16 जुलै रोजी, साजरी करा गुरु पौर्णीमा सदगुरू समवेत आदियोगीच्या सानिद्ध्यात. व्यक्तीशः ईशा योगा सेंटरमध्ये उपस्थित राहून किंवा मोफत लाईव्ह वेबस्ट्रीम पाहू शकता.

Register For Guru Purnima

सद्गुरु: सध्या सूर्याचे दक्षिणायन सुरू होत आहे. या काळात सूर्याचा पृथ्वीशी असलेला संबंध उत्तरी भ्रमणापासून दक्षिणी भ्रमणामध्ये बदलतो.या कालावधीत मानवी शरीरात होणारे बदल, साधना करण्यासाठी आणि लक्ष्य निश्चितीसाठी अधिक उपयुक्त ठरतात. याच काळात शेतकरी आपल्या जमिनीची मशागत सुरु करतो.आपला देह म्हणजे धरतीचा एक तुकडाच आहे, आणि एक योगीसुद्धा या मातीच्या गोळ्यास - म्हणजे आपल्या शरीरास मळायला सुरुवात करतो - एक असे शरीर; जे धारण करण्याची एक सुवर्णसंधी त्याला प्राप्त झाली आहे.आणि हजारो वर्षांपूर्वी,अगदी याच वेळी, आदियोगींची कृपादृष्टी मानवी प्राण्यावर पडली.

कथा पहिल्या गुरुपौर्णिमेची

योगिक संस्कृतीमध्ये शिवाकडे देवता म्हणून नव्हे, तर आदियोगी म्हणून पाहिले जाते. पंधरा हजार वर्षांहून अधिक काळापूर्वी एक योगी हिमालयातल्या उच्च प्रदेशांमध्ये अवतरला. त्याचे उगमस्थान किंवा त्याचा पूर्वेतिहास याविषयी कोणालाच कल्पना नव्हती. शिवाय, त्याने स्वतःची ओळखही करुन न दिल्याने त्याचे नावही अज्ञात राहिले. परिणामी त्याचा उल्लेख आदियोगी किंवा प्रथम योगी असा केला जातो.

गुरु पौर्णिमा म्हणजे प्रथम योगीने स्वतःचे रुपांतर आदिगुरु - पहिल्या गुरुमध्ये केले ती पौर्णिमा.

त्याचं आगमन झालं, तो आसनस्थ झाला… तो शून्यावस्थेतच होता. त्याच्या नेत्रांतून वाहणारे परमानंदाचे अश्रू हीच जीवनाची एकमात्र निजखूण होती. याव्यतिरिक्त काहीच जाणवत नव्हतं, अगदी त्याचं श्वसन सुरू आहे की नाही, हेसुद्धा समजत नव्हतं. तो काही गूढ अनुभूती घेत असल्याचं तिथल्या लोकांना जाणवलं, ज्याची ते कल्पनाही करू शकत नव्हते. सारंच अगम्य होतं. ते लोक आले, काही वेळ त्यांनी वाट पाहिली आणि अखेरीस ते निघून गेले. कारण गूढ अनुभूतीत हरवलेल्या त्या योग्याला भोवतालाचे भान उरले नव्हते.

<पण केवळ सात माणसे तेथे थांबून राहिली. या आदियोगीकडून ज्ञान ग्रहण करण्यासाठी ती सात माणसे आग्रही होती. पण आदियोगींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्या सात जणांनी प्रार्थना केली, ''जे गुह्य ज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे, ते आम्हालाही प्राप्त करण्याची इच्छा आहे.'' त्यांची विनवणी धुडकावून लावत आदियोगी गरजले, ''मूढमतींनो, तुम्ही आज ज्या अवस्थेत आहात त्यावरून हे स्पष्ट होतं की लाखो वर्षांमध्येही तुम्हाला ज्ञानप्राप्ती अशक्य आहे. हे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कठोर तपस्या करण्याची आवश्यकता आहे. हा काही पोरखेळ किंवा मनोरंजन नव्हे.''

दक्षिणायनची पहिली पौणिमा म्हणजे गुरुपौर्णिमा, अर्थात प्रथम गुरु जन्मला तो दिवस.

