निरपेक्ष प्रेम – कसं करावं?

मनुष्य संबंधांच्या लक्षणांवर स्पष्ट व्यक्तव्य करत सदगुरू म्हणतात; बिनशर्त किंवा सशर्त प्रेम असं काही नसतं. एकतर प्रेम असेल किंवा प्रेम नसेल एवढंच. तर प्रेमात कोण किती देतंय याचा हिशेब न ठेवता, प्रेमसंबंध कसे हाताळावेत यावर सदगुरू आपले तर्कसंगत विचार मांडताहेत.
प्रश्न: निरपेक्षपणे प्रेम कसं करावं? याबद्दल माणसांमधे वावरताना नेहमी याबाबत लोकांशी वागता बोलताना मला अडचण येते विशेष करून माझ्या पत्नीशी.
सदगुरू: पत्नीवर जर निरपेक्ष प्रेम कराल तर ती तुमची पत्नी राहणार नाही. कारण लग्नाची हि मुलभूत अट आहे कि ती केवळ तुमची पत्नी असणार. हि अट असताना बिनशर्त प्रेम कसं काय शक्य आहे? या क्षणी तुमचं आयुष्य सुद्धा एक अटच आहे. केवळ काही ठराविक अटि पूर्ण केल्या तरचं जीवनचक्र चालणं शक्य आहे. म्हणून ‘प्रेम’ या सारख्या मनुष्य भावनेचा जेंव्हा प्रश्न येतो, तेंव्हा सशर्त प्रेम प्रेम आणि बिनशर्त प्रेम असं काही नसतं. एकतर प्रेम असेल किंवा प्रेम नसेल एवढंच. वेगळ्या शब्दात सांगायचं म्हणजे, एकतर तुम्ही प्रेमाचा ओलावा जाणता नाहीतर प्रेमाच्या नावाखाली परस्पर लाभ योजना राबवणे जाणता – “मी तुला हे देईन; जर तु मला ते दिलेस तर. जर तू हे नाही दिलंस तर मी तुला ते नाही देणार”. जरी ती परस्पर लाभ योजना आहे तरी काही हरकत नाही. ती सुंदररित्या हाताळा.
लाभ योजना हव्यात कारण बॉस, सहकारी, व्यावसायिक भागीदार, शेजारी, पती, पत्नी, मुलं, आई, वडील, दैनंदिन या सर्वांशी वावरणं म्हणजे व्यावहारिक देवाण घेवाण असणारच. आणि हा सर्व व्यवहार तुम्हाला एक ओथंबून वाहणारं उत्कट प्रेम संबंध वाटत असेल तर नक्कीच तुम्ही कल्पनेच्या स्वप्न नगरीत वावरत आहात आणि मग तुमच्या पत्नीनंच तुम्हाला वास्तविक जगात आणावं लागेल. रोमॅन्स वगैरे ठीक आहे, पण जेंव्हा संबंधांचा प्रश्न येतो, व्यावहारिक देवाण घेवाण हे स्वाभाविक आहे. हे सत्य जर तुम्हाला मान्य नाही तर साहजिकच तुम्ही दुःखी व्हाल. जर त्याचा स्वीकार कराल तर संबंधानां यथायोग्य, सुंदररित्या हाताळण्याची कला अवगत करून घ्याल. जर तुम्ही म्हणालात, “मी तुला एवढं काही दिलं – तुला मला काय देणार आहेस?” तर हे अगदी कुरूप होतं. संबंध सभ्य, सुंदररित्या हाताळण्याचा मार्ग आहे, जेणेकरून तुम्ही काय देत आहात याचा सुगावा कोणालाही लागणार नाही.
कृतज्ञतेचा डोह
जर तुम्ही काय काय देता याचा हिशेब ठेवत नाही, पण जे जे काही तुम्हाला दिलं जाता ते सर्व काही आठवता तर स्वाभाविकपणे तुम्ही कृतज्ञतेचा डोह बनाल. “मी केवढं काही केलयं!” हा निरर्थक मूर्खपणा टाका. कोणाकडून कोणतीच अपेक्षा नसेल तर आयुष्य अगदी सहजपणे जगाल. जर इतरांकडून काही अपेक्षा असतील किंवा तुम्ही विचार करत असाल कि ते माझ्यावर प्रेम करतात कि नाही, तर मग इथूनच समस्यांची सनई वाजायला सुरवात होते. जेंव्हा कोणाकडून कोणतीच अपेक्षा नसेल, तर जे काही ते करतील ते त्यांच्याच भल्यासाठी असेल. आणि जर नाही केलं तरी काय हरकत आहे?
नातेसंबंध किंवा प्रेमसंबंध हा एक व्यवहार आहे आणि तो यथायोग्य हाताळायला एक प्रकारची कला असावी लागते, नाहीतर हा व्यवहार कुरूप होऊ शकतो. तुम्ही अनुभवलं असेल, एका व्यक्तीशी एक दिवस किती आनंदी, उल्लासित असता आणि लगेच इतर दिवशी त्याच व्यक्तीशी संबंध किती क्लेशदायक होतात.
पण दुर्दैवाने बहुतेक लोक हे मान्य करायला राजी नाहीत कि संबंध हा देवाण घेवाणीचा एक व्यवहार आहे. याचे ठराविक आधारभूत नियम आणि अटी आहेत. जर तुम्ही नियम आणि अटिंच्या चौकटीत राहिलात तर हे संबंध यशस्वीरीत्या पार पाडू शकता. पण “आपलं प्रेम निरपेक्ष आहे” असे म्हणत कल्पनेच्या दुनियेत वावरत असाल तर कोणत्याही क्षणी ते कोलमडू शकते.
निरपेक्ष प्रेमाच्या कल्पनांमधे हरवून जाऊ नका, कारण प्रेम हि सुद्धा एक अटच आहे. तुम्ही प्रेम का करावं? प्रेम ही एक मानवी भावना आहे आणि जर तुमच्या भावनां गोड असतील तर जे काही तुमच्या दृष्टीस पडेल, त्याकडे प्रेमाने पहाल – मग ते आकाश असो, फुलं, पक्षी, एक पुरुष किंवा स्त्री – कारण तुमचा सहज स्वभावच प्रेमळ बनलेला आहे. त्यात कोणत्या अटिं नाहीत. प्रेम हा दुसऱ्यांचा नव्हे तो तुमचा गुण आहे.