"आज समाजात हि सामान्य बाब बनली आहे; बहुतेक व्यक्ती एक प्रकारच्या विक्षिप्तावस्थेत (Neurosis) वावरतोय.  हे असं होण्याचं कारण तुमच्या आंतरिक उर्जेचा पुरेसा व्यय होत नाही आहे; ती आतच अडकली आहे."

संपूर्ण जग एक विशेष प्रकारच्या विक्षिप्तावस्थेतून (Neurosis) जात आहे जे कांही काळापूर्वी नव्हतं.  याचं कारण आधुनिक मानवाने मोठ्या प्रमाणावर आपल्या शरीराचा उपयोग करण्याचं थांबवलं आहे.  पूर्वी जेंव्हा मनुष्य कठोर शारीरिक कृतीत क्रियाशील असत; फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या आंतरिक उर्जेचा व्यय होत असे.  तुमची मज्जातंतू प्रणाली शक्तीचा (Nervous Energy) सुद्धा व्यय होत असे.  अशा कित्येक व्यक्ती मला माहित आहेत; विशेष करून तरुणव्यक्ती; मानसिक समस्यांनी ग्रस्त; यांनी केवळ नियमित पोहणे किंवा एक प्रकारचा खेळ खेळायला सुरवात केल्यानंतर सर्वकांही सुरळीत झालं.  याचं कारण शरीरात पुरेशी कृतीशीलता आल्यामुळे, उर्जेचा व्यय झाला.

आज मानवाची शारीरिक निष्क्रियता इतकी वाढली आहे जितकी पूर्वी कधीहि नव्हती.  पूर्वी केवळ जगण्यासाठी त्याला शारीरिक पातळीवर पुष्कळ कांही करावं लागे म्हणून शरीराने निष्क्रिय असणे परवडणारे नव्हते.  म्हणून आजचा मनुष्य पूर्वीपेक्षा जास्त विक्षिप्त (Neurotic) झाला आहे.  पूर्वीसुद्धा विक्षिप्त व्यक्ती असायच्या पण आजच्या तुलनेत त्यांची संख्या फारच कमी होती.  आज समाजात हि एक सामान्य बाब बनली आहे; प्रत्येक व्यक्ती कांही ना कांही स्तरावर विक्षिप्तावस्थेत आहे.  हे केवळ तुमच्या उर्जेचा व्यय झालेला नाही म्हणून; ती अडकून पडली आहे.  समजा बाहेर जाऊन संपूर्ण दिवसभर तुम्ही जर लाकडं तोडली असती – आणि समजा अंदाजे शंभर लाकडे तोडलीत – तर फार मोठ्या प्रमाणात तुमच्या उर्जेचा व्यय झाला असता आणि आयुष्य शांत, समाधानी झाले असते.  पण आजकाल तशी स्थिती नाही.  ज्याप्रकारे शरीराचा वापर पूर्वी होत असे तसा तो आज होत नाही.  म्हणून सर्व प्रकारच्या व्याधी तुम्ही शरीरात निर्माण करत आहात जे पूर्वी कधीही घडलं नाही. 

दिवसेंदिवस हा विक्षिप्तपणा तुमच्या शरीरात साठत जातो आणि मग तुमच्या शारीरिक आणि भावनिक उर्जेला बाहेर येण्यासाठी कांही निमित्त लागतं.  यासाठीच तुमच्या सभोताल तुमचे बार, तुमचे क्लब आणि तुमचे डिस्को पसरलेले आहेत.  माणसांनी त्यांचा विक्षिप्तपणा कसाबसा, कुठे ना कुठे व्यय केलाच पाहिजे.  हे डिस्को म्हणजे एक खूळसटपणा वाटतो, तेथे श्वास घेणे सुद्धा अशक्य.  धूर आणि घामाने पूर्ण भरलेला असतो तरी लोक सैरावैरा नाचत असतात.  नाचणे सुद्धा अशक्य कारण सगळे एक दुसऱ्यांवर आदळत असतात.  पण हे कोणाला खटकत नाही, तुमचा विक्षिप्तपणा व्यय झाला पाहिजे, नाहीतर तुम्हाला वेड लागेल.  म्हणून आठवड्याचा साठलेला विक्षिप्तपणा प्रत्येक शनिवारी जाऊन व्यय करावा लागतो. आणि मग पुन्हा संचय व्हायला सुरवात होते आणि मग पुन्हा शनिवार रात्रीची उत्कंठा.

