सदगुरु: एके दिवशी एक डुक्कर एका गाईकडे गेलं आणि म्हणालं, ‘मला ठाऊक आहे की तू लोकांना दूध देतेस पण मी माझं मांस देतो. मग लोक तुला एवढं प्रेमाने का वागवतात आणि मला तुच्छतेची वागणूक का मिळते?’ गायीने प्रेमाने डुकराकडे पाहिलं अन् म्हणाली, 'मी जिवंत असताना दूध देते’. तर तुमच्याकडे हाच पर्याय आहे. तुम्हाला दूध देणारी गाय व्हायचंय का डुकराचं मांस? जिवंतपणी तुम्हाला काही द्यायचंय का लोक तुमच्या मरण्याची वाट बघतायत म्हणजे तुमच्याकडे जे आहे ते ते घेऊ शकतील?
 

‘मी काय द्यायला हवं?’ मला याविषयी बोलायचं नाहीये. किंवा मला कुणाला सांगायचंही नाहीये की त्यांनी काय द्यावं, पण तुमच्यासाठी सगळ्यात मौल्यवान जे असेल ते तुम्ही द्यायलाच हवं. तुमच्या लेखी ज्या गोष्टीला फारशी किंमत नाही, अशी गोष्ट तुम्ही दिली तर त्याला देणं नाही म्हणत. जी गोष्ट तुमच्यासाठी खूप मौल्यवान आहे, प्राणप्रिय आहे, तीच तुम्ही अर्पण केली पाहिजे. तुमच्या लेखी ज्या गोष्टीला फारसं महत्त्व नाही ती तुम्ही देता, याला काही अर्थ नाही. हे देणं नाही. ही तर लबाडी आहे, स्वर्गाचं तिकीट हवंय तुम्हाला. अशी मनोधारणा ठेवून तुम्ही स्वर्गात जरी गेलात, आपल्याला माहीत नाही तिथे काय आहे ते, पण एक नक्की की ती जर चांगली जागा असेल तर तिथे तुमची खिल्ली उडविली जाईल. मी नेहमीच बघत आलोय, तुमचं मन जर क्षुद्र असेल आणि तुम्ही तुमच्यापेक्षा वेगळ्या लोकांमध्ये आलात तर असं वाटतं की सगळेजण तुमची खिल्ली उडवतायत, तुमच्याचविषयी गप्पा चालू आहेत, प्रत्येकजण तुमच्याचबद्दल काहीतरी बोलतोय. तर लोकांना या अडचणीचा सामना करावा लागेल.
 

जर...जर.. स्वर्ग खरोखरच चांगली जागा असेल...मला तिथे जाण्यात अजिबात रस नाही, त्यामुळे तिथे काय आहे हे शोधण्याच्या फंद्यात मी कधी पडलो नाही. जर तुम्ही तुमच्या चांगुलपणाच्या जोरावर स्वर्गाचं तिकीट खरेदी करू पाहत असाल अन् ती जागा खरंच चांगली निघाली तर अशा लबाड मनाला अतोनात दुःख होईल. पण तुमच्या सारखेच अजून काही जण तिथे पोहोचले तर तुम्हाला आणखी जास्त त्रास होईल कारण तुम्ही कल्पना करू शकता तुमच्या सारखे आणखी दहा जण आले तर काय होईल ते. प्रत्येक बारीकसारीक गोष्टीसाठी त्यांच्या डोक्यात हिशेब तयार असतो. तुम्ही जर अशा माणसांच्या सहवासात राहत असाल, तुम्ही त्यांच्यापैकीच एक असाल तर तुम्हाला नक्कीच ठाऊक असेल तुमच्यासारखे अजून दहाजण आले तर काय होतं ते.
 

