कंगना राणावत: श्रीकृष्ण, प्रोफेट मोहम्मद, श्रीराम, येशु ख्रिस्त, भगवान बुद्ध – यासारख्या पृथ्वीवर होऊन गेलेल्या सर्व दिव्य व्यक्तींच्या जन्माविषयी किंवा मृत्यूविषयी काहीतरी उल्लेख आढळून येतो. परंतु शिवाचा बाबतीत मात्र, मी असे वाचले आहे की ते स्वयंभू होते. शिव हे एलीयन किंवा परग्रहवासी आहेत अशी देखील मान्यता आहे. आणि अशी देखील समजूत आहे, की मनुष्य ज्या काही गोष्टींचा अनुभव घेतो – मग ती एखादी कल्पना असो, एखादा विचार, अगदी काहीही – तो त्यांच्यामध्ये बाह्य अवकाशातून, परग्रहवासीयांकडून प्रसारित केला जातो. तर मग आपल्यावर परग्रहवासीयांचे नियंत्रण आहे असे आपल्याला वाटते का?

सद्गुरु: हे पहा ज्या लोकांचा मानवी बुद्धिमत्तेवर विश्वास नाही, अशी लोकं बुद्धिमत्ता दुसर्‍या कोणत्या तरी ठिकाणांहून येईल या अपेक्षेने वरती पहात आहेत. अशा कित्येक महत्वाच्या गोष्टी आहे, ज्या दुर्दैवाने आजची पिढी संपूर्णपणे विसरत चाललेली आहे. उदाहरणार्थ, योगामध्ये, आम्ही पाठीच्या कण्याला “मेरूदंड” – म्हणजे विश्वाचा अक्ष असे म्हणतो. आज शास्त्रज्ञ हे मान्य करत आहेत, की हे एक अंतहीन जग आहे. या संस्कृतीत, आम्ही हे नेहेमीच सांगत आलो आहोत, की हे एक सतत विस्तारत असलेले विश्व आहे. 

अनुभवाचे केंद्र

वरकरणी पाहता, आपला पाठीचा कणा हा विश्वाचा अक्ष आहे असे म्हणणे मूर्खपणाचे वाटू शकेल. तर मग आपण असे का म्हणतो आहोत? विश्व अस्तित्वात आहे असा विचार आपण केवळ आपल्या अनुभवाच्या आधारे करतो. आपण जर काहीही पाहू किंवा अनुभवू शकलो नाही, तर विश्व अस्तित्वात आहे हे आपल्याला समजलेच नसते. केवळ आपल्या अनुभवामुळे, विश्व अस्तित्वात आहे. आणि हा अनुभव प्रसारित करण्याचे केंद्र म्हणजे आपल्या पाठीचा कणा आहे. 

 

आपण जर आपल्या पाठीच्या कण्याचे सर्व मज्जातंतू तोडून टाकले, तर आपल्याला आपले शरीरसुद्धा अनुभवता येणार नाही – विश्वाचा अनुभव घेणे तर खूप दूरची गोष्ट. आपण आपल्या पाठीच्या कण्याला विश्वाचा अक्ष असे म्हणत आहोत कारण आपली विश्व अनुभवण्याची क्षमता आपल्या पाठीच्या कण्यात केन्द्रित झालेली आहे.

या तत्वावर आधारित, या गोष्टींवर केवळ विश्वासच ठेवण्यासाठी नाही, तर त्याचा जीवंत अनुभव घेण्यासाठी मानवा जातीला आपण अनेक संधी निर्माण करून दिलेल्या आहेत. योग या शब्दाचा उगम येथूनच झालेला आहे. आपण आपल्या व्यक्तिमत्वाची मर्यादा ओलांडली की सर्वसमावेशक भाव आपोआपच निर्माण होतो.

“माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझे माझ्यावर प्रेम आहे. मी तुला मिठी मारतो, तू मला मिठी मारतेस” यामुळे आपण सर्वसमावेशक बनत नाही. हे सर्व थोडाच वेळ टिकेल. उद्या जर तुम्हाला आवडत नाही अशी कोणती गोष्ट त्याने केली, की ते संपुष्टात येणार आहे. योग म्हणजे तुमच्या शरीरासहित तुमच्या व्यक्तिगत स्वरुपाच्या सर्व मर्यादा पुसून टाकणे, ज्यामुळे तुमच्या व्यक्तिगत मर्यादांबरोबर तुमची ओळख न जोडता या ठिकाणी कसे बसायचे हे तुम्ही जाणाल.

शि-व- म्हणजे “ते जे नाहीये ते”

आपली शारीरिक रचना, मानसिक रचना, आणि भावनिक रचना यांना मर्यादा आहेत – ते कदाचित लहान किंवा मोठे असू शकेल. परंतु अशी काही परिमाणे आहेत, ज्यांना मर्यादाच नाहीत. ज्याला मर्यादा नसतात, ते अ-भौतिक स्वरूपाचे असते. आमचे लक्ष नेहेमीच त्या अ-भौतिक स्वरूपाकडे केन्द्रित केलेले आहे. म्हणूनच शिव सर्वात महत्वाचे ठरले, कारण शि-व म्हणजे “ते जे नाहीये ते” ते जे अ-भौतिक आहे. 