पण त्या सात जणांचा अट्टाहास इतका तीव्र होता की, आदियोगीने त्यांना काही पूर्वतयारीचे टप्पे सांगितले. दिवसांमागून दिवस गेले, महिन्यांमागून महिने सरले, वर्षांमागून वर्षे गेली... तरीही या सात जणांची तपस्या सुरूच होती. आदियोगींनी मात्र त्यांच्याकडे पाहिलेसुद्धा नाही. असं म्हणतात की, सात जणांची साधना जवळपास ८४ वर्षे अखंड सुरू होती. ८४ वर्षांनंतर एका पौर्णिमेच्या दिवशी सूर्य जेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे भ्रमण करता होता, त्या दक्षिणायनाच्या आरंभी आदियोगींची कृपादृष्टी त्या सात साधकांवर पडली. आता ते आत्मज्ञानप्राप्तीसाठी पात्र झाले होते. या पात्रतेच्या तेजाने ते तळपत होते. आता ते खरंच पात्र बनले होते. आदियोगी आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करूच शकत नव्हते.

आदियोगीने त्या सातही जणांना जवळून न्याहाळले आणि जेव्हा आकाशात पूर्ण चंद्र दिसला, त्या वेळी त्याने गुरूच्या भूमिकेत जायचे ठरवले. ती पूर्ण चंद्राची पौर्णिमा ‘गुरुपौर्णिमा’ म्हणून ओळखली जाते. पहिल्या योग्याचे रूपांतर आदिगुरूत होण्याची पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. तो आदिगुरू दक्षिण दिशेला वळला आणि त्याने आपल्या सप्त शिष्यांना योगशास्त्राचे ज्ञान दिले. म्हणूनच तो ‘दक्षिणमूर्ती’ म्हणून प्रसिद्ध आहे. हीच ती दक्षिणायनातील पहिली पौर्णिमा... हीच ती गुरुपौर्णिमा, ज्या पौर्णिमेला आदिगुरूचा म्हणजेच ब्रह्माण्डातल्या प्रथम गुरूचा जन्म जाहला.

गुरुपौर्णिमा - सर्व मर्यादा भेदण्याची शक्यता

ज्ञान संक्रमित करण्याचा हा ‘विश्वातला पहिला योग-कार्यक्रम’ कुठे संपन्न झाला बरं? केदारनाथपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कांतिसरोवराच्या काठी! जेव्हा आपण "योग'' असं म्हणतो, ते काही शरीर वेडेवाकडे पिळणे किंवा श्वास रोखून ठेवण्याच्या क्रियांबद्दल बोलत नाही आहोत. पण सध्या आपण चर्चा करत आहोत ती जीवनाच्या मूलभूत प्रक्रियेविषयी आणि तुम्ही, जी या सृष्टीची एक रचना आहात, तिला तिच्या सर्वोच्च संभावनेत प्रस्थापित करण्याविषयी. मानवी चेतनेचा हा अभूतपूर्व आयाम किंवा सीमित मनुष्याला ‘असीम’ आणि ‘वैश्विक’ बनवणारं गवाक्ष उघडलं ते गुरुपौर्णिमेलाच!

गुरुपौर्णिमा ही मानवजातीच्या इतिहासातील सर्वोच्च क्षणांना अधोरेखित करते. आजवर मानव ज्यापासून अनभिज्ञ होता, त्या श्रेष्ठत्वाच्या आणि मुक्तीच्या शक्यतेला ती प्रकाशात आणते.

गुरुपौर्णिमा ही मानवजातीच्या इतिहासातील सर्वोच्च क्षणांना अधोरेखित करते. आजवर मानव ज्यापासून अनभिज्ञ होता, त्या श्रेष्ठत्वाच्या आणि मुक्तीच्या शक्यतेला ती प्रकाशात आणते. तुमचा जन्म कोणत्या वंशात झाला, तुमचा जन्मदाता कोण आहे किंवा जन्मतःच अथवा नंतर तुमच्यात कोणत्या कमतरता किंवा दोष आहेत यांनी काहीच फरक पडत नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तुमची तयारी असेल, तर तुम्ही अलौकिक झेप घेऊ शकता. मानवजातीच्या इतिहासात मानवाला हे प्रथमच आकळलं आणि त्यानं घोषित केलं की, सजगतापूर्वक उत्क्रान्त आणि उन्नत होणं शक्य आहे.

