प्रश्नआमच्यात काही समजुती आहेत जसं की आपण दरवर्षी सत्यनारायणाची पूजा घातली पाहिजे किंवा नवीन घरात रहायला जाण्याआधी वास्तू पूजा किंवा वास्तुशांती केली पाहिजे. किमान मराठी लोकांत अशी परंपरा आहे. गृहशांती वगैरे. यावर काही बोलू शकाल का?

सदगुरु: अच्छा. आता… तुम्ही कितीही सत्यनारायण पूजा करा, तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही जे असत्य गोळा करताय त्यापासून कुठलीच सत्यनारायण पूजा तुम्हाला वाचवू शकत नाही. खरी सत्यनारायण पूजा म्हणजे तुम्ही किमान स्वतःशी सच्चे आहात, प्रामाणिक आहात. इतरांसोबत तुम्हाला प्रामाणिक राहता येत नसेल, त्यासाठी मी तुम्हाला माफ करतो. पण किमान स्वतःशी तुम्ही १००% प्रामाणिक असलं पाहिजे, हो की नाही? ही एक अद्भुत सत्यनारायण पूजा होईल जिचं फळ ताबडतोब मिळेल. तसंही तुमची सत्यनारायण पूजा तुम्ही करत नाही. दुसरं कुणीतरी करतं. कदाचित त्याला फळ मिळेल, पण तुमचं काय ते कुणाला ठाऊक? तुमच्या घरात धूर होतो आणि दुसऱ्या दिवशी सर्दी होते, सायनस चुरचुरतात. सत्यनारायण पूजा असली की घरात धूर होतो ना? … नाही होत धूर? अच्छा, तुम्ही होम करत नाही? दक्षिणेत भरपूर धूर होतो.. हल्ली ते या पूजेचं स्वरूप लहान लहान करत चाललेत, पण पूर्वीच्या काळी ही पूजा म्हणजे प्रचंड धूर व्हायचा! सत्यनारायण हुशार असेल तर तिथं आसपास फिरकणारही नाही!

तुम्ही सत्यनिष्ठ असणं..हेच खरं सत्यनारायण व्रत होईल जेव्हा तुम्ही त्याच्यासारखे व्हाल, किमान स्वतः बरोबर. जगाशी नाही तर नाही, किमान स्वतःशी. जगासोबत सुद्धा तुम्ही हे व्रत घेऊ शकता, फारच सुंदर होईल, पण ते शक्य नसेल तर किमान स्वतःशी सरळ मनानं राहिलात, आयुष्य सुंदर बनेल.

आता वास्तू, म्हणजे तुम्ही नवीन घरात प्रवेश करताना जी पूजा करताता त्याविषयी बोलताय का विशिष्ट गोष्टी पाळून एखादी इमारत बांधण्याविषयी बोलताय? वास्तुशांती एक गोष्ट आहे..हे पहा, जेव्हा नवीन इमारत बांधली जाते, नेहमीच नाही, पण कधी कधी नवीन बांधकाम होतं तेव्हा काही नकारात्मक ऊर्जा कोंडली जाते, तर हेतू हा होता की एक सकारात्मक वातावरण निर्माण व्हावं, मंत्रोच्चार करून , होमाचा पण परिणाम होतो, अग्निहोत्री जे करतात, वातावरण प्रसन्न करण्यासाठी. होय. याहीपेक्षा तुम्ही नवीन जागेत जाता तेव्हा , तुम्ही काही या सगळ्याच्या पलीकडे गेलेले नाहीआत, तुम्ही एवढे जागरूक नाहीआत की जागा पाहिल्याबरोबर तुम्हाला सगळं कळेल, तेव्हा नवीन घरात जाताना तुम्हाला एक मानसिक आधार पण लागतो , तुमची मूळ भावना भीती आहे, याकडे लक्ष द्या, तेव्हा बारीकसारीक गोष्टींनी तुम्ही पुरते डिस्टर्ब होता. तुम्ही नवीन घरात येता, अचानक, रंगाच्या वासाने म्हणा की कशाने तरी तुम्हाला झोप लागत नाही, मग तुम्हाला वाटू लागतं, ‘ हे काय! जुन्या घरात तर छान झोप लागायची. भूतबित असेल का इथे!’ झालं ! बरेच लोक एका विचारातूनही बाहेर येऊ शकत नाहीत, तोच तोच विचार घोळत राहतो अन् वाट लावून घेतात स्वतःची.

