logo
logo

शंकराची उपस्थिती

आदियोगींच्या मार्गावर सद्गुरूंना चार महत्वाच्या जागा जाणवतात जिथे शंकराने काही काळ व्यतीत केला आहे आणि ते त्या जागांवरच्या ऊर्जा आणि शक्तीचं वर्णन करतात.

शिवाची उपस्थिती – आदी योगीच्या पाऊल खुणांवर

सद्गुरूंनी, शिवाने जिथे महत्वपूर्ण वेळ घालवला अशी चार महत्वाची स्थानं आणि त्या ठिकाणी असलेली उर्जा आणि शक्ती याबद्दल आपला विचार मांडत आहेत.

सद्गुरू: योग संस्कृतीत शिवाला देव मानत नाही. तो मानव म्हणून इथे जगला होता आणि तो योग परंपरेचा उगम आहे. तो प्रथम योगी किंवा आदियोगी आहे, आणि आदिगुरु म्हणजेच प्रथम गुरु देखील आहे. योग विज्ञानांच्या प्रसाराला कांती सरोवरच्या काठावर सुरुवात झाली, हिमालयातील केदारनाथच्या पलीकडे काही मैलावर असलेला एक बर्फाच्छादित सरोवर आहे, जिथे आदियोगींनी आपल्या पैल्या सात शिष्यांना या आंतरिक तंत्रज्ञानाची पद्धतशीर दीक्षा दिली जे आज सप्तर्षी म्हणून प्रसिद्ध आहेत.

कांती सरोवर – दिव्य कृपेचा सरोवर

आख्यायिकेनुसार शिव आणि पार्वती कांती सरोवराच्या काठी राहात होते. आणि नजीक केदार येथे अनेक योगी देखील रहात होते ज्यांना शीव-पार्वती भेटायला जात. पूर्वी मी हिमालयमध्ये वर्षातून एक किंवा दोन महिने एकटाच प्रवास करत असे. १९९४ साली मी पहिल्यांदा कांती सरोवरला भेट दिली. कांती सरोवर म्हणजे तो सरोवर जो २०१३च्या पुरा मध्ये फुटून केदारपर्यंत आला होता. आता तो गांधी सरोवर म्हणून ओळखला जातो. खरे तर ते कांती सरोवर आहे. कांती म्हणजे कृपा आणि सरोवर म्हणजे जलाशय, हा कृपेचा सरोवर आहे.

मी जेव्हा दूरवर चालत केदारला पोहोचलो तेव्हा मी कांती सरोवरा बाबत ऐकले होते आणि एका दुपारी २-२.३० सुमारास मी तिथे गेलो आणि तासभर थांबलो. तिथे सरोवर होता आणि त्याच्या सभोवताली बर्फाच्छादित टेकड्या होत्या. नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टीने, हे अगदी विलक्षण आहे, एकदम स्थिर पाणी असलेला एक विशाल सरोवर अजिबात हिरवळ नाही आणि स्थिर पाण्यात पडणारी बर्फाच्छादित ठेकड्यांची प्रतिबिंबे अत्यंत अद्भुतरम्य जागा.

Sadhguru at Kantisarovar

मी तिथे बसलो, तेथील शांतता आणि शुद्धता याने माझे देहभान हरपले. त्या जागेचे अलौकिक सौंदर्य पाहून माझी शुध्दच हरपली. शांतपणे मी तिथल्या एका दगडावर डोळे उघडे ठेऊन बसलो आणि सभोवतालच्या सृष्टी भरभरून आत्मसात करू लागलो. हळूहळू सभोतालची सर्व सृष्टी विरून गेली आणि मागे राहिला फक्त नाद – आवाज. तो पर्वत, तो सरोवर आणि माझ्या शरीरासह तिथला परिसर त्यांच्या मूळ रुपात नव्हतेच. सर्वकाही म्हणजे केवळ नाद होता. आणि माझ्यातून एक गीत उमटलं “नाद ब्रह्म विश्व स्वरूपा.”

Nada Brahma

Nada Brahma Vishwaswaroopa
Nada Hi Sakala Jeevaroopa
Nada Hi Karma Nada Hi Dharma
Nada Hi Bandhana Nada Hi Mukti
Nada Hi Shankara Nada Hi Shakti
Nadam Nadam Sarvam Nadam
Nadam Nadam Nadam Nadam

मी संस्कृत भाषेचा अभ्यास नेहमीच टाळत आलोय. जरी ती भाषा मला आवडते आणि तिची व्याप्ती पण मला माहित आहे, तरी मी त्या भाषेचा अभ्यास टाळला कारण मला ठाऊक होते कि एकदा संस्कृत शिकलो कि स्वाभाविकपणे धर्म ग्रंथ वाचणार. माझ्या स्वत:दृष्टीने मला कधीच दगा दिलेला नाही, म्हणून मला त्या शास्त्र, पुराण आणि त्यासोबतच्या परंपरेत स्वत:ला अडकवून घ्यायचे नव्हते म्हणून मी संस्कृत टाळले.

