logo
logo

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर: हे शिवलिंग इतके शक्तिशाली कशामुळे आहे?

भारतातल्या सर्वात महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक असलेल्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचा गूढ वारसा जाणून घ्या. उज्जैन, मध्य प्रदेश इथे असलेले हे मंदिर भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, जे शिवभक्तांसाठी आदरणीय आहे.

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर: स्थापना आणि महत्त्व

सद्गुरू: उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर चंद्रसेन नावाच्या राजाने बांधले होते, जो शिवाचा परम भक्त होता. भक्तांची आणि ज्ञान शोधणाऱ्यांची नगरी बनलेल्या उज्जैनची संस्कृती नष्ट करू पाहणाऱ्या लोकांनी चंद्रसेनावर हल्ला केला. उज्जैन हे भारताच्या दुसऱ्या काशीसारखे होते, हे शहर ज्ञान, शिक्षण आणि आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार यांचे मुख्य केंद्र होते. याच हेतूने लोक या शहरात आले. ते कोणत्याही व्यापारी मार्गावर नसले तरी, उज्जैन, ज्याला त्या वेळी अवंतिका म्हटले जात होते, ते ज्ञान आणि आध्यात्मिक केंद्र म्हणून प्रसिद्ध झाले.  पण, काही असे लोक होते ज्यांना हे आवडत नव्हते आणि त्यांना या शहराचा नाश करायचा होता.

जेव्हा त्यांनी हल्ला केला, तेव्हा चंद्रसेनाने शिवाची प्रार्थना केली, तो महाकालच्या रूपात प्रकट झाला आणि शत्रूंना एका विशिष्ट प्रकारे शोषून घेतले, त्याला या संकटातून मुक्त केले जेणेकरून तो अध्यात्म आणि ज्ञानाचा प्रसार करत राहू शकेल.

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग: लिंगाची शक्ती

मी सहसा मंदिरांना भेट देत नसलो तरी उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाला माझे जाणे झाले. मंदिराची अनेक प्रकारे तोडफोड करण्यात आली आहे. आक्रमणकर्त्यांनी मंदिर उद्ध्वस्त केले आणि ते दोन-तीन वेळा पुन्हा बांधले गेले, पण तरीही, जर तुम्ही तिथे बसलात, तर हा छोटासा आकार, हजारो वर्षांपासून तिथे असलेला दगडाचा एक छोटा तुकडा तुम्हाला पूर्णपणे उडवून लावेल. असे वाटते की, ते कालच बनवले आहे. तुम्हाला जर माहित असेल, तर या सारख्या लिंगाच्या उपस्थितीत तुम्ही तुमच्या प्रणालीची संपूर्णपणे पुनर्रचना आणि पुनर्वापर करू शकता.

महाकाल मंदिर आणि तिथे प्राणप्रतिष्ठीत केलेले शिवलिंग हे विलक्षण स्वरूपाचे आहे. ते तुम्हाला तुमच्या अस्तित्वाच्या मुळापासून हादरवून टाकेल. त्याची प्राणप्रतिष्ठीता अद्भुतरित्या केली गेली आहे, उद्देश तुम्हाला एका प्रकारे विसर्जित करण्याचा आहे. ते मूलभूत रूपाच्या ताकदीसह एका विशिष्ट प्रकारे अभिव्यक्त होते. या मंदिरात जाण्यासाठी तुम्ही योग्यप्रकारे तयार असले पाहिजे कारण ते प्रचंड सामर्थ्यवान आहे आणि कमकुवत मन असलेल्या लोकांसाठी नाही.

दररोज, महाकालला जे अर्पण केले जाते ते स्मशानभूमीतील ताजे भस्म असते कारण त्याला तेच आवडते आणि ते ज्या प्रकारे आहे त्याला तसेच चालू ठेवते. हा केवळ सांस्कृतिक पैलू नाही. त्यात एक शास्त्र आहे. अनुभवानुसार, स्मशानभूमीतील राख आणि इतर कोणतीही राख यांच्यातील फरक अभूतपूर्व आहे. ही प्रक्रिया चालू राहणे फार महत्वाचे आहे कारण ते महाकालाचे स्वरूप आहे. या महाकाल रुपाचे अस्तित्व असे आहे की, तिथे गेल्यावर सर्व काही जळून राख होते. म्हणजे तुम्ही भौतिकापासून मुक्त होता. ते तुम्हाला तुमच्या परममुक्तीकडे जाण्यास प्रवृत्त करते.

