गेल्या साडेतीन-चार वर्षांत मी ...काही लोकांच्या आयुष्याचा शेवट पाहिला - ज्यांना मी खूप आधीपासून ओळखत‌ होतो - माझी एक काकू आणि इतर काहीजण. मी लहान असताना हे लोक मला खूप जवळचे होते. चांगली माणसं होती आणि त्यांचं आयुष्य त्यांच्या स्वप्नांनुसार घडलं. त्यांना विशिष्ट प्रकारचं शिक्षण हवं होतं - ते झालं. विशिष्ट प्रकारचा व्यवसाय किंवा करिअर हवं होतं - ते मिळालं. मुलं हवी तशी मिळाली. त्यांना त्यांच्या मुलीचं लग्न विशिष्ट प्रकारे करायचं होतं – ते झालं. मुलाला अमेरिकेत पाठवायचं होतं - ते झालं. नातवंडं हवी होती - ती झाली अन् ती गोंडसपण निघाली. जे जे त्यांना हवं होतं, त्यांच्या स्वप्नांप्रमाणे - इतर कुणाच्या नव्हे तर त्यांच्या इच्छेनुसार आयुष्यात गोष्टी घडत गेल्या, बारीकसारीक कुरबुरी सोडल्या तर. पण त्यांच्या आयुष्याची शेवटची काही वर्षं, जसा मृत्यू जवळ येऊ लागला तशी ही माणसं अगदी गोंधळून गेली , कोलमडून गेली - काही वाईट घडलं नाही, फक्त जीवनाचा नैसर्गिक शेवट जवळ येत होता. त्यांना हवं ते सगळं मिळालेलं आणि आता जायची वेळ आली तसं त्यांना पूर्णपणे हरवून गेल्यासारखं झालं. कारण जीवनात अध्यात्माचा समावेश नव्हता.

त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनुभवलेल्या गोष्टी म्हणजे त्यांचं शरीर, मनाचे रंगढंग, त्यांच्या भावना आणि अचानक हे जे काही त्यांच्याकडे होतं ते सगळं निरर्थक वाटू लागलं, विनाकारण चिडचिड व्हायला लागली, प्रचंड गोंधळ आणि अस्वस्थता निर्माण झाली त्यांच्यात. कारण की स्थिर उभं रहायला दुसरा पैलूच नव्हता जीवनात. मी ठरवलं की त्यांना सोपी आध्यात्मिक साधना द्यावी जिला फार समर्पण, बुद्धी वगैरे लागणार नाही. आम्ही शिकवतोय ती आध्यात्मिक साधना तुम्ही केली तर तुम्ही आनंदाने जगू शकाल आणि आनंदाने मरूही शकाल. मी तर आता असं बघतोय याकडे की ते आनंदाने जगले नाही तरी किमान त्यांचा मृत्यू शांतिपूर्ण व्हावा. याला पात्र नाही असा कुठलाच माणूस पृथ्वीवर नाही. प्रत्येक माणूस यासाठी पात्र आहे, ते कोणेत कायेत यानं काही फरक पडत नाही. हे

महत्त्वाचंय की किमान त्यांचा मृत्यू चांगल्या प्रकारे व्हावा, भले ते चांगल्या प्रकारे जगले नसतील. माझी तुमच्यापैकी प्रत्येकाला विनंतीये की तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीही करा पण कसंही करून एक लहानशी आध्यात्मिक साधना जीवनात आणा; नाहीतर जे लोक चांगलं जीवन जगतात, त्यांचा मृत्यू दुःखद होतो, माहितीये? कारण त्यांच्या जीवनात आध्यात्मिक साधना नसते. कारण शरीर जसजसं थकू लागतं, तसं अचानक आधाराला त्यांच्याकडे काहीच नसतं आणि केव्हातरी शरीर जवाब देणारच! मी काही भाकीत करत नाहीये. याची खात्रीये , नाही का? एक दिवस शरीर नक्की जवाब देणार.‌ तर हे काही भाकीत नाही की तुम्ही त्यावर चिंतन करायची गरजे, हा जीवनाचा निश्चित परिणामे.

म्हणून हे अतिशय महत्त्वाचंय की प्रत्येकाच्या जीवनात भौतिक जगाच्या पलीकडचं काहीतरी जिवंत अनुभवात आलं पाहिजे. तसं झालं नाही तर आयुष्याच्या शेवटी माणूस हवालदिल, भयभीत होईल.