तिथे बसलेलो असताना माझे डोळे उघडे होते आणि तोंड बंद होते, आणि मला ते गाणे माझ्याच आवाजात मोठ्याने ऐकू आले. माझा आवाज गात होता आणि ते एक संस्कृत गाणे होते. मला स्पष्टपणे ऐकू येत होते, इतके मोठ्याने कि जणू तो संपूर्ण पर्वतच गात होता. मला असे भासत होते कि जणू सर्व काही नादमय झाले होते. तेव्हा हे गाणे माझ्या आकलनात आले. ते काही मी कल्पिलेले नाही आणि रचलेसुद्धा नाही – ते माझ्यात अवतीर्ण झाले. ते संपूर्ण संस्कृत गाणे माझ्यातून बाहेर आले. तो एक अद्भुत असा अनुभव होता.

नंतर थोड्या वेळाने हळुवारपणे सर्व काही आपल्या मूळ रुपात परतले. माझे देहभान परतले – त्या नादातून परत सामान्य रुपात परतले – माझे डोळे भरून आले होते.

तुम्ही ते गाणे फक्त ऐका, त्यात एक असामान्य शक्ती आहे. त्यात एखाद्या माणसाला विलीन करून घेण्याची ताकद आहे, स्वतःला त्यात झोकून दिले पाहिजे.

कैलास- एक गूढ पर्वत

हिंदू जीवनशैलीत असे मानले जाते कि कैलास हे शिवाचे निवासस्थान आहे. याचा अर्थ असा नाही कि तो तिथे नाचतोय किंवा बर्फात लपून बसलाय. याचा अर्थ असा, कि त्याने त्याचे ज्ञान आणि जाणीव त्या पर्वतात साठवून ठेवलीये. जेव्हा आदियोगींना असे जाणवले कि सप्त ऋषींना ज्ञानाचा सात पैकी केवळ एकच पैलू समजला आणि योगाची सातही रूपे समजू शकणारा कोणी मनुष्य नाही हे लक्षात आले तेव्हा त्यांनी असे ठरवले कि जीवन रचनेच्या संपूर्ण प्रक्रियेचे सर्व सात पैलू एकाच ठिकाणी एकाच स्त्रोतात राहावे म्हणून ते कैलासात पर्वतात जमा करून ठेवले. म्हणून कैलास या भूतलावरील एक अनाकलनीय ज्ञान-भांडार बनला – एक जिवंत ज्ञान-भांडार, केवळ माहितीचा साठा नव्हे तर जिवंत ज्ञान-भांडार.

कैलासाचे दक्षिण मुख

जेव्हा एखाद्या व्यक्तीला आत्मज्ञान होते आणि त्याचे आकलन सामान्य आकलन कक्षेच्या बाहेर जाते, तेव्हा त्याच्या जाणीवेत जे काही येते, तो ते नेहमी सभोवताली असलेल्यांमध्ये प्रसारित करता येणे शक्य नाही, केवळ थोड्याफार प्रमाणात दिले जाऊ शकते. एखाद्या गुरूला त्याच्याकडे असलेलं संपूर्ण ज्ञान इतरांना देता येईल अशी माणसे सापडणे दुर्मिळ असते.

मग तुम्ही हे सर्व कुठे ठेवणार? आणि तुम्ही ते गमावू इच्छित नाही म्हणून हजारो वर्षांपासून ज्ञानीजन नेहमीच कैलासावर गेले आणि आपले ज्ञान त्या पर्वताचा आधार घेऊन एका विशिष्ठ उर्जा रुपात तिथे साठवले. म्हणूनच दक्षिण भारतीय असे म्हणतात कि अगस्त्यमुनी जो या गुढतेचा आद्य प्रवर्तक आहे, तो कैलासाच्या दक्षिण भागात राहतो. बुद्धधर्मीय असे मानतात कि होवून गेलेले तीन मुख्य बुद्ध ह्या पर्वतावर राहतात. जैन लोक असे म्हणतात कि पहिला तीर्थंकर वृषभदेव देखील कैलासावर राहतो.