तर या गोष्टींचा उपयोग होतो, आणि याला वैज्ञानिक आधारही आहे, काही ध्वनींचा उच्चार, काही सुगंध यांनी एक वातावरण तयार होतं. आणि दाराशी तुम्ही जो कोहळा बांधता, कारण त्यात प्रचंड प्राण ऊर्जा असते म्हणजे हळूहळू सकारात्मक ऊर्जा पसरते. पण तुम्ही तो खाल्ला तर ते जास्त चांगलं, माहितीये? स्थापत्याचं हे सारं विज्ञान आपल्याकडे मंदिरांच्या रूपात प्रगतीच्या शिखरावर पोचलेलं.

हे लक्षात घेतलं पाहिजे. भारतात मंदिरं कधीही प्रार्थनास्थळं म्हणून बांधली गेली नाहीत. तुम्ही मंदिरात जाता, तेव्हा परंपरेने तुम्हाला कधीच प्रार्थना म्हणायला सांगितलं नाही. किंवा तुमचं आयुष्य मार्गी लावायच्या विनंत्या देवाला पाठवायला सांगितलं नाही. परंपरेने लोक हेच सांगत गेले की मंदिरात गेला तर तुम्ही तिथं थोडा वेळ बसलं पाहिजे. हो ना? कारण मंदिरं ऊर्जाकेंद्रं म्हणून निर्माण केलेली, प्रार्थनास्थळं म्हणून नाही. भारतात कुठल्याही मंदिरात प्रार्थना सांगणारं असं कुणीही नसतं. हो की नाही? पहा , दुसरं एखादं ठिकाण असेल तर तिथे नेहमी प्रार्थना सांगणारं कुणीतरी असतं. भारतातल्या मंदिरात असं काहीही घडत नाही कारण ते ऊर्जाकेंद्र आहे, प्रार्थनास्थळ नाही. सकाळी नित्यनेमाच्या कामाला जाण्याआधी तुम्ही आंघोळ करून आधी मंदिरात जाता, थोडा वेळ तिथं बसता. हे एखाद्या सार्वजनिक बॅटरी चार्जिंग केंद्रासारखं आहे. परंपरा असंही सांगते की तुम्ही अध्यात्ममार्गावर असाल तर तुम्हाला रोज मंदिरात जायची आवश्यकता नसते. माहितीये का तुम्हाला? का बरं? कारण तुमच्याकडे सेल्फ चार्जिंग यंत्रणा आहे. आता तुम्ही प्राणायाम, ध्यान जे काही करताय ती सेल्फ चार्जिंग यंत्रणा आहे. तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी जायची गरज नाही. सेल्फ चार्जर नसेल तर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जाऊन चार्ज करता स्वतःला.

मंदिराचा आकार, परिक्रमा, गाभार्याचा आकार आणि माप,‌ मूर्तीचा आकार अन् माप, मूर्तीच्या मुद्रा, प्राणप्रतिष्ठेसाठी वापरलेले मंत्र, या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित जुळल्या, तर तिथे ऊर्जेचं शक्तिशाली क्षेत्र तयार होईल. तुम्ही फक्त तिथे जाता, बसता अन् ती ऊर्जा ग्रहण करता. ही काही तुमची बडबड करायची जागा नाही किंवा इतर कुणी तुमच्यासाठी ती करायची जागा नाही. तुम्ही तिथं शांत बसावं आणि ऊर्जा ग्रहण करावी.

बहुतेक मंदिरांचा आपण नाश केलाय, कारण त्यांची व्यवस्था कशी राखावी हे आपल्याला माहीत नाही. त्यासाठी आवश्यक ते समर्पण, त्यामागचं विज्ञान आपण हरवून बसलोय, शेकडो मंदिरं नष्ट झालीयेत. फक्त दगड तेवढा उरलाय. हे दगडात देवत्व आणण्याचं विज्ञान होतं, पण तुम्ही अजाण असाल तर तुम्ही पुन्हा देवाला दगड बनवाल. दगडात देवत्व आणण्याचं एक स्वतंत्र विज्ञान आहे. त्यात अशा प्रकारे ऊर्जेची स्थापना केली जाते की ती तुमच्यापेक्षा मोठी शक्यता होईल. पण तुम्ही ते उद्ध्वस्त करू शकता.

