सद्गुरू: लोकांबद्दल मला एकच समस्या आहे की, त्यांच्यात आवश्यक ती तीव्रता नाही. जर ते पुरेसे तीव्र असते, तर आम्हाला सर्वोच्चाकरिता जन्मभर काम करावे लागले नसते - आजच हे काम पूर्ण झाले असते. मृत्यूचा क्षण किंवा मृत्यूची शक्यता ही बहुतेक लोकांच्या जीबवणातला सर्वात तीव्र अनुभव असतो. त्यांच्यापैकी बहुतेकांनी त्यांच्या आयुष्यात कधीही त्या पातळीची तीव्रता अनुभवलेली नसते. त्यांच्या प्रेमात, हसण्यात, आनंदात, परमानंदात, दुःखात - इतर कुठेही ते अशा तीव्रतेला स्पर्श करत नाहीत - फक्त मृत्यूमध्येच ते घडून येते.
याच कारणासाठी शिव स्मशानात किंवा कायांतात जाऊन बसले, वाट पाहत. काया म्हणजे "शरीर," अंत म्हणजे "शेवट." कायांत म्हणजे "जिथे शरीर संपते" - "जीवन संपते" असे नाही. हे कायांत आहे, जीवांत नाही. या पृथ्वीकडून जे काही तुम्ही घेतले आहे, ते सर्व तुम्हाला मागे सोडावे लागेल. जर तुम्ही अशा प्रकारे जगला असाल की, ‘तुमचे शरीर’ हेच तुम्हाला माहीत आहे, तर जेव्हा तुम्हाला ते सोडून द्यावे लागेल तो क्षण तुमच्या आयुष्यातला सर्वात तीव्र क्षण होईल. जर तुम्हाला शरीराच्या पलीकडचे काही माहीत असेल, मग ते फारसे महत्त्वाचे ठरत नाही. ज्याने स्वतःचे स्वरूप आणि ‘तो काय आहे’ हे जाणले आहे, त्याच्यासाठी कायांत हा फार मोठा क्षण नाही. तो फक्त आणखी एक क्षण आहे, एवढेच. पण जे केवळ भौतिक शरीर म्हणून जगले, त्यांच्यासाठी, जेव्हा त्यांना स्वतःचे म्हणून जे काही माहीत आहे, ते सर्व सोडण्याची वेळ येते, तेव्हा तो खूप तीव्र क्षण असणार आहे.
अमरत्व हे प्रत्येकासाठी नैसर्गिक स्थिती आहे. मृत्यू ही तुम्ही केलेली चूक आहे. हे जीवनाबद्दल चुकीचे आकलन आहे. भौतिक शरीरासाठी, कायांत, शरीराचा अंत, निश्चितपणे येईल. पण जर तुम्ही फक्त काया न राहता ‘जीव’ बनलात, जर तुम्ही फक्त जिवंत शरीर नाही तर जिवंत अस्तित्व असाल, तर अमरत्व तुमच्यासाठी नैसर्गिक स्थिती आहे. तुम्ही मर्त्य आहात की अमर हा केवळ दृष्टिकोनाचा प्रश्न आहे - मग कोणताही अस्तित्वात्मक बदल आवश्यक नाही.
शिव स्मशानात बसतात, तुमच्या आणि तुमच्या खेळाला कंटाळून, कंटाळून कारण शहरभर चाललेले सगळे नाटक पूर्णपणे मूर्खपणाचे आहे. एकमेव वास्तविक गोष्ट केवळ स्मशानभूमीत घडते.
म्हणूनच ज्ञानप्राप्तीला प्रबोधन म्हणतात, यश किंवा साध्य म्हणत नाहीत. जर तुम्ही ते पहिले, तर ते तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही ते पहिले नाही, तर ते तुमच्यासाठी नाही. हा केवळ दृष्टिकोनाचा प्रश्न आहे - कोणताही मूलभूत, अस्तित्वात्मक बदल नाही. जर तुम्ही सज्ज असाल, इंद्रियांनी नाही, तर तुमच्या प्रज्ञेने, तर तुम्हाला केवळ काया नाही तर जीव माहीत होतो, आणि मग तुम्ही नैसर्गिकरित्या अमर आहात. तुम्हाला तुमच्या अमरत्वासाठी काम करावे लागत नाही. तुम्हाला केवळ हे जाणून घ्यायचे आहे की, हे असेच आहे.
म्हणून, शिवाने त्याचे निवासस्थान कायांत किंवा स्मशानात हलवले. श्म म्हणजे शव किंवा मृतदेह, शन म्हणजे शय्या किंवा पलंग. जिथे मृतदेह पडलेले असतात, तिथे तो राहतो, कारण त्याला जाणवले आहे की, जिवंत लोकांसोबत काम करणे हा वेळेचा अपव्यय आहे. तुम्हाला आवश्यक त्या तीव्रतेच्या टप्प्यावर आणता येत नाही. लोकांना थोडे तीव्र करण्यासाठी तुम्हाला खूप युक्त्या कराव्या लागतात.
