महाशिवरात्रीचे महत्व

सदगुरु: भारतीय संस्कृतीत एकेकाळी वर्षाचे सर्व 365 दिवस सण साजरे केले जात असत. वेगळ्या शब्दात सांगायचे म्हणजे वर्षाचा प्रत्येक दिवस साजरा करायला त्यांना केवळ एक कारण हवं होतं. हे 365 दिवस आयुष्याच्या वेगवेगळ्या हेतू आणि कारणांना समर्पित होते. त्याकाळी लोक विविध ऐतिहासिक घटना, युद्धातील विजय, किंवा जीवनाचे वेगवेगळे प्रसंग; उदा; पेरणी, कापणी, मळणी अशा प्रत्येक प्रसंगानुरूप एक सण ठरवलेला असे. पण महाशिवरात्रीचं महत्व या सर्वाहून वेगळंच आहे.
प्रत्येक महिन्याचा 14 वा दिवस किंवा अमावस्येच्या अगोदरच्या रात्रीला शिवरात्र म्हणतात. वर्षात येणाऱ्या अशा 12 शिवरात्रींपैकी, फेब्रुवारी-मार्च मधे येणारी शिवरात्र, अध्यात्मिक दृष्ट्या अगदी महत्वाची आहे. या रात्रीत पृथ्वीचा उत्तरी गोलार्ध असा स्थित असतो कि नैसर्गिकरीत्या मानव शरीरात उर्जेचा उर्ध्वदिशेने संचार होऊ लागतो. हाच तो दिवस आहे जेंव्हा सृष्टी तुम्हाला अध्यात्मिक शिखराच्या दिशेने ढकलत आहे. तर या निसर्ग निर्मित संधीचा लाभ घेण्यासाठी, भारतीय संस्कृतीत आपण हा रात्रभरचा उत्सव ठरवला आहे. या रात्रभर चालणाऱ्या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ठ्य म्हणजे – नैसर्गिकरित्या ऊर्ध्व दिशेने होणारा शरीरातील उर्जेचा संचार अबाधित राखण्याच्या उद्देश्याने – तुम्ही तुमचा पाठीचा कणा ताठ ठेवला पाहिजे. म्हणजे तुम्ही जागे असले पाहिजे, मुळीच झोपू नये.
अध्यात्मिक मार्गावर असलेल्या व्यक्तींना महाशिवरात्री अत्यंत महत्वाची आहे. तसेच ग्रहस्थ जीवनात असलेले आणि महत्वाकांक्षी लोकांना सुद्धा तितकीच महत्वाची आहे. ग्रहस्थ जीवनात असलेले लोक महाशिवरात्रीला शिवच्या विवाहाचा वार्षिकोत्सव म्हणून साजरा करतात, तर महत्वाकांक्षी लोक हा दिवस शिवनी आपल्या सर्व शत्रुंवर विजय मिळविल्याचा विजय दिन म्हणून साजरा करतात.
पण योगी, तपस्वीनां हा दिवस म्हणजे; शिव कैलास पर्वताशी एकरूप झालेला दिवस. ते एका पर्वताप्रमाणे झाले – अगदी निश्चल आणि स्तब्ध. योग परंपरेत शिव नां देव म्हणून पुजत नाहीत. त्यांना आदि गुरु, म्हणजे सर्वात पहिले,
प्र-प्रथम गुरु ज्यांना ज्ञानोदय झाला ते. हजारो वर्षांच्या ध्यान साधनेने शेवटी ते निश्चलतेत स्तब्ध झाले. तो दिवस म्हणजेच महाशिवरात्री. त्यांच्यातील सर्व हालचाली थांबल्या आणि ते निश्चलरुपी, अगदी स्तब्ध झाले. म्हणून योगी, तपस्वी महाशिवरात्रीला स्तब्धतेची रात्र म्हणून पाहतात.
अशा अनेक आख्यायिका आहेत, पण योग परंपरेत, हा दिवस आणि हि रात्र इतकी महत्वाची आहे याचे मुख्य कारण म्हणजे हा पर्व अध्यात्मिक जिज्ञासूंना पुष्कळ संभावना प्रस्तुत करतो. आजचं आधुनिक विज्ञान विविध पातळींवर संशोधन करीत आज या निष्कर्षाप्रत पोहोचलं आहे; त्यांनी हे सिद्ध केलंय कि जीवन म्हणून जे कांही तुम्ही जाणता, जे काही तुम्ही अस्तित्व आणि त्यातील तत्वांबद्दल जाणता, आणि जे कांही तुम्हाला ब्रम्हांड आणि तारकापुंज म्हणून ज्ञात आहे, हे सर्व केवळ एकच उर्जा लाखो प्रकारे व्यक्त होत आहे.
