logo
logo

केदारनाथ ज्योतिर्लिंग मंदिराशी असलेले महादेव शिवाचे नाते!

केदारनाथ ज्योतिर्लिंग मंदिराचं आध्यात्मिक महत्व आणि या मंदिराचा महादेव शिवाशी असलेला संबंध - याबाबत सद्गुरूंनी विषद केलेले काही पैलू.

Table of Contents

केदारनाथ ज्योतिर्लिंग मंदिराशी असलेले महादेव शिवाचे नाते!

सद्गुरू: केदारनाथ हे प्रचंड शक्तिशाली क्षेत्र आहे. इथे “शिव” उच्चारणाला संपूर्णपणे भिन्न आयाम आणि अर्थ प्राप्त होतो. हे ठिकाण या विशिष्ट उच्चारणासाठी मुद्दाम तयार केलेले आहे. जेव्हा आपण “शिव” शब्द उच्चारतो, तेव्हा तो जे अनिर्मित आहे त्याचे स्वातंत्र्य दर्शवतो. जो निर्मित झाला नाही, त्याची मुक्ती दर्शवतो. असे म्हणणे पूर्णपणे योग्य ठरणार नसले तरी जवळपास असेच आहे की, या भूतलावर “शिव” हा ध्वनी केदारनाथ इथून उगम पावतो. हजारो वर्षं अनेकांनी या स्थळाला या ध्वनीच्या स्पदानांच्या रुपात अनुभवले आहे.

जेव्हा आपण “शिव” म्हणतो तेव्हा ते आणखी एक दैवत निर्माण करण्याबद्दल नाही, ज्याच्याकडे आपल्याला भरभराट किंवा सुबत्ता मागता येईल. “शिव” म्हणजे “जे नाही ते.” आज आधुनिक विज्ञान सिद्ध करत आहे, की सर्व काही शून्यातून येते आणि शून्यात परत जाते. अस्तित्वाचा पाया आणि ब्रम्हांडाचा मूळ गुण, हे विशाल शून्य आहे.  आकाशगंगा ह्या छोट्या घटना आहेत - किंचित शिडकावा - बाकी सर्व काही एक विशाल पोकळी आहे, ज्याला “शिव” म्हणले जाते.

केदारनाथ ज्योतिर्लिंगाची कथा आणि पंच केदार

अशी एक आख्यायिका आहे की, कुरुक्षेत्राच्यासे युद्धानंतर पांडव खूप दुःखी होते, कारण त्यांनी आपल्याच भावंडांचा व नातलगांचा वध केला होता. याला गोत्र वध असेही म्हणतात. त्यांना या कृत्यामुळे दोषी आणि अपराधी वाटू लागले आणि यातून मार्ग काढण्यासाठी ते शिवाकडे गेले.

शिवाला त्यांना त्यांच्या या भयानक कृत्यामधून ताबडतोब मुक्त होण्याचा आनंद मिळू द्यायचा नव्हता,म्हणून त्याने एका बैलाचे रूप धारण केले आणि तिथून निघून जाऊ लागला. पांडवांनी त्याचा पाठलाग सुरू केला आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. शिव जमिनीच्या आत गेला आणि नंतर जेव्हा तो वर आला तेव्हा त्याच्या शरीराचे वेगवेगळे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले. त्या बैलाचे खांदे म्हणजेच केदारनाथ, पुढील दोन्ही पाय म्हणजे तुंगनाथ - जे केदारच्या मार्गावर आहे. त्याची नाभी भारतीय हिमालयातील मध्य - महेश्वर या ठिकाणी आढळून आली, हे एक अत्यंत शक्तिशाली मणिपूरक लिंग आहे. कल्पनाथ नावाच्या ठिकाणी त्याच्या जटा आढळून आल्या, याप्रमाणे त्याच्या शरीराचे वेगवेगळे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी आढळले.

