मुलांच्या संगोपनात नवजीवन

"तुमच्या मुलांनी असं कांही करावं जे करण्याचं विचाराचं धाडस सुद्धा तुम्हाला करता आलं नाही."
मुलांना वाढवताना सर्वप्रथम एक गोष्ट करा, तुमच्या व्यक्तिमत्वाची सावली त्यांच्यावर अजिबात पडू देवू नका. तुमच्या विपरीत मनाचा प्रभाव पडू देवू नका. मुलांच्या संगोपनाचे हे पहिलं सूत्र. हे खरं कि मुलं बाहेरील कितीतरी दुषित मनांच्या प्रभावाखाली येवू शकतात. अशी शक्यता नक्कीच आहे. कारण अशी दुषित मनं जगात सर्वत्र आहेत. मुलांना यांपासून तुम्हाला पूर्णपणे विभक्त करता येणार नाही.
आता तुम्ही विचारता आहात – मी काय करू? माझ्या मुलाचं शिक्षण काय आणी कसं असावं? मी त्यांना कोणत्या प्रकारे वाढवावं? त्यांचं मार्गदर्शन कसं करू? तुम्ही त्यांना फक्त बुद्धीमान होण्यासाठी प्रोत्साहन द्या. जागरूकता विकसित होण्यासाठी प्रेरणा द्या. प्रत्येक प्राणीमात्राला जीवन सार्थक करण्याचं जन्मजात, आवश्यक असं बुद्धिकौशल्य दिलं गेलं आहे. एका मुंगीचं निरीक्षण करून पहा; जन्मल्यापासून, एक परिपूर्ण मुंगीचं जीवन जगण्याची बुद्धिमत्ता तिच्यात आहे. तुम्ही जे करता ते एक मुंगी करू शकणार नाही; पण एक मुंगी म्हणून जगण्याचं बुद्धीकौशल्य तिच्यात आहे. हे प्रत्येक प्राणीमात्राला लागू आहे. तुम्हीही तुमचं जीवन परिपूर्णतेने जगण्याचं आवश्यक बुद्धिकौशल्य तुमच्यात आहे.
पण समस्या हि कि तुमच्या मुलांनी त्यांच्या जन्मजात बुद्धीकौशल्या प्रमाणे नव्हे तर तुमच्या अपेक्षेप्रमाणे बुद्धीमान व्हावं. तुमची बुद्धीकौशल्याची व्याख्या म्हणजे तुमच्या मुलांनं डॉक्टर व्हावं. तो एक उत्कृष्ट सुतार झाला असता पण त्याने डॉक्टरच व्हावं हि तुमची इच्छा. जगात डॉक्टरांची कमतरता आहे म्हणून नव्हे, जगातील पीडा, यातना दूर व्हावी याची तुम्हाला परवा आहे म्हणून तुमच्या मुलानं एक डॉक्टर म्हणून आपलं जीवन समर्पित करावं या हेतूने नव्हे; तर तुमच्या डोक्यात हि खुळसट कल्पना आहे, कि समाजात एक डॉक्टर किंवा इंजिनियर म्हणजे मोठी प्रतिष्ठा किंवा अशाच कांही व्यर्थ, निरर्थक धारणेत आहात.
आयुष्यात जे कांही तुम्ही केलं ते तुमच्या मुलांनी करावे हे आवश्यक नाही. तुमच्या मुलांनी असं कांही करावं जे करण्याचं विचाराचं धाडस सुद्धा तुम्हाला करता आलं नाही. असा विचारसुद्धा रुजवण्याचं धाडस तुमच्यात नव्हतं – असं कांही तुमच्या मुलांनी केलं पाहिजे – तेंव्हाच हे जग प्रगती करू शकेल आणी कांही नवनिर्मिती होवू शकेल. हो ना?
