सद्गुरु: जेव्हा मी प्राणायाम म्हणतो, तेव्हा लोक इंग्रजीत श्वास घेण्याचे तंत्र किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम म्हणून भाषांतर करतात. “प्राण” म्हणजे “जीवनशक्ती”, “यम” म्हणजे त्यावरील नियंत्रण मिळवणे. तर,ही एक सूक्ष्म प्रक्रिया आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती त्याच्या अंतर्गत ऊर्जेवर ताबा मिळवू शकते. या प्रक्रिया अतिशय सखोलतेने शिकविल्या जातात कारण शरीर आणि मन स्थिर करण्यासाठी आंतरिक ऊर्जेचा कायापालट करणे फार महत्वाचे आहे.

व्यक्तीची कार्मिक स्मृती प्राणावर अंकित झालेली असल्यामुळे ती प्रत्येक व्यक्तीमध्ये विशिष्ट पद्धतीने कार्य करते.

जीवनात तुम्ही जे काही करता ते तुमचे शरीर, तुमचे मन आणि तुमची संपूर्ण प्रणाली कशी कार्य करते हे तुमच्या प्राणाद्वारे निश्चित केले जाते. प्राण ही एक बुद्धिमान ऊर्जा आहे. व्यक्तीची कार्मिक स्मृती प्राणावर अंकित झालेली असल्यामुळे ती प्रत्येक व्यक्तीमध्ये विशिष्ट पद्धतीने कार्य करते. याउलट, विजेकडे स्मृती किंवा बुद्धिमत्ता नसते. ही लाइट बल्ब पेटवू शकते, कॅमेरा चालवू शकते आणि दहा लाख इतर कामे करू शकते, ते तिच्या बुद्धिमत्तेमुळे नव्हे तर त्या विशिष्ट उपकराणाला ती सामर्थ्य पुरवत असते. भविष्यात स्मार्ट वीज देखील असू शकते. तुम्ही ऊर्जेतील स्मृती एका विशिष्ट प्रकारे व्यवस्थापित केली तर तुम्ही तीला एका विशिष्ट मार्गाने वर्तन करायला लावू शकता.

प्राणाचे ५ प्रकार

शरीरात प्राणाची पाच मूलभूत रूपे आहेत. हे पंच वायु - प्राण वायू, समान वायू, उदान वायू, अपान वायू आणि व्यान वायू - मानवी यंत्रणेचे वेगवेगळ्या पैलुंचे मार्गदर्शन करतात. शक्तीचलन क्रियेसारख्या योगाभ्यासांद्वारे तुम्ही पंच वायूंचा ताबा घेऊ शकता. जर तुम्ही या पाच वायूंवर प्रभुत्व मिळवले तर तुम्ही बर्याच आजारांपासून मुक्त व्हाल, विशेषतः मानसिक. आज जगाला या गोष्टीची गरज आहे.

जर आपण आताच काही केलं नाही तर पुढील पन्नास वर्षात, तुमच्या जीवनशैलीतील विविध कारणांमुळे मानसिकदृष्ट्या असंतुलित, विचलित झालेल्या किंवा वेडसर लोकांची संख्या बर्याच पटींनी वाढेल. आपल्या जीवनातील बर्याच बाबी अत्यंत निष्काळजीपणाने हाताळत आहोत, ज्यासाठी आपल्याला किंमत मोजावी लागणार आहे. जर तुम्ही तुमच्या प्राणाचा ताबा घेतलात तर बाह्य परिस्थिती काहीही असली तरी तुम्ही मानसिकदृष्ट्या संतुलित राहाल. आत्ता या घडीला, जरी प्रत्येकजण वैद्यकीय दृष्ट्या नसला तरी बरेच लोक मानसिकदृष्ट्या असंतुलित आहेत.

प्राणायामाचे फायदे

समजा, तुमच्या हातांनी स्वतःच ठरवलं आणि तुमच्या डोळ्यात बोटं खुपसली, ओरबाडले आणि मारहाण केली - हे एक आजारपण आहे. बहुतेक लोकांचे मन हेच करत आहे. दररोज, ते त्यांना आतून डिवचतं, रडवतं, बडबड करतं किंवा काळजी करतं - बर्याच तऱ्हेने ते त्यांच्यासाठी दु: ख निर्माण करतं. याचा अर्थ असा की जरी सामाजिकदृष्ट्या स्वीकारलेलं असलं तरी हे एक प्रकारचे आजारपणचं आहे. दिवसरात्र मानव कित्येक प्रकारच्या त्रासातून जात आहे जे मनाने निर्माण केले आहेत. हे आजारपण घट्ट बसले आहे आणि सामाजिक रचना, तुमच्या सभोवतालचे तंत्रज्ञान आणि इतर विविध प्रभावामुळे ते वाढत जाणार आहे.

