क्लासिकल योग त्याच्या शुद्ध स्वरूपात पुन्हा लोकांना उपलब्ध करून देणे हे ईशाचे एक मुख्य उद्दिष्ट राहिले आहे. स्टुडिओ योग, पुस्तकी योग किंवा आजकाल जगात योगाची मूलभूत तत्वे लक्षात न घेता ढोबळपणे शिकवल्या जाणाऱ्या योगाच्या विविध नवकल्पना नव्हे, तर योग पुन्हा त्याच्या सर्वात शुद्ध स्वरुपात परत आणायचा आहे. एक अतिशय शास्त्रशुद्ध योग, जे एक प्रचंड शक्तीशाली विज्ञान आहे. ही एक अशी प्रणाली आहे जी अतिशय काटेकोरपणे आणि अचूकतेने जीवनाच्या आणि अस्तित्वाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचण्याचे एक साधन म्हणून निर्माण केले गेले आहे.

सद्गुरू: अंगमर्दन ही योगाची एक अनोखी प्रणाली आहे जी आज जवळजवळ संपूर्णपणे विस्मृतीत गेलेली आहे. पारंपरिकरित्या शास्त्रीय योगामध्ये, अंगमर्दन ही क्रिया नेहेमी वापरली जात असे. ही क्रिया योगासनांसारखी नाही, हा एक अतिशय तीव्र व्यायाम आहे ज्यासाठी तुम्हाला कोणत्याही साधनांची आवश्यकता भासत नाही. तुम्ही फक्त तुमच्या शरीराचा वापर करून अतिशय वेगळ्या स्तरावरील शारीरिक सामर्थ्य आणि चिकाटी निर्माण करता.

अंगमर्दनामधे, तुम्ही तुमच्या स्वतःच्या शरीराच्या वजनाचा आणि हालचालींचा वापर करून काही काळात स्नायूंची लवचिकता वाढवता. ही फक्त पंचवीस मिनिटांची एक प्रक्रिया आहे जी आज आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत, आणि आरोग्याच्या दृष्टीने ती चमत्कार घडवू शकते. ही एक अभूतपूर्व आणि परीपूर्ण प्रक्रिया आहे. तुम्हाला त्यासाठी केवळ सहा बाय सहा फुटांची जागा लागेल इतकेच; तुमचे शरीरच सर्वकाही आहे. त्यामुळे तुम्ही जिथे आहात तिथे ही साधना करू शकता. ही साधना शरीर मजबूत करण्यासाठी वजन उचलण्याच्या प्रशिक्षणा येवढीच प्रभावी आणि परिणामकारक आहे, आणि त्यामुळे तुमच्या शरीरावर कोणताही अनावश्यक ताण सुद्धा येत नाही.

तुम्ही जरी याकडे एक व्यायामाचा प्रकार म्हणून बघत असाल, तरी अंगमर्दन ती परीक्षा उत्तीर्ण होईल. पण स्नायू बळकट करणे आणि शरीरातील चरबीची पातळी खाली आणणे हे याचे केवळ अतिरिक्त फायदे आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारची साधना करत असाल, मग ती अंगमर्दन साधना असो किंवा इतर कोणती साधना असो, त्यामध्ये आम्ही ऊर्जा प्रणालीचे कार्य एका विशिष्ट स्तरापर्यंत आणि ऊर्जेच्या अखंडतेसाठी प्रयत्नशील आहोत. तुम्हाला एका अशा स्थितीत घेऊन जायचे आहे, जेथे तुमची शरीर प्रणाली संपूर्णपणे कार्यरत असेल, कारण ती जर संपूर्णपणे कार्यरत असेल, तरच ती धारणेच्या उच्च स्तरावर घेऊन गेली जाऊ शकते. अर्धे शरीर किंवा अर्धा मनुष्य यांना धारणेच्या पूर्ण पातळीवर घेऊन जाता येत नाही.

