एक व्यक्ती बनवतो. “शिव” शब्दाचा शाब्दिक अर्थ आहे “जे नाहीये ते ” किंवा “ते जे नाहीये.” तो शून्य आहे, ती रिकामी पोकळी आहे, पण ती नाचत आहे. ती नाचत आहे, म्हणूनच सर्व काही घडत आहे.
नटराजाचे रूप मुळात दक्षिण भारतातून आले आहे, विशेषत: तामिळनाडूमधून. हे रूप सृष्टीच्या हर्षोल्हासाचे प्रतिक आहे, सृष्टीचे नृत्य जे स्वतःला चिरंतन निश्चलतेमधून तयार करते. चिदंबरम मध्ये उभा असलेला नटराज अतिशय प्रतीकात्मक आहे कारण तुम्ही ज्याला चिदंबरम म्हणता ते फक्त पूर्ण निश्चलता आहे. तेच या मंदिराच्या रूपात अंतर्भूत केलेले आहे.
आपण नृत्य समजू शकत नाही कारण आपल्याला समजलेली प्रत्येक गोष्ट ही फक्त चुकीचा निष्कर्ष असेल. पण तुम्ही नृत्याचे सौंदर्य अनुभवू शकता किंवा तुम्ही स्वतः नृत्य बनू शकता. जर तुम्ही निरीक्षणाद्वारे नृत्याचे सौंदर्य अनुभवले तर आम्ही म्हणतो की तुम्ही शोधक आहात. समाजात, तुम्हाला वेगवेगळ्या नावांनी ओळखले शकते – कदाचित एक वैज्ञानिक – पण तरीही तुम्ही शोधक आहात. तुम्हाला ते काय आहे हे जाणून घ्यायचे आहे, म्हणून तुम्ही लक्ष देत आहात. जर तुम्ही स्वतः नृत्य बनला, तर तुम्ही दिव्य होता, तुम्ही योगी होता. ही निवड तुमच्याकडे आहे.
हे नृत्य इतके परिपूर्ण आहे की आपण नर्तकाला जवळजवळ विसरतो, पण नर्तकाशिवाय नृत्य असू शकत नाही. आपण नर्तकाला पाहू शकत नाही कारण आपली दृष्टी, आपले लक्ष इतके वरवर केंद्रित असते. नृत्यातील नर्तकाला ओळखण्यासाठी, एकतर तुम्ही नृत्यात इतके मग्न व्हायला हवे की तुम्ही स्वतः नृत्य व्हा, प्रेक्षक नाही. मग तुम्ही त्या अनुभवाने नर्तकाला जाणता, तुम्हाला त्याचा स्पर्श होतो. पण जर तुम्हाला नर्तकाला त्याच्या संपूर्ण खोली आणि परिमाणात जाणून घ्यायचे असेल, तर तुम्हाला नृत्याचे स्त्रोत जाणून घ्यायचे असेल, ते जे या नृत्याचा आधार आहे – मग तुम्ही पूर्ण लक्ष देण्यासाठी सक्षम असले पाहिजे, इतके की तुम्हाला नृत्यापासून वेगळे व्हावे लागेल. या दोन्ही गोष्टींमध्ये विरोधाभास वाटेल. एका बाजूला मी म्हणत आहे की तुम्ही नृत्यामध्ये डुबकी मारली पाहिजे, दुसऱ्या बाजूला मी असेही म्हणत आहे की तुम्ही अत्यंत लक्षपूर्वक नृत्य पाहण्यास सक्षम असले पाहिजे. यात विरोधाभास नाही. एवढेच आहे की जेव्हा तुम्ही ते तुकड्या तुकड्यात पाहाता, जर तुम्ही त्याचे तुकडे केले आणि त्याकडे पाहिले तर प्रत्येक गोष्टीत विरोधाभास असल्याचे दिसते.