आपण ज्या योगींविषयी बोलत आहोत – तो एक मनुष्य आहे, की तो कुठल्या वेगळ्या ग्रहावरून आला आहे? ही एक खूप मोठी कथा आहे.

आपण ज्या योगींविषयी बोलत आहोत – तो एक मनुष्य आहे, की तो कुठल्या वेगळ्या ग्रहावरून आला आहे? ही एक खूप मोठी कथा आहे. आमच्याकडे आदियोगींवर एक पुस्तक आहे, ज्यामध्ये या विषयावर भाष्य करण्यात आलेले आहे, पण मी ते तुम्हाला समजावून सांगतो. जेंव्हा आपण शिवाविषयी बोलतो, तेंव्हा त्यांचे कोणीही पालक नाहीत. त्यांच्या जन्माचे ठिकाण नाही. त्यांना लहानपणापासून, मोठे होताना कोणीही पाहिलेले नाही. जेंव्हा लोकांनी त्यांना पाहिले, तेंव्हा ते त्याच वयाचे होते. आणि त्यांना कोठे मृत्यू आला हे देखील आपल्याला माहिती नाही. अगदी त्या काळातसुद्धा इतका हा महत्वपूर्ण माणूस, जर तो कोठे मृत्यूमुखी पडला, तर लोकांनी त्याचे एखादे स्मारक उभारायला हवे होते – तसे काहीही घडलेले नाही.

यक्षस्वरूप: परग्रहावरील जीव

जन्म नाही, मृत्यू नाही, पालक नाहीत, बहीण-भाऊ नाहीत – ते येथे होते हे सिद्ध करण्यासारखे काहीच नाही. याचा अर्थ असा होतो का की ते परग्रहावरून येथे आले असे आपण समजावे? तशी गरज नाही. परंतु आपण जर पुराणकथेत पाहिलेत, शिवाला सर्वसाधारणपणे “यक्षस्वरूप” म्हणून संबोधलेले आहे. “यक्ष” हे नेहेमीच अमानवी, परंतु या ग्रहाच्या नैसर्गिक वातावरणात, जंगलांमध्ये आणि इतर ठिकाणी अस्तित्वात
असलेले जीव म्हणून ओळखले जातात. तसे दर्शविण्यार्‍या अनेक गोष्टी आहेत, परंतु ते परग्रहावरून येथे आले असे सिद्ध करणारा कोणताही हमखास पुरावा उपलब्ध नाही.

आधुनिक विज्ञान मागे पडत आहे

योगकथांनुसार, शिव किंवा आदियोगी या पृथ्वीतलावर 60,000 ते 75,000 वर्षांपूर्वी एक मानव म्हणून अस्तित्वात होते असा अंदाज आहे. मी जेंव्हा पहिल्यांदा याचा उल्लेख केला, माझ्या भोवती असलेल्या इतर अनेक हुशार लोकांनी, जे माझ्यायेवढे भोळे नाहीत – किंबहुना अधिक हुशार, तरुण आहेत – ते म्हणाले, “सद्गुरु, आपण जर 75,000 वर्षे म्हणालात तर तुमच्यावर प्रचंड टीका होईल. शिव किंवा आदियोगी
अस्तीत्वात होते याचा एकमेव पुरातत्व शास्त्रानुसार पुरावा साधारण 12,600 वर्षांपूर्वीचा आहे. 12,600 ते 13,000, किंवा 14,000 वर्षे.” मी म्हणालो, ठीक आहे – 15000” आज पुरातत्व शास्त्राकडे हा पुरावा आहे की 30,000 वर्षांपूर्वी या देशातील काही भागांमध्ये नागरी संस्कृती अस्तित्वात होती.

मी, 15,000 पेक्षा अधिक वर्षे असे म्हणतो आहे, कारण पाश्चिमात्य देशांना ते मान्य होईल. मी जर 75,000 म्हणालो, तर ते त्याला विरोध करतील कारण त्यांची जगाची कल्पना केवळ 6,000 वर्षे जुनी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विश्वाची निर्मिती 6 दिवसांमध्ये झाली आणि हे विश्व केवळ 6,000 वर्षे जुने आहे. गेली अनेक शतके, ते ठामपणे हेच सांगत होते. आता हळूहळू ते त्यांची चूक दुरुस्त करत आहेत, कारण विज्ञानाने वेगळेच काही सिद्ध केले आहे. आपण पहाल, पुढील पन्नास वर्षांमध्ये, आपण गेली हजारो वर्षे बोलत असलल्या गोष्टींवर आधुनिक विज्ञान प्रकाश टाकेल.

Editor’s Note: Sadhguru’s book, “Adiyogi: The Source of Yoga,” a book like no other, this extraordinary document is a tribute to Shiva, the Adiyogi, by a living yogi. Available now as a downloadable ebook on Ishashoppe and as paperback on Amazon India