एका साधकासाठी, कैलास हे पृथ्वीच्या मुलभूत स्रोताला स्पर्श करण्याजोगे आहे. ज्याला सृष्टीचे रहस्य जाणून घ्यायचं आहे त्याच्यासाठी हि एकमेवाद्वितीय जागा आहे. यासारखी इतर दुसरी कोणतीच जागा नाही.

8-12 शतकापासून शिव आणि शक्ती मंदिर

पूर्वीच्या काळी या देशात बहुतेक करून शिवासाठी मंदिरे बांधली जात इतर कोणा दैवतांची नाही. विशेषकरून मागच्या १००० वर्षांपासून इतर दैवतांची मंदिरे निर्माण केली गेली. “शिवा” चा अर्थ म्हणजे “जे नाही ते”; म्हणजे जे नाही त्यासाठी मंदिरे बांधली जात होती. “जे आहे ते” ती भौतिक अभिव्यक्ती आहे आणि “जे नाही ते” म्हणजे भौतिकतेच्या पलीकडचे आहे. मंदिर म्हणजे एक अशी पोकळी कि त्यातून तुम्ही अशा क्षेत्रात प्रवेश करता जे नाहीये. देशात हजारो शिवालये आहेत आणि त्यात मूर्त रुपात असलेले असे काही नाही. जे आहे ते सांकेतिक आहे आणि सामान्यतः तिथे एक लिंग असते.

खालील नकाशाची डाउनलोड करण्यायोग्य आवृत्ती येथे .उपलब्ध आहे.

वेल्लिंगीरी पर्वत – दक्षिणेचा कैलास

आपले ईशा योग केंद्र जेथे स्थित आहे, दक्षिण भारताच्या खूप जवळ, आणखीन एक ज्ञानभांडार म्हणजे वेल्लिंगिरी पर्वत. याला दक्षिणेचा कैलास म्हणून देखील ओळखतात. एक अद्भुत स्थान. ज्ञानाचे उच्चतम भांडार म्हणजे कैलास. परंतु दक्षिणेतील विविध द्रष्टे आणि योगींना जेव्हा ज्ञान संग्रहित करायचे होते तेव्हा वेल्लिंगिरी पर्वताचा वापर केला. आकारमानाच्या दृष्टीने कैलास अतुलनीय आहे, पण गुणवत्तेनुसार पाहिल्यास वेल्लिंगिरी पर्वत सुद्धा तितकाच उत्तम आहे.

हा पर्वत सात पर्वत टेकड्या म्हणून देखील ओळखला जातात, कारण जर तुम्ही चढत आलात तर सात वेगवेगळ्या छोट्या टेकड्या दिसतात ज्यामुळे तुम्हाला सात टेकड्या चढत आहोत असे वाटते. शेवटचे जे टोक आहे तेथे वारा सतत इतक्या उच्च वेगाने वाहतो, की तिथे गवताशिवाय काहीच उगत नाही. तिथे तीन प्रचंड मोठे दगड आहेत ते अशा पद्धतीने ऊभे आहेत कि जणू लिंग असलेले मंदिरच. हे एक अतिशय शक्तिशाली स्थान आहे.

या पर्वतावर आलेले योगी आणि सिद्धपुरूष हे पूर्णपणे वेगळ्याच प्रकारचे – अगदी उग्र, आणि प्रखर लोक होते. देवानाही हेवा वाटावा इतका शालीन आणि सन्माननीय लोक या पर्वतावर येऊन गेले आहेत. या महामानवांनी ह्या पर्वतात त्यांचे ज्ञान अशा पद्धतीने साठवले आहे कि ते कधीच गहाळ होणार नाही. याच पर्वतावर माझे गुरु सुद्धा चालून आले आणि त्यांनी आपला देहत्याग सुद्धा इथेच केला. त्यामुळे आमच्यासाठी हि जागा म्हणजे मंदिरच आहे.

काशी- एक शाश्वत शहर

जगभरातील लोक गेली हजारो वर्षे काशीला येत आहेत. आपली पहिली शिकवण देण्यासाठी गौतम बुद्ध इथे आले होते. गौतम बुद्धा इथे आल्यानंतर काही चीनी लोक इथे येऊन गेले. नालंदा विद्यापीठ – सर्वोत्तम शिक्षणाचे विश्वविख्यात स्थान म्हणजे काशीतून निर्माण झालेल्या ज्ञानाचा फक्त एक छोटासा थेंब आहे. आर्यभट्ट किंवा त्यांच्या सारखे सर्वश्रुत असलेले अनेक ज्ञानीजन याच परिसरातील आहेत जे काशीतील तत्कालीन संस्कृतीची फलश्रुती आहे.


