देव तुमच्यावर प्रेम करतो का?

कित्येक लोक म्हणतात की देव प्रेमळ आहे. सद्गुरू समजावून सांगतायत की सृष्टीच्या निर्मात्याविषयी एकच गोष्ट आपण ठोसपणे म्हणू शकतो ती म्हणजे सृष्टीचं मूळ एक अद्भुत बुद्धि आहे. तिच्या लयीशी आपली लय जुळली तर जीवन बहरून येते.
देवी शेट्टी: सद्गुरू, साधारण वीसेक वर्षांपूर्वी मला एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याकडून एक लाख रुपयांचा चेक मिळाला. त्यांनी फक्त त्यांचं नाव सांगितलं, पत्ता कळवला नाही आणि एक लहानशी चिठ्ठी पाठवली त्यात त्यांनी म्हटलेलं की “मी तुम्हाला जी रक्कम देतोय ती तुम्ही निवडलेल्या मार्गासाठी खूपच कमीये. पण देवाच्या आपल्याच वेगळ्या युक्त्या असतात, त्यातून तुम्हाला उरलेली रक्कम मिळेल.” याचा माझे विचार अन् माझ्या कामावर प्रचंड प्रभाव पडला. मी जे काही केलं ते करायला या घटनेनं प्रचंड आत्मविश्वास दिला. तर वैश्विक शक्ती म्हणून काही आहे का की जी सतत माणसांना मदत करायचा प्रयत्न करत असते का दुसरंच काहीतरी लोकांना त्यांच्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी करायला प्रवृत्त करतं?
सद्गुरू: पहा, कोणीतरी आपली मदत करतंय, काहीतरी आपल्या पाठीशीये या ज्या कल्पनायत ...मी साधारण महिनाभरापूर्वी लॉस अँजेलस मध्ये होतो आणि एकांकडे मुक्कामाला होतो. त्यांचं बेडरूम पुस्तकांनी भरलेलं होतं, तर मी सहज एक पुस्तक उचलून चाळलं. त्या पुस्तकाच्या लेखकानं म्हटलेलं की प्रेम हा विश्वाचा गाभाय.
विश्वाचा गाभा प्रेम का बरं असेल? कारण लोकांना नेहमी सांगितलं गेलंय की - “स्वर्गातून देव तुमच्यावर प्रेम करतो”. या सगळ्यांना. समजा आत्ता तुमचं तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीबरोबर ज्वलंत प्रेमप्रकरण चालूये, तर प्रेमाचे किरण आकाशातनं तुमच्यावर पडावेत असं तुम्हाला वाटेल का? (देवी शेट्टी हसतात). मी तुम्हाला विचारतोय. नाही. तुम्ही स्वतःला असं बनवलंय की कुणीच प्रेम करू शकणार नाही तुमच्यावर. (काही जण हसतात). आता फक्त देवच तुमच्यावर प्रेम करू शकतो. (हशा) देव माझ्यावर प्रेम करतो असं म्हटलात तर लक्षात घ्या तुम्ही इतकी भयंकर असहाय केस आहात. (हशा) तुम्ही स्वतःला असं बनवलंत की लोकांना तुमच्यावर प्रेम करण्यावाचून पर्यायच असणार नाही तर तुम्ही सुंदर व्यक्ती बनाल.