तुम्हाला ध्यानलिंगाचं माहितीपत्रक मिळालंय ना? फोटो पहायचे असतील तुम्हाला तर बाहेर पुस्तकं ठेवलीयेत आम्ही. तुम्ही तिथे जाऊन बसून पहा. या ध्यानलिंगाची स्थापना मंत्रांनी नव्हे तर प्राणप्रतिष्ठेने केली आहे. यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागलेत. एका दृष्टीने मी सध्या जे काही करतोय ते माझं खरं कार्य नाही. मुख्यतः मी ध्यानलिंगाची प्रतिष्ठापना करण्यासाठी आलो होतो. काही इतर कारणांमुळे मी या सगळ्यात हात घातला, आता असाच वेळ घालवतोय. नाहीतर ध्यानलिंगाची स्थापना झाली की लगेच मी देह सोडणार होतो. काही कारणाने मी थांबून राहिलो अन् गोष्टी घडतायत.

तुम्ही फक्त या मंदिरात या, तुम्हाला कोणा शंकरावर विश्वास ठेवायची गरज नाही. फक्त या अन् बसा. हे निधर्मी मंदिर आहे, सगळ्या धर्माची लोकं इथे येतात. फक्त बसलात की पाठीच्या कण्याच्या मुळापासून तुम्ही हादरून जाल इतकी या ऊर्जेची स्पंदनं शक्तिशाली आहेत. कारण त्याची प्राणप्रतिष्ठा अशा प्रकारे केली आहे की तुम्ही ती नष्ट करू शकत नाही. दगडी लिंगावर ही ऊर्जा अवलंबून नाही. दगडी लिंगाचा उपयोग फक्त एक सांगाडा म्हणून केलेला ऊर्जालिंग निर्माण करण्यासाठी. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दगडी लिंग जरी हटवलं तरी त्या ऊर्जेचं स्वरूप बदलणार नाही. सातही चक्र व्यवस्थित ताळेबंद केली आहेत. ते आता शाश्वत आहे. हा ग्रह नष्ट झाला तरी तुम्ही त्याला नष्ट करू शकणार नाही. योग परंपरेत हे घडवून आणण्याचं स्वतंत्र विज्ञान आहे. प्राणपर्तिष्ठेच्या वेळी जे कोणी तिथे हजर होते, तुमचा विश्वास बसणार नाही अशा गोष्टी तिथे घडल्या.

सध्या तुमच्या ऊर्जा शरीराशी इतक्या बांधलेल्यायेत की तुम्ही फारच कमी गोष्टी करू शकता. शरीराशी संपर्क कमीत कमी झाला की तुम्ही बरंच बरंच काही करू शकता. हे म्हणजे समजा तुम्ही मातीची दहा भांडी बनवली. अजून माती ओली आहे, तोवर तुम्ही ती पुन्हा मळून बारा भांडी बनवू शकता, हवं तर वीस बनवू शकता कारण माती ओलीये. तर समाधी म्हणजे तुम्ही पुन्हा अशा अवस्थेत जाता जिथं माती ओली आहे म्हणजे तुम्ही हव्या तशा गोष्टी घडवू शकता. साधारणपणे कुणी समाधी अवस्थेत असेल तर आपण त्यांचे बाह्य व्यत्ययांपासून रक्षण करतो. कारण अगदी लहानसा व्यत्यय जरी आला तरी ते शरीर सोडू शकतात. एखादा समाधी अवस्थेत असेल तर तुम्ही नुसतं असं (टाळी वाजवतात) केलं तरी तो शरीर सोडू शकतो. कारण ती इतकी तरल अवस्था असते. तर लोकांना त्या अवस्थेत राहूनही शारीरिक दृष्ट्या सक्रिय राहणं शिकायला प्रचंड प्रशिक्षण लागतं. ही परिस्थिती हळूहळू तयार करायला मला २० वर्षं लागली. असं करू शकणारी माणसं शोधून, त्यांना एकत्र आणून हे घडवून आणायला. तुम्ही हे अनुभवलंच पाहिजे, आयुष्यात एकदा तरी. तुम्हाला कशावरही विश्वास ठेवायची गरज नाही. फक्त या, बसा. तुम्ही पहाल, तुम्ही त्यात सामावून जाल.