या शरीराच्या अवयवांचे वर्णन सात चक्रांशी मिळते जुळते आहे. या मंदिरांची रचना मानवी शरीराप्रमाणेच केलेली आहे. विशाल शरीर निर्मितीच्या बाबतीत हा एक महत्त्वाचा प्रयोग होता. अशाच प्रकारचा एक देह भारतीय हिमालयाच्या दिशेने घडला आहे. पश्चिम दिशेत असाच एक देह घडला आहे, जिथे त्यांनी संपूर्ण नेपाळलाच एक विशाल शरीरात रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला होता.

केदारनाथ ज्योतिर्लिंग - ऊर्जेचे मिश्रण

केदारनाथ हे ऊर्जेचे अतिशय आकर्षक मिश्रण आहे. हे असे ठिकाण आहे जे हजारो योगी आणि सगळ्या प्रकारच्या गूढवादचा साक्षीदार आहे. जेव्हा मी सगळे प्रकार म्हणतो तेव्हा तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत असे प्रकार. हे असे लोक आहेत ज्यांनी कोणालाही काहीही शिकवण्याचा प्रयत्न केला नाही. जगाला अर्पण करण्याचा त्यांची पद्धत म्हणजे त्यांच्या ऊर्जा, त्यांचा मार्ग, त्यांचं कार्य – सर्व काही – या जागेत एका विशिष्ट प्रकारे ठेवून जाणे.

जेव्हा तुम्ही अध्यात्मिक मार्गावर असलेल्या एखाद्या व्यक्तीचा विचार करता, तेव्हा तुम्ही कदाचित त्यांचा विचार विशिष्ट प्रकारच्या वर्तन, पोशाख किंवा भाषणाच्या संदर्भात, विशिष्ट प्रकारच्या चौकटीत कराल. पण ही फक्त अश्या प्रकारच्या आध्यात्मिक लोकांची भूमी नाही. तुमच्या समजून घेण्याच्या पद्धतींमध्ये बसणारा प्रकार इथे आहे. परंतु असे बरेच लोक आहेत जे पूर्णपणे आदिम आहेत, ज्यांना तुम्ही कधीही आध्यात्मिक म्हणून ओळखू शकत नाही. पण हे असे लोक आहेत ज्यांनी अस्तित्वाची शिखरे गाठली आहेत. जेव्हा आपण "योगी" म्हणतो तेव्हा आपला अर्थ विशिष्ट वागणूक किंवा नैतिकता असा होत नाही. योगी जीवनाशी पूर्णपणे सुसंगत असतो. इतकं सुसंगत की, तो जीवन सुटे करू शकतो आणि पुन्हा एकत्र करू शकतो. मूलभूत जीवन म्हणजे तुम्ही आहात, जर तुम्ही ते पूर्णपणे सुटे करून परत एकत्र करू शकलात, तरच तुम्ही योगी म्हणवता. असे अनेक अविश्वसनीय मानव होऊन गेले आहेत.

केदारनाथची तीर्थयात्रा

जो माणूस कोणत्याही प्रकारच्या अध्यात्मिक उन्नत्तीच्या शोधात आहे, त्याच्यासाठी केदारनाथ हे असे वरदान आहे ज्याच्या विशालतेची तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही. ते काय आहे हे शब्दांत सांगणं खूप अवघड आहे. तसे पाहिले तर तो फक्त खडकाचा वर आलेला एक भाग आहे. पण हजारो वर्षांपासून तिथे ज्या प्रकारचे लोकं राहिले आणि त्यांनी त्या स्थानाबाबत जे काही केले, त्यामुळे तो प्रचंड विलक्षण झाला आहे. ही ती जागा आहे जिथे पुष्कळ योग्यांनी त्यांचा देह त्यागला आहे. हे असे काहीतरी आहे ज्याचा तुम्ही नक्कीच अनुभव घ्यायला हवा. भारतात जन्म घेऊन, खूप वृद्ध किंवा अशक्त होण्याआधी, तुम्ही एकदा हिमालयात जाऊन आले पाहिजे . 