तर … आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मानवी विचार आणि भावना ही एक गोष्टय … माणसाच्या भावनिक गरजा, प्रेमाची , काळजी घेण्याची, स्पर्शाची गरज, या मानवी गरजायत. ब्रह्मांड किंवा ज्याला तुम्ही सृष्टीचा निर्माता म्हणताय, किंवा दैवी शक्ती, तुम्हाला देव हा शब्द वापरायचा असेल तर… देव म्हटलं की लोकांना एखादी व्यक्ती वाटते म्हणून तो शब्द आपण टाळूया. असं म्हणूया की जे काही निर्मितीचं मूळे , ज्याला आपण साधारणपणे धार्मिक शब्दावलीत ईश्वर म्हणतो... मुळात ती फक्त एक बुद्धिमत्ताय जी एखाद्या विस्फोटाप्रमाणे निर्मितीमध्ये मग्नय. तिच्या तालाशी तुमचा
ताल जुळला तर तुम्ही वर उठाल. बेताल झालात तर त्यात भरडले जाल. तिला प्रेम नाही, दया नाही, तुम्हाला मदत करायचा तिचा बिलकूल हेतू नाही, तुम्हाला इजा करण्याचाही तिचा हेतू नाही. तिला असं काहीच नाही. तुम्ही या शक्तीला समजून घेऊन त्यावर स्वार झाला तर जीवन मस्त होईल. नाही समजून घेतलं तर ती तुम्हाला भरडून काढेल. तुम्ही पाहिलं असेल लोकांना समुद्राच्या लाटांवर सर्फ बोर्डिंग करताना, किती अद्भुत असतं ते , लाटांवर स्वार होणं. पण तुम्ही चुकला, लाटांमध्ये अडकला तर ते कॉंक्रिट मिक्सरसारखं असतं. गरगर फिरून तुम्हाला खलास करेल.
तर एखादा लाटेवर स्वार होतो, दुसरा गटांगळ्या खातो, इतकंच घडतंय. बाकी सगळे माणसाने काढलेले अर्थयत. ही गोष्ट आपण सगळ्यात पहिले थांबवायला हवी - आपण आपले विचार आणि भावना अस्तित्वावर लादता कामा नये. तुमच्या माझ्यामध्ये त्यांना महत्त्वय, तुम्ही अन् तुमच्या कुटुंबियांमध्ये ते ठीके , आय लव्ह यू, यू लव्ह मी सगळं ठीके. आकाशाकडे पाहून “आय लव्ह यू” म्हणू नका. (काहीजण हसतात). ते “आय लव्ह यू टू” म्हणणार नाहीये. (काहीजण हसतात), कारण त्याला तशी गरजच नाहीये. ते निखळ अस्तित्वय. तुम्हीही तसंच बनलं पाहिजे. तुम्ही इथे बसला तर तुम्ही एक परिपूर्ण अस्तित्व आहात. हे एक स्वयंपूर्ण जीवने. याला कुणाकडूनही कसलीही गरज नाहीये. यात सगळं आहे. विश्वातल्या प्रत्येक गोष्टीशी हे जोडलेलंय. कसलीच गरज नाही याला. पण आपल्याला आपले खेळ खेळायचेत, हरकत नाही. पण तुम्ही हे लक्षात घ्या- सध्या आपण आपल्या अनावर प्रवृत्ती अख्ख्या सृष्टीला लागू करू पाहतोय. हे तसं काम करत नाही. अस्तित्व तुम्हाला मदत करू पाहत नाहीये. कदाचित तुमचा ताल जुळलाय (चुटकी वाजवतात), चुटकीसरशी सगळं होईल.
आता तुमची लय जागरूकतेने जुळलेली असो वा अजाणतेपणे, कशीतरी तुमची लय जुळली. म्हणून तर आदि शंकराचार्य म्हणाले, “योगरतो वा भोगरतो वा” - म्हणजे कसंही करून तुम्ही लयीत या, कसं त्याच्याशी मला घेणंदेणं नाही. तुम्ही एकतर (हसतात) … तुम्ही जसं म्हणालात की हे सगळे लोक शूट केल्याशिवाय मरणार नाहीत (हशा). ते मद्य पितायत , नाचतायत . कसंही असो. आदिशंकराचार्य अगदी टोकाला जाऊन म्हणाले, कसंही करून लयीत या. तिथं पोचणं महत्त्वाचंय (हशा) कसे पोचता , कुणाला पडलीय! (काहीजण हसतात).