मन-एक कचराकुंडी

"आपल्या तर्काची मजल कुठपर्यंत जावी आणि कुठे थांबवावी, हे ज्यानां कळते, त्यांचे जीवन सुंदर होऊन जाते."
लोक जितके जास्त विचार करत चाललेत तितके ते आयुष्यात कमी कमी आनंदी होत आहेत. खरं तर असं व्हायला नको. तुमचं मन हे समाजाची कचरा कुंडी बनली आहे. तुमच्या बाजूने जाणारा प्रत्येकजण तुमच्या डोक्यात काही न काही टाकून जात असतो. यांतून तुम्हाला सुटका नाही. तुमच्या ज्ञानेंद्रियांवर जे काही येऊन आदळते; जसे की दृश्य, ध्वनी, संवेदना, चव वा गंध, ते सर्व तुमच्या मनात साठवले जाते. जे तुम्ही मन म्हणून संबोधता, त्यातील संचय करणारा भाग, हा तुम्ही; आजवर ज्या काही तुमच्या सभोवतालच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परिस्थितींच्या संपर्कात आला आहात त्यावर अवलंबून आहे.
आपण मन तीन भागात विभागणी करु शकतो. पहिला भेदाभेद करणारा भाग, यालाच बुद्धी म्हणतात. दुसरा माहिती साठवणारा भाग आणि तिसरा जाणिवेचा कप्पा याला प्रज्ञा म्हणतात.
ज्याप्रकारचा कचरा तुमच्या डोक्यात साठलेला असेल त्याप्रकारची तुमची विचारसरणी, अनुभव आणि जीवनाबद्दलची जाण असणार. तुमच्यापैकी काहीजणांमध्ये सामाजिक कचरा, काहीजणांमध्ये धार्मिक तर इतर काहीजणांमध्ये अध्यात्मिक स्वरूपाचा कचरा असतो, पण याला काहीच अर्थ नाही. हा सर्व बाहेरून आलेला कचरा आहे. आयुष्यात त्याचा उपयोग जीवित राहण्यापुरता मर्यादित आहे. एकूण जीवनाच्या तुलनेत त्याला विशेष असं महत्व नाही. तर हा कचरा पारखण्याच्या क्षमतेला बुद्धी म्हणतात. या पृथ्वीतलावर तुमचे जीवित असणे तुम्हाला शक्य आहे, कारण तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये फरक करू शकता.
तुमची बुद्धी जितकी तीक्ष्ण होते तेवढं सभोवतालचं सर्वकाही तुम्ही विच्छेदन करायला लागता, आणि मग हे कुठे थांबवावं हे तुम्हाला कळत नाही. या प्रकारची बुद्धी तुम्हाला कुठल्याही गोष्टींत पूर्णपणे सम्मिलित होऊ देत नाही. बुद्धी हे जीवित राहण्यासाठी अत्यंत प्रभावी असे साधन असले तरी; जीवनाची एकात्मता अनुभवण्याच्या कामी एक मोठा अडथळा होऊन बसते. आपल्या तर्काची मजल कुठपर्यंत जावी आणि कुठे थांबवावी, हे ज्यानां कळते, त्यांचे जीवन सुंदर होऊन जाते.
तुमच्या मनात उमटणारं सर्वकाही हे पंच ज्ञानेंद्रियांद्वारे येत असते आणि हि ज्ञानेंद्रिये सर्वकाही तुलनेने पडताळून पहात असतात. उदाहरणार्थ, तुम्ही आयुष्यात जर काळोख पाहिला नसेल, तर प्रकाश म्हणजे काय तुम्हाला कळले नसते. याचा अर्थ, ज्ञानेंद्रिये नेहमी एक विपरीत अस्तित्वाचं चित्र तुमच्या समोर मांडताहेत कारण सर्वकाही ते इतर सर्वांशी तुलनात्मक पडताळा करून अनुभूती करत आहेत. आणि तुलना आली रे आली कि द्वैत आलंच. मन द्विधा होणारच. अशा स्थितीत सर्वकाही तुम्ही अपूर्ण, तुकड्यांमध्ये पहाल. याप्रकारे अंशिक, तुकड्यांमध्ये विखुरलेलं तुमचं आकलन तुम्हाला कधीच पूर्णत्वाची अनुभूती देऊ शकणार नाही.
पण हीच बुद्धी जर तुम्ही जागृतीने शुद्ध केली तर ती तुम्हाला सत्य काय आणि असत्य काय हे उलगडून दाखवेल. जेंव्हा तुमची बुद्धी सुरीच्या धारेसारखी तीक्ष्ण होईल, तेंव्हा तिला काहीच चिकटणार नाही, कशानेही ती लिप्त होणार नाही, कोणत्याच ओळखीने ती बांधली जाणार नाही, सर्वकाही ‘जसे आहे त्या स्वरूपात’ तुम्ही पाहू शकाल. तुमचे कोणतेही पूर्वानुमान, तुमच्या ओळखीं, तुमच्या भावनां यांनी ती प्रभावित होणार नाही.
योग आणि ध्यान प्रक्रियेचा सर्व खटाटोप हाच आहे. एकदा जर का तुम्ही आणि तुमचे मन यांमधे स्पष्ट अंतर निर्माण झाले की, तुमच्या अस्तित्वाला एक वेगळीच कलाटणी मिळते.