केदारनाथ ज्योतिर्लिंग मंदिर आणि आदि शंकराचार्य

आदि शंकराचार्य हे एक बौद्धिक दिग्गज आणि भाषाविज्ञानाचे प्रतिभावंत तज्ञ होते. आपल्या आयुष्याच्या छोट्याशा कालखंडात त्यांनी या राष्ट्राची संपूर्ण भ्रमंती केली. त्यांच्या गावाचे नाव शंकर कलाडी होते. ज्याचा शब्दशः अर्थ "पायाखालील" असा होतो. दक्षिणेत आपण भारतमातेच्या चरणी आहोत. भारत म्हणजे आपण नेहमी परमात्म्याच्या चरणी कसे रहावे याचे शिक्षण आहे. परमात्म्याच्या चरणी राहून आपण उत्क्रांत झालो आणि फुललो. ही उथळपणाची संस्कृती नाही, तर स्वाभाविक भक्तीभावाची  संस्कृती आहे.

आदि शंकराचार्य म्हणाले, "सर्व काही माया आहे." माया म्हणजे एक भ्रम आहे, या अर्थाने की ते जसे आहे तसे तुम्हाला दिसत नाही. वरवर पाहता तुम्ही हे जड शरीर घेऊन फिरत, पण तुम्ही जे अन्न खाता, तुम्ही जे पाणी पिता आणि तुम्ही जो श्वास घेता त्या हवेसह तुमच्या शरीरातील पेशींची दररोज देवाणघेवाण होत आहे. याचा अर्थ काही काळानंतर, तुमच्याकदे पूर्णपणे नवीन शरीर असते. पण तुमच्या अनुभवात असे वाटते की ती एकच गोष्ट आहे - हीच माया आहे. त्याचप्रमाणे, ज्या प्रकारे तुम्ही पाच इंद्रियांद्वारे अस्तित्व जाणता, ते पूर्णपणे अस्पष्ट आहे - हा भ्रम आहे, माया आहे, ज्याबद्दल शंकराचार्यांनी सांगितले.

अशी एक कथा आहे की, एकदा काशीमध्ये शंकर पहाटे स्नान करून मंदिरात प्रवेश करत होते. तेवढ्यात एक चांडाळ त्यांच्या वाटेत आला. चांडाळ ही एक विशिष्ट जात होती ज्यांनी स्मशानभूमीची देखभाल केली. ते सर्वात हीन आणि अशुभ मानले गेले. चांडाळ दिसला तर मरण येईल, अशी समजूत होती. त्यांच्याशी कोणाला काही घेणेदेणे नव्हते आणि त्यांना दूर ठेवले गेले.

तर जेव्हा हा माणूस त्यांच्या समोर आला तेव्हा शंकर म्हणाले, "दूर हो." तो माणूस तिथेच उभा राहिला आणि त्याने विचारले, "कोणी दूर व्हावं- मी की माझं शरीर?" या प्रश्नाने शंकराचार्यांना जोरदार फटका बसला. “हे शरीर तू नाहीस, ही सर्व माया आहे” असे ते सर्वांना शिकवत आले होते. आता जेव्हा या माणसाने हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एक शब्दही उच्चारला नाही, शिकवण दिली नाही. ते तसेच हिमालयात निघून गेले. केदारनाथमध्ये, आजही त्यांचे एक स्मारक आहे - फक्त त्यांचे हात आणि त्यांची काठी संगमरवरात कोरली आहे. हेच ते ठिकाण आहे जिथे ते शेवटचे दिसले होते. ते वर चढले आणि शिवामध्ये विलीन झाले अशी कथा आहे.

हा आपल्या राष्ट्राचा आणि संस्कृतीचा मूळ स्वभाव आहे - आपण ताठरतेने उठत नाही - आपण वाकून उठतो. देव असो, पुरुष असो, स्त्री असो, बालक असो, प्राणी असो, झाड असो, खडक असो - प्रत्येक गोष्टीपुढे आपण नतमस्तक व्हायला शिकलो. हीच आपली ताकद आहे, हाच आपला मार्ग आहे आणि आपल्या उत्क्रांतीची आणि आत्मसाक्षात्काराची हीच पद्धत आहे.

