logo
logo

शिवाची दक्षिण भारतीय प्रेमकहाणी

बहुतेकांना शिवाची दक्षिण भारतीय प्रेमकहाणी माहीत नाही, जी दुर्दैवाने यशस्वी झाली नाही. मात्र, ती वेगळ्या रूपाने फळास आली आणि परिणामी दक्षिणेचा कैलास निर्माण झाला. अशी आहे त्याची कथा.

सद्गुरू: पुण्याक्षी, एक प्रचंड जाणीव असलेली, भारतीय उपखंडाच्या दक्षिण टोकाला राहणारी एक दैवी स्त्री होती. तिला शिवाबद्दल ओढ निर्माण झाली आणि त्याची पत्नी होण्याची तिची इच्छा होती. तिने ठरवले होते की, ती फक्त शिवासोबतच लग्न करेल, दुसऱ्या कोणाशीही नाही. म्हणून पुण्याक्षी शिवाचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वतःला सक्षम आणि सुयोग्य बनवण्याच्या दिशेने काम करू लागली. ती तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी पूर्णपणे शिवावर केंद्रित झाली; तिच्या भक्तीने आणि तपस्येने विवेकबुद्धीच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या.

तिच्या भावनांची तीव्रता पाहून, शिवामध्ये करुणा आणि प्रेम जागृत झाले. त्याने तिच्या प्रेमाला प्रतिसाद दिला आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाला. पण पुण्याक्षी ज्या समाजात राहत होती तो चिंतित झाला. त्यांचा विश्वास होता की, जर पुण्याक्षीने लग्न केले, तर भविष्य पाहण्याची आणि त्यांचे संरक्षण व मार्गदर्शन करण्याची तिची क्षमता नष्ट होईल. म्हणून त्यांनी हे लग्न थांबवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले. पण तिच्या शिवाबद्दलच्या निश्चयापासून आणि भक्तीपासून ते तिला काही हलवू शकले नाही.

शिवाने उत्कटतेने प्रतिसाद दिला आणि तिच्या लग्नाची तारीख निश्चित झाली. ते उपखंडाच्या दक्षिण टोकाकडे निघाले. पण तिच्या समाजातील लोक लग्नाच्या विरोधात होते, म्हणून त्यांनी शिवाला आवाहन केले, "हे शिवा, तुम्ही तिच्याशी लग्न केले तर आमच्याकडे असलेली एकमेव जाणीव आम्ही गमावू. कृपया तिच्याशी लग्न करू नका." पण शिव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता आणि तो लग्नासाठी पुढे जात राहिला.

समाजातील वडिलधाऱ्यांनी त्याला थांबवले आणि म्हणाले, "तुम्हाला ही मुलगी वधू म्हणून हवी असेल तर काही अटी आहेत. तुम्हाला वधूमूल्य द्यावे लागेल."

शिवाने विचारले, "वधूमूल्य काय आहे? जे काही असेल, मी तुम्हाला देईन."

त्यांनी पुण्याक्षीच्या वधूमूल्यासाठी शिवाने द्यायच्या तीन वस्तूंची यादी सांगितली, "आम्हाला गाठींशिवाय ऊस, शिरांशिवाय पान आणि डोळ्यांशिवाय नारळ हवा आहे. हे वधूमूल्य तुम्हाला द्यावे लागेल."

या सगळ्या वस्तू अनैसर्गिक आहेत. ऊस नेहमी गाठींसह येतो, शिरांशिवाय पान नसते, आणि डोळ्यांशिवाय नारळ असू शकत नाही. हे अशक्य वधूमूल्य होते आणि लग्न थांबवण्याचा निश्चित मार्ग होता.

शिव पुण्याक्षीबाबतीत खूप उत्कट होता आणि कोणतीही किंमत मोजून तिच्याशी लग्न करू इच्छित होता. म्हणून त्याने आपली गूढ शक्ती आणि जादुई क्षमता वापरली आणि निसर्गाचे नियम मोडून, या तिन्ही वस्तू निर्माण केल्या. त्याने अवाजवी, अशक्य वधूमूल्याची मागणी पूर्ण करण्यासाठी निसर्गाचे मूलभूत नियम मोडले. त्यांच्याकडून केल्या गेलेल्या मागण्या पूर्ण केल्यानंतर, तो लग्नासाठी पुढे निघाला.

पण मग, समाजातील वडीलधाऱ्यांनी शिवाला एक शेवटची अट घातली. "उद्या सूर्योदयापूर्वी तुमचे लग्न झाले पाहिजे. जर तुम्ही उशीर केला, तर त्या मुलीशी लग्न करू शकणार नाही," असे ते म्हणाले.

