सद्‌गुरु: तुमच्या भोवती असलेल्या प्रत्येक गोष्टींचा तुम्ही एक अविभाज्य भाग आहात. मनुष्य आणि विश्व या दोन्ही गोष्टी पंच महाभूतांपासून निर्माण झालेल्या आहेत. योग प्रणालीमध्ये, या पंचतत्वांवर प्रभुत्व मिळवल्यास तुम्ही तुमचे आंतरिक तसेच बाह्य अशा दोन्ही पर्यावरणांचा व्यवस्थित सांभाळ करू शकता; या दोन्ही अविभाज्य गोष्टी आहेत. परंतु मानवी चेतना येवढी विस्कळीत आणि अस्ताव्यस्त झाली आहे की परस्पर-निर्भरता हा केवळ एक सिद्धान्त नसून,ती एक वास्तविकता आहे हे लोक विसरले आहेत. योगाची एक अनुभवात्मक अवस्था म्हणजे तुम्ही तुमच्या हाताचे बोट जसे प्रत्यक्ष अनुभवता त्याचप्रमाणे पृथ्वी सुद्धा तुमचा स्वतःचाच एक अविभाज्य अंग असल्याप्रमाणे प्रत्यक्ष अनुभवता.

ईशा फाऊंडेशनने सुरू केलेला ‘नदी अभियान’ (रॅली फॉर रिव्हर्स) हा उपक्रम या जैविक दृष्टीकोणातून साकार झाला आहे की व्यक्तिगत मनुष्य आणि पृथ्वी यांना विभक्त करता येणार नाही. पाणी आणि सुपीक मातीच्या गुणवत्तेत आणि उपलब्धतेत गंभीर स्वरूपात घट होत असल्याची काळजी कोणत्याही विचारधारेचे समर्थन किंवा राजकीय पाठिंब्यासाठी प्रदर्शित केलेली नाही; तर ही चिंता पर्यावरणीय असतानाच आपल्या अस्तित्वाची देखील चिंता आहे. माती आणि पाणी या काही सामान्य वस्तु नाहीत, त्या जीवन साध्य आणि घडवणारे अनमोल साहित्य आहेत. मानवी शरीराची मूलभूत रचना 72 टक्के पाणी आणि 12 टक्के माती अशी आहे.

एक स्थिर पाया

आपण जेंव्हा खरोखरच पर्यावरणाशी असणारा आपला पंचभूतजनित मूलभूत संबंध समजावून घेऊ तेंव्हाच आपण अधिक शक्यता आजमावून पाहणे शक्य होण्यासाठी एक स्थिर पाया उभारू शकू. सूक्ष्म शरीरशास्त्रामध्ये मुलाधारा चक्राचे हेच महत्व आहे; स्थिर, आधारभूत पाया असल्याशिवाय, ब्रम्हांडाचे इतर आयाम अनुभवणे अशक्य आहे. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्या भौतिक आणि अस्तित्वात्मक वास्तवापासून पुर्णतः दुरावलेल्या मानसिक विश्वात वावरत असतो. निसर्गाने जरी मानवाला आत्म-जागरुकतेच्या असामान्य पातळीवर विकसित केले असले, तरीसुद्धा आपण ही बढती स्वीकारण्यास नकार देत आहोत!

सध्या आपल्यासमोर असलेली पर्यावरणाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. निसर्गाला ज्या गोष्टी निर्माण करण्यास लक्षावधी वर्षे लागली, त्या गोष्टी आपण एकाच पिढीत नष्ट करून टाकणार आहोत असे दिसते. असा अंदाज आहे की 2030 पर्यन्त आपल्या देशाला आवश्यक असणार्‍या पाण्याच्या फक्त 50% पाणी आपल्याकडे उपलब्ध असेल.

विनाशाकडे वाटचाल

आपल्या बहुतांश नद्या वन-पोषित असण्याने, त्यांचे पुंनरुत्थान करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अधिक झाडे लावणे. परंतु मातीमधील जैविक घटक झपाट्याने कमी झाले आहेत आणि वाळवंटीकरणाचा झपाट्याने वाढत असणारा वेग धोक्याची सूचना देणारा आहे. या देशातील मातीचा कस आणि सुपीकता घटण्याचे प्रमाण येवढे गंभीर आहे की पुढील तीन ते पाच वर्षांत भारतीय शेतजमिनींपैकी 25% जमिनी शेतीयोग्य राहणार नाहीत. चाळीस वर्षांच्या कालावधीत, 60% पेक्षा अधिक जमीन शेतीयोग्य राहणार नाही असा अंदाज आहे.

मातीमधील सेंद्रिय तत्व वाढवण्याचा एकमेव उपाय म्हणजे वृक्षारोपण आणि प्राण्यांची विष्ठा. अन्न उत्पन्न करण्याची आपली क्षमता जर आपण नष्ट केली, तर आपण एका महाभयंकर अनर्थाच्या दिशेन वाटचाल करू हे निश्चित. झाडेझुडपे, वनस्पतींचा आभाव आणि वाढत्या अनियंत्रित शहरीकरणामुळे, पूर आणि दुष्काळाची भीषणता दरवर्षी वाढतच आहे. गेल्या १२ वर्षात, जवळपास ३ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शेती करणे हा एक हृदय पिळवटून टाकणारा व्यवसाय बनलेला आहे.

जागे होण्याची वेळ आली आहे

पण आशेचा किरण अजूनही दिसतो आहे. ही भूमी असाधारण प्रतिसाद देणारी एक अलौकिक भूमी आहे, जी तिच्या अद्यापही अविश्वसनीय जैविक वैविध्यातून दिसून येते. प्राचीन ऋषींनी जेंव्हा या भूमीचा उल्लेख ‘पवित्र भूमी’ असा केला होता तेंव्हा त्यात कोणतीही अतिशयोक्ती नव्हती. फक्त थोडीशी सतर्कता आणि वेळीच केलेल्या कृतीने, ही भूमी जगातील इतर कोणत्याही भूमीपेक्षा अधिक वेगाने सुजलाम-सुफलाम होऊ शकते.

चला, आपण सर्वजण जातीपातींच्या क्षुल्लक मदाभेदांच्या पुढे जाऊया. आपल्या शरीरातील अणु-रेणुचा प्रत्येक कण या ब्रम्हांडाशी सतत संवाद साधतो आहे हे जेंव्हा आपल्या खरोखर लक्षात येईल, तेंव्हा हे स्पष्ट होईल की आता आपण सर्वांनी जागे होण्याची वेळ आली आहे. आपल्या नद्या आपल्या जीवनरेखा आहेत. त्यांच्यावरील संकट एकत्रितरित्या एक ठराविक मुदतीत दूर करणे अत्यावश्यक बनले आहे. आपण ही जबाबदारी आता पुढे ढकलू शकत नाही. एका जबाबदार कृतीद्वारे आपण ही परिस्थिती पालटवू शकतो.