आज जगभरात सर्वत्र योगाचे पेव फुटले आहे, पण त्याचा खऱ्या योगाशी फारच कमी संबंध आहे. या प्राचीन विज्ञानाचे अनेक गैरसमज आज खरे असल्याचे मानले जात आहे. आता सदगुरुंच्या तोंडून याची सत्यता जाणून घेण्याची वेळ आली आहे.

Read in Hindi: योग से जुड़ी सात भ्रांतियां
எது யோகா இல்லை?

अफवा #1 : योगाचा उगम हिंदू धर्मातून झाला आहे.

सद्गुरू: योग ही संकल्पना हिंदूंची आहे असे म्हणणे म्हणजे गुरुत्वाकर्षण ही संकल्पना ख्रिस्ती आहे असे म्हणण्यासारखे आहे. गुरुत्वाकर्षणाचा नियम आयझॅक न्यूटनने मांडला जो ख्रिस्ती संस्कृतीमध्ये वाढला होता. पण म्हणून गुरुत्वाकर्षण ही संकल्पना ख्रिस्ती होते का? योग हे एक तंत्र आहे. ज्या कोणाला या तंत्राचा उपयोग करून घ्यायचा आहे तो करून घेऊ शकतो.

योगशास्त्र आणि त्याचे तंत्र हे इथल्या संस्कृतीमध्ये वाढले आणि विकसित झाले त्यामुळे साहजिकच योग हिंदू संस्कृतीशी जोडला गेला आणि काही अज्ञानी लोकांनी योगशास्त्रावर‘हिंदू’ असण्याचा शिक्का मारला. ‘हिंदू’शब्दाची उत्पत्ती ‘सिंधू’ शब्दापासून झाली आहे, जी एक नदी आहे. सिंधू किवा इंडस नदीकाठी ही संस्कृती बहरली,म्हणून या संस्कृतीला ‘हिंदू’ हे नाव पडले. हिंदू हा कोणताही पंथ नाही - हा कोणताही धर्म नाही. ही एक भौगोलिक आणि सांस्कृतिक ओळख आहे.

अफवा #2 : जर तुम्ही वाटोळा आकार धारण करू शकता तर मग मनुष्यरूप का? योग म्हणजे शरीराला वेडेवाकडे पिळणे.

सदगुरू: आपण जेव्हा ‘योग’ हा शब्द उच्चारतो, तेव्हा या धरतीवरच्या बहुसंख्य लोकांना फक्त योगासनेच आठवतात. योगविज्ञानातून जीवनाच्या प्रत्येक पैलूचा शोध घेता येतो - पण आजचे जग योगाचा संबंध फक्त शरीराशी निगडीत ठेवते. योगशास्त्रात आसनांना फारसे महत्त्व दिले नाही. २०० हून अधिक योगसुत्रांपैकी फक्त एक सूत्र आसनांशी संबधित आहे. मात्र आजच्या आधुनिक जगात या एकाच सूत्राला इतरांपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.

कित्येक प्रकारे, जग कोणत्या दिशेला चालले आहे याचा हा ठळक पुरावा आहे. आधुनिक जगाचा प्रवासच  सूक्ष्म, सखोल परिमाणाकडून....चैतन्याकडून स्थूल शरीराकडे चालू आहे. हेच आपल्याला बरोब्बर उलटे  करायचे आहे. आम्हाला माणसाने त्याचा प्रवास शरीरापासून सुरु करून आंतरिक स्वरूपाच्या दिशेने केलेला हवा आहे.

पण मला निराश होता येत नाही, नाहीतर हल्ली ज्या पद्धतीने जगभर हठयोग केला जातो आणि तोच बरोबर आहे असे लोकं समजतात, ते पाहून मी निराश झालो असतो. तुम्ही जी पद्धत आणि तंत्र पहात आहात, ती फक्त शारीरिक कृती आहे. तुम्हाला त्यात प्राण फुंकावे लागतील, अन्यथा ती सचेतन होणार नाही. याच करता भारतीय परंपरा जीवित गुरूवर इतका भर देते कारण तो योगाला सचेतन करतो. योगाचे तंत्र म्हणजे तुमच्या शरीर व्यवस्थेत सूक्ष्म बदल करून ती एका उच्च पातळीवर नेणे. योग हा असा आयाम आहे जो तुम्हाला तुमचे सर्वोच्च स्वरूपात प्रस्थापित करतो. प्रत्येक आसन, प्रत्येक मुद्रा, प्रत्येक श्वसनाचा प्रकार – यातली प्रत्येक गोष्ट - याच उद्दिष्टावर केंद्रित केली आहे.

