logo
logo

मंत्राचे सामर्थ्य

आज आधुनिक विज्ञान आपल्याला हे सिद्ध करून दाखवत आहे, की संपूर्ण अस्तित्व हे केवळ ऊर्जेची कंपने आहेत. जेथे कंपने होत असतात, तेथे ध्वनी निर्माण होतोच. म्हणून योगामध्ये आम्ही असे म्हणतो, की संपूर्ण अस्तित्व म्हणजे केवळ एक ध्वनी आहे, ज्याला आपण नाद ब्रम्ह असे म्हणतो. संपूर्ण निर्मिती म्हणजे ध्वनींचे गहन समाकलन आहे. ध्वनींच्या या जटिल जाळ्यात काही ध्वनी प्रामुख्याने महत्वाचे आहेत. या महत्वपूर्ण ध्वनींना मंत्र असे म्हंटले जाते. असे समजा की आपल्याला एखाद्या सभागृहात किंवा खोलीत बंद करून ठेवले आहे आणि आपण आपले संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी घालवले आहे. आता जर आपल्याला ती बंदिस्त जागा उघडण्याची किल्ली सापडली, जर त्या किल्लीचा वापर करून खोलीचे दार कसे उघडायचे हे जर आपल्याला माहिती असेल, तर तसे केल्याने आपल्यासाठी एक संपूर्ण नवीन जग उघडले जाईल. आपल्याला जर ती किल्ली कुठे सरकवायची हे माहिती नसेल, आपण ती जर जमिनीत किंवा छतावर चालवून बघितलीत, तर आपल्याला त्याचा काहीही उपयोग होणार नाही. किल्ली म्हणजे केवळ एक धातूचा छोटा तुकडा आहे, परंतु आपल्याला जर तिचा वापर कसा करायचा याची माहिती असेल, तर त्यामुळे आपल्यासमोर आपल्या अस्तित्वाचे एक वेगळेच परिमाण उघडू शकते.

आणि म्हणून, या दिव्यत्वाची माहिती करून घेणे आणि त्याचा अनुभव घेणे म्हणजे आपली ऊर्जा अधिक उच्च संधी प्राप्त करण्यासाठी विकसित करणे, आपल्या अंतर्मनाच्या सूक्ष्म परिमाणांना जाणून घेण्यासाठी विकसित करणे होय. महाशिवरात्री दरम्यान पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात, नैसर्गिकरित्या एक विशेष प्रक्रिया घडते ज्यामुळे मानवी शरीरात नैसर्गिक ऊर्जेचा प्रचंड प्रवाह होताना आढळून येतो. ऊर्जेच्या या नैसर्गिक प्रवाहाचा वापर करून घेण्यासाठी कोणालाही पाठीचा कणा ताठ ठेवून जागरण करणे आवश्यक आहे. जीवशास्त्रज्ञांनी दाखवून दिल्यानुसार, प्राण्यांच्या उत्क्रांतीमधील महत्वाच्या पायर्‍यांपाइकी एक पायरी म्हणजे पाठीचा कणा आडव्या स्थितीतून उभ्या स्थितीत येणे ही आहे. हा बदल झाल्यानंतरच मानवी बुद्धिमत्ता वाढली आहे. म्हणून आजच्या या रात्री ज्या व्यक्तींची आपल्या पाठीचा कणा ताठ ठेऊन जागरण करण्याची इच्छा आहे, त्यांना जागे ठेवण्यासाठी आम्ही शक्य ते सारे प्रयत्न करू. ऊर्जेच्या या नैसर्गिक प्रवाहाचा वापर करून घेऊन, योग्य मंत्र, ध्यान आणि संपूर्ण परिस्थिती यांच्या मदतीने कोणतीही व्यक्ती दिव्यत्वाच्या जवळ एक पाऊल पुढे सरकू शकते.

तार्किक विचार करणार्‍या व्यक्ती साहजिकच आश्चर्य प्रकट करतील की केवळ मंत्रांचा उच्चार करून काय होणार आहे. योग कथांमध्ये एक सुंदर गोष्ट सांगितली आहे. अतिशय सिद्ध महान सामर्थ्य प्राप्त एक योगी, एके दिवशी शंकरांकडे गेले आणि त्यांनी विचारले, “आपले सर्व भक्त हे मंत्र जोरजोरात का म्हणत आहेत? ते नक्की काय करत आहेत? आपण त्यांना हा मूर्खपणा थांबवायला का सांगत नाही?”