जर तुम्हाला ते हळूवारपणे करायचे असेल तर ध्यानलिंगामध्ये महाकालाचा तसा आयाम आहे. पण तो फक्त शोधणाऱ्यांनाच मिळावा म्हणून तो झाकलेला आहे. परंतु जर तुम्हाला ते सक्तीने करायचे असेल, जर तुम्हाला खरोखरच जोरात ढकलले जावे असे वाटत असेल आणि तुम्ही कमकुवत मनाचे नसाल तर महाकाल मंदिर ही एक अभूतपूर्व प्रक्रिया आहे.

शिवाचे महाकाल स्वरूप: शुक्राचार्यांची कथा आणि संजीवनी मंत्र

शिवाच्या विविध रूपांपैकी 'काल' किंवा 'महाकाल' हे एक महत्त्वाचे आणि उग्र रूप आहे. महाकाल म्हणून तो काळाचा स्वामी आहे. ज्यांना मुक्ती किंवा संपूर्ण मुक्तीची आकांक्षा आहे, त्यांच्यासाठी हा आयाम ज्याला आपण महाकाल म्हणून संबोधतो तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

एकदा असे घडले की महान ऋषी शुक्राचार्यांनी, जे सर्व असुरांचे गुरु होते, त्यांनी शिवाच्या उपासनेत प्रचंड तपस्या केली आणि शिवाला प्रकट व्हावे लागले. जेव्हा तो प्रकट झाला तेव्हा शुक्राचार्यांनी अमरत्व मागितले. शिव म्हणाले, "ते शक्य नाही. जे जन्माला आले आहेत त्या सर्वांना मरावेच लागेल. दुसरे काहीतरी मागून घे." तेव्हा शुक्राचार्य म्हणाले, "मला कायाकल्प करण्याची शक्ती दे, की मी कोणत्याही प्रकारची जखम किंवा रोग पुन्हा ठीक करू शकेन." शिव हा उपचार करणारा, सर्व औषधी वनस्पती आणि औषधांचा स्वामी असल्यामुळे त्याने शुक्राचार्यांना संजीवनी मंत्र दिला, जो कोणत्याही प्रकारचे रोग, जखम किंवा दुखापतीपासून लोकांना पुनरुज्जीवित करणारा मंत्र होता.

एकदा शुक्राचार्यांनी हा संजीवनी मंत्र घेतल्यावर, असुर खूप जास्त धाडसी झाले आणि देवतांविरुद्ध सतत युद्ध केले. युद्धात कोणत्याही प्रकारच्या गंभीर जखमा झालेल्या सर्व असुरांना शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्राने पुनरुज्जीवित केले. अश्याप्रकारे, असुरांचे सैन्य एकही जण न गमावता लढाई करू शकत होते.

देवता खूप घाबरले आणि त्यांना वाटले की ही एक अतिशय अन्यायकारक लढाई आहे कारण ते कितीही लढले तरी असुरांचा मृत्यू होत नव्हता, तर देवांचा मृत्यू होत होता. ते ब्रह्मदेवाकडे गेले, ज्याने शिवासोबत चर्चा केली आणि म्हणाले, "शुक्राचार्यांना तू अशी शक्ती दिली आहेस. तू त्यांचा वध कर. नाहीतर, जगात संपूर्ण असंतुलन होईल. असुरांचा देवांवर सरशी अन्यायकारक आहे." शिव म्हणाला, "त्याला मारण्याची गरज नाही, मी त्याला सामावून घेईन."