शिवाने बद्रीनाथवरून केदारनाथला का प्रस्थान केलं?

बद्रीनाथ हे एक भव्य स्थान हिमालयात साधारणपणे १३७०० फुटांवर स्थित आहे. बद्रीनाथविषयी एक आख्यायिका आहे. इथे शिव आणि पार्वती रहात असत. एके दिवशी, शिव आणि पार्वती जेव्हा फेरफटका मारून परत आले, तेव्हा त्यांच्या घराच्या प्रवेशद्वारात एक लहान बाळ रडत होते. त्याला ओक्साबोक्शी रडताना पाहून पार्वतीचं आईपण जागे झाले आणि तिला वाटले जाऊन बाळाला उचलून घ्यावे. शिवाने तिला थांबवून म्हटलं, “त्या बाळाला हात लावू नकोस”. पार्वती उत्तरली, “किती दुष्ट आहात हो तुम्ही!  तुम्ही असं कसं म्हणू शकता?”   

शिव म्हणाला “हे बाळ काही ठीक नाही. ते स्वतःहून आपल्या दाराशी कसं आलं? इथं आजूबाजूला कुणीही  दिसत नाही. त्याच्या पालकांच्या पावलांचे ठसेही बर्फात दिसत नाहीत. हे साधंसुधं बाळ नाही.” पण पार्वती म्हणाली, “ते काही नाही! माझ्यातली आई हे बाळ असंच सोडून द्यायला तयार होणार नाही.” आणि ती त्या मुलाला उचलून घरात घेऊन गेली. तिच्या मांडीवर बाळ अगदी आरामात होते, अगदी आनंदात शिवाकडे पाहत होते. शिवाला ह्या सगळ्याचा परिणाम माहीत होता पण तरीही तो म्हणाला, “ठीक आहे, बघूया काय होतंय ते.”

पार्वतीने बाळाला शांत करून त्याला खाऊ घातले, आणि त्याला घरी सोडून शिवासोबत जवळच्या गरम पाण्याच्या झऱ्यावर स्नानासाठी गेली. जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना घराची दारे आतून बंद आहेत असे आढळले. पार्वती चक्रावली. “दार कुणी आतून बंद केलं असेल?” शिवा म्हणाला “मी तुला सांगितलं होतं. हे बाळ उचलून घेऊ नकोम्हणून . तू बाळाला घरात आणलंस आणि आता त्यानं दरवाजा बंद केला.”

पार्वती म्हणाली “आता काय करायचं?”

शिवाकडे दोन पर्याय होते: त्याच्या समोर जे काही आहे ते सर्व भस्म करून टाकायचे. दुसरा पर्याय म्हणजे दूसरा मार्ग शोधून तिथून निघून जायचे. तेव्हा तो म्हणाला “चल आपण दुसरीकडं कुठंतरी जाऊ. हे तुझं लाडकं बाळ असल्यानं, मी त्याला काही करू शकत नाही.” 

यामुळं शिवाला त्याचं स्वत:चं घर गमवावं लागलं आणि शिव पार्वती आपल्याच घरात उपरे झाले. ते राहण्यासाठी योग्य जागेच्या शोधात सर्वत्र फिरले आणि शेवटी केदारनाथला येऊन स्थाईक झाले. तुम्ही विचाराल, त्याला हे आधीच समजलं नव्हतं का? तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत असतात, पण तरीही तुम्ही त्या घडू देता.

शिवाकडे नेहमी एक शक्तिशाली जीव म्हणून पहिले जाते. पण त्याच वेळी तो जगासोबत इतका धूर्तपणा  दाखवत नाही. म्हणूनच शिवाचे एक रूप भोलेनाथ आहे, कारण तो लहान मुलासारखा आहे. तो बावळट होता असे नाही, पण बारीकसारिक गोष्टींसाठी त्याला आपली बुद्धी वापरायची नव्हती.