जो स्वतःच्या प्राणाचा ताबा घेतो तो शंभर टक्के स्थिर अशा मानसिक संतुलनातं राहू शकतो. यामुळे मोठ्या प्रमाणात शारिरीक आजार देखील रोखले जातात, परंतु धोका निरनिराळ्या कारणांमुळे शिल्लक राहतो, ज्याला आपण दररोज सामोरे जातो अशा घटकांचा जसे कि संक्रमण आणि सर्व प्रकारची रसायने आणि विष यांचा समावेश आहे. आपण जे काही खातो त्यावर कितीही काळजी घेतली तरी, हवा, पाणी आणि अन्नाद्वारे आपण आत काय घेतो यावर आपण कोणतेही नियंत्रण ठेवू शकत नाही. त्याचा आपल्यावर किती प्रभाव पडतो हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते.

बाह्य कारणांमुळे शंभर टक्के शारीरिक आरोग्याची हमी देता येत नाही. परंतु जर तुम्ही तुमच्या प्राणाचा ताबा घेतला तर मानसिक कल्याणाची शंभर टक्के हमी असू शकते. जर तुम्ही मनोवैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत चांगल्या पातळीवर असाल तर कुठलीही शारीरिक समस्या ही अडचण असू शकत नाही. बहुतेक वेळा, तुमच्या शरीरात किरकोळ समस्यांपेक्षा मोठी मानसिक प्रतिक्रिया हीच समस्या असते. तुमच्यात प्राण कसे कार्य करतात, उर्वरित विश्वाशी कसे व्यवहार करतात, नवजात मुलामध्ये कसे प्रवेश करतात आणि मेलेल्यांना कसे सोडतात हे सर्व त्यांना स्वतःची बुद्धिमत्ता असल्याचं स्पष्टपणे दाखवतं.

शक्ती चलन क्रिया - तुमच्या प्राणांबरोबर कार्य करणे

पाच प्राणांचे कार्य कसं होतं हे जाणून घेण्यासाठी एका विशिष्ट स्तराचं लक्ष आणि जागरूकता आवश्यक असते. शक्ती चलन क्रिया ही एक जबरदस्त प्रक्रिया आहे, पण तुम्ही संपूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी तुम्ही चाळीस ते साठ मिनिटं लक्ष केंद्रित केले पाहिजे. बरेच लोक त्यांच्या श्वासावर पूर्ण लक्ष केन्द्रित करू शकत नाहीत. मध्येच, त्यांचे विचार भटकतात किंवा ते गणती चूकतात किंवा विसरतात. संपूर्ण चक्राच्या दरम्यान तुम्ही श्वासोच्छवासावर तुमचे लक्ष केंद्रित करू शकाल, अशा ठिकाणी येण्यासाठी अनेक महिने आणि वर्षांचा सराव आवश्यक आहे.

म्हणूनच शक्ती चलन नेहमी शून्याबरोबरच शिकवले जाते. शून्य ध्यान म्हणजे स्वत: ला अशा ठिकाणी आणणे जेथे तुम्ही डोळे बंद केले तर जग तुमच्या अनुभवातून गेलेले असते. हा एक आशीर्वाद आहे जो तुम्ही सर्वांनी कधीतरी कमवावा. केवळ तुम्ही स्वत: ला असं बनवल्यावर तुम्ही कशावर तरी लक्ष केंद्रित करायला सक्षम व्हाल. जबरदस्तीच्या एकाग्रतेने काहीही मिळवता येणार नाही.

जेव्हा तुम्ही डोळे बंद करता, तेव्हा तुमच्यासाठी तुमचा श्वास, हृदयाचे ठोके, तुमच्या शरीरातल्या प्रक्रिया आणि तुमच्या प्राणांची कार्ये एवढंच अस्तित्वात असायला हवं. केवळ आत जे घडत आहे ते म्हणजे जीवन. बाहेरून जे घडत आहे ते फक्त प्रतिमा आहे.