देव आणि असुर यांच्यातील युद्धाच्या वेळी शुक्राचार्य मंत्र उच्चारत होते आणि सर्व असुरांची जखमा आणि घाव यातून सुटका करत होते. मग, क्षितिजाच्या पलीकडे, कृतिका नावाची एक राक्षसी, भयंकर रूपात प्रकट झाली. ती शिवगणांपैकी एक होती. तिने शुक्राचार्यांना तिच्या गर्भाशयात ओढून घेतले, जिथे ते गर्भाच्या रूपात राहिले. त्यांना तिथेच ठेवले, आणि देव आणि असुर यांच्यात संतुलन ठेवले गेले.

ब्रह्मदेव इतका आनंदित झाले आणि त्यांना वाटले की केवळ महाकालच हे करू शकतो, की त्या व्यक्तीला मारल्याशिवाय तो त्याचे जीवन पूर्णपणे सामावून घेऊ शकतो. शुक्राचार्य कृतिकाच्या गर्भातच राहिले आणि संजीवनी मंत्र नपुंसक झाला. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, महाकालने शुक्राचार्यांची वेळ गोठवली जेणेकरून ते पुढे जाऊ शकले नाहीत.

महाकालेश्वर मंदिराने उज्जैन, मध्य प्रदेशला मूळ “GMT” बनवले!

ब्रिटीश भारतात येण्यापूर्वी आणि ग्रीनविच मीन टाइममध्ये स्थलांतरित होण्यापूर्वी मध्य भारतात महाकालेश्वर देवता अनेक युगे वेळकाळाचे केंद्र होते. हा जगातील सरासरी वेळ होता कारण असे मानले जाते की येथूनच वेळची सुरूवात झाली. म्हणून, त्यांनी तेथे एका विशिष्ट देवतेची स्थापना केली, ज्याला महाकाल म्हणतात. योगशास्त्रात आपण पाहतो की फक्त काळ आहे, जागा नाही. अवकाश हा काळाचा परिणाम आहे. काळ नसता तर जागा नसती. अवकाश हा एक भ्रम आहे जो निर्माण झाला आहे कारण आपण आपल्या भौतिक स्वरूपात गुंतलेले आहोत. जर तुम्ही तुमच्या शारीरिक स्वभावापासून दूर गेलात तर, अचानक वेळ नाही आणि परिणामी, जागा उरत नाही.

आपल्याकडे काळ आणि अवकाश या दोन्हींसाठी समान शब्द आहे. त्याला आपण काळ म्हणतो. काळ म्हणजे वेळ आणि काळ म्हणजे रिक्तपणा. रिक्तपणा म्हणजे अवकाश. जेव्हा आपण म्हणतो की सभागृह रिकामे आहे, तेव्हा आपला अर्थ येथे जागा आहे. सभागृह भरले की आम्ही म्हणतो इथे जागा नाही. हेच आपल्याला साधेपणाने म्हणायचे आहे. परंतु हाच शब्द काळ आणि अवकाश या दोन्हींसाठी वापरला जातो कारण अवकाशाची उत्पत्ती काळानुसार होते. जर काळ नसेल तर अवकाश नसेल.

योगामध्ये, आपण वेळेला काळ ​​आणि महाकाल या दोन भिन्न आयामांमध्ये पाहतो. महाकाल हा मोठा काळ आहे. दैनंदिन जीवनात, आपल्या समजुतीनुसार काळाची हालचाल चक्राकार गतीत आहे - ग्रहाचे परिभ्रमण एक दिवसाचे आहे, चंद्राचे भ्रमण एक महिन्याचे आहे, पृथ्वीचे भ्रमण एक वर्षांचे आहे आणि याचप्रमाणे पुढे. परंतु महाकालला चक्राकार गती नाही.

चक्राकार गती भौतिक स्वरूपामुळे होते. भौतिक प्रकृतीमुळे, जन्म आणि मृत्यू, सुरुवात आणि शेवट या सर्व गोष्टींमध्ये काळ आहे. प्रत्येक अणू, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचे वय असते. अगदी ग्रह, सूर्यमाला आणि सूर्य यांचेही वय आहे. कधीतरी ते सुरू झाले आहेत, आणि कधीतरी ते संपणार आहेत. हे सर्व मोठा धमाका होऊन संपणार की कालांतराने विझून जाणार यावर आपण चर्चा करू शकतो. पण भौतिकता शाश्वत नसते. ती सुरू होते आणि संपते. यामुळे, आपण सहसा काळाकडे त्या अर्थाने पाहतो. पण चक्राकार स्वरूपाच्या पलीकडे काळ आहे. याला आपण महाकाल म्हणतो.