हे ऐकून, शिव घाईघाईने देशाच्या दक्षिण टोकाकडे निघाला. त्याने खूप वेगाने अंतर पार केले आणि त्याला खात्री होती की, तो पुण्याक्षीकडे वेळेत पोहोचेल. समाजातील वडीलधारी लोकांनी पाहिले की शिव त्यांनी घातलेल्या सर्व अशक्य अटी पूर्ण करत आहे आणि पुण्याक्षीला दिलेले वचन पाळणार आहे. ते खरोखर काळजीत पडले.

शिव घाईघाईने प्रवास करत असताना, तो एका ठिकाणी पोहोचला, जे आज सुचिंद्रम म्हणून ओळखले जाते, जे लग्नाच्या ठिकाणापासून फक्त काही किलोमीटर दूर होते. त्याला सूर्य उगवताना दिसला! त्याला विश्वासच बसेना. तो आपल्या कार्यात अपयशी झाला होता! पण खरं तर हा समाजातील वडीलधाऱ्यांचा तो शेवटचा डाव होता; त्यांनी खोटा सूर्योदय दाखवण्याचे ठरवले होते. त्यांनी कापराचा मोठा ढीग केला आणि त्याला पेटवून दिले. कापूर इतका तेजाने आणि तीव्रतेने जळत होता की, जेव्हा शिवाने दुरून पाहिले, तेव्हा त्याला वाटले की, सूर्योदय होत आहे आणि तो त्याच्या कार्यात अपयशी ठरला आहे. तो खूप जवळ होता - फक्त काही किलोमीटर दूर - पण त्याला फसवून असा विचार करायला लावले की, वेळ संपली आहे आणि तो पुण्याक्षीला दिलेलं वचन पाळू शकला नाही.

पुण्याक्षी तिच्या शिवासोबत होणाऱ्या भव्य लग्नाची तयारी करत होती, तिच्या समाजाच्या लग्न मोडण्याच्या प्रयत्नांबद्दल तिला काहीच माहीती नव्हते. जेव्हा खरा सूर्योदय झाला, तेव्हा तिला समजले की, शिव येत नाहीये. ती संतापली. तिने अन्नाने भरलेली सगळी भांडी लाथाडली आणि प्रचंड रागाच्या भरात ती जमिनीच्या अगदी शेवटच्या टोकाला जाऊन उभी राहिली. ती एक सिद्ध योगिनी होती आणि उपखंडाच्या अगदी टोकाला उभी राहून तिने देहत्याग केला. आजही तिने देहत्याग केलेल्या जागी एक मंदिर आहे; त्या जागेला कन्याकुमारी म्हणून ओळखले जाते.

शिवाला वाटले की त्याने पुण्याक्षीला अपयशी ठरवले आणि तो स्वतःवरच खूप निराश झाला होता आणि चिडला होता. तो मागे वळून चालायला लागला. पण स्वतःच्या आतल्या रागामुळे, त्याला आपली निराशा दूर करण्यासाठी एक जागा हवी होती. म्हणून तो वेल्लियांगिरी पर्वतावर चढला आणि शिखरावर बसला. तो आनंदात किंवा ध्यानात बसला नाही. तो स्वतःबद्दल एक प्रकारची निराशा आणि राग घेऊन बसला. तो तिथे बराच काळ राहिला आणि पर्वताने त्याची ऊर्जा शोषून घेतली जी इतर कुठल्याही ठिकाणापेक्षा खूप, खूप वेगळी आहे.

परंपरेनुसार, शिव जिथे जिथे काही काळ राहिला त्या प्रत्येक जागेला कैलास म्हणले गेले. म्हणून या पर्वताला दक्षिणेचा कैलास म्हणले जाते. उंची आणि रंगात, आणि कदाचित आकारमानात, वेल्लियांगिरीची तुलना हिमालयातील कैलासाशी होऊ शकत नसेल, पण सामर्थ्य, सौंदर्य आणि पवित्र्यात तो काहीच कमी नाही. हजारो वर्षे अनेक ऋषी, योगी आणि रहस्यवादी या पर्वतावर राहून गेले आहेत. वेल्लियांगिरी पर्वत अनेक अद्भुत अशा अध्यात्मिक कार्याचा साक्षीदार आहे. ज्यांचा देवही हेवा करतील अशा कृपेने आणि प्रतिष्ठेने जगलेले अनेक जीव, अनेक माणसे या पर्वतावर राहून गेली आहेत. या महान लोकांनी त्यांचे ज्ञान संपूर्ण पर्वताला शोषून घेऊ दिले, आणि ते कधीही हरवले शकत नाही. 

    Share

Related Tags

Get latest blogs on Shiva