केवळ कपटी, कमी दर्जाची बुद्धी, सतत आपण दुसऱ्यापेक्षा कसे वरचढ ठरू ह्याबद्दल विचार करत असते. बुद्धिमत्ता आणि वरवरची हुशारी ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हुशार असणे हे नेहमी तुलनात्मक असते. पण बुद्धिमान असण्यात कुणासोबत तुलना होत नसते, तो स्वाभाविक गुण आहे. बुद्धिमत्ता लक्षणीय असते कारण ती स्पर्धात्मक नसते, ती जीवनाची एक अभिव्यक्ती आहे. 

केदारनाथ ज्योतिर्लिंग आणि कांतीसरोवर - कृपेचा सरोवर

पौराणिक कथा अशी आहे की, शिव आणि पार्वती कांतीसरोवरच्या किनाऱ्यावर राहत होते आणि केदारमध्ये अनेक योगी राहत होते ज्यांना ते भेटत असत. कांतीसरोवर म्हणजे तो तलाव, जो २०१३ च्या पुरांमध्ये उफाळला आणि त्याचे पाणी केदारला आले. आज त्याला गांधी सरोवर म्हणतात. ते खरेतर कांतीसरोवर आहे. कांती म्हणजे कृपा, सरोवर म्हणजे तलाव. हा कृपेचा तलाव आहे. योग परंपरेत शिवाकडे देव म्हणून पाहिले जात नाही. तो या भूमीवर प्रत्यक्षात राहून गेलेला जीव होता आणि तो या योगपरंपरेचा मूळ स्त्रोत आहे. तो आदियोगी किंवा प्रथम योगी आहे आणि आदिगुरू किंवा प्रथम गुरू सुद्धा आहे. योगविज्ञानाचे पहिले प्रसारण कांतीसरोवराच्या किनाऱ्यावर घडले, जिथे आदियोगीने त्याच्या पहिल्या सात शिष्यांना,जे आज सप्तर्षी म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांना हे आंतरिक तंत्रज्ञान पद्धतशीरपणे प्रदान केलं.

खूप वर्षांपूर्वी, मी दरवर्षी एक किंवा दोन महिन्यांसाठी एकट्याने हिमालयात प्रवास करायचो. त्यावेळी मी फक्त लोकल बसने जायचो. सामान्यतः मी बसच्या टपावर बसून जायचो कारण मला पर्वत चुकवायचे नव्हते. या विलक्षण बस होत्या! त्या हरिद्वारहून सकाळी ४ किंवा ४:३० ला सुटायच्या आणि थेट गौरीकुंड किंवा बद्रीनाथला जायच्या. प्रवाशांना उतरवणे आणि घेणे याशिवाय त्या मध्ये कुठेच थांबायच्या नाहीत - अगदी खाण्यासाठीसुद्धा नाही. यांना भूक हरताळ बस म्हणायचे. ड्रायव्हरकडे त्याची गुंडाळी केलेली चपाती असायची जो ती गाडी चालवता चालवता खायचा आणि तुम्हाला तिथे तुमच्या जेवणाची चिंता करत बसावे लागायचे!

मी जेव्हा गौरीकुंडवरून एक लांब ट्रेक करून केदारला गेलो, तेव्हा मी कांतिसरोवराबद्दल ऐकले. म्हणून एका दुपारी मी २ किंवा २:३० ला निघालो आणि तासाभरापेक्षा थोड्या जास्त अवधीत मी तिथे पोहोचलो. तिथं एक तलाव आणि त्याभोवती बर्फाच्छादित पर्वत होते. नैसर्गिकदृष्टया ते खूप विलोभनीय आहे - हा शांत स्थिर पाण्याचा मोठ्ठा तलाव, बाजूला काहीच हिरवळ नाही आणि सर्व हिमशिखरे त्या शांत पाण्यात प्रतीबिंबित होता होती. ती एक अविश्वसनीय जागा होती. 