जेव्हा या योगींना ब्रम्हांडाच्या स्वरूपाचे दर्शन झाले – म्हणजे ते कसे आपल्याआतून विकसित झाले आहे आणि त्याची विकासाची क्षमता कशी अमर्याद आहे याची त्यांना जाणीव झाली तेव्हा त्यांना ते आपले स्वत:चे बनवण्याचा मोह झाला. त्यांनी काशी शहराच्या रूपात एक असे साधन बनविले कि ज्याद्वारे सूक्ष्म आणि विशाल यांचं मिलन घडवून आणणे शक्य होते. काशी शहर म्हणजे एक छोट्या मानवाप्रमाणे आहे, जो वैश्विक मिलन घडवून आणण्याची संभावना बाळगून आहे. अशा वैश्विक एकात्मतेचा आनंद, सुख आणि सौंदर्याची अनुभूती प्राप्त करण्याची शक्यता अभिप्रेत आहे. भौगोलिकदृष्ट्या काशीचे स्थान हे या सूक्ष्म आणि विशाल यांचे मिलन कसे होते याचे उत्तम प्रकट स्वरूप आहे. या देशात अशी अनेक ठिकाणे आहेत, पण काशीसारखे स्थान निर्माण कारणे ही एक असाध्य आणि अफाट अशी महत्त्वाकांक्षा होती. आणि हे त्यांनी हजारो वर्षांपूर्वी साध्य करून दाखविले. तिथे ७२००० शक्तिशाली उर्जित स्थळे किंवा मंदिरे होती -जितक्या मानवी शरीरात धमन्या असतात. हे जणू एखाद्या महाकाय मानवी शरीराचे ब्रम्हांडाशी संपर्क होण्यासाराखेच होते. यामुळेच कि काय अशी परंपरा आली: “तुम्ही काशीला गेलात तर जीवन परिपूर्ण झालं.” ती जागा तुम्ही सोडू इच्छित नाही कारण जेव्हा तुम्ही ब्रह्मांडाशी एकरूप झाल्यानंतर इतर कुठे जायची गरजच काय?

काशीची आख्यायिका खात्रीने म्हणते कि इथे शिव स्वतः राहत होते. हे त्याचे हिवाळी ठिकाण होते. अशा अनेक कथा आहेत कि, त्याने अनेक लोकांना काशीला पाठवले पण काशीचे स्वरूप इतके अप्रतिम होते कि ते कधीही परत आले नाहीत. कदाचित कथा अशी आहे की त्याने लोकांना बांधण्यासाठी पाठवले आणि त्यांनी बराच वेळ घेतला. बांधल्यानंतर, तो आला आणि त्याला ते आवडले आणि राहण्याचा निर्णय घेतला.

मागील काही शतकांत काशीला तीन वेळा नेस्तनाबूत केले गेले. त्यामुळे त्यातील अजून किती शिल्लक आहे हे एक कोडेच आहे, तरीही अजून बरेच काही शिल्लक आहे – ते सर्व गेले नाही. ते जेव्हा पूर्ण वैभवशाली होते तेव्हा आपण नव्हतो हे दुर्देवी आहे. जगभरातील लोकांना आकर्षित करणारे सर्वात अभूतपूर्व असे ठिकाण होते.

भूतकाळात आपण आणि आपली संस्कृती टिकून राहिली, परंतु प्रश्न हा आहे की आपण भविष्यात टिकून राहू शकतो का? जेव्हा मी “आपण” म्हणतो, तेव्हा मी काही एका विशिष्ट धर्माबद्दल बोलत नाहीये. मी अशा लोकांबद्दल बोलत आहे जे जीवनाकडे ते जसे आहे, तसे सरळ पाहतात, इतरांवर आपली मते लादण्याचा प्रयत्न करीत नाहीत. जगाला विशिष्ट शिकवण, तत्त्वज्ञान किंवा श्रद्धा-धारणा प्रणालींची गरज नाही. आज गरज आहे मानवी आकलनशक्ती अशा पातळीवर उंचावण्याची जेणेकरून भौतिकतेच्या पलीकडील आयाम आपण जाणू शकू. केवळ याच मार्गाने मानव जाणून घेऊ शकतो. केवळ हाच एकमेव मार्ग आहे ज्यामुळे मानवी चेतना विस्तारेल. आणि हाच एकमेव मार्ग आहे ज्यामुळे मनुष्य संकुचित भेदभाव आधारित समाजाच्या सीमा ओलांडू शकेल.

    Share

Related Tags

गूढवादशिव तत्त्व

Get latest blogs on Shiva

Related Content

जेव्हा शिवानी आपले घर गमावले – बद्रीनाथची कथा