तर आपल्याला जी गोष्ट मोलाची वाटते ती देणं - माणसासाठी सगळ्यात जास्त मोलाचं काय आहे? त्याचं स्वतःचं आयुष्य. तो स्वतः त्याच्यासाठी सगळ्यात मौल्यवान आहे. तर एखादी व्यक्ती स्वतःलाच समर्पित करायचं ठरवते, तिच्या खिशात काय आहे ते नाही, तिच्या शरीरात काय आहे ते नाही, तिच्या मनात काय आहे ते नाही, तर स्वतःलाच. तुमच्यासाठी जे काही मोलाचं आहे ते लोकांसोबत कसं वाटायचं हे तुम्हाला कळलं तर... आपल्याला लोकांचं माहीत नाही; तुम्ही लोकांनी तुमच्याकडे लक्ष द्यावं म्हणून झुरता, त्यांचं प्रेम अन् जिव्हाळा मिळवण्यासाठी झुरता कारण भवतालच्या या झाडांना आपल्या प्रेमात कसं पाडायचं ते तुम्हाला ठाऊक नाही, ज्या गवतावरनं तुम्ही चालता त्याला आपल्याला अलगदपणे कुरवाळायला अन् आशीर्वाद द्यायला भाग कसं पाडायचं ते तुम्हाला ठाऊक नाही, जी हवा तुम्ही श्वासावाटे आत घेता तिला तुमच्यात शिरून तुमच्याशी एकरूप व्हावंसं वाटलं पाहिजे; तुमच्या अन्नाला तुमच्याशी एकरूप व्हायची ओढ लागली पाहिजे. या गोष्टी तशाही घडतंच आहेत, प्रश्न इतकाच आहे की त्या ग्रहण करायला तुम्ही हजर आहात की नाही. तसंही हे सगळं घडतय - तुम्ही अन्न खाता ते तुमच्यात सामावून जातं, श्वासावाटे घेतलेली हवा तुम्हाला जिवंत ठेवते, हे झाड श्वासावाटे जी हवा बाहेर टाकतं ती तुम्ही श्वासावाटे आत घेता, ही काही नवीन घटना नाही. जीवन प्रक्रिया म्हणून ती सतत घडतेय. पण तिचा अनुभव घ्यायला तुम्ही इच्छुक आणि जागरूक आहात का? तसं झालं की मग प्रत्येक श्वास तुमच्यासाठी परमानंदाची अनुभूती ठरतो. मग तुम्हाला कुणी लक्ष द्यावं म्हणून किंवा कुणाच्या जिव्हाळ्यासाठी झुरत बसावं लागत नाही, का स्वर्गाच्या तिकिटाच्या रांगेत उभं रहावं लागत नाही.
 

तुम्ही सेप्टिक टँकमध्ये पडला तरी… मेल्यावरच जे काहीतरी देतं अशा डुकरासारखे बनू नका. तुमच्या बाबतीत सारं काही आलबेल असताना, तुम्ही जिवंत असताना, देताय ती गोष्ट तुमच्यासाठी मोलाची असताना देण्याला काही महत्त्व आहे. मग मी द्यावं का? तर 'मला द्यायचंय, मला द्यायचंय, दान केल्याने पुण्य मिळतं!’ नाही, नाही, नाही... लक्षात घ्या, तुम्ही काहीही देऊ शकत नाही. दान करण्याजोगं तुमच्याकडे आहे तरी काय? तुम्ही इथे बसला आहात, जीवन तुम्हाला खैरातीत मिळालं आहे, फुकट! तुम्हाला फक्त ते ग्रहण करायला शिकायचंय. आहे तरी काय द्यायला?

जो रिकाम्या हातांनी या जगात आला, तो काय डोंबल देणार? तुम्ही तिकडनं काहीतरी उचलून इथे ठेवू शकता, इकडनं काहीतरी उचलून तिकडे ठेवू शकता. इतकंच करू शकता तुम्ही. जिथे गरज आहे, तिथे ती गोष्ट देऊ शकता , एवढंच करू शकता तुम्ही. गुंतवणूक घेऊन जन्माला आलाय का तुम्ही? भांडवलदार वगैरे आहात का तुम्ही? या ग्रहावर जन्म घेतला तेव्हा स्वतःची गुंतवणूक घेऊन आला होता का? रिकाम्या हातांनी आलात.

स्वतःला कोण समजता तुम्ही? काय देऊ शकता? आहे काय द्यायला तुमच्याकडे? एका ठिकाणाहून एखादी गोष्ट उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवू शकता. योग्य ठिकाणी ती ठेवणे आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदाची अन् परिपूर्णतेची भेट स्वीकारणे एवढंच करू शकतो आपण. जीवन म्हणून जे काही आहे, सौंदर्य म्हणून जे काही आहे, परमानंद म्हणून जे काही आहे, त्याचा तुम्ही फक्त स्वीकार करू शकता, देऊ शकत नाही. ते सहज सुंदरपणे स्वीकारायला तुम्ही शिकला तर तेच सर्वश्रेष्ठ दान.
 