शंकराने त्यांच्याकडे पहिले आणि ते म्हणाले, “आपण एक गोष्ट करा.” त्याने जमिनीवर वळवळत चाललेल्या एका अळीकडे बोट दाखवले. “त्या अळीच्या फक्त जवळ जा, आणि शिव शंभो या मंत्राचा उच्चार करा, काय होते ते आपण पाहू.” त्या ज्ञानी योगींनी अतिशय नाइलाजाने तसे करायचे मान्य केले. ते त्या अळीच्या जवळ गेले आणि “शिव शंभो” असे म्हणाले. ती अळी ताबडतोब मरून पडली. ते पाहून त्या ज्ञानी योगींना धक्काच बसला. ते म्हणाले, “असे कसे घडले, केवळ या मंत्र उच्चाराने ही अळी मरण पावली.” मग शंकरांनी हसून जवळपास उडत असणार्‍या एका फूलपाखराकडे बोट दाखवले. ते म्हणाले, “या फूलपाखरावर लक्ष केन्द्रित करून ‘शिव शंभो’ असे म्हणा.” ज्ञानी योगी म्हणाले, “नाही, मला त्या फूलपाखराला ठार मारायचे नाही.” शंकर म्हणाले, “प्रयत्न करा.” ज्ञानी योगींनी फूलपाखराकडे पाहिले आणि ते ‘शिव शंभो’ असे म्हणाले. ते फुलपाखरू सुद्धा मरून पडले. ते ज्ञानी योगी अतिशय अस्वस्थ झाले आणि म्हणाले, “मंत्रांमुळे जर असा परिणाम होत असेल, तर मग हे मंत्र उच्चारुन काय फायदा!” शंकरांच्या चेहेर्‍यावरचे हास्य मात्र तसेच राहिले, आणि अरण्यात मुक्तपणे विहार करणार्‍या एका हरिणाकडे त्यांनी बोट दाखवले, आणि म्हणाले “या हरिणावर लक्ष केन्द्रित करून ‘शिव शंभो’ असे म्हणा.” ज्ञानी योगी म्हणाले, “नाही, मला त्या हरिणाला ठार मारायचे नाही.” शंकर म्हणाले, “काही हरकत नाही, पण आपण हा मंत्र म्हणा. त्या ज्ञानी योगींनी हरिणाकडे पाहिले आणि ते ‘शिव शंभो’ असे म्हणाले. आणि ते हरिण मरण पावले. ते पहाताच ते अतिशय अस्वस्थ झाले. ते म्हणाले, “या मंत्राचा उपयोग तरी काय आहे. यामुळे तर सर्वजण मरण पावत आहेत.”

त्यानंतर एक माता तिच्या नवजात शिशुला शंकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी घेऊन आली. शंकरांनी ज्ञानी योगींकडे पाहिले आणि ते त्यांना म्हणाले, “आपण या बाळासाठी का बरे मंत्र म्हणत नाही?” ते म्हणाले, “नाही, मला अशी कोणतीही गोष्ट करायची नाही. मला त्या बाळाला मारायचे नाही”. शंकर म्हणाले, “प्रयत्न करा.” त्याने त्यांना डिवचले. मोठ्या जड अंतःकरणाने ते ज्ञानी योगी त्या लहान बाळाजवळ गेले आणि म्हणाले, “शिव शंभो.” त्याबरोबर ते मूल उठून उभे राहिले आणि म्हणाले, “मी एक अळी होतो, आणि केवळ एका मंत्राने आपण माझे रूपांतर फूलपाखरात केलेत. आणखी एका मंत्राने आपण माझे रूपांतर हरिणात केलेत. आणखी एकदा मंत्र म्हणून आपण माझे रूपांतर मनुष्य प्राण्यात केलेत. आता आणखी फक्त एकदाच मंत्रोच्चार करा, मला दिव्यत्व प्राप्त करायचे आहे.

– सद्गुरूंच्या महाशिवरात्री 2010 मधील प्रवचनातील उतारा

Related Content

विभूती: पवित्र राख