सदगुरू: जगाच्या समजुतीनुसार, यश म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तीपेक्षा तुम्ही जरा अधिक वेगानं धावत आहात. पण माझी यशाची कल्पना तशी नाही. माझ्यासाठी यश म्हणजे, “मी स्वतःला पूर्णपणे उपयोगात आणू शकलोय की नाही ? मी जे कोण आहे त्याच्या सर्व क्षमतांचा आणि शक्यतांचा मी शोध घेऊ शकलोय की नाही?”. हे जर घडायचं असेल तर तुमचं आकलन सुस्पष्ट आणि बुद्धी अगदी सक्रीय हवी.

तर मग “मी माझी बुद्धी कशी विकसित करू?” त्याची काळजी करू नका. लोक आपली मनं विस्तारण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते केवळ तुम्हाला सामाजिकदृष्ट्या सफल करू शकतं, खरी सफलता लाभणार नाही. आत्ता सध्या, महत्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही तुमची आकलन शक्ती वाढवण्यावर भर दिला पाहिजे. जीवन जसं आहे ते अगदी तसं तुम्ही पाहू शकलात, कुठल्याही विकृतीविना, तर मग आयुष्य उत्तमरीत्या जगण्यासाठी तुमच्याजवळ आवश्यक बुद्धी असेल. मग तुम्ही जीवनाचा खेळ आनंदानं खेळू शकता, आणि नक्कीच उत्तमरीत्याही खेळू शकता. जर तुम्ही चांगल्याप्रकारे खेळू शकलात, तर लोक म्हणतील तुम्ही यशस्वी आहात.

तुम्हाला काय दिसतं?

एकदा असं घडलं, शेरलॉक होम्स आणि वॉटसन जंगलात कॅम्पिंग करायला गेले. रात्र झाली आणि ते झोपी गेले. मध्यरात्री, शेरलॉक होम्सनी वॉटसनला सहज उठवलं, वॉटसन ने डोळे उघडले. शेरलॉकनं त्याला विचारलं, “तूला काय दिसतंय?” 

वॉटसननं वर पाहिलं आणि म्हटलं, “मला निरभ्र आकाश आणि तारे दिसतायत, भरपूर तारे.”

शेरलॉकनं विचारलं, “याचा तू काय अर्थ लावशील?”

वॉटसनं उत्तर दिलं, “याचा अर्थ उद्या वातावरण अगदी छान असणार आहे. तुला काय वाटतं?

शेरलॉक म्हणाला, “माझ्यासाठी याचा अर्थ, कुणीतरी आपला टेंट पळवून नेलाय.”

जर तुम्हाला कुठलीही गोष्ट यशस्वीरित्या करायची असेल, तर हे तुमच्या शैक्षणिक पात्रतेवर नाही तर केवळ तुमच्या आजूबाजूच्या वास्तविकतेबद्दलची तुमची दृष्टी किती स्पष्ट आहे यावर अवलंबून असतं.

आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रातून तुम्ही तेव्हाच यशस्वीपणे चालत जाऊ शकता जेव्हा तुम्ही जीवन जसं आहे तसं पाहू लागता. नाहीतर तुमचा प्रवास धडपडत होईल. यश म्हणजे तुम्ही इतरांपेक्षा अधिक वेगाने चालत आहात. जर तुम्ही इतरांपेक्षा अधिक वेगाने चालत असलात आणि तुमची दृष्टी जर सुस्पष्ट नसेल, तर नक्कीच, तुम्ही जास्त तणाव आणि टेन्शनखाली असाल, इतरांपेक्षा अधिक दमून जाल कारण तुम्ही प्रत्येक पावलावर अडखळणार.

जर तुम्हाला कुठलीही गोष्ट यशस्वीरित्या करायची असेल, तर हे तुमच्या शैक्षणिक पात्रतेवर नाही तर केवळ तुमच्या आजूबाजूच्या वास्तविकतेबद्दलची तुमची दृष्टी किती स्पष्ट आहे यावर अवलंबून असतं. जर तुम्ही आजचा दिवसाकडे स्पष्टपणे पाहू शकलात, तर कदाचित तुम्ही आज लॉटरी तिकीट विकून पैसे कमवाल. जर तुम्हाला उद्याचा दिवस स्पष्टपणे दिसत असेल, तर तुम्ही आज अशी एखादी योजाना विकत घ्याल जी उद्या विकून पैसे मिळतील. जर तुम्हाला पन्नास वर्षांनंतरचं स्पष्टपणे दिसत असेल, तर तुम्ही कदाचित काहीतरी पूर्णपणे वेगळं कराल. 

चुकीची गोष्ट चुकीच्या क्षणी

ते लोक जे अपयशी झाले त्यांच्याजवळसुद्धा उत्तम पात्रता होती, बुद्धिमान आणि कुशलही होते. पण आयुष्यात काही ठराविक वेळी, काही ठरविक गोष्टी स्पष्टपणे त्यांच्या दृष्टीस पडल्या नाहीत. चुकीची प्रॉपर्टी तुम्ही चुकीच्या वेळी खरेदी केली. चुकीच्या वेळी तुम्ही चुकीच्या धंदा सुरु केला. अयोग्य माणसाला अयोग्य गोष्ट हाताळायला सांगितली. अपयश म्हणजे एवढंच, आणि यश म्हणजेसुद्धा फक्त एवढंच.

यशाच्या पाठीमागे धावू नका, फक्त कौशल्य आणि क्षमता विकसित करण्यावर भर द्या.

जे लोक यशस्वी म्हणून गणले जातात त्यांच्याकडे काही असामान्य बुद्धी होती म्हणून नाही, पण त्यांनी आपली दृष्टी आणि आकलन सुस्पष्ट ठेवलं. तुम्ही काय बोलत आहात हे तिथल्या तिथंच ते ताडतात आणि काय खरं आहे आणि काय नाही हे तुम्हाला ते तिथल्या तिथं दाखवून देऊ शकतात.  

म्हणून, यशाच्या पाठीमागे धावू नका, फक्त कौशल्य आणि क्षमता विकसित करण्यावर भर द्या – स्वतःला जरा उच्च पातळीवर कसं वृद्धिंगत करता येईल याकडे लक्ष द्या. जर तुमच्याकडे उच्च कोटीचं कौशल्य असेल, तर जिथं कुठं तुम्ही असाल, हमखास तुम्ही यशस्वी व्हाल यात मुळीच शंका नाही. जर तुमचं कौशल्य अत्युच्च पातळीचं असेल, कार्यक्षमतेच्या एका विशिष्ठ पातळीवर तुम्ही स्वतःला नेलं असेल, तर मग यश हे तुमच्या आयुष्याचं ध्येय म्हणूनसुद्धा उरणार नाही. ती फक्त तुम्ही जिथं कुठं जाल तिथं आपोआप तुमच्या पाठीमागे येणारी गोष्ट बनेल. 

जर एखादी व्यक्ती प्रचंड सामर्थ्य आणि क्षमतेच्या पातळीवर पोचली, तर पूर्ण जग  तिच्या किंवा त्याच्या शोधात येईल. तुम्ही जगाच्या मागे धावायच्या ऐवजी, तुमच्यातल्या सामर्थ्य आणि शक्यतांपायी, लोक तुमच्याकडे आलेलं अधिक चांगलं.

संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugwithSadhguru.org वर.

Youth and Truth Banner Image