हे वैज्ञानिक तथ्य प्रत्येक योग्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. “योगी” या शब्दाचा अर्थच मुळात; ज्यांनी संपूर्ण अस्तित्वाशी एकात्मता साधली आहे. जेंव्हा मी “योग” म्हणतो, तेंव्हा मी कोणताही एक विशिष्ठ योग सराव किंवा योग प्रणाली बद्दल बोलत नाहीये. अनंताला जाणण्याच्या सर्व प्रकारच्या उत्कंठा, संपूर्ण अस्तित्वाशी ऐक्य अनुभवण्याची उत्कंठा हे सर्वकाही योगच आहे. तर महाशिवरात्रीची रात्र हे अनुभवण्याची एक सुवर्ण संधी उपलब्ध करते.
शिवरात्र म्हणजे महिन्याची अगदी काळोखी रात्र. प्रत्येक महिन्यात शिवरात्र साजरी करणे; विशेष करून महाशिवरात्र म्हणजे जणू अंधाराचा सण साजरा करण्यासारखे आहे. साहजिकच कोणतेही तार्किक मन याचा विरोध करेल आणि त्याऐवजी प्रकाश पसंत करेल. पण “शिव” चा शब्दशः अर्थ आहे ‘ते जे नाही’. “ते जे आहे,” ते अस्तित्व आणि सृष्टी आहे. “ते जे नाही” ते शिव. ‘ते जे नाही’ याचा अर्थ तुम्ही डोळे उघडून नजर टाकलीत आणि तुमची दृष्टी लहान सहान गोष्टींबद्दल असेल तर भरपूर सृष्टी तुमच्या नजरेस पडेल. पण जर तुमची दृष्टी खरोखर विशाल, विलक्षण गोष्टी पाहण्याविषयी असेल, तर तुम्ही पहाल अस्तित्वातील सर्वात मोठी उपस्थिती म्हणजे अवकाशातील अफाट, असीम पोकळी. काही छोटे मोठे सौरमंडळ, तारकापुंज (Galaxy) सामान्यतः सर्वांच्या दृष्टीस पडतात, पण या सर्वांना व्यवस्थितपणे धरून ठेवणारी पोकळी कोणाच्याही दृष्टीस पडत नाही. तर हे अनंत अवकाश, हि असीमित पोकळी “शिव” म्हणून संबोधतात. आज आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केलयं, सर्वकाही या अवकाशीक पोकळीतून उपजतं आणि त्यातच पुन्हा विरून जातं. तर या संधर्भात, हे अनंत अवकाश किंवा पोकळी जे आपण शिव म्हणतो, ते महादेव म्हणून सुद्धा संबोधतात.
भारतीय संस्कृतीत, पूर्वी सर्व प्रार्थना स्वतःचे संरक्षण किंवा आयुष्यात इच्छित, उत्तम गोष्टी मिळविण्याविषयी नव्हत्या. लोक “हे ईश्वरा, माझा सर्वनाश कर म्हणजे मला तुझ्या सारखं होता येईल”, या प्रकारच्या प्रार्थना करायचे.
तर जेंव्हा आपण शिवरात्र म्हणतो - महिन्यातील अगदी काळोखी रात्र, ही तुमच्या संकुचित परिसीमा तोडण्यासाठी आणि विशाल सृष्टीच्या उगमाची अपारता अनुभवण्याची संधी आहे.
एका हाती शिव विनाशक म्हणून ओळखला जातो तर दुसऱ्या हाती करुणा सागर. तो एक सर्वात महान दाता म्हणून सुद्धा ओळखला जातो. योग परंपरेत शीवच्या करुणेच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. तर महाशिवरात्र शिवची कृपा प्राप्त करण्यासाठी विशेष रात्र आहे.
यावर्षी महाशिवरात्री 13 फेब्रुवारीला आहे. प्रत्येक वर्षी ईशा योग केंद्रात महाशिवरात्री अगदी हर्शोल्लासात साजरी केली जाते. अध्यात्मिक वृद्धी आणि लौकिक इच्छापूर्तीसाठी देश विदेशातील लाखो लोक या रात्री ईशा योग केंद्रात हजर होतात. संपूर्ण रात्रभर चालणाऱ्या या कार्यक्रमात, सदगुरुंचे प्रवचन, मध्यरात्रीचे ध्यान आणि प्रसिद्ध कलाकारांच्या संगीत महफिली व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. ज्यांना ईशा योग केंद्रात हजर होणे शक्य नाही त्यांच्यासाठी हा कार्यक्रम देशातील विविध टीव्ही चानल्स तसेच फेसबुक, युट्यूबवर थेट प्रक्षेपित केला जाईल. आयुष्यात अमर्याद आनंदाची अनुभूती करण्याच्या या सुवर्णसंधीचा सर्वांनी पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपलं जीवन सार्थक करावे. तुम्हा सर्वांना ही रात्र केवळ जागरणाची नव्हे तर जागृतीची रात्र होवो. सर्वांचे सहर्ष स्वागत. ईशा महाशिवरात्री अधिक माहिती: isha.sadhguru.org/MSR