जगण्याच्या प्रवृत्तीला सर्वात मोठी गोष्ट बनवली आहे म्हणून तीव्रता येत नाही. या जिवंत शरीरात दोन मूलभूत शक्ती आहेत. एक आहे जगण्याची प्रवृत्ती - दुसरी आहे अमर्याद विस्तार करण्याची ओढ. जर तुम्ही जगण्याच्या प्रवृत्तीला शक्ती दिली, तर ती नेहमी मूलभूत स्तरावर राहण्याचा प्रयत्न करते, कारण जगणे म्हणजे सुरक्षितता. जर तुम्ही अमर्याद होण्याच्या ओढीला शक्ती दिली, जर तुम्ही अमर्याद विस्ताराचा शोध घेत असाल, जर तुमची सर्व ऊर्जा त्यावर केंद्रित असेल, तर तिथे जीवनाची संपूर्ण तीव्रता असेल.
जगण्याची प्रवृत्ती प्रत्येक प्राण्यात प्रबळ आहे. उत्क्रांतीच्या या टप्प्यात जेव्हा आपण मानव बनलो आहोत, तेव्हा आपल्या जीवनात जाणीवेची आणि बुद्धीची उच्च पातळी आली आहे - अशा वेळी, जगण्याची प्रवृत्ती कमी करून विस्तार करण्याची ओढ वाढवली गेली पाहिजे. या दोन शक्तींपैकी, एक नेहमी तुमच्यातील तीव्रता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, दुसरी नेहमी तुम्हाला मंद ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला कदाचित अशी संसाधने साठवून ठेवावी लागतील जी अपुरी आहेत. पण जीवन अपुरे नाहीये.
शिव स्मशानात बसतो, तुम्हाला आणि तुमच्या खेळाला कंटाळून, कंटाळून कारण शहरभर चाललेले सर्व नाटक पूर्णपणे मूर्खपणाचे आहे. एकमेव वास्तविक गोष्ट स्मशानभूमीत घडते. कदाचित जन्माच्या क्षणी आणि मृत्यूच्या क्षणी, काहीतरी घडत आहे. प्रसूती गृह आणि स्मशानभूमी हीच दोन महत्वाची ठिकाणे आहेत, जरी प्रसूती थोडी जास्तच घडत आहे.
मर्यादित असणे चुकीचे आहे का? नाही. पण मर्यादित असणे वेदनादायक आहे. वेदना चुकीची आहे का? नाही. जर तुम्हाला ती आवडत असेल, तर मला काहीच अडचण नाही?
शिव अशा ठिकाणी बसले आहेत जिथे जीवनाला सर्वोच्च अर्थ आहे. पण जर तुम्ही भयभीत असाल, जर तुम्ही जगणे किंवा स्व-संरक्षणाच्या पद्धतीत असाल, तर हे तुम्हाला समजणार नाही. तुमच्या आत विस्तार करण्याची आणि परमला स्पर्श करण्याची ओढ असेल तरच हे तुम्हाला समजेल. जे जगण्याच्या प्रवृत्तीत आहेत त्यांच्यात त्याला रस नाही. जगण्यासाठी, तुम्हाला केवळ चार अवयव आणि काही कार्यरत मेंदूच्या पेशी लागतात. ते मग गांडुळ असोत, टोळ किंवा इतर कोणतेही प्राणी - ते सर्व जगत आहेत, त्याचे छान चालले आहे, जगण्यासाठी तितक्याच मेंदूची गरज आहे. जर तुम्ही जगण्याच्या प्रवृत्तीत असाल, जर स्व-संरक्षण हे तुमच्यात सर्वात प्रबळ असेल, तर तो तुम्हाला कंटाळला आहे - तो तुमच्या मरण्याची वाट पाहत आहे.
त्याला विनाशक म्हणतात, कारण तो तुमचा नाश करू इच्छितो म्हणून नाही. तो स्मशानभूमीत वाट पाहत आहे, जेणेकरून शरीर नष्ट होईल, कारण शरीर नष्ट होईपर्यंत, आजूबाजूचे लोकसुद्धा मृत्यू काय आहे हे जाणत नाहीत. तुम्ही पाहिले असेल की, जेव्हा प्रियजनांचा मृत्यू होतो, तेव्हा लोक मृतदेहावर पडतात, त्याला मिठी मारतात, चुंबन घेतात, त्याला परत जिवंत करण्याचा प्रयत्न करतात - बऱ्याच गोष्टी करतात. पण एकदा तुम्ही शरीराला आग लावली की, कोणीही कधीच ज्वाळांना मिठी मारायला जात नाही. त्यांची स्व-संरक्षणाची सवय त्यांना सांगते की, हे ते नाही.
