भक्ती आणि व्यसन – काय निवडावं?

सदगुरु एका साधकाच्या प्रश्नाला उत्तर देताना भक्ती आणि व्यसनामधील फरक समजावून सांगतात: "व्यसन तर पदार्थांचं असतं, तर भक्ती अशाच गोष्टीविषयी निर्माण होऊ शकते जी तुम्ही स्वत:च्या पलीकडची, स्वत:पेक्षा विशाल समजता."
प्रश्न: सदगुरु, भक्ती आणि व्यसनामध्ये काय फरक आहे? भक्तीतसुद्धा माणूस आपल्या पूज्य विषय वस्तूच्या अधीन होतो. मग या दोन्हींत फरक काय?
सदगुरु: व्यसन पदार्थांचं असतं तर भक्ती अशाच गोष्टीविषयी निर्माण होऊ शकते ज्या गोष्टीला तुम्ही स्वत:च्या पलीकडची, स्वत: पेक्षा विशाल समजता. भक्तीचा सराव करता येत नाही. ती जाणूनबुजून कोणामधे रुजवता येत नाही. एखाद्या गोष्टीमुळे किंवा व्यक्तीमुळे तुम्ही भारावून जाता, गलबलून जाता, तेव्हा भक्ती निर्माण होणं साहजिक आहे. जेव्हा एखादी गोष्ट किंवा व्यक्ती तुम्हाला तुमच्यापेक्षा खूप विशाल, तुमच्या आवाक्यापलीकडची वाटते, तेव्हा भक्ती निर्माण होणं स्वाभाविक आहे. व्यसन कशाला म्हणतात? तुम्ही एखाद्या पदार्थाची चव चाखता आणि त्यातून मिळालेला अनुभव तुम्हाला आवडतो. मग तो तुम्हाला परत परत घ्यावासा वाटतो आणि असं करत तुम्ही त्यात अडकता.
तर भक्ती आणि व्यसनाचा प्रश्न एकत्र विचारला जातोय कारण दोन्ही गोष्टी एक सुखद, आनंददायी अनुभव निर्माण करतात. लोक व्यसनाधीन होतात कारण तो अनुभव जबरदस्त असतो. लोक तंबाखू, कॉफी, मद्य, तऱ्हेतऱ्हेचे ड्रग्स वगैरेच्या आहारी जातात कारण त्यातून काहीतरी सुखद अनुभव त्यांना येतो. जर त्या गोष्टींनी त्यांना वेदना झाली असती किंवा दु:खद अनुभव आला असता तर व्यसन लागण्याचा प्रश्नच नव्हता.
भक्ती आणि व्यसनाचा संबंध फक्त अनुभवाच्या पातळीवर आहे, बाकी कुठेही नाही. दोघांची एकत्र तुलनाही होवू शकत नाही. पण अनुभवाच्या पातळीवर मात्र दोघांत साम्य आहे. दोन्हीमुळे अतिशय सुखद अनुभव येतो. भक्ती म्हणजे तुमच्या भावना अतिशय गोड झाल्या आहेत. इतर लोकांना भक्त वेडपट वाटू शकतो. एखाद्या बुद्धिवादी माणसाला भक्त बावळटच वाटेल. पण तुम्ही सांगा, एखादा माणूस सबंध चोवीस तास निखळ आनंदात डुंबतोय हे शहाणपण आहे, का वास्तवाशी काहीही संबंध नसलेल्या मनातल्या कल्लोळाशी झुंजत बसणे हे शहाणपण आहे? जीवनात ही निवड करायचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे.
भक्त अतिशय बुद्धिमान असतो. जीवनाची प्रगल्भ जाण त्याला आलेली असते. त्याला कळून चुकलेलं असतं की शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की जर आपण आपल्या जीवनाचा अनुभव पूर्णत: आनंदमय केला तर कोणतीच गोष्ट आपल्याला बांधू शकत नाही. सगळ्यापासून तुम्ही मुक्त व्हाल. बुद्धिवादी माणसाला तो बावळटपणा वाटेल पण त्यात अतिशय गहन बौद्धिक तत्व सामील आहे.
भक्तीसुद्धा आनंद आणि ऊन्मादाच्या अवस्थेत घेऊन जाते. हल्ली औषधांच्या गोळ्यांनाही "एक्सटसी" (आनंद आणि उन्माद) असं नाव देतात. जर असा एखादा पदार्थ असता की जो एकदा खाल्ला केला की आयुष्यभर माणूस परमानंदात मग्न राहील तर काय हरकत आहे? घेऊयात की! पण अडचण ही आहे की असे पदार्थ तुम्हाला काही वेळ सातव्या आसमंतात ठेवतात आणि मग धाडकन खाली आपटतात. आणि या सगळ्या प्रकारात तुमच्या जीवनचं मातेरं करून घेता. जर तुमच्या बौद्धिक क्षमता अबाधित ठेवून त्या पदार्थाने तुमचा अनुभव उंचावला असता तर तो पदार्थ घेण्यात मला काहीच चूक दिसत नाही. पण ड्रग्स असं करत नाहीत.
ड्रग्सच्या व्यसनांनी शरीर आणि मन या दोन्हींची कार्यक्षमता कमी होते. शारीरिक क्षमताही कमी होते आणि मानसिक क्षमताही कमी होते. माणूस म्हणून तुमचं कल्याण नव्हे तर अधोगतीच होते. याउलट भक्ती तुम्हाला प्रचंड बळ देते. तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल अशा गोष्टी करण्यास तुम्ही समर्थ होता, कारण तुमच्यावर कसलंही बंधन उरत नाही.
व्यसन माणसाला संकुचित करतं, भक्ती माणसाला फुलवते. दोन्ही सुखद अनुभव देऊ शकतात. व्यसनामुळे तुम्हाला सुखाचे काही क्षण अनुभवायला मिळतील. भक्ती रात्रंदिवस आनंदाचा वर्षाव करते पण त्याहीपेक्षा भक्ती तुम्हाला फुलवते, अनुभवाच्या कक्षा विस्तारते आणि सर्वसमावेशक बनवते. व्यसन तुम्हाला इतरांपासून तोडत जातं, एकाकी बनवतं, इतकं की बहुतेक लोक मनोविकारी होतात किंवा नैराश्येने खचून जातात. एकाने तुम्ही बहरून येता तर दुसरं तुमच्या जीवनाचं मातेरं करतं. हा जमीन-आसमानाचा फरक आहे.