logo
logo

शिवाचे महत्त्व

आपण ज्याला शिव म्हणतो त्या अस्तित्वाचे महत्त्व सद्गुरू समजावून सांगत आहेत आणि मानवतेसाठी त्याचे योगदान खरोखरच अद्वितीय कसे आहे हे स्पष्ट करत आहेत.

प्रश्न: सद्गुरू, तुम्ही शिवाला खूप महत्त्व देता. तुम्ही इतर गुरूंबद्दल, उदाहरणार्थ झेन गुरूंबद्दल इतके का बोलत नाही?

सद्गुरू: कारण माझ्यासाठी कोणीही तितके विलक्षण नाही. आपण शिव विरुद्ध कोणीतरी याबद्दल बोलत नाही आहोत. ज्याला तुम्ही शिव म्हणता त्यात सर्वकाही सामावलेले आहे. अनेक उत्कृष्ट माणसे होऊन गेली ज्यांनी मानवतेची महान सेवा केली. पण जाणीवेच्या दृष्टीने, याच्यासारखे दुसरे अस्तित्व नाही.

तर तुम्ही झेनबद्दल बोलत आहात. स्वतः शिवापेक्षा मोठा झेन गुरू कोण असू शकतो? तुम्ही झेन गुरू गुटेईबद्दल ऐकले आहे का? जेव्हाही गुटेई झेनबद्दल बोलत असे, तो नेहमी त्याचे बोट वर करत असे, हे दाखवण्याचा प्रयत्न की, "सर्वकाही एक आहे." या झेन मठांमध्ये, लहान मुले चार-पाच वर्षांच्या वयात भिक्षू बनत. असाच एक लहान मुलगा जो मठात वाढत होता, त्याने गुटेईला पाहिले आणि कोणी काहीही म्हणाले की, तो सुद्धा स्वतःची तर्जनी वर करू लागला. गुटेईने हे पाहिले पण मुलगा सोळा वर्षांचा होईपर्यंत वाट पाहिली. मग एक दिवस, गुटेईने मुलाला बोलावले आणि स्वतःचे बोट वर केले. मुलानेही सहजप्रवृत्तीने तेच केले. गुटेईने सुरी काढली आणि मुलाचे बोट कापून टाकले, आणि असे म्हणतात की, मुलाला ज्ञानप्राप्ती झाली. त्याला अचानक समजले की, हे एकत्वाबद्दल नाही, हे शून्यत्वाबद्दल आहे.

खूप काळापूर्वी, शिव यापेक्षाही पुढे गेला होता. एक दिवस, दीर्घ अनुपस्थितीनंतर, तो घरी परतला. त्याने त्याच्या मुलाला पाहिले नव्हते, जो आता दहा-अकरा वर्षांचा झाला होता. जेव्हा तो आला, या मुलाने, जो एक छोटा त्रिशूल घेऊन उभा होता, त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. शिवाने त्या मुलाचा त्रिशूलच नाही तर त्याचे डोके सुद्धा उडवले. पार्वती या घटनेमुळे खूप उद्विग्न झाली. म्हणून हे ठीक करण्यासाठी, शिवाने मुलाच्या शरीरावर एका गणाचे डोके लावले. जो मग अतिशय बुद्धिमान झाला. आजही भारतात, लोक शिक्षण किंवा इतर कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी, प्रथम या मुलाची पूजा करतात. आता लोकांनी त्यात थोडा बदल केला आहे आणि ‘गणा’चे  डोके ‘गजा’चे डोके बनले आहे, पण तो बुद्धिमत्ता आणि प्रतिभेचे मूर्तिमंत रूप बनला. असे म्हणतात की, त्याला माहिती नाही असे काहीही नव्हते.

या विश्वात काहीही शिवाच्या जीवनाबाहेर नाही. तो इतका जटिल आणि परिपूर्ण आहे.

ती पहिली झेनची कृती होती. या जगात काहीही शिवाच्या जीवनाबाहेर नाही. तो इतका जटिल आणि परिपूर्ण आहे. आणि त्याच्याकडे शिकवण नव्हती, फक्त पद्धती होत्या, आणि या पद्धती शंभर टक्के वैज्ञानिक स्वरूपाच्या आहेत. त्याने मानवाला प्राप्तीकरिता ११२ मार्ग सांगितले, कारण मानवी प्रणालीत ११४ चक्रे आहेत, पण त्यातील दोन भौतिक शरीराच्या बाहेर आहेत, म्हणून त्यांनी सांगितले, "हे प्रांत फक्त त्यांच्यासाठी आहेत, जे पलीकडे आहेत. मानवांसाठी फक्त ११२ मार्ग आहेत." आणि त्याने हे जीवन ११२ आयामांनी कसे बनले आहे आणि तुम्ही त्याचा उपयोग कसा करू शकता, याच्या पद्धती स्पष्टपणे दाखवल्या. यापैकी प्रत्येकातून, तुम्ही आत्मज्ञान प्राप्त करू शकता.

शिव जे बोलत होता, ती जीवनाची रचना होती. कोणतेही तत्त्वज्ञान नाही, कोणतीही शिकवण नाही, कोणताही सामाजिक संदर्भ नाही – केवळ विज्ञान. या विज्ञानातून, प्रत्येक गुरू तंत्रज्ञान तयार करतो. त्याने विज्ञान दिले. आज तुम्ही जे तंत्रज्ञान वापरत आहात, मग ते स्मार्टफोनच्या रूपात असो किंवा संगणक किंवा इतर कोणतेही उपकरण असो, त्यामागे एक विज्ञान आहे. ते विज्ञान तुमच्या संबंधित नाही. तुम्ही फक्त तंत्रज्ञान वापरत आहात. पण जर एखाद्याला विज्ञान समजले नसते, तर तुमच्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध नसते.

म्हणून शिवाने जे सांगितले, ते केवळ शुद्ध विज्ञान आहे. त्याने सप्तऋषींना असे तंत्रज्ञान तयार करण्याचे काम सोपवले, जे त्या दिवशी त्यांच्यासमोर बसणाऱ्या लोकांसाठी योग्य ठरेल. तंत्रज्ञान तयार केले जाऊ शकते. आपल्याला काय हवे आहे यावर अवलंबून, आपण एक विशिष्ट उपकरण तयार करतो, पण मूलभूत विज्ञान तेच आहे. आज उपयोगी असलेली उपकरणे उद्या अनुपयोगी ठरू शकतात. अनेक उपकरणे जी आपण एकेकाळी खूप मूल्यवान समजत होतो, आता ती मूल्यवान राहिली नाहीत कारण नवीन उपकरणे आली आहेत – पण विज्ञान तेच आहे.

म्हणून आदियोगींसोबत, आपण मूलभूत विज्ञानाकडे पाहत आहोत. अशा वेळी, जेव्हा विविध कारणांमुळे, मानवता जी सद्यस्थितीत आहे, मूलभूत विज्ञान बळकट केले जाणे महत्त्वाचे आहे.

    Share

Related Tags

Get latest blogs on Shiva