हा योग्य-अयोग्यचा प्रश्न नाही तर मर्यादित समज विरुद्ध परम जाणीव यांचा प्रश्न आहे. मर्यादित असणे चुकीचे आहे का? नाही. पण मर्यादित असणे वेदनादायक आहे. वेदना चुकीची आहे का? नाही. जर तुम्हाला ती आवडत असेल, तर मला काहीच अडचण नाही? मी कशाच्याही विरोधात नाही. एकमेव गोष्ट जी मला आवडत नाही ती म्हणजे, तुम्हाला एका दिशेने जायचे आहे, पण तुम्ही विरुद्ध दिशेने जात आहात.
निरर्थकता हीच एकमेव गोष्ट आहे जिच्या मी विरोधात आहे, कारण मानवी जीवनाचे सार हे आहे की, तुमच्याकडे इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा जास्त समज आहे - किंवा तसे असायला हवे, पण बरेच लोक हे खोडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. निर्मिती म्हणजे बुद्धिमत्ता. निर्माता म्हणजे परम बुद्धिमत्ता. दुर्दैवाने, सर्व प्रकारच्या गोंधळात असलेले बरेच लोक देवाबद्दल बोलतात, आणि बहुतेक लोक केवळ गोंधळात असताना देवाबद्दल बोलतात. जर तुम्हाला छान, उबदार पाणी अंघोळीला मिळाले, तर तुम्ही सिनेमातले गाणे म्हणाल. जर आम्ही तुम्हाला थंडगार तीर्थकुंडात टाकले - "शिव! शिव!" - जेव्हा कठीण प्रसंग येतो, तेव्हा तुम्हाला शिव आठवतो. जेव्हा जीवन तुम्हाला हवे तसे चालू असते, तेव्हा तुम्ही सर्व प्रकारच्या लोकांबद्दल आणि सर्व प्रकारच्या गोष्टींबद्दल विचार कराल. जर कोणी तुमच्या डोक्याला बंदूक लावली - "शिव! शिव!" अशा प्रसंगी धावा करण्यासाठी तो चुकीचा व्यक्ती आहे. तो स्मशानभूमीत वाट पाहत आहे. जर कोणी तुमच्या डोक्याला बंदूक लावली, आणि तुम्ही तुमचे रक्षण करण्यासाठी शिवाला बोलवले - तो येणार नाही.
जर तुम्ही फक्त जिवंत शरीर नाही तर जिवंत अस्तित्व असाल, तर अमरत्व ही तुमच्यासाठी नैसर्गिक स्थिती आहे.
जीवनाला मागे नेण्याचा प्रयत्न करणे, ही एकमेव गोष्ट आहे, जी जीवनात काम करणार नाही. जर तुम्ही पुढे धावलात, कोणत्याही दिशेने जा, तुम्हाला जे करायचे आहे ते करा - तुम्ही गा, नाचा, ध्यान करा, तुम्ही रडा, हसा - जोपर्यंत ते तुम्हाला उच्च पातळीच्या तीव्रतेकडे घेऊन जात आहे, तोपर्यंत ते सर्व उपयोगी ठरते. जर तुम्ही ते मागे नेण्याचा प्रयत्न केला, तर ते काम करत नाही. बहुतेक माणसांना दुःखी करण्यासाठी तुम्हाला कट्यारीने टोचावे लागत नाही. जर तुम्ही त्यांना एकटे सोडले, तर ते दुःखी होतील. त्यांच्या स्व-संरक्षणाच्या प्रवृत्तीने वाजवी मर्यादा ओलांडली आहे आणि जीवनाला मर्यादित करण्याचा आणि मागे फिरवण्याचा प्रयत्न ते करत आहे. स्मशानभूमीत बसून, हा शिवाचा संदेश आहे: जरी तुम्ही मेलात तरी ते काम करेल, पण जर तुम्ही जीवन मर्यादित केले, तर ते काम करणार नाही. तुम्ही जीवन मर्यादित करता की, जीवनाला घडू देता हा प्रश्न तुम्ही काय करता आणि काय करत नाही यावर अवलंबून नाही, तर या जीवन प्रक्रियेची उत्स्फूर्तता आणि तीव्रता सध्या किती आहे यावर अवलंबून आहे.
हा प्रश्न, तुम्ही जे करता ते उपयुक्त आहे की नाही, याचा नाही. जर तुम्ही निरुपयोगी गोष्टींमध्ये तीव्रता आणू शकलात, तरीही ते काम करेल. पण तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीला अर्थ हवा असतो. जोपर्यंत ते अर्थपूर्ण नाही, जोपर्यंत ते उपयुक्त नाही, तोपर्यंत तुम्ही स्वतःला त्यात झोकून देऊ शकत नाही. त्या संदर्भात, अर्थपूर्णता आणि उपयुक्तता महत्त्वाच्या आहेत. अन्यथा, अर्थपूर्णता आणि उपयुक्तता या मुख्यतः मानसशास्त्रीय गोष्टी आहेत. त्या प्रेरणा आहेत, अंतिम लक्ष्य नाहीत.