अनेक लोकांना मोठे अनुभव हवे असतात पण ते अनुभव घेण्यास सक्षम होण्यासाठी त्यांच्या शरीरात परिवर्तन घडवून आणण्याची त्यांची तयारी नसते. योगामधे, तुम्ही अनुभवांच्या पाठीमागे धावत नाही, तुम्ही फक्त शरीर तयार करता.

“अंगमर्दन” या शब्दाचा अर्थ तुमच्या हातापायांवर किंवा शरीराच्या अवयवांवर प्रभुत्व मिळवणे. या जगात तुम्हाला जी काही कृती करायची असेल, त्यासाठी तुमचे तुमच्या अवयवांवर किती प्रभुत्व आहे यावर तुम्ही ती गोष्ट किती चांगल्या प्रकारे करू शकता हे ठरते. मी कृती हा शब्द एखाद्या खेळाच्या संघात सहभागी होणे अशा अर्थाने वापरत नाहीये. तुम्ही तुमच्या जगण्यासाठी करत असलेली कृती आणि तुमच्या परम मुक्तीसाठी करत असलेली कृती यामधील फरक दर्शवितो आहे. तुम्हाला तुमच्या मुक्तीसाठी आणि विशेषतः तुमच्या सभोवताली असणार्‍या प्रत्येकाच्या मुक्तीसाठी काही करण्याची इच्छा असेल, तर तुमचे तुमच्या हातापायांवर प्रभुत्व हवे. हातापायांवर प्रभुत्व याचा अर्थ असा नाही की तुम्ही अतिशय पिळदार शरीर बनवावे किंवा तुम्ही एखादा पर्वत चढून जावा. तसे सुद्धा कदाचित घडेल पण मुख्यतः याद्वारे तुमच्या शरीरामधील ऊर्जा संरचना बळकट केली जाते.

साधर्म्य दर्शविण्यासाठी एक उदाहरण देतो, जर एखादा मनुष्य शेजारून चालत गेला, तर नुसते त्याच्या चालण्यावरुन त्याचे शरीर व्यायामाचा सराव करते आहे की नाही हे तुम्हाला कळेल. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीच्या चेहेर्‍याकडे पाहिले, तर त्याच्या मनाचे स्थैर्य आपल्याला जाणवते; तुम्ही जर आणखी बारकाईने पाहिले, तर एखाद्या व्यक्तीची ऊर्जा योग्य प्रकारे वापरली जात आहे की नाही हे सुद्धा स्पष्टपणे दिसून येते. ते काय करू शकतात आणि काय करू शकत नाही ये यावरून ठरते. संपूर्ण प्रभुत्व असणे म्हणजे तुम्ही तुमची ऊर्जा उत्सर्जित करू शकता. तुम्ही इथे नुसते बसलात, तरी तुमचे शरीर कार्ये करील, तुम्हाला कुठेही जाऊन काहीही करण्याची गरज भासणार नाही.

जर कृपेने स्वतःला तुमच्यामध्ये संक्रमित करायचे असेल, तर तुमच्याकडे सुयोग्य शरीर असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे जर योग्य असे शरीर नाही आणि कृपा तुमच्यात फार मोठ्या प्रमाणात अवतरली, तर तुम्ही संपून जाल. अनेक लोकांना मोठे अनुभव हवे असतात पण ते अनुभव घेण्यास सक्षम होण्यासाठी त्यांच्या शरीरात परिवर्तन घडवून आणण्याची त्यांची तयारी नसते. योगामधे, तुम्ही अनुभवांच्या पाठीमागे धावत नाही, तुम्ही फक्त शरीराला तयार करता. तुमची आध्यात्मिक प्रक्रिया निव्वळ बोलण्यापेक्षा काहीतरी अधिक असेल, तर त्याचा अर्थ तुमचे तुमच्या हातापायांवर थोडेफार प्रभुत्व असलेच पाहिजे.