लोक दानाचा अवास्तव बडेजाव करतात, आणि ते देतायत असं त्यांना वाटतं. खरोखर जी गोष्ट तुम्ही लोकांसोबत वाटू शकता , ज्याला दान म्हणू शकता ती गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही या ग्रहावरनं उचलल्या. इथेच उचलणार आणि इथेच सोडून जाणार, याला दान म्हणतात का? हे काही दान नाही. याला शहाणपण म्हणू शकतो. खरंखुरं दान तुम्ही तेव्हाच करता जेव्हा तुम्ही तुमच्यातलं जीवन समर्पित करता. हीच अनमोल संधी आहे, हे अहोभाग्य आहे की तुम्ही जे आहात ते इतरांसोबत वाटू शकता कारण तेच खरं दान आहे. ती एकच गोष्ट आहे ज्याला ढोबळमानाने आपण “दान” म्हणू शकतो. बाकी सगळं नुसती मालवाहतूक आहे. हो की नाही? इकडून तिकडे, तिकडून इकडे. कारण आपण सोबत काहीच घेऊन आलेलो नाही. सगळ्या गोष्टी नेहमी इथेच आहेत, जागा बदलत फक्त राहते त्यांची. तुम्ही जी गोष्ट आपली मानता ती त्यांच्या घरात दिली की त्यांचं घरही तुमचं बनतं की नाही? हो की नाही? तुम्ही अख्ख्या जगाला आपलं बनवू शकता, एकतर जगावर आपला अंमल बसवून ते आपलं बनवू शकता. सुदैवाने कुणाला अजून ते जमलेलं नाही. ते अशक्य आहे असं नाही. पण सुदैवाने आजवर कुणालाही ते शक्य झालेलं नाही.

दुसरा मार्ग म्हणजे आपल्यात सामावून घेऊन जगाला तुम्ही आपलं बनवू शकता. इथे बसल्या बसल्या आपलं बनवू शकता. नक्कीच हा अधिक शहाणपणाचा आणि खात्रीने यश मिळवून देणारा मार्ग आहे. जर एकरूपतेच्या अनुभवाने मी जगाला आपलं केलं, तर तुम्हाला ठाऊक आहे मी तुम्हाला श्वास घेऊ देतोय, खाऊ देतोय, हवं ते करू देतोय. याला 'देणं’ म्हणतात. द्यायचा आनंद लुटा कारण तुम्ही सगळे माझ्या जगात राहू शकता, मला काहीच अडचण नाही. हवं तेवढं खा, कारण तुम्ही ते घेऊन कुठेही पळून जाऊ शकत नाही‌‌. जे काही तुम्ही घ्याल ते काही वेळानंतर परत करावं लागेल. मग मला काय हरकत असेल? माझ्या जगात राहू शकता तुम्ही, बिनधास्त! काहीतरी आपल्या सोबत घेऊन जाऊ शकता का तुम्ही? तुम्ही अगदी सराईत चोर असाल तरीसुद्धा आम्हाला आनंदच वाटेल, कारण तुम्ही ते कुठेतरी घेऊन जाल आणि तेही आमचं होईल.

हा काही शब्दांचा खेळ नाही. हा योग्याचा अनुभव आहे. योगी ‌सबंध अस्तित्व स्वतःमध्ये पाहतो. ऐक्य साधलं आहे. ही एकात्मता साधणं हे योगाचं मूळ ध्येय आहे. इथे बसल्या बसल्या तुम्ही सगळ्या अस्तित्वाशी एकरूप होऊन जाता, अस्तित्व 'तुमचं’ होतं असं नाही, तुम्हीच अस्तित्व बनून जाता. आता तुम्ही देऊ शकता. सगळं काही तुमचं आहे. तुम्ही त्यांना घेऊ देता. काय चांगलं आहे? सतत तुम्ही देत बसणं? का त्यांना हवं ते घेऊ देणं? ज्याला जे हवं ते घेऊ देत. आम्हाला कसलीच भीती नाही. ते वापरतील अन् तसंही परत करतीलच. काही जण काळजीपूर्वक वापरतील, काही जण उद्दामपणे वापरतील पण ते परत तर ठेवणारच आहेत. कोणीही कुठेही घेऊन जाणार नाहीये.