मी फक्त तिथे बसलो आणि ती शांतता, मौन आणि निर्मळता माझ्या जाणिवेला भेदून आत जाऊ लागली. त्या जागेचा चढ, उंची आणि निर्जन सुंदरता मला थक्क करून गेली. त्या शांततेत मी तिथेच एका लहान दगडावर डोळे उघडे ठेवून, माझ्या आजूबाजूचे प्रत्येक रूप आत्मसात करत बसलो. त्या परिसराचे हळू हळू रूप हरवू लागले आणि फक्त नाद-ध्वनी-उरला. पर्वत, तलाव आणि आजूबाजूचा परिसर; अगदी माझ्या शरीरासह सर्वच सामान्य रूपात नव्हते. सर्वकाही फक्त नाद स्वरूप झाले होते. माझ्या आतून एक श्लोक बाहेर आला :"नाद ब्रह्मा विश्व स्वरूप."

नाद ब्रह्मा विश्व स्वरूप
नाद हि सकल  जीवरूप
नाद हि कर्म नाद हि धर्म
नाद हि बंधन नाद हि मुक्ती
नाद हि शंकर नाद हि शक्ती
नादम नादम सर्वम नादम
नादम नादम नादम नादम

मी असा आहे की, ज्याने संस्कृत शिकणे नेहमी टाळले होते. जरी मला ती भाषा आवडत असली आणि मी त्या भाषेची गहनता जाणतो, तरीही मी ती शिकणे टाळले कारण ज्या क्षणी तुम्ही संस्कृत शिकता, तुम्ही लगेच शास्त्रं वाचायला लागता. माझ्या स्वतःच्या दृष्टीकोनाने मला कधी क्षणभरासाठीही धोका दिलेला नाही. तर मला स्वतःला या शास्त्र आणि या सर्व परंपरांमध्ये गोंधळून जायचे नव्हते. म्हणून मी संस्कृत शिकणे टाळले. 

जेव्हा मी तिथे बसलो होतो, माझे तोंड नक्कीच बंद होते आणि माझे डोळे उघडे होते आणि हे गीत मी माझ्या आवाजात एका मोठ्या सुरात ऐकले. हे गाणारा आवाज माझा होता आणि हे संस्कृत गीत होते. मी ते स्पष्टपणे, मोठ्याने ऐकले. इतक्या मोठ्याने की, जसे काही सगळा पर्वतच जणू गात आहे. माझ्या जाणीवेत सर्व काही नाद स्वरूप बनून गेले होते.

हळूहळू, काही वेळानंतर, सर्व काही त्याच्या मूळ स्वरूपामध्ये दिसू लागले. जाणीवेच्या उंच स्थानापासून खाली येण्याने - नादाकडून रुपाकडे येण्याने - माझे डोळे भरून आले.  

नाद ब्रह्मचा साधा अर्थ म्हणजे जग जडरूपात नाही, तर नादरूपात अनुभवणे. आधुनिक विज्ञान सुद्धा म्हणते की, प्रत्येक ध्वनीशी संबंधित एक रूप असते आणि प्रत्येक रूपाशी संबंधित एक ध्वनी असतो. हे एक वैज्ञानिक सत्य आहे. आणि आज आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की, जिथेपर्यंत विज्ञानाचा संबंध आहे, जड पदार्थ असे काहीच नाही. जिथे कुठे कंपने आहेत, तिथे नाद असलाच पाहिजे. म्हणून आम्ही योगामध्ये म्हणतो, की संपूर्ण अस्तित्व हे नाद स्वरूप आहे.

जर तुम्ही त्या गीतामध्ये संपूर्णपणे स्वतःला झोकून दिले, तर त्यात एक प्रकारची शक्ती आहे. जर तुम्ही खरोखर स्वतःला त्यात झोकून दिले,तर त्यात एका व्यक्तीला विलीन करण्याची शक्ती आहे.

    Share

Related Tags

शिव तत्त्व शिवाच्या कथा

Get latest blogs on Shiva

Related Content

सर्वस्व अर्पण केलेला संतकवी। शिव भक्तांचा शोध