अफवा #3 :सिक्स पॅक शरीर यष्टी हवी? योग हा व्यायामाचा जबरदस्त प्रकार आहे.

सदगुरू:  तुम्हाला तंदुरुस्त शरीर हवे असेल, तुम्हाला सिक्स पॅक अॅब्ज किंवा अजून जास्त अॅब्ज हवे असतील, तर टेनिस खेळा किंवा डोंगर चढा. योग हा व्यायाम नाही, त्याला इतरही अनेक सूक्ष्म, सखोल आयाम आहेत. तंदुरुस्तीचे हे वेगळे परिमाण आहे. हो, तुम्हाला निरोगी तब्येत मिळेल, पण सिक्स पॅक अॅब्ज मात्र मिळणार नाहीत. तुम्ही कॅलरी घटवण्यासाठी किंवा स्नायूंना उठावदार आकार देण्याकरता योग करत असाल, तर तुम्ही निश्चितपणे चुकीच्या कारणाकरता योग करत आहात यात शंका नाही. अॅब्ज करता जिममध्येजा. योग अगदी सूक्ष्म आणि नाजूक पद्धतीने करायचा असतो, स्नायू पिळदार करण्याच्या जोरकस पद्धतीने नाही. कारण योग हा व्यायाम नाही.

शरीरामध्ये स्मृतींचा खूप मोठा साठा असतो. तुम्हाला जर तुमचे शरीर वाचायचे असेल, त्यातले सगळे काही माहीत करून घ्यायचे असेल... अगदी शून्यातून हे विश्व निर्माण झाले ते इथपर्यंत कसे येऊन पोचले - हे या शरीरात लिहिलेले आहे. तुम्ही जेव्हा आसने करता तेव्हा तुम्ही या स्मृतींची दारे उघडता आणि एका उत्तम शक्यतेकरता आयुष्याची फेररचना करता. हठयोग योग्य वातावरणात शिकवला गेला तर ते तुमच्या शरीराला एका अश्या अदभूत पात्रात रुपांतरीत करते, ज्याद्वारे दैवी शक्ती प्राप्त करता येते.

अफवा #4 : फक्त मागच्या शतकापासून योग जगभर पसरला.

सदगुरू: जरी आज योग अनेकविध प्रकारे विपरीतरित्या प्रसारित आणि चुकीच्या पद्धतीने सर्वत्र केला जात असला, तरी ‘योग’ या शब्दाला आता जागतिक मान्यता मिळालेली आहे.  योगाचा प्रसार कुठल्याही संस्थेने संघटीतरित्या जगभर केला नसला तरी योग हजारो वर्षे टिकून आहे आणि इथवर आला आहे कारण तो प्रदीर्घ काळ माणसाच्या कल्याणाकरता, इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा, उपयोगी ठरला आहे.

लाखो लोक योग करत आहेत. पण याचा उगम कोठे झाला? याचा शोध कोणी लावला? गोष्ट खूप जुनी आहे. काळाच्या ओघात त्याचे प्राचीन अस्तित्व आज हरवून गेले आहे. योग संस्कृतीमध्ये शिवाला देव मानले जात नाही, तर त्याला आदियोगी किंवा पहिला योगी ...योगाचा जनक समजले जाते.  त्याने मानवाच्या मनात सर्वात प्रथम योगाची बीजे रोवली.

शिवाने योगाचे पहिले धडे त्याची पत्नी, पार्वतीला दिले. नंतर त्याने योगतंत्र त्याच्या पहिल्या सात शिष्यांना विशद करून सांगितले. केदारनाथ येथील कांती सरोवराच्या काठावर हे घडले. योगाचा पहिला वर्ग तिथे भरला.

अनेक वर्षांनी, जेव्हा योगविद्येचा अभ्यास पूर्ण झाला, तेव्हा त्यांतून सात पूर्ण आत्मसाक्षात्कारी पुरुष...जगप्रसिद्ध सात ऋषी तयार झाले. ज्यांना आज भारतीय संस्कृतीमध्ये सप्तर्षी म्हणून ओळखले जाते, त्यांची पूजा केली जाते, स्तुती केली जाते. शिवाने या सात लोकांना योगाचे वेगवेगळे प्रकार शिकवले, आणि हे प्रकार पुढे योगाचे सात मुलभूत प्रकार बनले. आजही योगाचे हे सात वेगवेगळे प्रकार जपले गेले आहेत.