लक्ष केंद्रित करणे हि गुरुकिल्ली आहे

शून्य आणि इतर साधना त्या दिशेने घेऊन जाणाऱ्या आहेत. तुम्ही किती दूर जात आहात हा एक वेगळा प्रश्न आहे, विशेषत: आजच्या जगात. आजूबाजूच्या आयुष्याच्या बाबतीत जे घडत आहे मी त्याच्या विरोधात नाही. पण दुर्दैवाने, उदास असणे हे फॅशनेबल बनले आहे - प्रगल्भपणा नाही. अशा मनोवृत्तीत, जीवन तुमच्यात कसे कार्य करते याकडे तुमचे लक्ष वेधण्याचा कोणताही मार्ग नाही. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक मनुष्यासाठी हे शक्य नाही - ते आहे. तुम्ही याला किती महत्त्व देता यावर हे सर्व अवलंबून असते. तुम्ही त्याला पहिल्या क्रमांकाचे प्राधान्य दिले तर तुमच्यातली प्रत्येक गोष्ट त्यानुसार स्वत: ला व्यवस्थित करेल.

जर तुमचे प्राधान्यक्रम वेगवेगळ्या दिशांवर असतील तर मूलभूत पातळीवरील जीवनाच्या दृष्टीने तुम्ही कुठेही जात नाही. सामाजिक पातळीवर, तुम्ही कदाचित कुठेतरी जात असाल. शारीरिक पातळीवर, तुमचे शरीर सरळ थडग्याकडे जात आहे - जास्तीत जास्त, तुम्ही मार्ग थोडा लांबवू शकता. तुमच्या मनाचा विचार कराल तर ते गोल गोलच फिरत आहे. जर तुम्ही जीवनाच्या मूलभूत स्वरूपावर लक्ष केंद्रित केलं तरच तुम्ही खरोखर कुठेतरी पोहोचू शकाल. तुमच्यातील जीवन ही एकमात्र वास्तविक गोष्ट आहे - उरलेले फक्त प्रतिबिंब आहेत. परंतु आत्ता, बहुतेक लक्ष प्रतिबिंबांवर आहे, वास्तविकतेवर नाही.

शक्ती चलन क्रियेद्वारे, हळूहळू परिवर्तन होते. तुमचा प्राण आणि तुमच्या शरीर संस्थेतील वेगवेगळ्या क्रियांचा ताबा तुमच्याकडे घेणं ही एक विलक्षण प्रक्रिया आहे. शक्ती चलन क्रिया त्या पातळीवर कार्य करते. तुम्ही याचा सराव केला तर तुम्ही तुमच्या शरीर संस्थेचा पाया मजबूत करता.

शाम्भवी महामुद्रा - प्राणाच्या पलीकडे

शाम्भवी महामुद्रेमध्ये तुमच्याला त्या सर्व गोष्टींचा आधार असलेल्या आयामाला स्पर्श करण्याची क्षमता आहे. परंतु तुम्ही हे सक्रियपणे करू शकत नाही. तुम्ही केवळ वातावरण तयार करू शकता. आम्ही नेहमीच शाम्भवीला “ती” म्हणून संबोधतो. शाम्भवी सक्रिय होण्यासाठी तुमच्यात भक्ती असणे आवश्यक आहे. तुम्ही केवळ निर्मितीच्या स्रोताच्या संपर्कात येऊ शकता - तिच्या बरोबर तुम्ही काही करू शकत नाही. शाम्भवीत पण प्राणायामाचा एकभाग आहे, ज्यामुळे बरेच फायदे होतात.

शाम्भवी महामुद्रेविषयी महत्वाची गोष्ट म्हणजे ती सृष्टीच्या उगमस्थानला स्पर्श करण्याचे साधन आहे, जी प्राणापेक्षा पलीकडे आहे. हे पहिल्या दिवशी होऊ शकते, किंवा तुम्ही ते सहा महिने करीत आहात आणि काहीही झाले नाही. परंतु तुम्ही हे सुरू ठेवले तर, तो दिवस येईल जेव्हा तुम्ही या आयामाला स्पर्श कराल. तुम्ही त्याला स्पर्श केलात तर अचानक सर्वकाही बदलून जाईल.