काही वर्षांपूर्वी, एका अमेरिकन मासिकामध्ये माझी मुलाखत घेण्यात आली होती. त्यादरम्यान मला एक प्रश्न विचारण्यात आला होता, ''मानवी चैतन्य उन्नत करण्यासाठी झटलेली सगळ्यात महत्त्वाची पाश्चात्त्य व्यक्ती कोण?'' मी अगदी सहजपणे उत्तरलो, ''चार्लस डार्विन.'' त्यावर मुलाखतकार म्हणाले, ''पण चार्लस डार्विन तर जीवशास्त्रज्ञ होता ना?'' मी म्हणालो, ''खरंय, पण सतत विकसित होणे, उन्नत होणे मनुष्याला शक्य आहे हे सांगणारा तोच पहिला व्यक्ती होता. तुम्ही आता जसे आहात त्यापेक्षा उन्नत, उत्क्रान्त होणे नेहमीच शक्य असते.''

जीवशास्त्रीय उत्क्रान्तीचा सिद्धांत अंगिकारणारा हा पाश्चात्त्य समाज आज आध्यात्मिक मार्ग स्वीकारण्यास राजी आहेत. पण जे लोक "मी जसा आहे तसाच योग्य आहे, कारण परमेश्वरानेच माझी निर्मिती केली आहे'' यावर विश्वास ठेवतात त्यांना यासारख्या शक्यतां मान्य नाहीत.

डार्विनने जीवशास्त्रीय उत्क्रान्तीची चर्चा केली ती सुमारे दोनशे वर्षांपूर्वी; पण आदियोगींनी आध्यात्मिक उन्नतीची चर्चा केली ती जवळपास पंधरा हजार वर्षांपूर्वी! आदियोगींच्या शिकवणीचे सार आहे - ब्रह्माण्डातल्या प्रत्येक अणूरेणूत अगदी सूर्य-ग्रह यांच्यातही त्यांची स्वतःची चेतना विराजमान असते. पण त्या सर्वांत विवेकी मन मात्र नसते, जे केवळ मानवात आहे. एकदा का विवेकी मनासोबत चेतना उन्नत झाली की एक सर्वशक्तीशाली शक्यता निर्माण होते. यासाठीच मानवी जीवन अगदी अदभूत, अद्वितीय आहे.

गुरुपौर्णिमेच्या कथेतली वरुणराजा - मान्सूनची - भूमिका

आदियोगींनी योगविज्ञानाचे ज्ञान सप्तर्षीमध्ये संक्रमित केल्यानंतर ते सातही ऋषीगण योगविज्ञानाच्या प्रसारासाठी जगभर पसरले. त्यापैकी एक अगस्त्य मुनी ज्यांनी भारतीय उपखंडाच्या दक्षिणेत आपले कार्य सुरू करण्यासाठी मार्गस्थ झाले. अगस्त्य मुनींचं जीवन अगदी अदभूत, विलक्षण, सामर्थ्यशाली आणि प्रगल्भ बुध्दि प्राप्त पुरुष होते. हिमालयाच्या दक्षिणेकडील; संपूर्ण भारतीय उपखंडातील प्रत्येकासाठी एक आध्यात्मिक क्रिया प्रदान केली. आज “ईशा योगा” म्हणून जे काही आपण करत आहोत ते सर्वकाही अगस्त्य मुनींच्या महान कार्याचाच छोटासा भाग आहे.

अगस्त्य मुनींच्या दक्षिणेकडे प्रयाण करण्यामुळे योगी आणि आध्यात्मिक साधक यांची एक परंपराच सुरू झाली.

Story of Guru Purnima in Marathi - Role of Monsoon

 

 

अगस्त्य मुनींच्या दक्षिणेकडे प्रयाण करण्यामुळे योगी आणि आध्यात्मिक साधक यांची एक परंपराच सुरू झाली. ऋतुमानानुसार योगी आणि साधकांनी हिमालयातून दक्षिणेपर्यंत आणि पुन्हा परत हिमालयाकडे असे भ्रमंतीचे चक्रच सुरू झाले. हे चक्र हजारो वर्षे अखंड चालत राहिले आहे. योगिजन उन्हाळ्यामध्ये हिमालयातल्या गुंफांमध्ये साधना करतात; आणि हिवाळ्यात दक्षिणेत यात्रा करतात. त्यांच्यापैकी बरेच जण रामेश्वरपर्यंत जातात, रामेश्वर हे भारताचे दक्षिणेकडचे टोक आहे. नंतर हजारो किलोमीटर पायी प्रवास करत ते पुन्हा उत्तरेकडे परततात.