महाकालेश्वर लिंग आणि मुक्ती

अध्यात्मिक साधकाची संपूर्ण आकांक्षा मुक्ती प्राप्त करणे ही आहे, याचा अर्थ तुम्हाला भौतिक मार्गांच्या पलीकडे जायचे आहे. दुसऱ्या शब्दांत, तुम्हाला अस्तित्वाच्या चक्राकार स्वरूपाच्या पलीकडे जायचे आहे. अस्तित्वाच्या चक्राकार स्वरूपाच्या पलीकडे जाणे म्हणजे जीवनाच्या पुनरावृत्ती प्रक्रियेच्या पलीकडे जाणे. जीवनाच्या पुनरावृत्ती प्रक्रियेच्या पलीकडे जाणे म्हणजे आपण कोण आहात या आसक्तीच्या पलीकडे जाणे. हा आसक्तीपासून जागरुकतेपर्यंतचा प्रवास आहे.

जर तुम्हाला आसक्तीकडून जागरुकतेकडे जायचे असेल, तर तुमच्याकडे सध्या असलेला काळाचा मर्यादित अनुभव, जो भौतिक अस्तित्वाच्या चक्राकार हालचालीची अभिव्यक्ती आहे, त्याला ओलांडणे आवश्यक आहे. जर तुम्ही भौतिकतेच्या आधाराशिवाय किंवा भौतिकतेच्या मर्यादांशिवाय काळ अनुभवत असाल तर त्या काळाला आपण 'महाकाल' म्हणतो. महाकाल ही अशी मांडणी आहे जिच्यावर सृष्टी निर्माण होते. आकाशगंगा अफाट आहेत, पण तरीही, त्या निर्मितीचे छोटे कण आहेत; बाकी सर्व जागा रिकामी आहे. नव्याण्णव टक्के किंवा त्याहून अधिक अणू म्हणजे रिक्तपणा आहे, ते म्हणजेच महाकाल आहे.

अणू जरी चक्राकार गतीत असला तरी, नव्याण्णव टक्क्यांहून अधिक रिक्तपणा आहे. या मोठ्या विश्वात, नव्याण्णव टक्क्यांहून अधिक रिक्तपणा आहे. प्रचंड आकाशगंगा चक्राकार गतीत आहेत, परंतु नव्याण्णव टक्क्यांहून अधिक रिक्तपणा आहे. तर, महाकालाच्या कुशीतच सृष्टी घडते. जर तुम्ही निर्मितीच्या मर्यादित रूपांमध्ये गुंतलेले असाल, तर तुम्ही काळाला चक्राकार गतीत अनुभवता. या आयामाला संसार असे संबोधले जाते - म्हणजे चक्राकार गती.

जर तुम्ही याच्या पलीकडे गेलात तर आपण याला 'वैराग्य' म्हणतो. याचा अर्थ तुम्ही पारदर्शक झाला आहात. जर तुम्ही पारदर्शक असाल तर प्रकाश थांबवू शकत नाही. जर तुम्ही प्रकाश थांबवला नाही, तर याचा अर्थ तुम्ही जीवनाच्या आसक्तीच्या स्वरूपातून किंवा जीवनाच्या चक्राकार गतीतून मुक्त झाला आहात. जर तुम्ही जीवनाच्या चक्राकार गतीतून मुक्त झालात, तर आपण म्हणतो, 'तुम्हाला मुक्ती प्राप्त झाली' किंवा संपूर्ण मुक्त झालात. म्हणून, ज्यांना संपूर्ण मुक्तीची आकांक्षा आहे, त्यांच्यासाठी हा आयाम ज्याला आपण महाकाल म्हणून संबोधत आहोत तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

    Share

Related Tags

शिव तत्त्व

Get latest blogs on Shiva

Related Content

शिव आणि शक्ती : ५४ शक्तिस्थळांचा उगम कसा झाला