तर हे वेड टाकण्याचा दुसरा एक उपाय आहे.  हे वेड असं पूर्णपणे मागं टाकून पुढे जाऊ शकतो कि मग याचा आपल्याशी कांहीही संबंध राहणार नाही.  आणि हे शक्य आहे ध्यानाने.  मग जरी तुम्ही नृत्य केलात, ते केवळ नृत्याच्या आनंदापोटी;  कांहीतरी व्यय करण्याच्या दृष्टीनं नव्हे. जर कांही व्याधी दूर करण्याच्या दृष्टीने उपचार म्हणून नृत्य करत असाल; तर तो एक उपचार म्हणून ठीक आहे.  पण डिस्को आणि या प्रकारच्या  नृत्यात एक प्रकारची बिभत्सता असते.  ते कामुक असतं. वासनेतून नृत्य होतं; प्रेमातून नाही.

प्रेम आणि वासना यातील भेद तुम्हाला आहे का?  वासनेत उत्कट गरज असते तर प्रेमात गरज असणे शक्य नाही.  जेंव्हा तुम्ही प्रेमात असता; स्थिर आणि स्थित असता, आणखीन कशाचीच गरज नसते.  संपूर्ण आयुष्य या अवस्थेत व्यतीत करू शकता.  पण वासना असेल  तर कोठेही स्थिर असणे अशक्य.  कांहीतरी खूळसट कृती करता नाहीतर वेडगळ होणे निश्चित.  जेंव्हा तुमच्यामधे एक प्रकारचा विक्षिप्तपणा, एक प्रकारचे वेड असते,  तेंव्हा तुम्ही केवळ वासनेने भरलेले असता.  तुमची वासना हि लैंगिक असेल, अन्नासाठी असेल किंवा इतर कोणतीही कृती अथवा छंद असेल; कांहीही असो; कशासाठी तरी तुमच्यात वासना असते.  त्या वासनेवीना तुम्ही जगू शकत नाही.  तुमचं कामकाज सुद्धा वासना व्यय करण्याचा एक प्रभावशाली उपाय आहे.  एवडंच कि जगातील हा सर्वात लोकप्रिय आणि सर्वस्वीकृत उपाय आहे.  आज लोक सतत केवळ काम काम काम करण्यात व्यस्त आहेत.  असं नाही कि ते कांही तरी अगदी विलक्षण असं निर्माण करण्यात मग्न आहेत; पण काम केलंच पाहिजे म्हणून करतात; नाहीतर कामा नसेल तर स्वतःचं काय करावं हे त्यांना माहित नाही.

सावधपणे तुम्ही तुमचं वेड सुरक्षित ठेवलं पाहिजे.  हे वेड तुमच्यात आहे हे कोणालाहि ठाऊक नाही.  तुम्ही स्वतः ते विसरायला राजी आहात.  ते विसरण्यासाठी सर्वकांही संभव ते करता.  जगातील करमणुकीची सर्व साधने हि तुमचं वेड लपविण्यासाठी आहेत.  जर तुम्ही अगदी विवेकपूर्ण व्यक्ती असाल तर कोणत्याही करमणुकीची तुम्हाला गरज भासणार नाही.  करमणुकीची तुम्हाला गरज भासते केवळ तुमचं वेड लपविण्यासाठी.  तुमची करमणूक जर आम्ही हिसकावून घेवू तर तुम्ही वेडे होवून जाल.  मनुष्याला केवळ आपलं वेड लपवण्यासाठी करमणुकीची गरज भासते.  तो जर पूर्ण विवेकी असता, तर त्याला याची गरजच भासली नसती.  केवळ एक बांबू कसा वाढतो हे पाहत बसणे त्याला अतिशय आनंदी वाटलं असतं.  खरोखरच त्याला करमणुकीची गरज भासली नसती.