दक्षिणेकडे यात्रा आणि पुन्हा उत्तरेकडे परतीचा प्रवास हे यात्रेचे वार्षिक चक्र अगस्त्य मुनींच्या काळापासून सुरू झालं. आज अशा लोकांचं प्रमाण घटलंय; पण एक वेळ अशी होती जेव्हा शेकडो-हजारो योगी अशी यात्रा करायचे. पण त्या काळात हा महिना त्यांच्यासाठी खूपच अडचणींचा होता. कारण याच महिन्यात मान्सून जबरदस्त पाउस पडायचा.

आज मान्सूनची तीव्रता फारच कमी झाली आहे, पण त्याकाळी मान्सून म्हणजे एक भयंकर नैसर्गिक प्रकोपच असायचा. मान्सून चा शब्दशः अर्थच विशिष्ट वेग आणि रौद्रता असा आहे. निसर्गाने भयंकर रूप धारण केले की पायी प्रवास अवघड व्हायचा. म्हणून सर्वसाधारणपणे असं ठरलं होतं, की या महिन्यामध्ये प्रत्येकाने जेथे शक्य आहे तेथे आश्रय घ्यावा.

त्यानंतर पुष्कळ काळ उलटल्यावर गौतम बुध्दांनी त्यांच्या भिक्षूंना या एका महिन्यासाठी विश्रांती घेण्याची आज्ञा केली. कारण या कालावधीत प्रवास करणे खूपच जिकिरीचे असल्याने प्रतिकूल हवामानापासून भिक्षूंचं संरक्षण व्हावं हाच यामागचा उद्देश होता. या काळात भिक्षू एकाच जागी वास्तव्य करत असल्यामुळे त्यांनी संपूर्ण महिनाभर अखंड गुरुस्मरण करत असणे रुढ झाले.

जगातील सर्व धर्मांच्या आरंभा आधीपासून गुरु पौर्णिमा साजरी केली जात आहे

हजारो वर्षे, मानव जातीसाठी नवनवीन शक्यता उपलब्ध करून देणारा दिवस म्हणून गुरु पौर्णिमा ओळखली जाते व साजरी केली जाते. आदियोगीने जे योगविज्ञान मानवजातील उपलब्ध करून दिलं ते कोणत्याही धर्माच्या आरंभा आधीचे आहे. लोकांनी मानवतेला परस्परविरोधी अनेक छोट्या छोट्या गटांमध्ये विभागण्याचे मार्ग शोधण्याआधी, जे आज दुरुस्त करणे दुरापास्त होऊन गेले आहे, आदियोगीने मानवी चेतना वाढविण्यासाठी आवश्यक असणार्‍या शक्तीशाली साधने निर्माण करून त्यांचा अभ्यास आणि प्रसार देखील सर्वत्र केला. हजारो वर्षांपूर्वी, आदियोगीने मानवी यंत्रणेचे रुपांतर अदभूत शक्यतांमध्ये करण्यासाठी, शक्य असणारे सर्व मार्ग शोधून काढले.

हजारो वर्षे, मानव जातीसाठी नवनवीन शक्यता उपलब्ध करून देणारा दिवस म्हणून गुरु पौर्णिमा ओळखली जाते व साजरी केली जाते.

या परिष्कृत विज्ञानाची आधुनिकता अविश्वसनीय आहे. त्या काळी लोकं इतकी सुधारलेली आधुनिक होती का हा प्रश्न प्रासंगिक नाहीये कारण हे ज्ञान एका विशिष्ट संस्कृतीतून किंवा विचारसरणीतून आलेले नाही. हे आंतरिक साक्षात्कारातून आले आहे. त्याच्या सभोतली काय घडत होते त्याचा याच्याशी काहीही संबंध नव्हता. त्याच्या आत्मसाक्षातकारातून अनुभवलेल्या एकात्मतेच्या ध्यासाने त्याने स्वतःलाच विश्वकल्याणासाठी प्रस्तुत केलं. मानवी यंत्रणेमधील प्रत्येक अंगात असलेली शक्यता कशी खुली करता येईल हे त्यांनी अत्यंत तपशीलवार दाखवून दिलं.