एक परिपूर्ण जीवन जगण्याचं बुद्धीकौशल्य हे प्रत्येक मुलात उपजत असतं. तुमच्या व्यर्थ, निरर्थक धारणा त्यांच्यावर लादण्यापेक्षा; त्यांचं बुद्धीकौशल्य विकसित होण्यासाठी लागणारे फक्त एक अनुकूल वातावरण त्यांच्या सभोवताली निर्माण करा. मुलांवर इतरांचा प्रभाव पडणे साहजिक आहे; त्यात विशेषकरून शिक्षक, मित्रवर्ग आणी समाजाचे इतर कांही घटक त्यांना प्रभावित करण्यात भूमिका बजावत असतात. हे टाळता येणार नाही. तुमच्या मुलांसाठी असा प्रभाव मुक्त प्रबंध करणे शक्य नाही. तरी सुद्धा पालक म्हणून मुलांचं बुद्धीकौशल्य पूर्णपणे बहरण्यासाठी एक महत्वपूर्ण भूमिका बजावू शकता.
मुल जन्माला आल्यानंतर तुम्ही जर अशा कल्पनेत असाल कि आता शिकवण्याची वेळ आली तर तुम्ही त्या मुलाचे वाटोळे करून टाकाल. जेंव्हा मुल तुमच्या जीवनात येतं, तेंव्हा हि तुम्ही स्वतः शिकण्याची संधी आहे, कारण जीवनात तुम्ही पुष्कळ कांही अनुभवण्याचं राहून गेलं. तसंच पुष्कळ कांही तुमच्यात विकृत होवून राहिलंय. एक लहान मुल जीवनाकडे केवळ लक्ष देवून बघत असतं. त्या मुलाबरोबर बसून तुम्हीही जीवनाकडे पूर्णतः नव्याने पहा. केवळ एकच गोष्ट तुम्ही त्यांना देवू शकता – प्रेम आणी आधार. असे केल्याने त्यांचे बुद्धीकौशल्य पूर्ण विकसित होईल. एवढंच पुरेसं आहे. सभोवताल प्रेमळ वातावरण निर्माण केलं कि त्यांचं बुद्धीकौशल्य स्वाभाविकपणे फुलून जाईल.
लोकांची अशी समजूत आहे कि मुलांना प्रेमाने वाढविणे म्हणजे जे कांही मागतील ते पुरविणे. जरा जाणीव आणि लक्षपूर्वक तुमच्या मुलाकडे पाहिलं तर तुम्हाला कळतं का – ते मागतील ते पुरविणे म्हणजे पूर्णतः मूर्खपणा आहे? आणि या मुर्खतेला तुम्ही नाव ठेवलंय “प्रेम, वात्सल्य”. तर मग मुलांना तुम्ही कसं वाढवावं? जीवनाच्या कोणत्याही परिस्थितीत त्यांना आनंदाने जगता आलं पाहिजे. नाही का? अशा प्रकारे तुम्ही मुलांना वाढवलं पाहिजे.
मुलांना जर तुम्हाला वाढवायचं असेल तर सर्वप्रथम; स्वतः तुम्ही नेहमी आनंदी असणे महत्वाचे. ह्या क्षणी लक्षपूर्वक तुम्ही पाहिलं तर बाह्य निमित्तावीणे कसे आनंदी असावं हे तुम्हाला माहित नाही. नित्यनियमित तुमच्या घरात तणाव, क्रोध, भय, चिंता, मत्सर यांचच प्रदर्शन चाललेलं असतं. केवळ याच गोष्टी मुलांना प्रदर्शित केली जातात. असं असेल तर मुलांवर याचा काय परिणाम होईल? मुलं मग याच गोष्टी आत्मसात करतात. खरोखरच मुलांना जर चांगल्याप्रकारे वाढवायचा उद्देश्य असेल तर सर्वप्रथम स्वतःच्या व्यक्तित्वात परिवर्तन घडवून आणलं पाहिजे. जर तुम्ही स्वतःला बदलण्यात असमर्थ असाल तर तुम्ही मुलांना वाढवण्याचा प्रश्न येतोच कुठे?