ह्या सप्तर्षींना जगाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या दिशेला हे परिमाण देऊन पाठवले  ज्याच्या वापराने माणसाला त्याच्या वर्तमान संकुचित सीमा आणि अनिवार्य प्रवृत्तिंच्या  पलीकडे जाऊन प्रगती करता येईल.

एक जण मध्य आशिया मध्ये गेला, एकजण मध्य पूर्वेला आणि उत्तर आफ्रिकेला गेला. एकजण दक्षिण अमेरिकेला गेला, एकजण तिथेच आदियोगींबरोबर राहिला. एक जण हिमालयाच्या खालच्या भागात गेला, एकजण पूर्व आशियात गेला आणि एकजण दक्षिणेकडे प्रवास करून भारताच्या उपखंडात गेला.  काळाने बरेच काही उध्वस्त केले. पण जेव्हा या भागांची संस्कृती काळजीपूर्वक पाहिली जाते तेव्हा या लोकांच्या कर्तृत्वाचे धागेदोरे आजही तिथे पाहायला मिळतात. त्यांची रूपे बदलली आहेत पण ते धागेदोरे आजही दिसून येतात.

अफवा #5 : तुमची लय ठरवा. योग आणि संगीत एकत्रित मस्त वाटतात.

योगासने करताना आरश्याचा किंवा संगीताचा वापर कधीच करू नका. हठयोग करताना तुमचा तुमच्या शरीराशी, मनाशी,आंतरिक ऊर्जेशी आणि अगदी तुमच्या आतल्या गाभ्याशी नाळ जुळली जाणे अपेक्षित आहे. तुम्हाला जर तुमच्या मधील सृजनशक्तीच्या स्त्रोताशीनाते जोडायचे असेल तर तुमचे शरीर, तुमचे मन आणि तुमची ऊर्जा यांचा त्यामध्ये संपूर्ण सहभाग अत्यावश्यक आहे. तुम्ही त्यामध्ये पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्र वृत्तीने झोकून द्यायला हवे. सहज जाता जाता, गाणे ऐकता ऐकता काहीतरी करून टाकणे, असे असता कामा नये. योगशाळेमधील सगळ्यात मोठी अडचण म्हणजे शिक्षक आसने करता करता बोलत असतो. यामुळे निश्चितच तुम्हाला अपाय होवू शकतो.

आसने करताना बोलू नये हा फक्त आदर्श नाही, तर तो एक नियम आहे. आसने करताना तुम्ही अजिबात बोलायचे नसते. आसने करताना श्वास, एकाग्र मन आणि उर्जेची स्थिरता अतिशय महत्वाची असते. जर तुम्ही बोललात तर तुम्ही या सगळ्या गोष्टी नष्ट करून टाकाल. आम्ही कमीत कमी ८ ते १० अश्या लोकांना मदत केली, जे आमच्याकडे त्यांच्या गंभीर असंतुलनाच्या तक्रारी घेऊन आले होते. माझ्या मते त्यातल्या ४ जणांनी त्यांचा व्यवसाय आता सोडून दिला आहे, कारण ते काय मूर्खपणा करत होते ते आता त्यांना समजले आहे.

काही वर्षांपूर्वी मी जेव्हा अमेरिकेत होतो, तेव्हा  मला कोणी तरी एका योग शाळेमध्ये भाषण द्यायला बोलावले. मी तिथे गेलो तर तिथे सगळ्यांना उत्साही वाटावे म्हणून संगीत चालू  होते. चँग .. चँग... चँग. ती महिला अर्धमत्स्येंद्रियासन करता करता काही लोकांशी  बोलत होती. मला पाहताच तिने टेबलावरून टुणकन उडी मारली आणि माझ्याजवळ येऊन मला मिठी मारली.