अगदी आजही आपण त्यामधील एकही गोष्ट बदलू शकत नाही कारण जे काही सांगण्यासारखे होते ते त्यांनी अगोदरच अतिशय सुंदर प्रकारे आणि बुद्धी कौशल्याने सांगून ठेवले आहे. आपण केवळ ते आकलन करून घेण्यासाठी आपले आयुष्य खर्च करू शकता.

आपण गुरु पौर्णिमा का साजरी करण्याचे का थांबवलं आहे?

गुरु पौर्णिमेचा संबंध मोक्ष आणि मुक्तीशी आहे, एक अशी शक्यता जी मानवाला कधीही माहित नव्हती. तुमचे अनुवांशिक गुणधर्म काय आहेत, तुमचे पूर्वज कोण होते, किंवा तुम्ही कोणत्या मर्यादा घेऊन जन्माला आलात किंवा कोणत्या मर्यादा घालून घेतल्यात असलात तरी काही हरकत नाही, तुम्ही जर प्रयत्न करण्यास राजी आहात तर तुम्ही त्या सर्व मर्यादा मोडून प्रगती करू शकता. हा दिवस यासाठी ओळखला जातो आणि म्हणूनच हजारो वर्षे या संस्कृतीत हा एक महत्वाचा उत्सव म्हणून ओळखला जात होता.

प्रत्येक व्यक्तीने हे केलं पाहिजे. या गुरु पौर्णिमेला, कामाला जाऊ नका. सुट्टीचा अर्ज करा, आणि सांगा, “गुरु पौर्णिमा आहे, म्हणून मी कामाला येऊ शकत नाही.”

पण गेल्या 300 वर्षात आपल्यावर राज्य करणार्‍या राज्यकर्त्यांच्या स्वतःच्या काही स्वार्थी योजना होत्या. त्यांच्या असे लक्षात आले की, जोपर्यंत हे लोक अध्यात्माच्या धाग्याने एकमेकांशी घट्ट बांधले गेले आहेत, तोपर्यंत तुम्ही त्यांच्यावर राज्य करू शकत नाही. गुरु पौर्णिमेचा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून का जाहीर केलेला नाही? रविवार हा सूट्टीचा दिवस का असावा? रविवारी आपण काय करता – बटाट्याचे चिप्स खात टीव्ही बघत बसता. एवढंच. काय करावे हे देखील तुम्हाला कळत नाही! पण जर पौर्णिमा किंवा अमावास्येच्या दिवशी सुट्टी असेल, तर त्या दिवशी काय करावे हे आपल्याला अचूकपणे माहित आहे.

प्रत्येक व्यक्तीने हे केलं पाहिजे. या गुरु पौर्णिमेला, कामाला जाऊ नका. सुट्टीचा अर्ज करा, आणि सांगा, “गुरु पौर्णिमा आहे, म्हणून मी कामाला येऊ शकत नाही.” तुमच्या सर्व आप्तेष्टांना गुरु पौर्णिमा आहे म्हणून सुट्टीचा अर्ज द्यायला सांगा. या दिवशी तुम्ही काय केले पाहिजे? हा दिवस तुमच्या आंतरिक कल्याणासाठी समर्पित करा, हलका आहार घ्या, संगीत ऐका, ध्यान करा, चंद्राला पाहत राहा – आपल्यासाठी हे अतिशय विलक्षण असेल कारण वर्षातील सर्वात मोठ्या दिवसानंतर येणारी ही पहिली पौर्णिमा आहे. या दिवसाचे महत्व इतर किमान दहा लोकांना सांगा.

जो दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे तो आपल्यासाठी सुट्टीचा दिवस असावा ही वेळ आता आली आहे. किमान गुरु पौर्णिमेच्या दिवशी तरी सार्वजनिक सुट्टी असणे आवश्यक आहे म्हणजे लोकांना या दिवसाचे महत्व लक्षात येईल. मानवी जीवनावर परिणाम करणारी एवढी मोठी घटना घडत असलेला हा दिवस असा वाया घालवून चालणार नाही.

Register For Guru Purnima