मी तिला बाजूला घेऊन म्हटले की “हे बघ, अश्या प्रकारे तू तुझ्या शरीराच्या व्यवस्थेमध्ये गंभीर असंतुलन तयार करते आहेस. तू हे असे किती दिवस करते आहेस?” ती म्हणली, बहुतेक १५-१६ वर्षे. मी म्हणलो...” जर तू हे गेली १६ वर्ष करत आहेस, तर तुला अमके तमके आजार सतावत असले पाहिजेत.” तिने माझ्याकडे दचकून पहिले आणि दुसऱ्या दिवशी ती माझ्याकडे आली आणि म्हणाली “सदगुरू, तुम्ही जे काही म्हणालात ते सगळे त्रास मला होत आहेत. मी डॉक्टरांकडे जाऊन अनेक प्रकारचे उपाय करत आहे”. मी म्हणालो “तुला डॉक्टरची गरज नाही. तूच याला कारणीभूत आहेस. तू हे थांबव, तुझे सगळे त्रास थांबतील.” नंतर एक दीड वर्षांनी तिने योग शिकवणे बंद केले.

चुकीच्या पद्धतीने योग करून बऱ्याच लोकांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. याचा अर्थ योग धोकादायक आहे असे नाही. मूर्खपणा ही या भूतलावरची सर्वात धोकादायक गोष्ट आहे. तुम्ही जर काही मूर्खपणा केलात तर त्यामुळे तुम्हाला हानी पोचेल. अगदी प्राचीन काळापासून मूर्खपणा ही या भूतलावरची सर्वात धोकादायक गोष्ट आहे.

अफवा  #6 : योग शिकवणारे पुस्तक हवे आहे? तुम्ही पुस्तक वाचून योग शिकू शकता.

सदगुरू: आज तुम्ही जर कोणत्याही मोठ्या पुस्तकांच्या दुकानात गेलात, तर तुम्हाला कमीत कमी १५-२० योग या विषयावरची पुस्तके दिसतील. ७ दिवसात योग कसे शिकावे, २१ दिवसात योगी कसे बनावे... कित्येक लोकांनी पुस्तके वाचून योग शिकत स्वतःचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करून घेतले आहे. हे वरवर खूप सोपे दिसते, पण तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष करता तेव्हा तुम्हाला त्यातील नाजूक बाजू समजते.. योग ही पूर्णपणे समजून घेण्याची आणि योग्य मार्गदर्शनाखाली करण्याची गोष्ट आहे. नाहीतर एखाद्याला बराच अपाय होवू शकतो. पुस्तकाने तुम्हाला प्रेरणा मिळेल, पण पुस्तकाचा हेतू योग शिकवण्याचा नाही.

अफवा #7 : तुम्हाला रोज सकाळ-संध्याकाळ योग करावा लागतो.

सदगुरू: योग ही काही सकाळ संध्याकाळ करण्याची गोष्ट नाही. ती अस्तित्वात असण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. साधकाने स्वतः योग बनून जायचे असते. तुम्ही जर सकाळ-संध्याकाळ योग केला आणि बाकीचा वेळ दुसऱ्या कशात तरी कार्याकृतीत अडकून पडलात, तर त्याला योग म्हणता येणार नाही, तो फक्त योगाचा सराव झाला.

योगप्रक्रियेमधून जीवनाचा कोणताही पैलू वगळलेला नाही. जर तुमचे आयुष्यच योग बनून गेले तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. जर तुम्ही तुमचे अस्तित्वच योगमय बनवलेत तर तुम्ही तुमचा संसार चालवू शकता, तुम्ही नोकरीला  जाऊ शकता, तुमचा व्यवसाय करू शकता, कोणत्याही अडचणीशिवाय तुम्ही तुम्हाला काय हवे ते करू शकता. आयुष्यातील कोणत्याही गोष्टीचा वापर तुम्ही त्यात अडकून पडण्यासाठी  करू शकता किंवा स्वतःला मुक्त करून घेण्यासाठी करू शकता. जर तुम्ही त्या गोष्टीमध्ये अडकून पडत असाल तर आपण त्याला कर्म म्हणतो आणि जर तुम्ही ती गोष्ट स्वतःला मुक्त करण्यासाठी वापरत असालतर आपण त्याला योग म्हणतो.

Editor’s Note: Excerpted from Sadhguru’s discourse at the Isha Hatha Yoga School’s 21-week Hatha Yoga Teacher Training program. The program offers an unparalleled opportunity to acquire a profound understanding of the yogic system and the proficiency to teach Hatha Yoga. The next 21-week session begins on July 16 to Dec 11, 2019. For more information, visit www.ishahathayoga.com or mail info@ishahatayoga.com